Tuesday 29 January 2019

Travelog - One Day Trek to Sinhagad 2019

Travelog - One Day Trek to Sinhagad 2019


माझा पहिला ट्रॅव्हलॉग माहुली गड ट्रेक आमच्या बऱ्याच मित्र-मैत्रिणींना आवडला म्हणून सिंहगड ट्रेकचा ट्रॅव्हलॉग लिहावा असे वाटले. माहुली ते सिंहगड दरम्यान अनेक ट्रेक केले पण प्रत्येकाचा ट्रॅव्हलॉग लिहावा वाटला नाही किंबहुना माहुली इतकाच सिंहगड सुद्धा मध्यम कठीण प्रकारात येतो म्हणून या ट्रेकचा अनुभव लिहून ठेवणे महत्वाचे वाटले.


सिंहगडाबद्दल थोडी माहिती..

सिंहगड (पूर्वीचे नाव कोंढाणा) स्वराज्यातील एक महत्वाचा गड. सिंहगडाला तसा खूप महत्वाचा इतिहास आहे. सिंहगड आधी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे कोंढाण्याचे किल्लेदार होते. दादोजींच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा स्वराज्यात सामील करून घेतला. पण महाराजा शहाजीराजे भोसले यांना दगा करून कैदेत ठेवल्यानंतर त्यांना सोडण्याच्या बदल्यात शिवाजी महाराजांनी कोंढाणा आदिलशाहीला परत दिला. त्यानंतर पुन्हा कोंढाणा स्वराज्यात आला पण त्यानंतर मिर्झाराजा जयसिंगच्या स्वारीत पुरंदरच्या तहात कोंढाणा मोगलांकडे दिला. तेव्हा कोंढाण्याचा सुभेदार होता उदयभान राठोड. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असू नये म्हणून शिवाजी महाराजांनी मोहिमेवर जायचे ठरवले पण त्यांचा बालमित्र आणि स्वराज्याचे सुभेदार तानाजी स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून तानाजी, सूर्याजी, शेलारमामा आणि काही निवडक मावळे सोबत घेऊन "आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं" म्हणत  कोंढाणा मोहिमेवर गेले. मोठं युद्ध झालं, गड स्वराज्यात आला पण राजांना त्यासाठी त्यांचा मित्र, स्वराज्याचा सुभेदार गमवावा लागला. तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले.

सिंहगड ट्रेक अनुभव

सिंहगड ट्रेकसाठी २७ जानेवारी २०१९ला आम्ही आमच्या खाजगी बसने सकाळी ४:१५ला मुंबईहून निघालो. मुंबईत थंडी इतकी जाणवत नव्हती पण माझा फेवरेट स्पॉट, लोणावळा आला आणि थंडी जाणवायला लागली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने खंडाळा-लोणावळा परिसरातून जाताना काँक्रीटच्या कुशीतून निसर्गाच्या मांडीवर डोकं ठेवल्याचा फील येतो. मजल दरमजल करीत खडकवासला धरणाच्या बाजूने आम्ही सिंहगडाच्या पायथ्याला पोहोचलो. गाडी जाण्याचा मार्ग बंद होता म्हणून गाडी पार्किंगला लावून मुख्य ट्रेकला सुरवात केली. डोणजे गावापासून सिंहगड पायथा पर्यंतचा प्रवास आणि नंतर सिंहगड सर करतानाचा पहिला टप्पा सहज पार झाला. सिंहगड आम्ही तीन टप्प्यात सर केला. पार्किंग ते सिहंगड पायथा, सिंहगड पायथा ते सिंहगड मध्य आणि मध्य ते सिंहगड माथा, या तीन टप्प्यांपैकी पहिला टप्पा सहज पार झाला. दुसरा टप्पा पार करताना थोडी दमछाक झाली. सिंहगड सर करताना आमचे २ ग्रूप झाले आणि चढतं ऊन आणि सरळ चढ यामुळे आमच्यातला एक मावळा अर्ध्यावरच थांबला. एका टपरीजवळ त्यांना बसवून आम्ही पुढे निघालो. सिंहगड चढताना एक गोष्ट नक्की की तुम्हाला प्रत्येक थोड्या अंतरावर ताक, लिंबूपाणी, दही, रानमेवा मिळतो. एनर्जी ड्रिंक पिऊन गड सर करण्यापेक्षा लिंबूपाणी आणि ताक हे आमचं खरं एनर्जी ड्रिंक अधे मध्ये घेत गडाच्या माथ्याच्या दिशेने आम्ही प्रवास करत होतो. शेवटच्या टप्प्यात चढ कठीण होता आणि सूर्यदेव डोक्यावर होते. अशातच माझ्यासोबतच्या अजून एका मावळ्याने थांबण्याचा निर्णय घेतला. पायात क्रॅम्प आल्याने पुढे गड चढणं तीला शक्य नव्हतं आणि मला गड चढायची कितीही इच्छा असली तरी तीला एकटीला अर्ध्यावर सोडून पुढे जाणं पटतही नव्हतं. म्हणून एकाक्षणी मीसुद्धा तिथेच थांबायचा निर्णय घेतला कारण गडमाथा अजून २५-३० मिनिटं वर होता. पण आमचा एक ग्रूप पुढे निघून गेलेला आणि त्यांना हे कळवणार कसं की आम्ही थांबतोय? कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती. आणि आमचं तर ठरलेलं की जेवण एकत्र करायचं. मग आम्ही थांबतोय हे त्यांना कळणार कसं? फक्त या एकाच कारणामुळे आमचा बसलेला मावळा पुन्हा उभा राहीला गड सर करण्यासाठी. मला एक गोष्ट आठवली, तानाजी धारातीर्थी पडल्यानंतर सर्व मावळे धीर खचून पळत होते तेव्हा सूर्याजीने परतीचे दोर कापून टाकले. एकतर पडून मारा किंवा लढून मारा हाच एक पर्याय होता. तसंच या मोबाईलच्या रेन्जने आमचे परतीचे मार्ग बंद करून टाकले (पण मनातून मला आनंद झालेला :-D ). आणि इथून तिसरा टप्पा सुरु झाला.








