Tuesday, 14 July 2015

दुर्गभ्रमंती :- पहिला गड - माहुली गड

          adventure किंवा ट्रेक ह्या सर्वाशी माझा कधी फारसा संबंध आलेला नव्हता तरी एकदा trek ला जाऊन लोकं ट्रेक ला अजून काय मजा करतात ती अनुभवायचं होत… रोजचं तेच तेच काम करून कंटाळा आलेला होता, शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोट ह्याबद्दल नितांत आदर आणि कुतूहल होत… आणि त्यातूनच ठरवल कि ट्रेक ला जायचं… पण कुठे ? मग शोध सुरु झाला आणि गड ठरला, माहुली गड…. मुंबई जवळच आसनगाव ह्या स्टेशन पासून हा गड जवळ आहे… मग माझ्यासारखेच जे रोजच्या कामाला कंटाळलेले आम्ही ३ मित्र निघालो आणि प्रवास सुरु झाला…


प्रवासाला आम्ही तशी तासभर उशिरानेच सुरुवात केली होती… दादर वरून सकाळी ७:३० ची ट्रेन पकडून आम्ही ९ ला आसनगाव स्टेशनला पोहोचलो… स्टेशन च्या बाहेरच रिक्षा असतात ती रिक्षा पकडून माहुली ह्या गावी पोहोचलो… रिक्षातून जातानाच आजूबाजूची हिरवळ बघूनच हे कळत होत कि आपण कॉंक्रिट च्या जंगलातून बाहेर आलो आहोत आणि निसर्गाकडे वाटचाल करीत आहोत… वाटेत जाताना आम्हाला काही लोक दिसले जे वृक्षारोपण करत होते… त्यांना विचारल्यावर असे समजले कि ते नाना धर्माधिकारी ह्यांच्या बैठकीतील लोक होते जे निसर्गाशी आपली बांधिलकी जपत होते… साधारण ४० मिनिटांनी आम्ही माहुली गावी पोहोचलो… तिथेच एका टपरीजवळ चहा घेतला, मस्त आलं घातलेला… आणि तिथूनच सुरुवात केली ट्रेक ला…


ट्रेक ला सुरुवात केली आणि प्रथम गणपती मंदिर लागले… कदाचित पुढे काही विघ्न येऊ नये हीच भावना असावी, बाप्पाला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो… आजूबाजूला घनदाट जंगल, पक्षांचे आवाज आणि शांतता… इतक शांत कि स्वतःच्या पावलांचा आवाज  ऐकू येत होता… पुढे गेल्यावर माहुली किल्ल्याचे पर्यटन केंद्र कार्यालय / टोलनाका दिसले, "टोल" म्हणजेच entry fees भरून आम्ही पुढे निघालो… साधारण १५ मिनिटे चालल्यानंतर एक छोटासा धबधबा दिसला पण आमच लक्ष गड गाठणे असल्याने धबधबा येताना बघू असे ठरवले आणि स्वारी पुढे निघाली… जसे जसे आत जात होतो तस जंगल अधिकच घनदाट होत होत… साधारण २ वर्षांपूर्वी तिथे एका चित्त्याचे वास्तव्य होते आणि १०-१२ लोकांना त्याने आपले भक्ष्य केलेले… पण हि माहिती मी माझ्याजवळच ठेवली :-D …
वर दिलेल्या फोटो मध्ये माहुली गडाकडे जाणारा रस्ता दिसत आहे आणि दुसर्या फोटो मध्ये गडाकडे जाण्याचे दिशादर्शक आहेत…

दिशादर्शकाच्या मदतीने आम्ही चालत राहिलो आणि साधारण १ तासाने आम्ही काही वेळासाठी थांबलो, साधारण १५ मिनिटांसाठी… ह्या फोटो मध्ये असलेल्या जागेवर आम्ही आराम करत होतो… पाय बरेच दुखत होते आणि पुढची वाट ह्यापेक्षाही अवघड होती…एक क्षण असा विचार आला कि आता बस, ह्यापुढे नाही जमणार पुढे जायला… पण तो शिवरायांच्या मावळ्यांचा, मराठ्यांचा अपमान ठरला असता… मनाचा निश्चय केला आणि पुन्हा गड चढायला सुरवात केली… तेवढ्यात मागून येणाऱ्या काही ग्रूपची मुलं आम्हाला join झाली आणि "हर हर महादेव" ची गर्जना करत सर्व गड चढू लागले… आयुष्यात पहिल्यांदा शिरायांचा मावळा झाल्याचा feel आला…

तिथून पुढच्या दीड तासात आम्ही गडावर होतो, म्हणजे एकूण अडीच तास लागले गडावर पोहोचायला… गडावर पोहोचल्यावर आम्ही गडावरून खाली दिसणारे निसर्गसौंदर्य बघत बसलो… आराम केला आणि महत्वाचं, खूप भूक लागलेली म्हणून जेवण जेवलो…

आराम करता करता तासभर कसा निघून गेला कळलच नाही आणि मग सुरु झाला परतीचा प्रवास… परतीचा प्रवास फार दमवणार नाही हा माझा अंदाज होता कारण येताना लागलेली चढण हि जाताना उतरण असणार होती पण  माझा अंदाज सपशेल चुकला… चढण चढण्यापेक्षा उतरण जास्त कठीण होत… अरुंद वाटा, एकाबाजूला मोठे खडक आणि दुसऱ्याबाजूला दरी, खोल दरी… भरीस भर म्हणून पडणारा पाऊस त्या वाटा निसरड्या करत होता… जर जरी तोल गेला तर गडाच्या माथ्यावरून थेट पायथ्याला जाण्याचा shortcut होता तो… तरी एकमेकांना मदत करत  पुढच्या २ तासात आम्ही गडावरून खाली आलो…


तरी गडावरून खाली येताना पुन्हा मागे वळून गडाकडे पहिले, आपलं घर सोडून बाहेर जाताना जसं वाटतं तसं वाटत होतं… महाराजांना स्मरून आम्ही गडाला निरोप दिला… आणि हो येताना धबधब्यात हात पाय धुतले आणि परतीच्या प्रवासाला निघालो…

अशाप्रकारे माझा पहिला ट्रेक झाला… ह्या ट्रेक ने मला खूप काही गोष्टी शिकवल्या… समोर असलेल्या संकटांवर मात करत आणि कितीही विश्वास डगमगला तरी ठरलेला निश्चय पूर्ण करण्यासाठी आम्ही केलेली यशस्वी मेहनत हेच शिकवते कि आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात पण न डगमगता विश्वासाने त्याला सामोरे जायचे असते आणि संकटांवर मात करायची… असा हा माझ्या आयुष्यातील पहिला मोठा ट्रेक मला खूप काही शिकवून गेला…

जय महाराष्ट्र

प्रथमेश तेंडुलकर

https://www.facebook.com/prathamesh.tendulkar.7/posts/934035196635117?ref=notif&notif_t=like

2 comments: