Monday 30 June 2014

जात नाही ती जात…

कोणत्याही समाजाचे आर्थिक मागासलेपण दूर करणे फारसे आवाक्याबाहेरचे नसते. खरी गरज असते ती मानसिक आणि वैचारिक मागासलेपण दूर होण्याची. स्वातंत्र्यापासून ज्या वर्गाच्या हाती सत्तेच्या राजकीय आणि आर्थिक चाव्या आहेत त्या वर्गाला स्वत:चा समावेश राखीव वर्गात व्हावा असे वाटत असेल तर यापेक्षा अधिक दुर्दैव ते कोणते? ही अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा ते त्या समाजाच्या राजकीय अपयशाचे निदर्शक असते.

मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाच्या निमित्ताने अनेक मुद्दे पुन्हा उफाळून वर येण्याचा प्रयत्न होईल. आरक्षण आणि विशेषतः एका विशिष्ट जातीवर आधारित आरक्षण हा आज राजकारणाचा विषय झालेला आहे. आरक्षणाची मागणी करणारे, त्याला विरोध करणारे आणि काहीही न करता गप्प बसणारे हे सर्व आज आरक्षण ह्या शस्त्राचा वापर निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी करताना दिसत आहेत. मराठा समाजावरील आपले वर्चस्व कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने २००४च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहिरनाम्यात मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. पण १९८० मध्ये मंडल आयोगाने मराठा समाजाला 'उच्च' दर्जा दिला होता. त्यामुळे या प्रश्नी अभ्यास करण्याची जबाबदारी न्या. आर. एम. बापट यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागास आयोगाकडे सोपवण्यात आली. बापट आयोगाने २००८ मध्ये अहवाल सादर केला. त्यात सामाजिक मागासलेपणासाठी १२, शिक्षण ८ व आर्थिक मागासलेपणासाठी ३ अशी गुणांक पद्धत ठरवण्यात आली. त्या आधारावर मराठा समाजाला मागास समाज ठरवणे अवघड असल्याने या समाजाचा इतर मागास वर्गात (ओबीसी) समावेश करू नये, अशी शिफारस केली.

एका विशिष्ट समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्यांच्यासाठी आरक्षणाची मागणी करणार्यांनी आधी काही गोष्टी लक्षात घेण गरजेच आहे. आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही पण दिलेल्या आरक्षणाचा फायदा त्या त्या समाजातील गरजू लोकांना खरच होतोय का? स्वातंत्र्यानंतर ५० - ६० वर्ष नंतर सुद्धा जरी त्या समाजातील गरजू लोकांपर्यंत जर आरक्षणाचा लाभ पोहोचत नसेल तर ते आरक्षण कशासाठी? आजही अनेक लोक आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत आणि त्या उलट अनेक आर्थिक दृष्ट्या सधन लोक मात्र ह्याचा पुरेपूर वापर करत आहेत. हि सुद्धा एक प्रकारची विषमताच आहे. ह्यातून आंबेडकरांना जी समानता अपेक्षित होती हि कशी साद्ध्य होईल? आरक्षणाचा लाभ समाजातील प्रत्येक स्तरावर पोहोचला पाहिजे.

आणि एवढ करून सुद्धा अजून एक प्रश्न उरतोच. आज जे घटक किंवा ज्या जाती आरक्षणाच्या लाभातून बाहेर आहेत त्या जातीतील सर्वच लोक हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत? आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही? म्हणजे एकीकडे अनेक सधन लोक आरक्षणाचा फायदा घेतायत कारण त्यांच्या "जातीचा " समावेश आरक्षण क्षेत्रात होतो पण त्याच्याच उलट जे लोक अतिशय गरीब आहेत पण फक्त आणि फक्त आरक्षण नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेत येत नाही ह्यात कुठली समानता साधण्याचा प्रयत्न आपण करतोय?

कदाचित माझ हे म्हणणं वाचून काही लोकांना नक्की वाईट वाटेल. पण त्यांना मी एक सांगू इच्छितो कि आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही. आरक्षण हवेच पण सामाजिक समानते बरोबर आर्थिक समानता सुद्धा गरजेची आहे. आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिले तर त्याचा फायदा अधिकाधिक लोकांना होईल आणि तो सर्व समाजातील लोकांना होईल हे विशेष. 

Sunday 22 June 2014

महागाई आणि अच्छे दिन…???

काही महिन्यांपूर्वी लोक स्वप्न बघत होते…  स्वप्न कसलं, तर अच्छे दिन येण्याच, महागाई कमी होण्याचं आणि ह्या महागाईत होरपळून निघालेल्या जनतेला एक चांगलं सरकार मिळ्ण्याच… बहुदा हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे… अच्छे दिन आयेंगे ह्या tag line च्या मदतीने एक सरकार पूर्ण बहुमताने  उभं राहिलं… उभ राहिल म्हणण्यापेक्षा आपण, जनतेने ते बहुमताने निवडून दिलं… कारण एकच होतं आणि ते म्हणजे हे नव सरकार नक्की अच्छे दिन घेऊन येईल…

मोदींनी तीन वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये सत्तेत परतलेल्या जयललिता यांचे अनुकरण केले आहे.. सत्तेत आल्याआल्या जयललितांनी राज्याची अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी अनेक कटू निर्णयांचा धडाकाच लावला... यंदा लोकसभा निवडणुकीत ३९ पैकी ३७ जागा जिंकताना २०११साली खंबीरपणे राबविलेल्या कठोर निर्णयांचा घसघशीत लाभ त्यांच्या पदरी पडला. आता शेवटच्या दोन वर्षांमध्ये जयललितांना लोकानुनय करून पुन्हा निवडणूक जिंकण्यासाठी भरपूर वाव आहे... कारण त्यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीची बेगमी सत्तेच्या पूर्वार्धातच केली आहे. जयललितांच्या मॉडेलचा कित्ता गिरविणार् या मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातही कडवट निर्णयांच्या मालिकेचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे. सत्ता सोडताना काँग्रेसने खजिन्यात खडखडाट करून ठेवल्याचा शिमगा करीत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदींनी देशवासियांसाठी नव्या पर्वाची सुरुवात जीवघेण्या महागाईने केली आहे.देशवासियांना 'अच्छे दिन' येणार असल्याचे स्वप्न दाखवून केंद्रात सत्ता मिळवलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शुक्रवारी रेल्वेच्या प्रवासी भाड्यात अभूतपूर्व अशी १४.२ टक्के, तर मालवाहतुकीच्या भाड्यात ६.५ टक्के वाढ केली आहे. यामुळे रेल्वेच्या मासिक पासात तब्बल १०० टक्के आणि उपनगरी तिकिटांच्या दरात १० टक्के वाढ होणार आहे. परिणामी सेकंड क्लासचा पास दुपटीने महागणार आहे....

रेल्वेच्या भरमसाठ दरवाढीचा निर्णय काँग्रेस सरकारनेच घेतला होता... आम्ही केवळ त्याची नाईलाजाने अमलबजावणी करीत आहे, अशी बनवाबनवीही मोदी सरकार करीत आहे. नैसर्गिक गॅसच्या दुपटीने होऊ घातलेल्या दरवाढीचेही असेच होणार आहे. काँग्रेसच्या अनेक जनविरोधी निर्णयांच्या नावाने सोशल मीडियातून आगपाखड करणारे मोदी आता त्यांच्यासाठी सोयीचे ठरणारे अप्रिय निर्णय काँग्रेसच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अर्थात स्वतंत्र निर्णयक्षमता असलेल्या मोदी सरकारचा हा युक्तिवाद मोदींचा ब्रँड शाबूत ठेवण्यासाठी फारसा उपयुक्त ठरणार नाही... आज ना उद्या मोदी सरकारला अशा कटू निर्णयांचे पालकत्व पत्करावेच लागणार आहे. ह्या महागाईची झळ शहरी भागातील जनतेला विशेषतः मोदी सरकारला लोकसभेतील १३ खासदारांचा नजराणा देणाऱ्या दिल्ली आणि मुंबईकरांना सर्वाधिक बसणार आहे. दिल्लीकरांना विजेच्या दरवाढीचा चटका बसणार आहे, तर मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास किमान दुपटीने महागणार आहे....

