Friday 16 September 2016

चैतन्य गणेश

नमस्कार

चैतन्य ग्रूपच्या माध्यमातून दर महिन्यात आपण एक एक सामाजिक उपक्रम करत असतो. असाच एक उपक्रम आपण ह्या गणेशोत्सवात सुद्धा केला. यंदाचा गणेशोत्सव आपण अनाथाश्रमासोबत साजरा करण्याचे ठरवले. गणपती बाप्पांना प्रिय असलेले मोदक ह्या मुलांना वाटून हा गणेशोत्सव साजरा करायचे ठरले. संकल्पना जरी माझी असली तरी हे काम पूर्ण करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. आणि मग दिनांक 5 सप्टेम्बर, 11 सप्टेम्बर आणि 15 सप्टेम्बर ह्या दिवशी आम्ही सर्वांनी मिळून मोदक वाटपाचा कार्यक्रम करायचे ठरवले.

5 सप्टेम्बर 2016 आणि 11 सप्टेम्बर 2016 -
भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी, ह्या दिवशी स्नेहसदन ह्या अंधेरी पूर्व येथील एका अनाथालयाला आमच्या ग्रूपने भेट दिली. ते करत असलेले काम समजून घेतले. तसं बघायला गेलं तर स्नेहसदन ह्या संस्थेच काम फार अगोदरपासून सुरु आहे. गरीब, अनाथ अशा मुलांचा साम्भाळ करून, त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभ करण्याचं काम ही संस्था करते. गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नेहसदन मधे मुलांना आमच्या ग्रूपतर्फे सकाळचा नाश्ता आणि मोदकांचे वाटप केले. तसेच माझा भाचा ओम मराठे ह्याचा वाढदिवससुद्दा तिथे साजरा करण्यात आला. ओम आणि देशपांडे काकांच्या हस्ते काही मुलांना शालेय दप्तर आणि सर्वांना वही व पेन देण्यात आले. असाच मोदक वाटप उपक्रम दिनांक 11 सप्टेम्बर 2016 रोजी पुन्हा स्नेहसदन येथे करण्यात आला. ह्या दिवशी त्या मुलांसोबत काही वेळ घालवता आला. तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आमच्या ग्रूपमेम्बर्सना मिळालेले समाधान हे अवर्णनीय होते.

15 सप्टेम्बर 2016 - अनंत चतुर्दशी
वात्सल्य ट्रस्ट सोबत मी आणि आमचा चैतन्य ग्रूप फार अगोदर पासून जोडले गेलो आहोत. वात्सल्य सोबत पिकनिक असो वा गुढीपाडवा, दसरा असो वा दिवाळी, प्रत्येक सण, उत्सव आमचा ग्रूप वत्सल्य सोबत साजरा करतो. हा गणेशोत्सव सुद्धा वात्सल्य सोबत आम्ही साजरा करणार होतोच. अनंत चतुर्दशीच्या दिवशी वात्सल्य ट्रस्ट येथील मुलांना मोदक वाटण्यात येतात. त्यात आमच्या ग्रूप तर्फे काही मोदक देऊन खारीचा वाटा आम्ही उचलला.

अशाप्रकारे ह्या दोन संस्थांसोबत ह्यावेळी आम्ही गणेशोत्सव साजरा केला आणि श्रीन्च्या क्रूपेने हे सर्व कार्य सुरळीत पार पडले. ह्या निमित्ताने गणपती बाप्पांकडे एकच मागणे, " ह्यापुढे सुद्दा आमच्या ग्रूप तर्फे असेच चांगले काम होऊंदे. आमच्यातर्फे होणाऱ्या कामांची व्याप्ती तुमच्या सोन्डेसारखी वाढत जाओ, आमच्या ग्रूप मधील सर्वांचे आयुष्य आणि स्वभाव तुम्हाला प्रिय असणाऱ्या मोदकांसारखे गोड होवोत. "

गणपती बाप्पा मोरया.

प्रथमेश श. तेंडुलकर

** अधिक माहिती व फोटो फेसबुक पेज वर उपलब्ध आहेत.

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/

https://www.facebook.com/groups/945763795437105/

Saturday 2 July 2016

आम्ही देव वाटून घेतलेत...?

