Thursday 27 July 2017

आरोग्यम धन संपदा....

आरोग्यम धन संपदा

मागच्या एका ब्लॉग मध्ये मी पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात असलेल्या अंधश्रद्धेविषयी माहिती दिली होती. मेडिकल ट्रीटमेंटच्या अभावी कशाप्रकारे एका मुलीला आपला जीव गमवावा लागला ह्याची माहिती मी दिली होती. (त्या ब्लॉगची लिंक मी देत आहे दुर्दैव.... http://prathamesh10dulkar.blogspot.com/2017/07/blog-post.html ) ह्यावर आमच्या ग्रुप मार्फत काही करता येईल का हे मी पाहात होतो. त्यासाठी मी काही डॉक्टर्स सोबत चर्चा केली. काही सामाजिक संस्थांसोबत चर्चा केली. त्यानंतर एका निष्कर्षाप्रत मी पोहोचलो.

त्यातील आरोग्यासंबंधीचा मुद्दा मी आपल्या समोर मांडत आहे. सप्टेंबर महिन्यात आम्ही त्या विभागात एक आरोग्य शिबीर करणार आहोत. ह्या आरोग्य शिबिरात शाळेतील व गावातील इतर मुलांची तपासणी करण्यात येईल. त्याचे रेकॉर्डस् आमच्याकडे ठेवण्यात येतील. त्या रेकॉर्डस् नुसार तिथे एक फॉलोअप घेतला जाईल. त्यासाठी महिन्यातून एकदा डॉक्टर्स तिथे जातील आणि तपासणी करतील. काही मेजर आजार दिसला तर त्यांचे उपचार करण्यासाठी मदत करण्यात येईल. आरोग्य सोबतच त्या गावकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी काही वर्कशॉप्स, लेक्चर्स सुद्धा आम्ही करणार आहोत. साधारणतः मेडिकल ट्रीटमेंटला नकार हा ३ गोष्टींमुळे दिला जातो. १) अंधश्रद्धा, २) भीती आणि ३) उपचारांसाठी लागणाऱ्या पैशांची कमी. ह्यातील मुद्दा क्रमांक १ आणि २ ह्या दूर करण्यासाठी आपले लेक्चर्स, वर्कशॉप्स हे उपयोगी पडतील. तसेच मेडिकल ट्रीटमेंट नंतर जे काही लोक बरे होतील तसं त्यांच्या मनातून ह्या गोष्टी हळू हळू कमी होतील. पण ह्या गोष्टीला बराच वेळ द्यावा लागेल. राहिला मुद्दा क्रमांक ३, पैशांची कमतरता. आजूबाजूच्या विभागातले लोक हे दैनंदिन रोजावर काम करतात. वीटभट्टी वैगरे वरती ते कामाला आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे साधन हे अत्यंत कमी आहे. त्यासाठी म्हणून गावातील गरजूंना, विशेषकरून स्त्रियांच्या हाताला काम कसे मिळवून देता येईल ह्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणेकरून त्यांनी बनवलेल्या वस्तूंना मुंबई, पुणे सारख्या शहरात मार्केट उपलब्ध करून देता येईल आणि त्यातून त्यांच्या उत्पन्नाची सुरुवात होईल. सुरवात हि अगदीच मोठी नसेल, पण काही दिवसातच हि लहानशी सुरुवात मोठी व्हायला वेळ सुद्धा लागणार नाही. 

हे काम आमच्या एका ग्रूपमार्फत करताना आम्हाला समाजातील विविध संस्थांची, व्यक्तींची गरज आहे. जे ह्या उपक्रमात आपापल्या परीने जी मदत करू शकतील ती मदत अपेक्षित आहे. आपण डॉक्टर असाल तर तुम्ही महिन्यातून १ दिवस (रविवार) ह्या कामासाठी देऊ शकता. आपण एखाद्या संस्थेचे सदस्य असाल तर संस्थे मार्फत आरोग्य शिबिराला मदत करू शकता. वैयक्तिकरित्या आपण आरोग्य शिबिरात होणाऱ्या, पुढील फॉलोअप मधील येणाऱ्या खर्चाचा वाटा तुमच्यापरीने उचलून, श्रमदान करून आम्हाला मदत करू शकता.

बाबा आमटेंचं एक फार सुंदर वाक्य ह्या निमित्त्ताने मला आठवलं. " निःस्वार्थ सेवा हा सामाजिक कार्याचा आत्मा असतो". आपली मदत हि आमच्यासाठी आणि त्यापेक्षाही जास्त समाजातील त्या दुर्बल घटकांसाठी अमूल्य असेल. आपल्याला आमच्यासोबत ह्या कार्यात सहभागी व्हायचं असेल तर मेसेजच्या शेवटी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

धन्यवाद. 

