Thursday, 23 April 2015

एका शेतकऱ्याचे मनोगत

सकाळी गुरु ठाकूर ह्यांची एक कविता वाचली आणि त्यावरून आज हि एक कविता सुचली…

काल अजून एका शेतकऱ्याचेआत्महत्या केली… रोज कुठेतरी शेतकरी आत्महत्या करतोय आणि दुर्दैवाने आपण अजूनही देशाला कृषिप्रधान म्हणतोय… अशाच एका शेतकऱ्याची कविता…एका शेतकऱ्याचे मनोगत

गोड लागला ऊस म्हणून मुळासकट खाऊ नको…
शिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…

निरभ्र आहे आकाश, लावलीय त्याच्याकडे नजर
रक्ताचं झाल पाणी आणि सरकार दाखवतंय packagesच गाजर
चुकत असेल काही तर चपलेन हाण पण त्यांच्यात गणू नको
शिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…

दमत नसतो कधी राबून असा आमचा वेगळेपणा
१८ विश्व दारिद्र्य इथे तरी ताठ ठेवलाय कणा
साचून राहिलंय मनामध्ये ते बाहेर आणू कि नको
शिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…

मीही दिसेन तुला असाच एखाद्या फांदीवर लटकलेला
कामाने नाही पण संकटाने जीव आहे गुदमरलेला
मरताना मुलाला मात्र एकच सांगेन, बाबा तू तरी माझ्यासारखं बनू नको
काम कर दुसर एखाद पण शेतकरी मात्र बनू नको…

प्रथमेश तेंडूलकर** कविता गुरु ठाकूर ह्यांच्या कवितेवरून सुचली म्हणून श्रेय गुरु ठाकूर ह्यांना आणि अशी कविता शेतकऱ्यावर सुचली म्हणून सरकारचे श्रेय अधिक…

No comments:

Post a Comment