Wednesday, 22 July 2015

टिळक… तुम्हाला विनम्र अभिवादन…

टिळक… तुम्हाला विनम्र अभिवादन… आज तुमची १६० वी जयंती… वाटतेय का हो कि आज आपल्या एका राष्ट्रीय नेत्याची जयंती आहे? ज्या नेत्याने भारताला स्वातंत्र्य मिळाव म्हणून कित्येक वर्ष तुरुंगात खर्च केली, ज्या नेत्याने स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे हे लोकांच्या मनात बिंबवल त्या नेत्याबद्दल आज कोणालाच फारशी माहिती नाही… टिळक, आज तुम्ही फक्त इतिहासाच्या एका पुस्तकात, नव्हे नव्हे तर त्या पुस्तकाच्या १-२ पानापुरते मर्यादित झाले आहात… ह्याचीच खंत आहे…

लहान असताना मला आठवतंय की मी तुमच्या जीवनावर असलेल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होतो… तेव्हा त्या स्पर्धेत बक्षिस मिळण ह्यापेक्षा आज मला जास्त आनंद ह्याचा होतो कि त्यासाठी मी तुमच्याबद्दल तेव्हापासून वाचत होतो… आजही कोणी मला झोपेतून उठवलं आणि टिळकांच भाषण म्हण म्हटल तर मी म्हणून दाखवेन, एवढ लक्षात आहे… म्हणजे माझे आई वडील आणि शिक्षक ह्यांचा वाटा जास्त आहे त्यात… त्यांनी मला वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध करून दिली, आणि मी ती वाचली… मुळातच जहाल मताचे असणारे तुम्ही आणि तुमचे जहाल विचार मला तेव्हापासून पटतायत… इतिहासाचं पुस्तक वाचताना तुमच्यावर जास्त लिहिलेलं असाव अशी माझी मनोमन इच्छा असायची, पण काय करणार, आमच्याकडे तुमच्या नंतर आलेल्या लोकांचं कौतुक जरा जास्तच आहे… असो, त्या वादात पडायचं नाही…

पण मला सर्वात जास्त राग तेव्हा येतो जेव्हा आजकाल काही लोक तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अनेक राष्ट्रपुरुषांना जातीच्या बेड्या घालतात… टिळक ब्राम्हणांचे असे म्हणून ब्राम्हण ब्राम्हणेतर हा वाद उगाच पण स्वतःच्या फायद्यासाठी आज लोक करतात… तो वाद करताना ह्यांना हेही माहित नसत की महाराजांचे चौथे वंशज ह्यांच्या विरोधात संस्थान खालसा करण्याच कट हे इंग्रज सरकार करत होत तेव्हा त्याला केसरी मधून वाचा फेडणारे तुम्हीच होतात, त्यासाठी तुरुंगवास भोगणारे हि तुम्हीच (तुम्ही आणि आगरकर) होतात आणि तुमची जामिनावर सुटका करणारे महात्मा फुले होते… असो हे माहित असण्यासाठी तुमच्याबद्दल फार वाचावं लागेल पण टिळक तुम्ही ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मंडालेला तुरुंगवास भोगलात ते स्वातंत्र्य काय फक्त ब्राम्हणांना मिळव ह्यासाठी नव्हत… असो…

पण टिळक, तुम्ही सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज खूपच लोकप्रिय झाला आहे… पण ह्या लोकप्रियते सोबत अनेक वादही आहेत… आज अनेक गणेश मंडळ स्थापन झालेली आहेत आणि नुकताच गणेशोत्सवाच्या मंडपावरून जो वाद झाला तो सर्वश्रुतच आहे… डीजे, डॉल्बी हे तर आजकाल गणेशोत्सवात नित्याचेच झाले आहे… नुसतं ध्वनिप्रदूषण आणि मंडप एवढाच हा वाद नाहीये, आज गणपतीची "उंची" हे लोक फुटावर मोजतायत आणि त्या प्रत्येक प्लास्टर च्या मूर्तीसोबत जलप्रदूषण सुद्धा होतंच आहे… सामाजिक प्रबोधन तर दूरच पण आज ह्यांचच प्रबोधन करायची वेळ आलीय कि काय असं वाटतंय… सर्वच मंडळ नाहीत तशी, काही खरच चांगल काम करत आहेत पण ती हाताच्या बोटावर मोजू एवढीच आहेत… पण, जर आज तुम्ही असतात तर कदाचित तुम्ही एक गाव एक गणपती योजना राबवली असतीत…

टिळक तुमच्याबद्दल जेव्हा मी वाचतो तेव्हा मला एक नवीन उर्जा मिळते, कुठलही संकट आलं तरी त्यावर मात करायची शक्ती मिळते… आणि आजपासून मी तुमची माहिती माझासोबत  इतरांना कळावी म्हणून प्रयत्न नक्की करेन… तुम्हाला पुन्हा विनम्र अभिवादन…

प्रथमेश तेंडुलकर

No comments:

Post a Comment