Tuesday 20 October 2015

चैतन्य - प्रवासाचे १ वर्ष

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

गेल्या दसऱ्याला मी आणि माझ्या काही मित्रांनी, मैत्रिणींनी मिळून एक उपक्रम सुरु केला… आमच्यापैकी प्रत्येकाला काहीतरी सामाजिक उपक्रम करावा असे वाटत होते आणि त्यातूनच एक विचार सुरु झाला, आमच्यापैकी प्रत्येकजण एकतर job करत होते किंवा शिक्षण घेत होते… मग वेळ मिळणार कसा ह्यासाठी? तर मग असे ठरले की आपापले job आणि शिक्षण सांभाळून महिन्यातील एक दिवस (सुट्टीचा) ह्या कामासाठी द्यायचा, दर महिना आपण जे कमावतो त्यातील एक फूल न फुलाची पाकळी बाजूला काढायची, ती एकत्र जमा करायची आणि त्यातून अशा काही संस्थांना आपल्याकडून जमेल तशी मदत करायची… त्यासाठी मग कुठे मदत करायची असा एक प्रश्न आला आणि नाव सुचलं ते " आनंदवन  "… आनंदवन मला सुचण्यामागच अजून एक कारण म्हणजे माझी आत्या आणि काका सुद्धा आनंदवन साठी मदत करतात, सक्रिय भाग घेतात… मग पहिल्या महिन्यातील जमा झालेली रक्कम आम्ही आनंदवनला पाठवली, पण इथेच थांबायचं नव्हतं , आम्हाला त्या संस्थांचं काम बघण्यात अजून उत्सुकता होती आणि आनंदवनला आपापल्या कामामुळे भेट द्यायला लगेच जमणार नव्हते… मग मी कुठेतरी वात्सल्य बद्दल ऐकलं होतं, आणि मुंबई मधेच असल्याने तिथे एखाद्या सुट्टीच्या दिवशी भेटही देता येत होती… मग लगेचच पुढचा उपक्रम, वात्सल्य मधील मुलांना आम्ही दिवाळीनिमित्त खाऊ देण्याचे ठरवले… आणि अशारीतीने त्यानंतर अनेक उपक्रम करत "चैतन्य" ह्या आमच्या socially connected friends चा ग्रूप तयार झाला आणि मग गेले वर्षभर ह्या ग्रूप तर्फे आम्ही बऱ्याच activities केल्या…त्या activity आज मी संक्षिप्त स्वरुपात माझ्या ह्या blog मध्ये लिहित आहे -


----  जसं वर नमूद केल त्याप्रमाणे आमच्या activity ची सुरुवात आनंदवनपासून झाली… मग वात्सल्य ह्या संस्थेतील मुलांना दिवाळीनिमित्त खाऊ देण्यात आला… पण काही दिवसांनी आम्ही वात्सल्य ला प्रथम भेट दिली, तिथली मुलं, आणि तिथला अनुभव http://prathamesh10dulkar.blogspot.in/2014/12/blog-post_15.html ह्या मझ्या ब्लॉग मधून मांडायचा एक प्रयत्न केला…

---- त्यानंतर आनंदवन आणि वात्सल्य ह्यांच्यासोबत नियमित काहीनाकाही आमच्या activity सुरु होत्या, पण मग आम्ही ठरवल कि वात्सल्य मधील मुलांना कुठेतरी पिकनिकसाठी घेऊन जाऊ, एक दिवस… जागा ठरली आणि पिकनिक सुद्धा झाली, कमला नेहरू उद्यान , म्हातारीचा बूट … पिकनिक मध्ये मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता… हि पिकनिक होण्यासाठी मला अनेक मदतीचे हाथ लाभले, वल्लभ, स्नेहा , कीर्ती , सुवर्णा, शिल्पा असे अनेक लोकांनी एकत्र येउन ही पिकनिक होण्यास हातभार लावला… ह्या पिकनिक चा अनुभव मला आणि माझ्या सर्व मित्रांना बरच काही शिकवून गेला…

---- पिकनिक नंतर आम्ही अजून २ संस्थेला थोडीफार मदत केली… एक म्हणजे स्नेहालय आणि self एस्टीम foundation फॉर disables, स्नेहालय ही एक गतिमंद आणि मतीमंद मुलांची शाळा आहे… त्या मुलांचे hand & eye co-ordination नित व्हावे ह्यासाठी वेगवेगळे उपक्रम ते करतात, तर त्या मुलांनी बनवलेल्या वस्तू विकून त्यांना आम्ही मदत करायचं ठरवल… १ मे २०१५ रोजी "सरस्वत हितवर्धक मंडळ " ह्यांच्या कार्यक्रमात आम्ही स्नेहालयचा एक छोटासा stall लावला होता आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला तिथे मिळाला… असाच एक stall self एस्टीम foundation फॉर disables ह्यांच्यासाठी लावला होता, राखी पोर्णिमा आधी आम्ही त्यांनी तयार केलेल्या राख्या विकून जी मदत जमा झाली ती आम्ही self एस्टीम foundation फॉर disables ना दिली…

---- त्यानंतर अनेक उपक्रम सुरु होते त्यात एक कल्पना सुचली, रद्दी कलेक्शन… रद्दी कलेक्शन मध्ये आपल्या घरी जे वर्तमानपत्र येते ते रद्दी मध्ये विकून महिना अखेरीस जे पैसे जमा होतील ते आनंदवन, वात्सल्य, स्नेहालय सारख्या संस्थांना मदत करण्यासाठी वापरण्यात येतील… सध्यातरी मुंबई मध्ये हा उपक्रम सुरु आहे, लवकरच पुण्यामध्ये हा उपक्रम सुरु करू जेणेकरून जास्तीतजास्त लोक आमच्यासोबत येतील…

तर ह्या दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही आमचा एक वर्षाचा प्रवास वात्सल्य ट्रस्ट आणि ओम साई वृद्धाश्रम ह्यांच्यासोबत दसरा साजरा करून करणार आहोत… ह्या एक वर्षभरात अनेक लोक माझ्यासोबत ह्या कामात माझ्या सोबत आले, माझ्यावर विश्वास दाखवला, त्या सर्वांचे आभार… अगदी सुरुवातीपासून स्नेहा, कीर्ती, शिल्पा , सुवर्णा, वल्लभ असे अनेक सोबत आहेत त्यात सध्या निलेश सारखे अनेक जण स्वताहून आमच्यासोबत ह्या उपक्रमात सहभागी होतात… ह्या आणि अश्या अनेक ज्यांची नावं कदाचित लिहायची राहून गेली त्या सर्वांचे आभार…

असाच लोभ ह्यापुढेही असावा…

प्रथमेश

Saturday 29 August 2015

बंधन प्रेमाचे

रक्षाबंधनच्या निमित्ताने एक छोटासा लेख.

सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दीक शुभेच्छा. रक्षाबंधन म्हणजे आपल्या बहिणीला मी तुझा रक्षणासाठी सदैव आहे हे सांगणे. मुळातच रक्षाबंधन हे एका स्त्री-पुरुषातील पवित्र नात्याचे प्रतिक आहे. राखी ही फक्त बहिणीने भावाला बांधावी का? जर एखाद्या पत्नीने तीच्या पतीला, एखाद्या मैत्रिणीने तिच्या मित्राला  राखी बांधली तर वावग असण्याचं काय कारण? मला तर अनेकदा माझी आई राखी बांधते, मला त्यात वावग अस काहीच वाटत नाही.

पण काळानुसार रक्षाबंधन हा सण बदलत चालला आहे. पूर्वी भाऊ जर आपल्या बहिणीपासून खूप लांब राहत असेल तर पोस्टाने राखी पाठवली जायची, अजूनही पाठवली जाते. त्याने काही प्रेम संपत नाही उलट लांब असून सुद्धा दुरावा कमी होत असे. पण बदलत्या काळात पोस्टाने राखी पाठवायची ही गोष्ट बदलली नाही, आजही अनेक बहिण भावातला दुरावा दूर होतो. पण बदल असा झाला की जवळ राहणाऱ्या बहिणींनाही राखी पोस्टाने पाठवावी लागते. म्हणजे कामाच्या रगाड्यात आपल्याला एक नाही तर अर्धा दिवसही भावासाठी किंबहुना ह्या सणासाठी मिळू नये? बरं हा प्रश्न फक्त बहिणीसाठी नव्हे तर भावालाही लागू होतो.  मूळातच आपण सण ह्यासाठी साजरे करतो की वर्षातून एकदा ह्या सणाच्या निमित्ताने आपली भेट होते, सर्व एकत्र जमतात, वातावरण आनंदी होतं. बरं माझं म्हणणं असही नाही की रक्षाबंधन च्या दिवशी कामं सोडून बहिणीने भावाकडे किंवा भावाने बहिणीकडे जावे, पण त्यानंतर येणाऱ्या रविवारी तरी एकत्र भेटून हा सण साजरा करावा.

काळाच्या ओघात सगळंच बदलत आणि ते बदललं पाहिजे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, पण पद्धती बदलल्या तरी माणसांनी बदलू नये, प्रेम कमी होऊ नये. रक्षा बंधानासोबत प्रेमाचे बंध सुद्धा दृढ व्हावेत हीच इच्छा.

प्रथमेश

Friday 21 August 2015

स्वातंत्र्य की स्वैराचार ?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आणि त्यांचा शासनातर्फे सन्मान करण्यात आला… बाबासाहेबांच्या वयाच्या ९४व्या वर्षी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा पुरस्कार त्यांना मिळावा हे विशेष… बाबासाहेबांनी वयाची कित्येक वर्ष शिवाजी महाराज आणि इतिहास ह्यासाठी खर्च केली. शिवाजी महाराज म्हणजे जणू त्यांचा श्वास. जाणता राजा चे कित्येक प्रयोग आणि राजा शिवछत्रपती ह्यांच्या आवृत्ती मधून शिवाजी महाराज समजून घेण्यात प्रत्येकाला मदत झाली. शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले राष्ट्रपुरुष. महाराजांचं नुसतं स्मरण केलं तरी एक उत्साह संचारतो. पण अशा शिवरायांच चरित्र ज्यांनी घरा घरात पोहोचवले त्या बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण देण्यावरून जो वाद झाला (तो निर्माण केला गेला) तो दुर्दैवी होता. इतिहासाबद्दल व्यक्ती व्यक्तीत दूमत असू शकते पण बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचं मोठे पण कमी कसं होईल? आणि विशेष म्हणजे जे लोक विरोध करत होते त्यांनी आधी स्वतःचा इतिहास जर तपासून पहिला तर आपण शिवाजी महाराजांबद्दल काही बोलण्यात किती योग्यतेचे आहोत हे त्याचं त्यांना कळून येईल.

आज हा विचार मांडण्याच कारण एवढंच १५ ऑगस्ट २०१५ रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला पण गेल्या काही दिवसांपासून, आठवड्यांपासून आपल्या देशात, महाराष्ट्रात जे सुरु आहे ते पाहून असं वाटत की आजकाल स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा समज झाला आहे. सुरवातच करायची झाली तर याकूब च्या फाशी हे त्याच ताजं उदाहरण. याकूबला जेव्हा फाशी देण्याच समजले तेव्हापासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबई मध्ये जे काही सुरु होत ते पाहून कळत नव्हत की फाशी एका गुन्हेगाराला होतेय की एका देशभक्ताला? अगदी आपल्या मिडीया पासून ते so called सेलेब्रिटी पर्यंत सर्वच ह्याला इतकं महत्व देत होते की लोकांमध्ये संभ्रमाच वातावरण होतं. मिडीया तर ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली हि बातमी चवी चवी ने खात होती, याकूब ने हे खाल्लं, मग त्याला कधी नेणार इत्यादी. काही महान व्यक्तींनी तर त्याची फाशी माफ व्हावी ह्यासाठी पत्र लिहिलं. मुळातच पहिली गोष्ट ही की ज्याला फाशी होत होती तो कोणी देशभक्त नव्हता, आणि एकदा न्यायालयाने फाशी दिली ह्याचा अर्थ हा होतो की सर्व पुरावे आणि साक्षिदार ह्यांच्या तपासणीतून जे सत्य समोर आलं त्यावर झालेला हा न्याय होता. मग एकाबाजूला आम्हाला लोकशाही मान्य आहे, न्यायालयावर विश्वास आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्याबाजूला त्याच न्यायालयाने दिलेल्या न्यायावर आक्षेप ठेवायचा? त्या स्फोटात जे कोणी आयुष्याला मुकले त्यांची ही एकप्रकारे मस्करी नाही का? आपण काय बोलतो आणि त्याचा लोकांवर काय परीणाम होतो ह्याचा विचार ह्या so called सेलेब्रिटीनी करायला हवा होता, कारण सामाजिक जीवनामध्ये असताना तुमचे विचार ह्यांना follow करणारे अनेक लोक असतात. उद्या प्रत्येक दहशतवाद्याला हेच वाटेल की काहीही केलं तरी आपल्याला फार मोठी शिक्षा होणार नाही.

आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य नक्कीच आहे पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. म्हणजे जेव्हा अमेरीकेवर जो हल्ला झाला तेव्हा काय दाखवावे आणि काय दाखवू नये ह्याच तारतम्य तिकडच्या मिडीया ने दाखवलं पण मुंबईवर जेव्हा २६/११ चा हल्ला झाला तेव्हा आपल्या मिडीयाने तर सर्वच सोडल होतं. ब्रेकिंग न्यूज च्या हव्यासापोटी आपण आपल्या देशाची सुरक्षितता धोक्यात आणतोय का? हा विचार मिडीया ने करायला हवा. जशी श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये एक पुसटशी रेषा असते तशीच स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. याकूब पासून ते सध्याच्या महाराष्ट्र भूषण वाद ह्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे स्वातंत्र्याचा झालेला चुकीचा वापर. तो होऊ नये हीच इच्छा, बाकी आपण सर्व सुज्ञ, विचारी आहोतच.

