Thursday 31 August 2017

रोज मरे त्याला कोण रडे...

२६ जुलै २००५, मुम्बईच्या इतिहासातील एक काळा दिवस. मिठी नदीला आलेला पूर आणि सतत पडणारा पाऊस. जीवितहानि, वित्तहानि असं कितीतरी घडलं होतं त्या दिवशी. तब्बल ९००मीमी पाऊस पडला आणि कधी न मंदावणारी मुम्बई थाम्बली होती. आता तुम्ही म्हणाल की ह्या दिवसाची आठवण हा का बरं करून देतोय? ह्या दिवसाची आठवण कोणालाच नकोय पण २ दिवसापुर्वी म्हणजे २९ ऑगस्ट २०१७ रोजी असाच पाऊस इथे पडला आणि सर्वांना २६ जुलैची आठवण झाली. सकाळपासून पडत असलेल्या पावसाने दुपारी अगदी थैमान घातले आणि परिणामी मुम्बई भरली, पावसाच्या पाण्याने. ट्रेन थाम्बल्या, गाड्यांचा वेग मंदावला. दुपारी गुढगाभर असलेलं पाणी संध्याकळी कमरेपर्यँत आलं. नंतर पाऊस जसा थाम्बला तसं ते ओसरल पण तब्बल ८-९ तास ह्या पावसाच्या पाण्यात मुंबईकर अडकला होता.

दरम्यानच्या काळात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. जाती, धर्म विसरून सर्व एकमेकांना मदत करत होते ते फक्त मुंबईकर म्हणून. दुसऱ्या दिवशी मुम्बई पुन्हा त्याच वेगाने कामाला लागली. सर्वांनी मुंबईकरांच कौतुकसुद्धा केले. बघा, स्पिरिट बघा. मुंबईकरांच स्पिरिट ह्यावर रकानेच्या रकाने भरून लेख आले. पण कसले स्पिरिट आणि कसलं काय. खरंतर हा नाईलाज आहे मुंबईकरांचा. एक वर्ष दाखवा की मुम्बईमधे गुडघाभर पाणी साचल नाही, रस्त्यांना खड्डे नाहीत. असं एक वर्ष दाखवा फक्त. बरं भौगोलिक परिस्थिती आहे सर्व मान्य आहे पण आता जरा facts वर बोलुया. २००५ साली ९००मिमी पाऊस पडला आणि २९ ऑगस्ट २०१७ला जवळपास ३००मिमी. म्हणजे तब्बल ६००मिमी पाऊस कमी पडला. पण ह्या ३००मिमी पावसाने मुम्बई कमरेभर "भरून दाखवली" पण जर ९००मिमी पडला असता तर त्याने मुम्बई "बुडवून दाखवली" असती. ह्याची कल्पना करून बघा. असं काही झाल की एकतर भौगोलिक स्तिथि किंवा मग मुम्बईकर लोकांनी केलेला कचरा असं म्हणून त्यांच्यावर खापर फोडायला आम्ही मोकळे. कचरा हे एक कारण आहेच ह्या सर्वाचे पण त्यापेक्षाही जास्त ढिसाळ व्यवस्थापन आहे. जागोजागी मेट्रोमुळे पडलेले खड्डे, रस्त्यावर तर रस्ता तसाही दिसत नाही, खड्डेच खड्डे ह्यामुळे पावसामुळे त्रासलेल्या मुम्बईचा वेग खड्ड्यात गेला.

मग आपण म्हणणार की पाऊसच इतका पडला त्याला आम्हीतरी काय करणार? बरोबर ना साहेब. पावसाने त्याच्या पद्धतीने पडून दाखवलं पण त्या आधी व्यवस्थापन नीट करून आपण का नाही दाखवलं? आता पाऊस काय तुम्हाला विचारून पडणार का? की बाबा झाली का तयारी? पडू का आता? नाही ना? प्रत्येक शहराची एक आपत्ति व्यवस्थापन नावाचा प्रकार असतो. काही वर्षापूर्वी चेन्नई मधे असाच पाऊस पडला. चेन्नई अगदी पाण्याखाली गेलेलं. त्यानंतर ते चिखलफेक नाही करत बसले. त्यांनी एक अभ्यास कमिटी बसवली. त्या कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्यात म्हटले होते की हवामानात होणारे बदल ह्यामुळे आता पावसाचे प्रमाण वाढेल आणि किमान २००मिमी पाऊस दरवर्षी पडण्याची शक्यता वर्तवली होती. २००५ ते २०१७, तब्बल १२ वर्षे झाली तरी आपण ह्यातून काही धडा घेत नाही. ३५०००कोटी वार्षिक बजेट असलेली आमची महापालिका नक्की करतेय काय? आमच्या घरात डेन्ग्यूच्या अळ्या सापडल्या की आपण आमच्यावर कारवाई करणार मग रोज खड्ड्यात जाऊन येऊन ज्यांना मणक्याचे, पाठीचे आजार झालेल्या लोकांनी महापालिकेला का दोषी ठरवू नये. तुम्बलेल्या पाण्यातून लेप्टो सारखे आजार पसरून ज्यांना त्याचा त्रास होईल त्याची नैतिक जबाबदारी महापालिका घेणार काय?

बॉम्बस्फोट असो, आतंकवादी हल्ला असो किंवा हे कालसारखी तुम्बलेली मुम्बई असो, मुम्बईकर आपलं स्पिरिट नेहमीच दाखवतात. त्याबद्दल मुम्बईकरांना सलाम. पण किती वर्ष हे स्पिरिट दाखवायच? ह्या स्पिरिटमधे नाईलाज आहे. मुम्बईची ही अवस्था पाहता एकच म्हणावं लागेल, "रोज मरे त्याला कोण रडे?"

---- एक मुम्बईकर