          ह्या लेखाला सुरवात करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की इथे " देव " म्हणजे पुराणकाळातील देव नव्हेत. देव म्हणजे ते महापुरुष जे आपल्या कार्याने देवपण मिळवून गेले.

          आजचा हा लेख का लिहावा लागला ह्याच कारण म्हणजे नुकतंच आपल्या " जाणत्या राजांनी " छत्रपतींच्या राज्यसभेवरील नेमणुकीवरून केलेल वक्तव्य. बघायला गेलं तर वक्तव्य जातीय भेदाला खतपाणी घालणारं आहे. ब्राम्हण - ब्राह्मणेतर हा वाद काही आपल्याला नवीन नाही. त्यात ब्राम्हण-मराठा वाद निर्माण करण्याची ही सुस्पष्ट खेळी दिसते आहे. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्या नंतर ह्यांच्याच एका शिलेदाराने बाबासाहेब पुरंदरे, ब्राम्हण व ब्राह्मणेतर असा वाद निर्माण केला होता. वादाला कोणीच घाबरत नाही किंबहुना असले वाद आता कोणीच जास्त मनावरही घेत नाहीत पण स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्या नेत्यांकडून जर अशी वक्तव्य येत असतील तर महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. प्रत्येकाला आपल्या जातीचा, धर्माचा तितकाच अभिमान असतो जितका आपल्याला आपल्या भारतीय ह्या राष्ट्रीयत्वाचा असतो. पण एकाबाजूला स्वतःला पुरोगामी म्हणायचं आणि दुसरीकडे जातीय वक्तव्य करायचं हे कितपत योग्य आहे?  मला कुठल्याही जाती बद्दल काहीही आक्षेप नाही, प्रत्येक जात, धर्म हा आपापल्या जागी श्रेष्ठ असतो, पण एखाद्या महापुरुषाला जातीय बेडीत अडकवणे किती योग्य? ह्याचा विचार कोण कधी करणार कोणास ठाऊक.

          आज सर्व महापुरुष, योद्धे जातीय बेडीत अडकलेले आहेत किंबहुना जाणूनबुजून तसे अडकवले गेले आहेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे मराठ्यांचे, पेशवे, लोकमान्य हे ब्राह्मणांचे, बाबासाहेब दलित समाजाचे असे आपण जातीनुसार महापुरुष वाटून घेतले आहेत का? शिवरायांनी स्वराज्य उभारलं होतं ते काय फक्त मराठा समाजासाठी? शिवरायांचं कार्य हे संपूर्ण हिंदुस्थान साठी होतं. त्यात  १८ पगड जाती, धर्म अशा सर्व लोकांसाठी होतं. "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा" ह्यातील मराठा म्हणजे मराठा जातीतील नव्हे तर ह्या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो, ज्याला हिंदवी स्वराज्य हवं आहे असा मराठा, मग त्यात कोणत्याही जातीचा आणि धर्माचा मराठा असला तरी महाराजांना त्यावर आक्षेप नव्हता. शिवाजी महाराजांच्या सैन्यात बाजीप्रभू, मोरोपंत ह्यांच्यासारखे ब्राम्हण सुद्धा होते आणि नूरखान बेग सारखा मुस्लिम सुद्धा होते. ह्यावरूनच महाराज जातीपातीच्या किती पुढे होते हे आपल्याला लक्षात येते. फक्त आपले महाराज नाही तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लोकमान्य ह्यांना स्वराज्य हे ब्राह्मणांसाठी नको होतं, संपूर्ण देशासाठी हवं होतं. बाबासाहेबांनी राज्यघटना ही फक्त एक विशिष्ट वर्गासाठी नाही लिहिली. ह्या व इतर सर्व महापुरुषांनी जे केलं ते राष्ट्रासाठी, ह्यांनी एक समाजाचा, संकुचित विचार केला असता तर आपण आज सुखाने घरात बसलो नसतो.