Wednesday 22 July 2015

टिळक… तुम्हाला विनम्र अभिवादन…

टिळक… तुम्हाला विनम्र अभिवादन… आज तुमची १६० वी जयंती… वाटतेय का हो कि आज आपल्या एका राष्ट्रीय नेत्याची जयंती आहे? ज्या नेत्याने भारताला स्वातंत्र्य मिळाव म्हणून कित्येक वर्ष तुरुंगात खर्च केली, ज्या नेत्याने स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे हे लोकांच्या मनात बिंबवल त्या नेत्याबद्दल आज कोणालाच फारशी माहिती नाही… टिळक, आज तुम्ही फक्त इतिहासाच्या एका पुस्तकात, नव्हे नव्हे तर त्या पुस्तकाच्या १-२ पानापुरते मर्यादित झाले आहात… ह्याचीच खंत आहे…

लहान असताना मला आठवतंय की मी तुमच्या जीवनावर असलेल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होतो… तेव्हा त्या स्पर्धेत बक्षिस मिळण ह्यापेक्षा आज मला जास्त आनंद ह्याचा होतो कि त्यासाठी मी तुमच्याबद्दल तेव्हापासून वाचत होतो… आजही कोणी मला झोपेतून उठवलं आणि टिळकांच भाषण म्हण म्हटल तर मी म्हणून दाखवेन, एवढ लक्षात आहे… म्हणजे माझे आई वडील आणि शिक्षक ह्यांचा वाटा जास्त आहे त्यात… त्यांनी मला वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध करून दिली, आणि मी ती वाचली… मुळातच जहाल मताचे असणारे तुम्ही आणि तुमचे जहाल विचार मला तेव्हापासून पटतायत… इतिहासाचं पुस्तक वाचताना तुमच्यावर जास्त लिहिलेलं असाव अशी माझी मनोमन इच्छा असायची, पण काय करणार, आमच्याकडे तुमच्या नंतर आलेल्या लोकांचं कौतुक जरा जास्तच आहे… असो, त्या वादात पडायचं नाही…

पण मला सर्वात जास्त राग तेव्हा येतो जेव्हा आजकाल काही लोक तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अनेक राष्ट्रपुरुषांना जातीच्या बेड्या घालतात… टिळक ब्राम्हणांचे असे म्हणून ब्राम्हण ब्राम्हणेतर हा वाद उगाच पण स्वतःच्या फायद्यासाठी आज लोक करतात… तो वाद करताना ह्यांना हेही माहित नसत की महाराजांचे चौथे वंशज ह्यांच्या विरोधात संस्थान खालसा करण्याच कट हे इंग्रज सरकार करत होत तेव्हा त्याला केसरी मधून वाचा फेडणारे तुम्हीच होतात, त्यासाठी तुरुंगवास भोगणारे हि तुम्हीच (तुम्ही आणि आगरकर) होतात आणि तुमची जामिनावर सुटका करणारे महात्मा फुले होते… असो हे माहित असण्यासाठी तुमच्याबद्दल फार वाचावं लागेल पण टिळक तुम्ही ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मंडालेला तुरुंगवास भोगलात ते स्वातंत्र्य काय फक्त ब्राम्हणांना मिळव ह्यासाठी नव्हत… असो…

पण टिळक, तुम्ही सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज खूपच लोकप्रिय झाला आहे… पण ह्या लोकप्रियते सोबत अनेक वादही आहेत… आज अनेक गणेश मंडळ स्थापन झालेली आहेत आणि नुकताच गणेशोत्सवाच्या मंडपावरून जो वाद झाला तो सर्वश्रुतच आहे… डीजे, डॉल्बी हे तर आजकाल गणेशोत्सवात नित्याचेच झाले आहे… नुसतं ध्वनिप्रदूषण आणि मंडप एवढाच हा वाद नाहीये, आज गणपतीची "उंची" हे लोक फुटावर मोजतायत आणि त्या प्रत्येक प्लास्टर च्या मूर्तीसोबत जलप्रदूषण सुद्धा होतंच आहे… सामाजिक प्रबोधन तर दूरच पण आज ह्यांचच प्रबोधन करायची वेळ आलीय कि काय असं वाटतंय… सर्वच मंडळ नाहीत तशी, काही खरच चांगल काम करत आहेत पण ती हाताच्या बोटावर मोजू एवढीच आहेत… पण, जर आज तुम्ही असतात तर कदाचित तुम्ही एक गाव एक गणपती योजना राबवली असतीत…

टिळक तुमच्याबद्दल जेव्हा मी वाचतो तेव्हा मला एक नवीन उर्जा मिळते, कुठलही संकट आलं तरी त्यावर मात करायची शक्ती मिळते… आणि आजपासून मी तुमची माहिती माझासोबत  इतरांना कळावी म्हणून प्रयत्न नक्की करेन… तुम्हाला पुन्हा विनम्र अभिवादन…

प्रथमेश तेंडुलकर

Tuesday 14 July 2015

दुर्गभ्रमंती :- पहिला गड - माहुली गड

          adventure किंवा ट्रेक ह्या सर्वाशी माझा कधी फारसा संबंध आलेला नव्हता तरी एकदा trek ला जाऊन लोकं ट्रेक ला अजून काय मजा करतात ती अनुभवायचं होत… रोजचं तेच तेच काम करून कंटाळा आलेला होता, शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोट ह्याबद्दल नितांत आदर आणि कुतूहल होत… आणि त्यातूनच ठरवल कि ट्रेक ला जायचं… पण कुठे ? मग शोध सुरु झाला आणि गड ठरला, माहुली गड…. मुंबई जवळच आसनगाव ह्या स्टेशन पासून हा गड जवळ आहे… मग माझ्यासारखेच जे रोजच्या कामाला कंटाळलेले आम्ही ३ मित्र निघालो आणि प्रवास सुरु झाला…


प्रवासाला आम्ही तशी तासभर उशिरानेच सुरुवात केली होती… दादर वरून सकाळी ७:३० ची ट्रेन पकडून आम्ही ९ ला आसनगाव स्टेशनला पोहोचलो… स्टेशन च्या बाहेरच रिक्षा असतात ती रिक्षा पकडून माहुली ह्या गावी पोहोचलो… रिक्षातून जातानाच आजूबाजूची हिरवळ बघूनच हे कळत होत कि आपण कॉंक्रिट च्या जंगलातून बाहेर आलो आहोत आणि निसर्गाकडे वाटचाल करीत आहोत… वाटेत जाताना आम्हाला काही लोक दिसले जे वृक्षारोपण करत होते… त्यांना विचारल्यावर असे समजले कि ते नाना धर्माधिकारी ह्यांच्या बैठकीतील लोक होते जे निसर्गाशी आपली बांधिलकी जपत होते… साधारण ४० मिनिटांनी आम्ही माहुली गावी पोहोचलो… तिथेच एका टपरीजवळ चहा घेतला, मस्त आलं घातलेला… आणि तिथूनच सुरुवात केली ट्रेक ला…