प्रथमेश श. तेंडुलकर (चैतन्य मित्रमंडळ)
संपर्क :- ९८६९३७१५८० (Whatsapp वर उपलब्ध) / ७०३९४६४२९१

Sunday 23 July 2017

वृक्षवल्ली आम्हा सोयरी - २०१७...

#वृक्षवल्ली आम्हा सोयरी - २०१७...

चैतन्य मित्रमंडळातर्फे गेल्या 3 वर्षात अनेक उपक्रम करण्यात आले. त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे वृक्षारोपण. जुलै २०१६ मधे वात्सल्य ट्रस्टच्या व्रुद्धाश्रमाच्या जागेवर आम्बा, साग, वड अश्या एकूण ५५-६० झाडांचे रोपण आम्ही केले होते. हा आमच्या ग्रूप तर्फे केलेला पहिला वृक्षारोपण कार्यक्रम. तेव्हा सांगितल्याप्रमाणे वर्षभर आम्ही त्या झाडांची नीट काळजी घेतली आणि त्याचा परिणाम म्हणजे लावलेल्या झाडान्पैकी १००% झाडे जगली.

गेल्यावर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही ( चैतन्य मित्रमंडळ - बाळशिवाजी ग्रूप - स्वराज्य ग्रूपतर्फे ) २३ जुलै २०१७ रोजी वाशिन्द येथील रावतेपाडा येथील प्रगट वीघ्नेश माध्यमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जाम्भूळ, आम्बा, पारिजातक अश्या एकूण ५५ झाडांचे रोपण आम्ही केले. तीनही ग्रूप मिळून काम करतानाचा हा अनुभव खूप मस्त होता.

ह्या झाडांचे रोपण करताना एक अभिनव कल्पना आम्ही राबवली. प्रत्येक झाडाला शिवाजी महाराजांच्या एक एक गडाचे नाव आम्ही दिले. रोपण करताना आणि त्या आधी मुलांना प्रत्येक गडाबद्द्ल माहिती दिली गेली. गडांचा इतिहास आणि महत्व सांगण्यात आले. ह्याचा उद्देश एकच होता, तो म्हणजे आपल्या महाराजांचा इतिहास, गडकिल्ल्यांची माहिती एका पिढी कडून दुसऱ्या पिढी पर्यंत पोहोचवणे आणि आपला वारसा, वैभव जतन करणे. गडकोट हे आपले वैभव आहे, महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. ह्याच गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मेसेज आम्ही लोकांना देण्याचा एक प्रयत्न केला.

वृक्षारोपण झाल्यावर पुढील उपक्रमाची आखणी व त्यावर चर्चा करण्यात आली. त्याबद्दल वेळोवेळी आपल्याला कळवले जाईलच. प्रत्येक उपक्रमात आमचा ग्रूप थोडा थोडा वाढतोय. प्रतिपदेचा चंद्र जसे कलेकलेने वाढतो तसंच चैतन्य मित्रमंडळ ह्या ३ वर्षात कलेकलेने वाढलय. सुरूवतीला १० हातांनी (५ व्यक्ती) होणारी मदत आज ३० हातांनी होतेय. ह्याच ३० हातांच बळ ३०० हातांच व्हावे म्हणून आपणही आमच्या उपक्रमात सहभागी व्हा ही नम्र विनंती.

सहभागी झालेल्या सर्व सहकार्याँचे मनापासून धन्यवाद. ह्यापुढेसुद्धा तुमची अशीच साथ मिळेल ही अपेक्षा. कोणाला आमच्या ग्रूप सोबत उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर मेसेजच्या शेवटी दिलेल्या नम्बर वर सम्पर्क करा.

चैतन्य मित्रमंडळ
सम्पर्क :- 9869371580 / 7039464291

*Please visit our fb page. Click on the link given bellow...

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/

Saturday 15 July 2017

दुर्दैव....

दुर्दैव....

चैतन्यचं काम करताना अनेक आदिवासी पाड्यांना भेट आम्ही देत असतो. त्या निमित्ताने आम्ही वासिंद जवळील रावतेपाडा येथे भेट देण्याचा योग्य आला. तिथल्या प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय येथे ई - लर्निंग सुविधा आम्हाला सुरु करायची होती. तेव्हा तिथल्या सरांकडून इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीबद्दल मला समजलं. त्या मुलीला काहीतरी आजार झाला इतकंच मला समजलं होतं. मी माझ्या ओळखीतल्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन यायला सांगितले. खरा प्रॉब्लेम तर इथून सुरु झाला होता. आदिवासी पाडा आणि तिथले लोक हे औषधं, डॉक्टर ह्यापासून चार हात नव्हे तर किंबहुना कोसो दूर असल्याचं आम्हाला दिसलं. कारण जेव्हा त्या मुलीच्या पालकांना त्या शिक्षकांनी डॉक्टरांकडे घेऊन जायची तयारी दर्शवली तेव्हा त्यांनी त्याला साफ नकार दिला. त्या विभागात फिरताना आम्हाला जवळपास एखादं हॉस्पिटल तर सोडाच पण साधा दवाखानासुद्धा दिसला नाही. सरकारी आस्थेच हे एक अपयशच म्हणावं लागेल. पण मुंबईसारख्या मेट्रोसिटी पासून काही किलोमीटर अंतरावर असूनसुद्धा मूलभूत सुविधांचा अभाव हे सर्वांसाठीच लज्जास्पद आहे आणि सरकारसाठी जास्त.