सिंहगड - अखेरचा टप्पा

तिसरा टप्पा हा पूर्ण सिहंगड ट्रेक मधील सर्वात कठीण टप्पा म्हणता येईल. उभी चढण आणि प्रत्येक ठिकाणी निसरडी वाट. दगडांना धरून उभी चढण चढणे म्हणजे एक टास्क होता. पुढे जाऊन मागच्यांना हात देऊन वर घेणे असं करत करत वर जायचं होतं. साधारण हा कठीण टप्पा पार करायला अर्धातास लागला. आता मात्र सिंहगड माथा नजरेत आला. डौलाने फडकणारा भगवा बघून झालेला त्रास विसरलो आणि पुढे पुढे सरकत राहिलो. 

जसा जसा गड जवळ येत होता तश्या शिवगर्जना ऐकू येत होत्या. खालून वर येताना तर URI मधलं "How's the Josh" करत सर्व वर येत होते. गडाच्या माथ्यावर उभं राहिल्यावर गेले काही तास आम्ही जी मेहनत केली ती सफल झाल्याचं समाधान वाटलं. वरून खाली बघताना "आपण एवढं वर चढून आलो?' असा प्रश्नही मनात आला. पण हो, आम्ही गडावर होतो, माथ्यावर.


सिंहगड दर्शन आणि जेवण

सिंहगड म्हणजे अगदी नावासारखा, जिंकण्यास अभेद्य. पहिला येतो तो पुणे दरवाजा. त्यापुढे पुणे दरवाजा दोन. आणि मग गडावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. घोड्याची पागा आहे आणि दारूखाना सुद्धा आहे. पूर्वी या ठिकाणी युद्धसाहित्यातील दारुगोळा ठेवला जात असे. सिंहगडावर तुम्हाला हिरकणी बुरुज सुद्दा दिसेल. आणि सर्वात महत्वाचा तानाजी कडा. जिथून तानाजी आणि त्यांचे साथीदार गडावर चढून आलेले. या व्यतिरिक्त राजाराम महाराजांची समाधी अश्या अनेक गोष्टी पाहणासारख्या आहेत.





इतकं चढून आल्यावर भूक तर लागणारच. गडावर अनेक छोटी हॉटेल आहेत जिथे जेवण्याची सोय होते. आम्ही सर्व एका चटईवर मस्त झाडाच्या सावलीत जेवायला बसलो. गडावरची स्पेशल चुलीवरचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी,वांग्याचं भरीत, सोबत कांदाभजी आणि मटक्यात लावलेले दही.



मटक्याच्या दह्याची चव वेगळीच. गड चढत असताना आम्हाला एक दही विकणारे काका भेटले. त्यांच्याकडे दही घेऊन खाता खाता मी या दह्याबद्दल अधिक माहिती घेतली. मुळात आपण घरी जे विरजण लावतो त्या दह्याची चव आणि या चवीत खूप फरक होता कारण हे दही करण्यासाठी लागणारं दूध हे एका मडक्यात उकळवलं जातं आणि मग प्रत्येक छोट्या छोट्या मटक्यात त्याचं दही लावलं जातं. या मटक्यात उकळवलेलं दूध आणि मटक्यातच लावलेलं विरजण यामुळे दह्याची चव एक नंबर लागते.