ट्रेक ला सुरुवात केली आणि प्रथम गणपती मंदिर लागले… कदाचित पुढे काही विघ्न येऊ नये हीच भावना असावी, बाप्पाला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो… आजूबाजूला घनदाट जंगल, पक्षांचे आवाज आणि शांतता… इतक शांत कि स्वतःच्या पावलांचा आवाज  ऐकू येत होता… पुढे गेल्यावर माहुली किल्ल्याचे पर्यटन केंद्र कार्यालय / टोलनाका दिसले, "टोल" म्हणजेच entry fees भरून आम्ही पुढे निघालो… साधारण १५ मिनिटे चालल्यानंतर एक छोटासा धबधबा दिसला पण आमच लक्ष गड गाठणे असल्याने धबधबा येताना बघू असे ठरवले आणि स्वारी पुढे निघाली… जसे जसे आत जात होतो तस जंगल अधिकच घनदाट होत होत… साधारण २ वर्षांपूर्वी तिथे एका चित्त्याचे वास्तव्य होते आणि १०-१२ लोकांना त्याने आपले भक्ष्य केलेले… पण हि माहिती मी माझ्याजवळच ठेवली :-D …




वर दिलेल्या फोटो मध्ये माहुली गडाकडे जाणारा रस्ता दिसत आहे आणि दुसर्या फोटो मध्ये गडाकडे जाण्याचे दिशादर्शक आहेत…

दिशादर्शकाच्या मदतीने आम्ही चालत राहिलो आणि साधारण १ तासाने आम्ही काही वेळासाठी थांबलो, साधारण १५ मिनिटांसाठी… ह्या फोटो मध्ये असलेल्या जागेवर आम्ही आराम करत होतो… पाय बरेच दुखत होते आणि पुढची वाट ह्यापेक्षाही अवघड होती…एक क्षण असा विचार आला कि आता बस, ह्यापुढे नाही जमणार पुढे जायला… पण तो शिवरायांच्या मावळ्यांचा, मराठ्यांचा अपमान ठरला असता… मनाचा निश्चय केला आणि पुन्हा गड चढायला सुरवात केली… तेवढ्यात मागून येणाऱ्या काही ग्रूपची मुलं आम्हाला join झाली आणि "हर हर महादेव" ची गर्जना करत सर्व गड चढू लागले… आयुष्यात पहिल्यांदा शिरायांचा मावळा झाल्याचा feel आला…

तिथून पुढच्या दीड तासात आम्ही गडावर होतो, म्हणजे एकूण अडीच तास लागले गडावर पोहोचायला… गडावर पोहोचल्यावर आम्ही गडावरून खाली दिसणारे निसर्गसौंदर्य बघत बसलो… आराम केला आणि महत्वाचं, खूप भूक लागलेली म्हणून जेवण जेवलो…

आराम करता करता तासभर कसा निघून गेला कळलच नाही आणि मग सुरु झाला परतीचा प्रवास… परतीचा प्रवास फार दमवणार नाही हा माझा अंदाज होता कारण येताना लागलेली चढण हि जाताना उतरण असणार होती पण  माझा अंदाज सपशेल चुकला… चढण चढण्यापेक्षा उतरण जास्त कठीण होत… अरुंद वाटा, एकाबाजूला मोठे खडक आणि दुसऱ्याबाजूला दरी, खोल दरी… भरीस भर म्हणून पडणारा पाऊस त्या वाटा निसरड्या करत होता… जर जरी तोल गेला तर गडाच्या माथ्यावरून थेट पायथ्याला जाण्याचा shortcut होता तो… तरी एकमेकांना मदत करत  पुढच्या २ तासात आम्ही गडावरून खाली आलो…


तरी गडावरून खाली येताना पुन्हा मागे वळून गडाकडे पहिले, आपलं घर सोडून बाहेर जाताना जसं वाटतं तसं वाटत होतं… महाराजांना स्मरून आम्ही गडाला निरोप दिला… आणि हो येताना धबधब्यात हात पाय धुतले आणि परतीच्या प्रवासाला निघालो…

अशाप्रकारे माझा पहिला ट्रेक झाला… ह्या ट्रेक ने मला खूप काही गोष्टी शिकवल्या… समोर असलेल्या संकटांवर मात करत आणि कितीही विश्वास डगमगला तरी ठरलेला निश्चय पूर्ण करण्यासाठी आम्ही केलेली यशस्वी मेहनत हेच शिकवते कि आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात पण न डगमगता विश्वासाने त्याला सामोरे जायचे असते आणि संकटांवर मात करायची… असा हा माझ्या आयुष्यातील पहिला मोठा ट्रेक मला खूप काही शिकवून गेला…

जय महाराष्ट्र

प्रथमेश तेंडुलकर

https://www.facebook.com/prathamesh.tendulkar.7/posts/934035196635117?ref=notif&notif_t=like

Monday 6 July 2015

स्मारकांच्या देशा...

आपल्या देशात स्मारक हे एक चर्चेचं आणि वादाचा विषय असतो… देशात अनेक स्मारक आहेत, आणि अजून काही होणार आहेत… पण बऱ्याच स्माराकांवरून ह्या आधीही वाद झाले आहेत आणि आजही होत आहेत… मुळातच एखाद्या व्यक्तीच स्मारक हा जितका लोकांच्या भावनांशी निगडीत विषय आहे तेवढाच राजकारणाचाही आहे…

आज ह्या मुद्द्यावर लिहायचं कारण एवढाच की काही दिवसांपूर्वी एक बातमी पाहिली कि प्रतापगड ढासळतोय… प्रतापगड म्हणजे शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचा साक्षिदार… स्वराज्यावरील मोठे, महाकाय संकट म्हणजे अफजल खान आणि त्याची स्वारी… त्याच अफजलखानाचा जिथे शिवरायांनी कोथळा बाहेर काढला आणि खान संपवला तो प्रतापगड… काही दिवसांपूर्वी हि बातमी वृत्तवाहिन्यांवर दाखवली होती… महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची दुरावस्था काही लपून राहिलेली नाही… बहुतांश गडावर हीच परिस्थिती आहे, एकतर गड ढासळतो किंवा मग गडावर जाणारे प्रेमवीर आपल्या प्रेमाची निशाणी त्या गडावर सोडून येतात ( बदाम आणि बाण )… अशी एकीकडे गडांची दुरावस्था असताना आपण मात्र स्मारकात अडकलोय… कितीतरी हजार कोटींच स्मारक उभारतायत म्हणे शिवाजी महाराजांचं, आनंदच आहे… भव्य स्मारक व्हाव हि माझीही इच्छा आहे,  आपला राजा कोण होता, किती महान कार्य आहे हे प्रत्येकाला कळाल पाहिजे पण शिवरायांच खरी स्मारके म्हणजे त्यांचे गडकोट आहेत… हेच काही हजार कोटी मधले काही पैसे गडकिल्ले संवर्धनासाठी वळवले तर तो इतिहास जिवंत राहील… स्मारक काय आज नाही तर उद्या होईलच पण हे दुर्ग कोसळले तर असे दुर्ग पुन्हा होणे नाही… ज्या काळी, ज्या भौगोलिक अवस्थेत हे गड-किल्ले बांधले आणि तेव्हा असलेली तंत्रज्ञानाची उपलब्धता लक्षात घेता, हे गड-किल्ले चमत्कारापेक्षा काही वेगळे नाहीत. अशा वास्तूंचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.