आमच्या काही प्रयत्नांमुळे त्या मुलीचे पालक तिला के.ई.एम. हॉस्पिटलला घेऊन यायला तयार झाले. ९ जुलैला त्या मुलीचे पालक तिला घेऊन आले. तिची परिस्थिती बघवत नव्हती. तिचा एक पाय पूर्ण काळा पडला होता आणि ती वेदनेने कळवळत होती. ओळखीचे डॉक्टर तिथे होतेच. शाळेचे एक सर, आणि आमच्या ग्रुपचे मेम्बर्स तिथे प्रत्यक्ष हजर होते. डॉक्टरांनी ताबडतोब तिचं चेकअप केलं आणि त्यात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्या मी पुढे सांगेनच. पण तिला गँगरीन झाला होता आणि तो पसरला होता. तिचा पाय कापावा लागणार होता आणि पर्याय नव्हता. तिच्या पालकांनी ऑपेरेशन करायला साफ नकार दिला. डॉक्टरांनी त्यांना खूप समजावले आणि हे सुद्धा सांगितलं की जर हिच्यावर आता उपचार झाले नाहीत तर पुढील १५-२० दिवसात हिला जीव गमवावा लागेल. पण इतक ऐकून सुद्धा ते तयार झाले नाहीत. कारण त्यांचा डॉक्टर, हॉस्पिटल ह्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. शेवटी ते तिला घेऊन गेले घरी. आणि आज १५ जुलैला त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला.

ह्या गोष्टीला जबाबदार कोण? त्या मुलीचे आई वडील? मूलभूत आरोग्य, शिक्षण न पुरवणारं सरकार? की त्यामुलीचं नशीब? कारण जेव्हा डॉक्टरांनी त्या मुलीचं चेकअप केलं तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी माझ्या समोर आल्या. त्या मुलीला गँगरीन झाला होता. आणि ह्या गोष्टीला १ महिन्यापेक्षा जास्त होऊन गेलेला. आणि म्हणूनच ते विष त्या मुलीच्या शरीरात पसरत गेलं. मग एक महिना हे लोक करत काय होते? ह्या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न मी केला तेव्हा काही शक्यता समोर आल्या. त्या म्हणजे सगळ्यात आधी एखाद्या रोगाबद्दल तिथल्या लोकांचं असलेलं अज्ञान. दुसर म्हणजे गरिबी आणि शिक्षणाचा अभाव. तिसरं म्हणजे मूलभूत सोयी सुविधा जस आरोग्य सुविधांचा अभाव आणि जरी त्या उपलब्ध झाल्या तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या दळणवळणाच्या गोष्टींचा अभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धा. लोक ताप खोकला ह्यासाठी सुद्धा बुवा-बाबाकडे जातात. स्वतःला पुरोगामी म्हणवणर्या आपल्या सर्वांसाठी ही एक चपराक आहे.

Whatsapp, फेसबुक ह्यासारख्या virtual जगात राहणाऱ्या आपल्या नेटकरी लोकांपर्यंत ह्या बातम्या क्वचितच पोहोचत असतील. अश्या कितीतरी मुली आपला जीव ह्यामुळे गमावत असतील. आता ह्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपतर्फे जे जे जमेल ते ते करणार आहोत. कारण निदान रावतेपाडा विभागात तरी पुन्हा कोणाची अशी अवस्था होऊ नये अशी अपेक्षा आहे. ह्याला आपण एक लढा म्हणू शकतो. हा लढा कुठल्या व्यक्ती विरुद्ध किंवा सरकार विरुद्ध नाही. हा लढा आहे विचारांचा. आपले विचार त्यांना पटवून देण्याचा. हे काम करताना, हा विचारांचा लढा लढताना, ह्या कामात आम्हाला आपल्या मदतीची सुद्धा गरज लागेल. निदान आत्तातरी ह्या व्हर्च्युअल जगातून बाहेर येऊया आणि सर्वांनी मिळून एक विचाराने ह्यासाठी काम करूया.

आमच्या चैतन्य ग्रुपची लिंक मी शेवटी देत आहे. ज्यांना आमच्या ग्रुप सोबत काम करायचे आहे किंवा आपले काही सजेशन असतील तर आम्हाला संपर्क करू शकता. वाट बघतो आहे.

प्रथमेश श. तेंडुलकर
९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel