Friday, 21 August 2015

स्वातंत्र्य की स्वैराचार ?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आणि त्यांचा शासनातर्फे सन्मान करण्यात आला… बाबासाहेबांच्या वयाच्या ९४व्या वर्षी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा पुरस्कार त्यांना मिळावा हे विशेष… बाबासाहेबांनी वयाची कित्येक वर्ष शिवाजी महाराज आणि इतिहास ह्यासाठी खर्च केली. शिवाजी महाराज म्हणजे जणू त्यांचा श्वास. जाणता राजा चे कित्येक प्रयोग आणि राजा शिवछत्रपती ह्यांच्या आवृत्ती मधून शिवाजी महाराज समजून घेण्यात प्रत्येकाला मदत झाली. शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले राष्ट्रपुरुष. महाराजांचं नुसतं स्मरण केलं तरी एक उत्साह संचारतो. पण अशा शिवरायांच चरित्र ज्यांनी घरा घरात पोहोचवले त्या बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण देण्यावरून जो वाद झाला (तो निर्माण केला गेला) तो दुर्दैवी होता. इतिहासाबद्दल व्यक्ती व्यक्तीत दूमत असू शकते पण बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचं मोठे पण कमी कसं होईल? आणि विशेष म्हणजे जे लोक विरोध करत होते त्यांनी आधी स्वतःचा इतिहास जर तपासून पहिला तर आपण शिवाजी महाराजांबद्दल काही बोलण्यात किती योग्यतेचे आहोत हे त्याचं त्यांना कळून येईल.

आज हा विचार मांडण्याच कारण एवढंच १५ ऑगस्ट २०१५ रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला पण गेल्या काही दिवसांपासून, आठवड्यांपासून आपल्या देशात, महाराष्ट्रात जे सुरु आहे ते पाहून असं वाटत की आजकाल स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा समज झाला आहे. सुरवातच करायची झाली तर याकूब च्या फाशी हे त्याच ताजं उदाहरण. याकूबला जेव्हा फाशी देण्याच समजले तेव्हापासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबई मध्ये जे काही सुरु होत ते पाहून कळत नव्हत की फाशी एका गुन्हेगाराला होतेय की एका देशभक्ताला? अगदी आपल्या मिडीया पासून ते so called सेलेब्रिटी पर्यंत सर्वच ह्याला इतकं महत्व देत होते की लोकांमध्ये संभ्रमाच वातावरण होतं. मिडीया तर ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली हि बातमी चवी चवी ने खात होती, याकूब ने हे खाल्लं, मग त्याला कधी नेणार इत्यादी. काही महान व्यक्तींनी तर त्याची फाशी माफ व्हावी ह्यासाठी पत्र लिहिलं. मुळातच पहिली गोष्ट ही की ज्याला फाशी होत होती तो कोणी देशभक्त नव्हता, आणि एकदा न्यायालयाने फाशी दिली ह्याचा अर्थ हा होतो की सर्व पुरावे आणि साक्षिदार ह्यांच्या तपासणीतून जे सत्य समोर आलं त्यावर झालेला हा न्याय होता. मग एकाबाजूला आम्हाला लोकशाही मान्य आहे, न्यायालयावर विश्वास आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्याबाजूला त्याच न्यायालयाने दिलेल्या न्यायावर आक्षेप ठेवायचा? त्या स्फोटात जे कोणी आयुष्याला मुकले त्यांची ही एकप्रकारे मस्करी नाही का? आपण काय बोलतो आणि त्याचा लोकांवर काय परीणाम होतो ह्याचा विचार ह्या so called सेलेब्रिटीनी करायला हवा होता, कारण सामाजिक जीवनामध्ये असताना तुमचे विचार ह्यांना follow करणारे अनेक लोक असतात. उद्या प्रत्येक दहशतवाद्याला हेच वाटेल की काहीही केलं तरी आपल्याला फार मोठी शिक्षा होणार नाही.

आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य नक्कीच आहे पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. म्हणजे जेव्हा अमेरीकेवर जो हल्ला झाला तेव्हा काय दाखवावे आणि काय दाखवू नये ह्याच तारतम्य तिकडच्या मिडीया ने दाखवलं पण मुंबईवर जेव्हा २६/११ चा हल्ला झाला तेव्हा आपल्या मिडीयाने तर सर्वच सोडल होतं. ब्रेकिंग न्यूज च्या हव्यासापोटी आपण आपल्या देशाची सुरक्षितता धोक्यात आणतोय का? हा विचार मिडीया ने करायला हवा. जशी श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये एक पुसटशी रेषा असते तशीच स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. याकूब पासून ते सध्याच्या महाराष्ट्र भूषण वाद ह्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे स्वातंत्र्याचा झालेला चुकीचा वापर. तो होऊ नये हीच इच्छा, बाकी आपण सर्व सुज्ञ, विचारी आहोतच.

No comments:

Post a Comment