गड किल्ल्याच संवर्धन कस करायचं ह्याबद्दल मी मागे एकदा राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंट मध्ये वाचल होत… अतिशय अभ्यासपूर्ण अस लिहिलेल होत… त्याची link मी शेवटी दिली आहे, त्यावर जाऊन आपण वाचू शकता…  खर बघायला गेल तर गडांची काळजी घेण हे आपल्या सर्वांच काम आहे… ट्रेक ला जाताना गडावर कचरा होणार नाही हे पहाव आणि हे बदामवाल्यांनी गड हि आपली property समजून त्यावर आपली नाव कोरण टाळाव… ह्या सर्व गोष्टीला सरकारची साथ मिळायला हवी… आणि असे झाले तर ती खरी शिवरायांना दिलेली आदरांजली ठरेल…

जय महाराष्ट्र

प्रथमेश तेंडुलकर 

लिंक:- http://mnsblueprint.org/m_06_09_marathiPride_conservationOfForts.html

Saturday 16 May 2015

अणुऊर्जा :- शाप की वरदान

आज अणुऊर्जा ह्या विषयावर लिहायचं कारण एवढंच की गेले अनेक दिवस बातम्यांमध्ये एक मुद्दा खूप गाजतोय, तो म्हणजे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प… ह्या प्रकल्पाला विरोध सुद्धा आहे आणि समर्थन करणारे सुद्धा खूप आहेत… म्हणून माझ्यापरीने मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तीच माहिती मी इथे share करत आहे… कदाचित हि माहिती अपूर्ण असेल पण मला मिळालेल्या माहिती च्या आधारावर मी माझे मत व्यक्त करत आहे… ह्यात internet ह्या माध्यमाचा आणि मधु मंगेश कर्णिक ह्यांच्या जैतापूरची बत्ती ह्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला…

आज वीज निर्माण करण्यासाठी पाणी, कोळसा, सौरऊर्जा किंवा gas ह्याचा वापर केला जातो… अणू  पासून वीजनिर्मिती हे तंत्रज्ञान पाश्चिमात्य देशांचं विशेषतः अमेरीकेच… पण १९४५ साली हिरोशिमा नागासाकी प्रकारानंतर पहिल्यांदाच अणूऊर्जा आणि त्याच्या शक्तीचा प्रत्यय सर्व जगाला आला… भारताचा विचार करायचा झाला तर १९ डिसेंबर १९४५ रोजी टाटा institute ऑफ fundamental Researchची स्थापना झाली… त्यानंतर साधारण १० वर्षांनी डॉक्टर होमी भाभा, पंडित नेहरू ह्यांच्या समन्वयाने आणि कॅनडा च्या मदतीने भारतात न्युक्लिअर reactor बांधण्यास समर्थन दर्शवले… BARC ने प्रथमच तयार केलेला Cirus- Reactor ह्याच प्रयत्नातून जन्माला आला… त्यानंतर भारतात अणु-रेणू चे संशोधन सातत्याने सुरु राहिले… गेल्या पन्नास वर्षात भारतात २० अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत आणि त्यातले १७ प्रकल्प उभारणारे शास्त्रज्ञ वैज्ञानिक हे भारतीय आहेत हि अभिमानाची गोष्ट आहे… डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर राजा रामण्णा ह्यांची परंपरा जपत डॉक्टर अनिल काकोडकर ह्यांच्यासारखे अनेक अणुवैज्ञानिक आपल्याकडे आहेत…

सध्या विजेची जी गरज आहे ती येत्या ३०-४० वर्षात १० पटीने वाढणार आहे… त्यावेळी कोळसा आणि इतर स्त्रोत हे कमीच पडणार हे दिसतंय… तेव्हा समोर २ पर्याय येतात, एक सौरऊर्जा आणि दुसरा अणुऊर्जा… सौरउर्जेचा पर्याय ह्या सध्या तरी खूप महागडा आणि प्रचंड विस्तीर्ण जमीन मागणारा आहे… तेव्हा समोर एकमेव पर्याय उभा राहतो तो म्हणजे अणुऊर्जा… १९५४ - १९५५ नंतर देशात अनेक अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत ते पुढीलप्रमाणे :- तारापूर (महाराष्ट्र), रावतभाटा (राजस्थान), कल्पकम (तामिळनाडू), नरोरा ( उत्तरप्रदेश), काकरापार  ( गुजरात), आणि कैगा (कर्नाटक) येथे आहेत आणि त्यातून ४७८० megawatt वीज तयार होते…पण आपल्या देशात चांगल्या माहितीच्या आधी पोचते ती अफवा… अशा अनेक अफवा जस कि किरणोत्साराने माणसं मारणार, नपुंसक होणार, मुले अपंग होणार अश्या अनेक अफवा ह्या प्रकल्पाच्या बाबतीत पसरल्या, की पसरवल्या?

ह्या अफवांना अनिल काकोडकर ह्यांनी उत्तर देताना अस म्हटल आहे कि, अणुउर्जा प्रकल्पातून निघणारे उत्सर्जन हे अतिशय नगण्य असते, ह्यापेक्षा कितीतरी जास्त नैसर्गिक उत्सर्जनाला आपण रोज तोंड देत असतो… उलट अणुऊर्जा हि इतर कोळसा आणि इतर प्रकल्पांपेक्षा कितीतरी पटीने स्वच्छ प्रक्रिया आहे… अजून एक अफवा अशी होती कि अणुऊर्जा प्रकल्पामुळे पाण्यातील जीवांना धोका असतोजेव्हा … जेव्हा संयन्त्रातील वाढीव तापमानाचे पाणी समुद्रात सोडतात तेव्हा त्याची मर्यादा हि ७ अंश से. इतकी मर्यादित आहे आणि जैतापूर येथील ६ यंत्रे कार्यान्वित झाली तरी ५ अंश पेक्षा से पेक्षा कमी तापमानाचे पाणी सोडण्यात येईल आणि त्यामुळे जलचरांना कुठलाही अपाय होणार नाही… आणि राहिला प्रश्न भूकंपाचा तर चेर्नोबिल येथे जो भूकंप झाला आणि जी भट्टी उध्वस्त झाली ती अतिशय जुनी होती, प्रगत तंत्रज्ञान त्यात वापरले नव्हते उलट भारताच्या अणुभट्ट्यांची सुरक्षितता जगमान्य आहे,तारापूर अणुभट्टीची मूळ २५ वर्षाची मुदत संपण सुद्धा आपण ती पुन्हा कार्यान्वित करू शकलो ह्यावरूनच आपले तंत्रज्ञान किती प्रगत आहे ह्याचा अंदाज येतो… आणि जैतापूर भूकंप प्रवण भागात येत नाही… भारत सरकारच्या भूकंप विभाग च्या नकाशा नुसार हि जैतापूर प्रकल्पाची जागा विभाग ३ मध्ये येते…