सर्वसामान्यांच्या संयमाचा अंत बघणे म्हणजे विषाची परीक्षा घेण्यासारखे ठरले आहे. दिल्लीचे ४९ दिवस मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत लोकपाल विधेयक मंजूर करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि भाजप समर्थन देत नसल्याचा बहाणा करून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला... त्यावेळी केजरीवाल लोकप्रियतेच्या शिखरावर होते. पण त्यानंतर अंगलट येणाऱ्या निर्णयांच्या मालिकेने अल्पावधीत प्रस्थापित झालेल्या केजरीवाल ब्रँडचा तितक्याच वेगाने कडेलोट झाला. १४ फेब्रुवारी ते १६ मे अशा अवघ्या तीन महिन्यांच्या काळात त्यांचे राजकीय पतन झाले.... जनतेची सातत्याने निराशा करणाऱ्या काँग्रेसचा ऐतिहासिक धुव्वा उडाला. उत्तर प्रदेशातही सत्ताधारी समाजवादी पार्टीचा माज जनतेने असाच उतरविला. जयललितांचा कित्ता गिरविताना त्यांनी सत्तेच्या पहिल्या वर्षात जनतेला दिलेल्या सर्व वचनांची पूर्तता करून आपली विश्वासार्हता कायम राखली होती, हेही मोदींना विसरता येणार नाही....

एक-२ कटू निर्णयांमुळे काही लगेच मोदी सरकार बिनकामाच आहे असा अर्थ निघत नाही… हे सरकार ५ वर्षांसाठी आपण निवडल आहे पण येणाऱ्या अच्छे दिन साठी सुरवातीला मात्र बुरे दिन बघावे लागणार हे जवळपास निश्चित झालंय…कॉर्पोरेट जगताकडून पाठ थोपटून घेण्याच्या नादात निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची प्रामाणिकपणे पूर्तता करण्याऐवजी अप्रिय निर्णय लादण्यावरच भर दिला तर ‘बुरे दिन’ ओढवायलाही वेळ लागणार नाही, याचे भान मोदी आणि त्यांच्या सल्लागारांना बाळगावे लागणार आहे...

Sunday 15 June 2014

भय इथले संपत नाही…

काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली आणि मन सुन्न झाले… मुंबई मध्ये एका स्त्रीवर नोकरी देण्याच्या आमिषाने बलात्कार… आजकाल पेपर मध्ये, टीव्ही वर बातम्यांमध्ये जिकडे तिकडे अशाच बातम्या येत आहेत… कधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कधी तरुणीवर तर कधी विवाहितेवर… कधी मित्राकडून, कधी नातेवाईकांकडून, तर कधी कधी वडील आणि भाऊ सुद्धा ह्याला अपवाद नसतात… आज परिस्थिती अशी आहे कि कुठलीही स्त्री, कुठल्याही वयोगटातली असली तरी ती आज मुंबई मध्ये सुरक्षित नाही आणि ह्याचाच सर्वात जास्त खेद वाटतो आणि राग सुद्धा येतो…