          होय, हे खर आहे की छत्रपती पूर्वी पेशव्यांची, फडणवीसांची नेमणूक करायचे. पण हे कोणालाच अमान्य नाही आहे. पेशवे हे छत्रपतींचे सेवक होते आणि जरी पेशव्यांनी छत्रपतींच साम्राज्य संपूर्ण हिंदुस्थानभर पोहोचवलं तरी त्यांनी छत्रपतींच्या गादीचा हव्यास पेशव्यांना नव्हता. आणि झाला तो इतिहास आहे. आत्ता छत्रपतींची नेमणूक राष्ट्रपतींनी केली आहे राज्यसभेवर, आणि त्यात कोणाला आक्षेप असण्याचं काहीच कारण नसावं. पण ह्यातही आपण जातीय काहीतरी शोधून काहीतरी वादाला तोंड फोडत आहोत का ह्याचा विचार सर्वांनीच करायला हवा. सरकार फडणवीसांचं असो किंवा ९५ साली आलेलं जोशी-महाजनांच, पण आपण सर्व जातीत इतके अडकलो आहोत का की मुख्यमंत्री हे एका जातीसाठी नसून संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत हेही आपल्याला समजू नये? असं असतं तर शंकरराव चव्हाण असो किंवा दिवंगत देशमूख साहेब असोत, ह्यांना लोकांनी मराठा समाजाचे मुख्यमंत्री म्हणून बघितलं असतं.

          असो, कोणी काय विचार करायचा आणि काय बोलायचं ह्याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा. पण आपल्या स्वार्थासाठी निदान आपल्या देवांचा (महापुरुषांचा) वापर करणं आपण थांबवलं पाहिजे, असं मला वाटतं. बाकी आपण सूज्ञ आहात.

जय महाराष्ट्र.

प्रथमेश श. तेंडूलकर

Friday 11 March 2016

एक मराठी माणूस

**सदर blog ABP माझा च्या फेसबूक पेज वरील " एका मराठी माणसाने " राज ठाकरे ह्यांना लिहिलेल्या पत्राला उत्तर म्हणून आहे.

माननीय " एक मराठी माणूस ",

ABP माझाने आपलं blog रूपी पत्र फेसबूक वर दाखवल आणि ते माझ्या वाचनात आलं. सुरुवातीपासूनच आपल्या पत्राला काय म्हणावं हेच कळत नाही पण आपण एका इंग्रजी माध्यमातून शिकला आहात हे नमूद केले आहे म्हणून कदाचित पत्र कसं लिहावं ह्याच ज्ञान नसेल म्हणून आपल्या पत्राला माझ हे उत्तर. पण हे उत्तर फक्त आपल्याला नाही बरं का? हे पत्र ABP माझाला सुद्धा आहे, हे पत्र त्या प्रत्येकाला आहे जे लोक आज राज ठाकरेंवर टीका करत आहेत. पत्राच्या सुरुवातीलाच एक गोष्ट नमूद करतो की मी मनसे ह्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, "आपल्यासारखाच एक मराठी माणूस आहे", फक्त उलट बाजूने न बघता एखादी गोष्ट सरळ बघण्याकडे माझा दृष्टीकोन असतो. हे सांगायचे कारण इतकच की कदाचित हे पत्र वाचल्यावर तुम्ही मला मनसेचा कार्यकर्ता समजाल, तर आपल्या चुकीच्या विचारात अजून एका चुकीच्या मताची भर नको म्हणून हे स्पष्टीकरण.

मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे ह्यांनी त्यांच्या भाषणात सांगितल ते आपण सर्वांनी पाहिलं, तेच पुन्हा मी बोलत नाही. पण आज ते बोलायची वेळ का आली? आपण आपल्या पत्रात सलग एक उल्लेख केला आहे की आपण होळीला रिक्षा जाळू आणि होळी साजरी करू, आपला हा उल्लेख जरी एक टोमणा किंवा तत्सम असल तरी ह्या गोष्टीचा सारासार विचार केला का तुम्ही? ज्या रिक्षाचे परवाने वाटले गेले त्यात ७०% लोक हे परप्रांतीय आहेत ह्या मनसेच्या दाव्याला तुम्ही खोडलं असं कुठेच दिसलं नाही मला. नाही तुम्ही आणि नाही माझा ने. जरा पत्र लिहायच्या आधी नुसत ABP माझा बघू नका, इतर बातम्या बघायचा सल्ला मी आपल्याला देत आहे. कारण काल डॉक्टर उदय निरगुडकर ह्यांच्या कार्यक्रमात मनसे च्या नेत्यांनी अनेक कागदपत्र दाखवली जसे की खोट डोमेसाइल , शाळा सोडल्याचा दाखला ज्यात फक्त ३ वर्षात तो माणूस ८वी पास झाला. अशी अजब शाळा कुठली हे अजून मला कळलेलं नाही. तुमच्या शाळेल तरी अस होईल का? आता मला सांगा की इतके खोटे कागदपत्र जर मनसे दाखवत असेल तरी तुम्ही त्यांना एकाच गोष्टीवर झोडा की रिक्षा जाळायचा आदेश का दिला? तुम्हाला  (ABP माझा सारख्या ) फक्त ह्याच गोष्टी वर खेळ नाचवून TRP वाढवायचा आहे, असं ह्यातून शंका येत आहे.