प्रश्न एवढाच आहे की आगीमुळे अंग भाजते म्हणून आग हि व्यर्ज झाली का? नाही, तर तिचा योग्य वापर करून माणसाने स्वतःचे पोट भरलेच… सध्या आपली विजेची भूक वाढत चालली आहे तर ती भागवणे गरजेचे आहे म्हणून कोणताच पर्याय व्यर्ज नको… त्यावर त्या त्या विषयाच्या संबंधित लोकांनी एकत्र येउन अभ्यास झाला पाहिजे… शाळेत असताना विज्ञान शाप कि वरदान असा निबंध यायचा, विज्ञानाचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्हीसाठी करता येतो, फक्त तो कसा करायचा (चांगला करायचा की वाईट) हे आपल आपण ठरवायला पाहिजे… म्हणूनच जर विजेची गरज भागवणार असेल तर खरच अणुउर्जा हे आपल्यासाठी वरदानच ठरेल…

प्रथमेश तेंडूलकर

Thursday 23 April 2015

एका शेतकऱ्याचे मनोगत

सकाळी गुरु ठाकूर ह्यांची एक कविता वाचली आणि त्यावरून आज हि एक कविता सुचली…

काल अजून एका शेतकऱ्याचेआत्महत्या केली… रोज कुठेतरी शेतकरी आत्महत्या करतोय आणि दुर्दैवाने आपण अजूनही देशाला कृषिप्रधान म्हणतोय… अशाच एका शेतकऱ्याची कविता…



एका शेतकऱ्याचे मनोगत

गोड लागला ऊस म्हणून मुळासकट खाऊ नको…
शिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…

निरभ्र आहे आकाश, लावलीय त्याच्याकडे नजर
रक्ताचं झाल पाणी आणि सरकार दाखवतंय packagesच गाजर
चुकत असेल काही तर चपलेन हाण पण त्यांच्यात गणू नको
शिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…

दमत नसतो कधी राबून असा आमचा वेगळेपणा
१८ विश्व दारिद्र्य इथे तरी ताठ ठेवलाय कणा
साचून राहिलंय मनामध्ये ते बाहेर आणू कि नको
शिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…

मीही दिसेन तुला असाच एखाद्या फांदीवर लटकलेला
कामाने नाही पण संकटाने जीव आहे गुदमरलेला
मरताना मुलाला मात्र एकच सांगेन, बाबा तू तरी माझ्यासारखं बनू नको
काम कर दुसर एखाद पण शेतकरी मात्र बनू नको…

प्रथमेश तेंडूलकर



** कविता गुरु ठाकूर ह्यांच्या कवितेवरून सुचली म्हणून श्रेय गुरु ठाकूर ह्यांना आणि अशी कविता शेतकऱ्यावर सुचली म्हणून सरकारचे श्रेय अधिक…

Friday 17 April 2015

मैत्री… तुझी माझी …

अचानक हे असे काय झाले,
तुझे मन आणि माझे शब्द अनोळखीच झाले…

अनोळखी होतो जरी शब्द होते सोबतीला
साथ होती तुझ्या मनाची भावना समजायला…

आज ना साथ उरली ना साद उरली कोणाला द्यायला
शब्दच झाले पोरके मनाला भावना समजायला….

मन तरी बिचारे काय करेल, बावरले असेल बिचारे ते सुद्धा
निखळ मैर्त्रीच्या मध्ये कुठून आला इगोचा मुद्दा?

एकमेकांच्या चुका काढण्याची सवय मैत्री वर बेतली
शब्द माघार घेत नाही पाहून बिचार्या मनाने तरी माघार घेतली…

मैत्री दोघांनाही हवीय पण पहिली माघार कोण घेणार?
शब्दांवर मोठा झालेला इगो सोडून पुढे कोण जाणार?

मैत्री मध्ये नसावे हेवेदावे नसावेत शब्दांचे बाण
देवाकडे एकाच प्रार्थना, आमच्या जुन्या मैत्रीला परत आण ….

प्रथमेश तेंडूलकर

Thursday 9 April 2015

एक पत्र देवाला

प्रथमेश तेंडूलकर
                 मुंबई 
प्रति,
देवबाप्पा.

                                                  विषय:-  तुझ्या काही गोष्टी न आवडल्या बद्दल

          देवा, आज तुला पत्र लिहायची हि माझी पहिलीच वेळ… कदाचित बोलण्याच्या ओघात काहीतरी जास्त बोलून जाईन तर राग मानू  नकोस, थोड्या आमच्या भावना समजून घे…

          आज नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला आलो आणि येतानाच एक दुखद बातमी समजली… आम्ही ज्या चैतन्य ग्रूप तर्फे सामाजिक उपक्रम करतो त्या समूहातील एक मृदुला तांबे ह्याचं हृदयविकाराच्या झटक्याने दादर येथील त्यांच्या घरी निधन झाले… माझ्यासाठी हा एक अतिशय दुखद धक्का होता कारण काही दिवसांपूर्वीच त्याचं आणि माझ फोन वर संभाषण झाल होत, आम्ही आमच्या ग्रूप ला घेऊन जव्हार येथे जाणार होतो पण त्या आधीच हे अस झाल…

          देवा, तुला पत्र लिहायचं कारण एवढच की आज जगात खूप कमी चांगले लोक उरले आहेत, लोकांसाठी निस्वार्थीपणे काम करणारे लोक खूप कमी उरले आहेत… त्यातही तू एक एक करून सर्वांना अस आपल्यासोबत नेलस तर देवा एकदिवशी असे चांगले लोक पूर्णपणे जगातून संपतील… मला ह्याच गोष्टीची तक्रार आहे तुझ्याकडे… मी इतर काही लोकांसारखा नास्तिक नाही, म्हणून ह्या माझ्या छोट्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्या तुझ्या इच्छेने घडतात ह्यावर माझा ठाम विश्वास आहे… 

          देवा, तू सर्वांची परीक्षा घेतोस हे मला नीट माहित आहे… पण देवा परीक्षा घेताना इतका कठोर होऊ नकोस रे… परीक्षा द्यायला कोणीच नाही म्हणत नाही आहे, पण चांगल काम करणाऱ्यांची जास्त परीक्षा घेऊ नकोस, नाहीतर एकदिवशी देव ह्या संकल्पनेवरून लोकांचा विश्वास उडेल… तुझी आम्हाला गरज आहे, द्रौपदीच वस्त्रहरण होताना जसा तू श्रीकृष्ण रूपाने तिच्या मदतीला धाऊन आलास तसच चांगली माणसं संकटात असताना त्यांना मदत कर रे… दुर्दैव हेच आहे कि फार पूर्वीपासून हे असेच सुरु आहेत, म्हणजे बाजीरावाला चाळीस वर्षांच आयुष्य आणि औरंगजेबला नव्वद वर्षाचं आयुष्य हा जो प्रकार आहे ना तो बंद कर…