आपला समाज कुठे चाललाय… इतका बदल कसा काय होतो आहे काहीच कळत  नाही… आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा आदर्श आपण बाळगतो, त्यांनी आपल्या आयुष्यात कुठल्याही स्त्री चा अपमान नाही केला… महाराजांच्या स्वराज्यात कोणत्याही स्त्री चा अपमान जर कोणी केला तर त्याला कडक शासन होत असे, त्यामुळेच लोक घाबरून असायचे… पण आज मात्र नाही शासनाचा धाक उरला आहे नाही कुठल्या शिक्षेचा… दिल्ली मधील निर्भया केस नंतर बलात्कारी प्रवृत्तींच्या लोकांना कडक शासन होत आहे पण त्याला लागणारा वेळ हा खूप अहे… अरुणा शानभाग सारखी केस बघितली कि हेच लक्षात येत कि आजही त्या स्त्री ला योग्य तो न्याय मिळाला नाही आहे… कायद्याचा धाक राहिलेला नसल्यामुळे ह्या घटना करणार्यांना अजूनच सूट मिळते आणि ते हे करायला धजावतात… कारण आपल्या राज्यात भाषणं जास्त आणि कृती कमी असते… जिथे कृती जास्त असली पाहिजे…

ह्या गोष्टी थांबवायच्या असतील तर कायद्याची कठोर अंमलबजावणी त्या त्या लोकांवर झाली पाहिजे आणि अस विकृत काम करणाऱ्या लोकांना एक जरब बसली पाहिजे… पण हे करताना आपण आपली मानसिकताही बदलायला हवी… आणि ज्याची सुरवात शालेय शिक्षणापासून झाली पाहिजे… शाळेत प्रत्येक मुलीला आणि मुलाला स्वसंरक्षणाचे बेसिक धडे दिले पाहिजेत जेणेकरून मुली-स्त्रिया आपला संरक्षण स्वतः करू शकतील… मानसिकता बदलण्यामध्ये इलेक्ट्रोनिक मिडिया असेल किंवा अजून काही social networking ह्या सर्वांचा योग्य तो वापर केला पाहिजे…

हे काही रॉकेट सायन्स नाही… हे सगळ बदलू शकत… आपण हे बदलू शकतो, तुम्ही- मी आपण सर्व मिळून हे बदलू शकतो … फक्त गरज असते ती एका चांगल्या सुरवातीची आणि इच्छा शक्तीची…

Wednesday 11 June 2014

"लीड" च्या यादीत भारत करतोय लीड ….

‘लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंटल डिझाइन’च्या (लीड) यादीत अमेरिकेबाहेरील देशांत भारताचा तिसरा क्रमांक असल्याचे जाहीर झाले आहे. अमेरिकेतील ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या अहवालामध्ये हे स्पष्ट करण्यात आले असून, त्यामध्ये पहिला क्रमांक कॅनडाचा, तर दुसरा क्रमांक चीनचा आहे. 

लीड म्हणजे नेमक काय?? लीड हे प्रकरण नेमके काय आहे, असा प्रश्न सहज मनात आला असेल.… जागतिक तापमानवाढ, हवामानबदल आदींच्या माध्यमातून जाणवू लागले आहेत. वाढत्या तापमानाने ध्रुवांवरील बर्फ वितळू लागल्यामुळे समुद्राची पाणीपातळी वाढू लागली आहे. ऋतूंमध्ये होणारे बदल तर आपल्याला बऱ्यापैकी अनुभवायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर, पर्यावरणसुसंगत ‘ग्रीन बिल्डिंग’ अर्थात ‘हरित इमारती’ उभारण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लीड’ची संकल्पना अमेरिकेतील ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने १९९४मध्ये विकसित केली. हरित इमारतींचे डिझाइन, आराखडा, त्यांचा मेन्टेनन्स आणि निगडित अन्य बाबींच्या दर्जाचे निकष ठरवणारी यंत्रणा (रेटिंग सिस्टीम) म्हणजे ‘लीड’…