पुणेकरांना तसंही स्वतःचे (पुण्यातले) पदार्थ जगात भारी असतात हे वाटतच असतं (गैरसमज) पण मटक्यातलं दही हे चवीच्या दृष्टीनेतरी जगात भारी होतं.माझं नशीब जोरात, ज्या ज्या गोष्टी जेवायला आवडतात त्या त्या अगदी भारी चवीच्या तिथे मिळाल्या.

पैशांचा विचार केला तर हो जेवण बऱ्यापैकी महाग आहे पण हिशोबाचा विचार केलात तर गडाच्या माथ्यावर, चटईवर, झाडाच्या सावलीत बसून असे ऑथेंटिक पदार्थ खायला मिळणार तर थोडे पैसे जास्त गेले तरी प्रॉब्लेम नाही. तशीही आमची मुंबई आर्थिक राजधानी आहेच, मग चालतंय की राव.

परतीचा प्रवास

सगळ्यात मोठा टास्क आत्ता होता. जेवढी उभी चढण आम्ही चढून आलो तेवढीच उभी उतरण होती. त्यामुळे एक मावळा जो अर्ध्यावर होता त्याला घेण्यासाठी एक ग्रूप आलेल्या वाटेने गडउतार झाला आणि आम्ही एक ग्रूप जिथून गाड्या येतात त्या रस्त्याने निघालो. साधारण १०-११ किलोमीटरचं अंतर होतं पण फक्त उतार होता आणि तोही चांगल्या रस्त्याचा. कोणीतरी मागून ढकलावे आणि घरंगळत हळू हळू पायथ्याशी पोहोचावे असं आम्ही चालू लागलो. सुनसान रस्ता आणि त्या रस्त्यावरून चालणारे आम्ही. फक्त पक्षांचा आवाज आणि आमच्या बोलण्याचा आवाज इतकी शांतता होती त्या रस्त्याला. पण हळू हळू आम्ही ते अंतर पार केलं. साधारण दीड तास आम्हाला लागलॆ. डोणजे गावात येऊन मस्त कटिंग चहा आणि बिस्कीट सोबत परतीचा प्रवास सुरु झाला.

ट्रेकमधून आम्ही परत काय घेऊन गेलो? असं जर कोणी विचारलं तर मी या ट्रेक मधून माझ्या सोबत ऊर्जा घेतली आणि काहीही झालं तरी गड सर करायचाच ही प्रचंड इच्छाशक्ती घेऊन परतलो. ट्रेक करून खाली उतरताना अजून एक अनुभव मला समजला. आमचा एक ग्रूप ट्रेक मार्गाने खाली उतरताना एका आजींच हाड निखळलं होतं हे आमच्या ग्रूपमधील गणेशला समजलं. त्यावेळी त्यांना प्रथमोपचार देण्यासाठी तो पुन्हा वर गेला आणि इतकंच नाही तर आपल्यासोबत इतर 4-5 जण जमवून त्याने त्या आजींना खाली आणलं. गणेशने आणि त्या इतर 4-5 जणांनी जे काम केलं त्याला तोड नाही. आजकाल लोक आपल्या लोकांसाठी काही करत नाहीत पण ना ओळख ना पाळख असलेल्या आजींना मदतीसाठी हे सर्व धावून गेले. गणेशला त्याच कारणामुळे पायथा गाठायला उशीर झाला आणि नक्की का उशीर झाला हे माहित नसल्याने त्याची काळजी तर होतीच पण त्याच्याशी कुठलाच संपर्क नसल्याने मी त्याच्यावर चिडलो सुद्धा पण हे कारण कळलं तेव्हा पट्ठ्याचा अभिमान वाटला. आणि एवढं करून पण मनाचा मोठेपणा दाखवून त्याने "हे मी चैतन्य मधून शिकलो, क्रेडिट चैतन्यच.." असं सांगितलं पण हे क्रेडीट चैतन्यच नाही ते फक्त छत्रपतींच. कारण छत्रपतींच्या गडावर असताना आपल्या डोक्यात शिवविचारच असणार आणि त्याच शिवविचाराने त्याने त्या आजींना मदत केली.

 आपण ट्रेक करतो त्यात एक मजा असते पण त्यासोबत आपल्याला आपल्या मर्यादा कळतात. आपल्या limits आपण किती स्ट्रेच करू शकतो हे कळतं आणि सिंहगडाच्या माथ्यावर पोहचून जेव्हा खाली बघतो तेव्हा २ तास केलेल्या मेहनतीचं जे फळ मिळतं आणि जे समाधान मिळतं त्याची तोड कशालाच नाही.

जय शिवराय.
प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८0)


काही टीप्स:-
मटक्यातील दही घ्यायचे असल्यास ते मटक्यातच लावलेले होते का याची खात्री करून घ्यावी. दही मटक्यातच लावलेले असेल तरच त्याला ती चव असेल.