          तुझ्याशी असलेल्या नात्याने निदान हक्काने मी हे तुला सांगतो आहे… जर काही चुकल असेल तर माफ कर…


तुझा एक भक्त,

प्रथमेश तेंडूलकर

Wednesday 8 April 2015

मराठी चित्रपट, multiplex आणि वाद…

 मराठी चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये प्राईम टाईम मध्ये दाखवावा म्हणून राज्यसरकार ने विधीमंडळात काल एक मत दिले आणि त्याची अंमल बजावणी करण्याचे आदेश दिले… आदेश  येतो न येतो तोच काही हिंदी "celebrities" ची टिव टिव twitter वरून ऐकू आली… अनेकांनी स्वागत केले आणि अनेकांनी जाहीर विरोध केला… ह्या विरोधकांसाठी माझा एक ब्लॉग…

महाराष्ट्रात मराठी भाषा आणि त्या भाषेशी निगडीत सर्वच गोष्टींना प्राधान्य मिळायला हवे हे माझ स्पष्ट मत आहे… मराठी नाटक, मराठी सिनेमे, मराठी साहित्य हे सर्व मराठी भाषेशी निगडीत विषय आहेत… मराठी चित्रपटाच्या फायद्यासाठी जर राज्य सरकार काही करू पाहत असेल तर ह्या काही लोकांच्या पोटात दुखण्याचे कारण ते काय? एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय कि " आम्हाला आता choice उरलेली नाही…" choice ? काय पूर्ण दिवसभर मराठी चित्रपट दाखवणार अस हे बोलण आहे आणि तुम्हाला तुमच्या choice ची पडलेली आहे पण मराठी माणसाकडे एवढा दिवस कुठला choice नव्हता तेव्हा कुठे गेलेलात? म्हणजे तुमच्या choice  प्रमाणे आम्ही चित्रपट बघायचे ? कि मराठीत दर्जेदार सिनेमे नसतात?

हे तथाकथित celebrity ज्या माध्यमातून पैसा कमवत आहेत ते चित्रपट सृष्टी एका मराठी माणसाने निर्माण केली आहे… अगदी सुवर्ण कमळ वीजेता श्यामची आई पासून ते ऑस्कर ला जाणार्या श्वास पर्यंत मराठी चित्रपट आहेत…  एवढच कशाला, विहीर, देऊळ, नटरंग सारखे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे चित्रपट मराठीच आहेत… अहो एवढच कशाला… २६ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथात जे गाणं वाजल आणि ज्याला पहिल्या क्रमांकच बक्षीस मिळाल ते मराठी चित्रपटातील आहे आणि संगीतकार सुद्धा मराठीच आहेत… तरी तुम्ही मराठीचा दुस्वास करणार, कारण मराठी चित्रपट, मराठी माणूस म्हटला कि तुमची नाक आपोआप मुरडतात… मग हाच शहाणपणा तुम्ही दक्षिणेकडे शिकवता का?  तिथे आजही प्राइम टाईम मध्ये त्यांचे सिनेमे दाखवले जातात मग तुमचा विरोध मराठीलाच का? कि जाणूनबुजून केलेला हा विरोध आहे?

मुद्दा एवढाच आहे कि महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच अग्रस्थानी असेल आणि जर हे ऐकून कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी पोटदुखीच औषध घ्याव किंवा आमचे मराठी सिनेमे बघायला शिकावेत… नसेल जमत तर प्राइम टाईम सोडून इतर वेळी असलेले हिंदी किंवा इतर भाषिक (तुमच्या आवडीचे) सिनेमे बघा… कोणी अडवलय…

जय महाराष्ट्र

प्रथमेश तेंडूलकर

Monday 30 March 2015

मराठी शाळा जागवा आणि जगवा

आज मराठी शाळा ह्या विषयावर लिहायचे कारण हेच की गेल्या बर्याच दिवसापासून वृत्तपत्रांमध्ये मराठी शाळा टिकवा, मराठी शाळा जगवा अस बरच काही वाचायला मिळतंय..  कदाचित माझी मतं सर्वांनाच पटतील अस नाही पण ह्या सर्वांचा सारासार विचार व्हायला पाहिजे म्हणून हे माझ मत…

मराठी भाषा म्हणजे फक्त संभाषणाच मध्यम नाही… मराठी भाषा हा आपला अभिमान आहे, मराठी हि एक संस्कृती आहे… पण आपल्या महाराष्ट्रातच मराठी शाळा जगवा आणि वाचवा हीं ओरड ऐकायला मिळणे हे आपल दुर्दैव आहे… पण ह्यासाठी फक्त सरकारी धोरण जबाबदार आहे का? कि मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये घालणारे पालक? वास्तविक पाहता ह्यासाठी फक्त कोणा एकाला जबाबदार धरता नाही येणार…

सरकारी धोरणाबरोबर मराठी शाळा सुद्धा काहीप्रमाणात ह्यासाठी जबाबदार आहेत… आज लोकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल जो "अतिविश्वास" निर्माण झाला आहे त्याला ह्या लोकांपेक्षा मराठी शाळांचा बेजबाबदारपणा  सुद्धा काहीप्रमाणात जबाबदार आहे… एखादे पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात टाकताना त्यांचा विचार हा असतो कि आपल्या पाल्याला उत्तम प्रतीच शिक्षण मिळाव आणि ह्यात त्यांची काही चूक असते अस वाटत नाही… पण आपण तेच दर्जेदार शिक्षण मराठी शाळांमध्ये का नाही देऊ शकत? आज जगातल्या लोकांशी स्पर्धा करायची असेल तर आपल्याला इंग्रजी येणं अत्यंत गरजेच आहे पण त्या तोडीच (काही इंग्रजी माध्यमात शिकवल्या जाणार्या इंग्रजी च्या) इंग्रजी भाषेच शिक्षण आपण मराठी शाळात देत आहोत का? हाताच्या बोटावर मोजता यॆतिल अशा काही शाळांमध्ये दर्जेदार इंग्रजी शिकवलं जात पण अनेक शाळांमध्ये इंग्रजी हा विषय सुद्धा मराठीत शिकवला जातो…

पाल्याच प्राथमिक शिक्षण हे त्याच्या मातृभाषेत झाल तर तो विषय त्या पाल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजतो पण इतर विषयांसोबत जगाशी टक्कर घेताना त्या दर्जाच इंग्रजी भाषेच ज्ञान आपल्या मराठी शाळेत दिल गेल तर मला विश्वास आहे कि पालक स्वताहून मुलांना मराठी माध्यमात शिकायला पाठवतील… फक्त गरज आहे ती सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची… कोणा एका व्यक्तीला, संस्थेला दोष न देता अश्या शाळा निर्माण करू कि  मराठी शाळा टिकवा, मराठी शाळा जगवा अशी ओरड करायची गरजच लागणार नाही…