इमारती उभारताना ऊर्जा, पाणी आदी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षम पद्धतीने वापर केला जावा आणि नंतर इमारतीचा वापर करतानाही वापरकर्ते पर्यावरणदृष्ट्या सजग असावेत, हा उद्देश ठेवून ‘लीड’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘लीड’अंतर्गत तब्बल वीस हजार निकषांचा समावेश असून, त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या जातात. निर्मितीच्या वेळी केवळ नव्या बांधकामासाठीचा एक दर्जा असे स्वरूप असलेली ‘लीड’ ही आता विकास आणि बांधकाम प्रक्रियेच्या सर्व बाजूंचा समावेश असलेली आणि एकमेकांशी निगडित असलेल्या निकषांची सर्वसमावेशक यंत्रणा बनली आहे.…

कॅनडात १७.७४ दशलक्ष जीएसएम जागेला ‘लीड’ सर्टिफिकेशन मिळाल्याने तो देश पहिल्या क्रमांकावर आहे. चीन आणि भारत या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असून, त्यामध्ये पर्यावरणपूरक बांधकाम करण्याचे प्रमाणही वाढीला लागले आहे. या दोन देशांना अनुक्रमे १४.३० दशलक्ष जीएसएम आणि ११.६४ जीएसएम जागेसह दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे. दक्षिण कोरियाला चौथा, तर जर्मनी आणि फिनलंडला अनुक्रमे सहावा आणि दहावा क्रमांक मिळाला आहे.…

‘सारे जग हवामानबदलाच्या आव्हानाला तोंड देत असल्याने जगभरातील समाज त्या दृष्टीने योग्य ती पावले उचलण्याला आणि हरित इमारती बांधण्याला प्राधान्य देत असल्याचे या यादीतील बाकीच्या देशांच्या वाढत्या समावेशावरून स्पष्ट होत आहे,’ अशी भावना अमेरिकेच्या ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष रिक फेड्रिझी यांनी व्यक्त केली आहे. याविषयी अधिक माहिती हवी असेल, तर http://in.usgbc.org/leed
 या वेबसाइटला जरूर भेट द्या….

Tuesday 10 June 2014

...... तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणे बंद करा…

महाराष्ट्र… आपला महाराष्ट्र… महाराष्ट्र म्हणजे  संतांची भूमी… महाराष्ट्र म्हणजे अनेक वीरांची आणि समाजसुधारकांची भूमी… महाराष्ट्राला आहे ती हजारो वर्षांची परंपरा ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे… पण… गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते बघून महाराष्ट्राची परंपरा हीच का?? असा प्रश्न मनात येतो…

कुठेतरी काहीतरी होता आणि त्याचा परिणाम म्हणून अख्खा समाज त्यात भरडला जातो… कोणीतरी विकृत मानसिकतेची लोकं आपल्या आदर्शांचा, आपल्या महापुरुषांचा अपमान करतात, तेही फेसबुक आणि इतर social media मधून… आणि आपण काय करतो?? आपल्याच माणसांना त्रास देतो… कोणीतरी ४-५ लोकांच टवाळक येतं, हातात भगवा झेंडा घेऊन आणि मग हे बंद आणि ते बंद च्या नावाखाली बसेस पेटवून देतात, दुकानं फोडतात, गाड्या जळतात… पण त्यांना हे कळत कस नाही कि ह्या सर्व सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पैशातून उभ्या राहिल्या आहेत… आपण जे बंद करतो आहोत त्यामुळे त्या विकृत माणसाला काहीच फरक पडत नाही आहे… उलट असा करून आपण त्याला जे करायचं ते सध्य करून देतोय… आणि तसही हे सर्व करून तो विकृत माणूस सापडणार आहे का?? उलट अशाने पोलीसांच सगळ लक्ष ह्यांना सांभाळायला जात आणि ते मुख्य आरोपी मात्र मोकाटच सुटलेले असतात…

