Friday 27 February 2015

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…

काल २७ फेब… आपण सर्व मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करत होतो… प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठीत बोलून आणि इतर अनेक उपक्रम साजरे करून हा दिवस साजरा केला असेल… पण आतापर्यंत आपण असे दिवस फक्त एका दिवसापुरते साजरे करतो आणि नंतर पुन्हा दुसर्या वर्षी येणाऱ्या दिवसाची वाट बघतो… हे एवढ्यापुरतच मर्यादित राहणार आहे का? ह्यातून मराठी भाषा आणि भाषेचे संवर्धन होईल? माझ्यासाठी मराठी ही एक फक्त भाषा नाही तर ती एक संस्कृती आहे आणि ती जपणे आणि वाढवणे हे आपल काम आहे…

आपल्या मध्ये मराठी रुजते ती जागा म्हणजे आपली शाळा… आज मराठी शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे… बरेचसे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत… असे का होत आहे ह्याचा कोणी विचार केला का? प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचं भविष्य उज्वल व्हाव हि माफक अपेक्षा असते आणि ती सर्वांची असते… पण अचानक असे काय झाले कि मराठी शाळा आपल्या महाराष्ट्रात वाचवायची वेळ आपल्यावर आली ह्याचा सारासार विचार आपण सर्वांनी केला पाहिजे… अस तर अजिबात नाही कि इंग्रजी माध्यमात काही वेगळ शिकवतात… पण मुळात फरक हा दर्जेदार शिक्षणात आहे… रात्रीच्या प्रकाशात चांदण्या चमकतात ह्याच कारण त्या सूर्यापेक्षा तेजस्वी झाल्या असा नाही तर सूर्य अस्ताला जातो म्हणून…

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत झाले कि ते त्या मुलांना लवकर अवगत करता येते हे सर्व मान्य आहे पण बाहेरच्या व्यावहारिक जगात जेव्हा इंग्रजी बोलण्याची वेळ येते तेव्हा आपण मागे पडणार नाही ना हा एक न्यूनगंड तयार होतो… त्यासाठी आपल्या मराठी शाळेतच मुलांसाठी दर्जेदार इंग्रजी का नाही शिकवत आपण? काही शाळांमध्ये शिकवलं जात दर्जेदार मराठी  सोबत इंग्रजी शिकवलं जात पण अनेक शाळांमध्ये अजून तेच होत नाही… इंग्रजी माध्यमाच्या तोडीच्या शाळा जर मराठी माध्यमात असतील तर मराठी शाळा वाचवा असे सांगायची गरजच लागणार नाही…

जोपर्यंत आपल्या मातृभाषेला आपण आपली व्यवहाराची भाषा बनवत नाही तोपर्यंत अमुक एक भाषा टिकवा हे सांगावे लागेल… आणि म्हणूनच आज एक संकल्प करू, आजपासून जास्तीत जास्त मराठीत बोलू… समोरचा नाही बोलला तरी चालेल पण जमेल तितक आपण संवाद मराठीतून करू आणि वर्षभर मराठीचा सन्मान करू…

जय महाराष्ट्र…

No comments:

Post a Comment