लेख संपवताना एक उदाहरण द्यावेसे वाटते कि एखाद्या पेपर वर दुसर्यापेक्षा आपली रेख मोठी करण्यासाठी दुसर्याची रेख रबर ने खोडण्यापेक्षा स्वतःची रेख मोठी कशी करता येईल ह्याचा विचार झाला पाहिजे… ह्यापुढे आपण असच काहीस करू आणि स्वतःची क्षमता वाढवू…

जय महाराष्ट्र

प्रथमेश तेंडूलकर

Friday 27 February 2015

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…

काल २७ फेब… आपण सर्व मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करत होतो… प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठीत बोलून आणि इतर अनेक उपक्रम साजरे करून हा दिवस साजरा केला असेल… पण आतापर्यंत आपण असे दिवस फक्त एका दिवसापुरते साजरे करतो आणि नंतर पुन्हा दुसर्या वर्षी येणाऱ्या दिवसाची वाट बघतो… हे एवढ्यापुरतच मर्यादित राहणार आहे का? ह्यातून मराठी भाषा आणि भाषेचे संवर्धन होईल? माझ्यासाठी मराठी ही एक फक्त भाषा नाही तर ती एक संस्कृती आहे आणि ती जपणे आणि वाढवणे हे आपल काम आहे…

आपल्या मध्ये मराठी रुजते ती जागा म्हणजे आपली शाळा… आज मराठी शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे… बरेचसे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत… असे का होत आहे ह्याचा कोणी विचार केला का? प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचं भविष्य उज्वल व्हाव हि माफक अपेक्षा असते आणि ती सर्वांची असते… पण अचानक असे काय झाले कि मराठी शाळा आपल्या महाराष्ट्रात वाचवायची वेळ आपल्यावर आली ह्याचा सारासार विचार आपण सर्वांनी केला पाहिजे… अस तर अजिबात नाही कि इंग्रजी माध्यमात काही वेगळ शिकवतात… पण मुळात फरक हा दर्जेदार शिक्षणात आहे… रात्रीच्या प्रकाशात चांदण्या चमकतात ह्याच कारण त्या सूर्यापेक्षा तेजस्वी झाल्या असा नाही तर सूर्य अस्ताला जातो म्हणून…

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत झाले कि ते त्या मुलांना लवकर अवगत करता येते हे सर्व मान्य आहे पण बाहेरच्या व्यावहारिक जगात जेव्हा इंग्रजी बोलण्याची वेळ येते तेव्हा आपण मागे पडणार नाही ना हा एक न्यूनगंड तयार होतो… त्यासाठी आपल्या मराठी शाळेतच मुलांसाठी दर्जेदार इंग्रजी का नाही शिकवत आपण? काही शाळांमध्ये शिकवलं जात दर्जेदार मराठी  सोबत इंग्रजी शिकवलं जात पण अनेक शाळांमध्ये अजून तेच होत नाही… इंग्रजी माध्यमाच्या तोडीच्या शाळा जर मराठी माध्यमात असतील तर मराठी शाळा वाचवा असे सांगायची गरजच लागणार नाही…

जोपर्यंत आपल्या मातृभाषेला आपण आपली व्यवहाराची भाषा बनवत नाही तोपर्यंत अमुक एक भाषा टिकवा हे सांगावे लागेल… आणि म्हणूनच आज एक संकल्प करू, आजपासून जास्तीत जास्त मराठीत बोलू… समोरचा नाही बोलला तरी चालेल पण जमेल तितक आपण संवाद मराठीतून करू आणि वर्षभर मराठीचा सन्मान करू…

जय महाराष्ट्र…

Friday 20 February 2015

चार्ली हेब्दो ते कॉ. पानसरे…

आज पहाटे कॉ. पानसरे ह्यांच्या निधनाची बातमी आली आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर अजून एक डाग लागला… आज ह्या विषयावर लिहिण्याच कारण एकच , काही दिवसापूर्वी चार्ली हेब्दो वरील हल्ल्याबद्दल आपल्याला सर्व माहित आहे… अमुक एका समुदायाच्या भावना दुखावल्यामुळे त्या व्यंगचित्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली… हे सर्व करणारा गट हा अतिरेकी होता हे सुद्धा स्पष्ट आहे… पण काही दिवसांपूर्वी कॉ. पानसरे ह्यांच्यावर हल्ला झाला आणि पुन्हा एकदा अश्या घटनेची आठवण झाली… मी चार्ली हेब्दो घटना आणि कॉ. पानसरे ह्यांच्यावरील हल्ला ह्याची बरोबरी करत नाही आहे… चार्ली हेब्दो वरील हल्ला आणि कॉ. पानसरे ह्यांच्यावरील हल्ला ह्यात साम्य एकच, ते म्हणजे दोन्ही वेळा माणूसकीला काळीमा फासणारी घटना होती…

तूर्तास हिंसा, अहिंसा जर बाजूला ठेवली तर आपल्याला एक कळेल कि हा हल्ला समोरच्या व्यक्तीचे विचार दाबण्यासाठी केलेला एक केविलवाणा पण क्रूर प्रयत्न होता… पण संतांसोबत ज्येष्ठ विचारवंतांची परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात हे व्हाव म्हणजे हे तर महाराष्ट्राची संस्कृती लोप पावत असल्याच लक्षण आहे… टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर अशा अनेक विचारवंतांची परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आणि आज विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐवजी आज ती वेगळ्या मार्गाने लढली जातेय… प्रत्येकाचे मत सर्वांना पटेलच अस नाही हे खरं आहे पण त्यासाठी समोरच्याला शारीरिक इजा करण्याचे प्रकार होत आहेत… कॉ. पानसरे हे त्या वृत्तीला बळी पडलेले अजून एक… काही महिन्यांपूर्वी नरेंद्र दाभोलकर ह्यांचासोबत असंच झालं होतं… पण ह्याने नरेंद्र दाभोलकर नावाची व्यक्ती आज जगात नाही पण त्यांच्या विचारांनी ती अंनिस च्या प्रत्येक कार्यकर्त्यात जिवंत आहेत… माणसाचा देह संपवता येतो त्याचे विचार नाही…

दु:ख ह्याच गोष्टीच आहे कि महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांनी हातात शस्त्र घेतली पण ती घेतलेली शस्त्र हे शौर्याचं लक्षण होतं पण आत्ता ह्या काहींनी घेतलेली शस्त्रे हे शौर्याच नाही तर क्रौर्याच लक्षण आहे… अश्या वृत्तींना आळा घालणे आपल्याच हातात आहे… बाकी आपला समाज सुज्ञ सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे… शेवटी कॉ. पानसरे ह्यांना विनम्र आदरांजली…

जय महाराष्ट्र…

प्रथमेश तेंडूलकर