बरं जे लोक हे भगवे झेंडे घेऊन आणि छत्रपतींच नाव घेऊन हे उद्योग करतायत त्यांना आधी भगव्या झेंड्याचा अर्थ तरी नीट समजला आहे का?? भगवा झेंडा हे शौर्य आणि वैराग्य ह्याच प्रतिक आहे… त्यामागे शिवाजीमहाराजांची कित्येक वर्षांची मेहनत आणि प्रेरणा आहे… पण आज मात्र हा भगवा झेंडा दहशत निर्माण करण्यासाठी वापरला जातोय आणि महत्वाच म्हणजे हि दहशत मात्र आपल्याच मराठी माणसावर होतेय… शिवरायांचा वचक हा जे लोक हिंदवी स्वराज्याच्या रस्त्यात आडवे येतील त्यांच्यावर असायचा पण आज मात्र सगळच उलटं आहे… जे लोक चुकीचे आहेत ते मात्र मस्त मजा  बघतायत आणि आपण आपापसातच भांडतोय…

कुठलीही गोष्ट करायच्या आधी ह्याच गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे कि हीच का आपली महाराष्ट्राची परंपरा?? हीच का आपल्या संतांची शिकवण?? महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात हे घडणं म्हणजे आपल्यावरच एक कलंक आहे… आणि जर हेच करायचं असेल आणि असाच वागायचं असेल तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणं बंद करा…

Sunday 8 June 2014

पुणे बदलतंय …???

बर्याच घटना घडतायत आपल्या पुण्यात… त्या घटना पाहून पुणे आपला बदलतंय कि काय अस वाटतंय… बदल हा निसर्गाचाच नियम आहे आणि तो आपण कितीही नाही म्हटल तरी होणारच… पण सध्याचा पुण्यात होणारा बदल हा वेगळ्या दिशेने जाणारा आहे… सामान्य माणसाला नको असा आहे…

आता हल्लीचं ३-४ दिवसांपूर्वीच उदाहरण घ्या… कोणीतरी एका व्यक्तीने फेसबुक वर शिवाजी महाराज आणि महापुरुषांची बदनामी करणारे पोस्ट केले… ह्या गोष्टीचा राग सगळ्यांनाच आहे… तुम्हालाही आला असेल आणि मलाही आला… आणि तो येणे स्वाभाविकच आहे त्याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही… ज्या व्यक्तीने हे केल आहे त्याला शिक्षा हि झालीच पाहिजे…. पण तो राग व्यक्त करताना आपल्याच लोकांना त्रास देऊन काय मिळणार आहे?? बस आणि इत्यादी सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करून आपल्याला काय मिळणार?? उलट आपल्याच पैशातून उभी राहिलेली हि मालमत्ता आपण आपल्याच हाताने नष्ट करतोय…. हे सर्व उद्योग करणाऱ्यांनी एक लक्षात घेतल पाहिजे कि हे सर्व उद्द्योग करून आपण  त्या लोकांना मदत करतोय ज्यांना आपल्या समाजात अशांतता पसरवायची आहे….

कोणीतरी गावगुंड खांद्यावर भगवे झेंडे घेऊन, छत्रपतींच नाव घेऊन हे सर्व करतात आणि त्याचा उपद्रव मात्र सगळ्यांनाच होतो आहे… खरं तर भगवा झेंडा हे कोणी सोम्या-गोम्याने वापरण्याचे निशाण नाही. दुसऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने वापरण्याचे तर नक्कीच नाही. या झेंड्याला महाराष्ट्राच्या संतांची परंपरा आहे. शिवछत्रपतींची प्रेरणा आहे. शौर्य आणि वैराग्य या दोन्ही गुणांना प्रेरणा देणारा हा झेंडा दहशत निर्माण करण्यासाठी वापरला जातो आहे… हे सगळ करताना हॉटेल्स, मेडिकल्स अशी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली… मेडिकल स्टोर सारखी अत्यावश्यक सेवा बंद करताना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना किती त्रास होईल ह्याचा जराही विचार ह्या गावगुंडांनी केला नाही…