आपल्या पत्रात अजून एका गोष्टीचा उल्लेख आहे, तो म्हणजे "ब्ल्यू प्रिंट". ह्या पत्राच्या माध्यमातून मला हे तुम्हाला विचारायचे आहे कि तुम्ही तरी हि ब्ल्यू प्रिंट नीट वाचली आहे का? जर ती वाचली असती तर आज त्यावर प्रश्न विचारले नसतेत. वृत्त वाहिन्यांना माझा एकच प्रश्न आहे की  " ब्ल्यू प्रिंट दाखवून १ आमदार आला " वैगरे तुम्ही बोलता आहात पण जेव्हा ब्ल्यू प्रिंट च सादरीकरण होत होतं तेव्हा तुम्ही ते दाखवलं का? तेव्हा तुम्ही युती आणि आघाडीच्या घटस्फोटावर डोळा ठेऊन होतात. मग आत्ता हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे एकदा तपासून पहा. मला ह्या पत्र लिहिणाऱ्या " मराठी माणसाला " अजून एक विचारायचे आहे की बाबा एक सांग आझाद मैदानावर जेव्हा एक हिंसक मोर्चा निघाला आणि आपल्याच मराठी पोलिसांवर अन्याय झाला तेव्हा त्यांच्या बाजूने बोलणारा आणि आवाज उठवणारा नेता फक्त राज ठाकरे होते. तेव्हा साध आभारच पत्र तरी लिहिलं का रे तू? बर ते जाऊदे टोल विषयी महाराष्ट्रात जेव्हा राज ठाकरे ह्यांनी आवाज उठवला तेव्हा जे अनेक टोल बंद झाले त्याबद्दल कृतज्ञता तर जाऊदे पण ते आंदोलन अर्धवट का सोडलं म्हणून तू विचारतो आहेस. अरे पण आज जे सरकार आहे त्यातले मंत्री महाराष्ट्र टोलमुक्त करू हि घोषणा करत सत्तेवर आले, त्यांनी केला का रे महाराष्ट्र टोलमुक्त? हा प्रश्न "मराठी माणसाला" एकट्याला नाही तर हे जे वृत्तवाहिन्या आहेत त्यांना सुद्धा आहेत.

राहिला प्रश्न रिक्षा परवानाच्या आंदोलनाचा तर एकच सांगायचे आहे की कुठल्याही हिंसेच समर्थन मी करत नाही पण मराठी माणसाच्या पोटावर जर पाय मारत असेल कोणी आणि त्यासाठी कोणी विरोध केला तर कुठे चुकलं? असे किती मुजोर रिक्षा आणि टेक्सी वाले दाखवू तुला कि जे मुजोरी करतात? AC च्या गार हवेत बसून ब्लॉग रूपी पत्र लिहिणं जितकं सोपं आहे ना तितक आज मुंबई मध्ये कुठे जायचं असेल तर रिक्षा मिळवण कठीण आहे. हाच बिचारा गरीब रिक्षावाला असतो (परप्रांतीय). मुंबईत ह्याच बिचार्या गरीब रिक्षा आणि कॅब वाल्याला तो ज्या विभागात वाहन चालवतो आहे त्या विभागाची माहिती नसते. तेव्हा ह्या सगळ्यात त्रास सहन करणारा सुद्धा मराठीच असतो, पण तुला त्याच काही नसेलच. बोलायला गेलं तर बरंच आहे पण सध्यापुरत इतका खूप झालं.

माझ पत्र तुला मिळालंच तर वाच आणि विषय समजून घ्यायचं प्रयत्न कर. बाकी मराठी माणूस सुद्न्य आहे.

सस्नेह जय महाराष्ट्र,

एक मराठी माणूस..