इतके दिवस शहराच्या काही भागांमध्ये असलेले लोण आता शहरभर पसरते आहे. आपल्या पार्किंगमधली आपली गाडी अचानक कोणी तरी पेटवतो आणि त्याचा कधीच शोध लागत नाही. आपल्या भागामधले भाई अचानक कोणाला तरी लक्ष्य करतात आणि बघता बघता खून होतो. आपल्याच आई बहिणीचे, मावशी – वहिनीच्या गळ्यातील मंगळसूत्रे कोणीतरी क्षणात हिसकावून घेतो. याची सवय होऊन चालणार नाही. कारण पुण्यात होणारा हा बदल अतिशय चुकीचा आहे आणि ह्याची सवय झाली तर महाराष्ट्राचा युपी-बिहार व्हायला वेळ लागणार नाही…



Saturday 7 June 2014

आम्ही सारे षंढ ???

कोणाही संवेदनशील माणसाचे मन सुन्न होईल. आपली लाज वाटेल अशी ही घटना आहे. आपण शिवाजी महाराजांचे नाव घेणे थांबवावे, अशी ही घटना आहे. कल्याणमध्ये एका एसटी बसमधील महिला कंडक्टरला, एक प्रवासी मारहाण करतो आणि सारे प्रवासी आपले काही घेणेदेणे नाही किंवा काही घडतच नाही इतक्या शांतपणे, मुर्दाडपणे बघत बसतात.

त्या कंडक्टर महिलेची प्रतिक्रिया आपल्या सदसदविवेकबदुध्दीला टोचणी लावणारी आहे. ती म्हणते की, मला त्या गुंडाची भीती वाटत नाही तर ही घटना घडत असताना, डोळयावर पट्टी बांधून बसणाऱ्यांची वाटते.या घटनेची बातमी वाचून मला शरम तर वाटलीच, परंतु अनेक प्रश्नही मनात उभे राहिले.

आज हा प्रसंग त्या परक्या बाईवर आला म्हणून लोक मध्ये पडले नाहीत… जर हाच प्रसंग तुमच्या घरातल्या एखाद्या बाईवर आला असता तर असेच शांत बसला असतात का हा प्रश्न त्या लोकांना विचारावा लागेल… कुठे गेले नेते आणि कुठे गेल्या महिला संगठना?? एरवी उठसूठ कोणाच्या तरी तोंडाला काळे फासणारे, ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा देणारे मावळे नंतरही तिच्या बाजूने उभे ठाकले नाहीत आणि त्यांची हायकमांड किंवा सरसेनापतीदेखील मूग गिळून बसले आहे. त्यांचे युवराजदेखील आत्ममग्न आहेत. सनसेनपतीना चिंता पडली आहे ती मुख्यमंत्रीपदाची. त्यावर काही लोक म्हणतील कि कठोर कायदे नाहीत ह्यासाठी… अरे पण नुसते कायदे करून काय होणार?? आपण जर अन्यायाविरोधात आवाज उठवला नाही तर कायदे काहीच कामाचे नाहीत…

मुंबईकर इतके शांत कधीपासून झाले?? पावसाळ्यात पाणी भरल्यावर एकमेकांना मदतीचा हात देणारे मुंबईकर, २६ जुलै च्या पावसात एकमेकांना निस्वार्थी भावनेने मदत करणारे  मुंबईकर कुठे गेले?? अशा घटना घडल्या कि फक्त निषेध नोंदवायचा… ते पण फेसबुक किंवा ट्विटर वरून… अशाने ह्या घटना थांबणार नाहीत… ह्या घटना थांबवायची गरज आहे आणि त्या मी एकटा किंवा तुम्ही एकटे नाही करू शकत, आपण सर्वांनी एकत्र मिळून केला पाहिजे हे काम…

म्हणून ह्यापुढे अशी कुठलाही अन्याय होताना आपण गप्पा बसू नये… अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे… आणि जर हे आपण करू शकत नसू तर छत्रपतींच नाव घेण्याचा नैतिक अधिका.रही आपल्याला नसेल…