Wednesday 28 August 2019

मंतरलेले दिवस

25 ऑगस्ट 2019ला आम्ही सांगली विभागातील एका गावाला (पूरग्रस्त गावाला) मदत देऊन आलो. या लेखातून गेल्या 15 दिवसांचा माझा अनुभव मांडणार आहे. मदत करताना आणि त्याआधीचे सर्व अनुभव या लेखातून मांडणार आहे. म्हणून हा लेख कदाचित थोडा मोठा, दोन टप्प्यात होईल. कसा आहे ते नक्की कळवावे.

बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रात आलेल्या पुराच्या बातम्या पाहत होतो, त्याने झालेलं नुकसान पाहत होतो. पण काही कारणाने चैतन्यतर्फे हा उपक्रम करावा असा विचार नव्हता. इतकं मोठं नुकसान आणि आपली मदत कोणापर्यंत आणि किती पुरी पडणार याचा काहीच अंदाज नव्हता. 7 ऑगस्टला संध्याकाळी बातम्यांमध्ये पुराची बातमी पाहिली आणि तिथली एकूण परिस्थिती बघून कोणाचं मन हेलावलं नसेल असा माणूस कदाचित दुर्मिळ असेल. म्हणून हा उपक्रम थोड्या प्रमाणात का होईना पण करायचाच असं ठरवलं आणि 8 ऑगस्ट 2019ला आमच्या कमिटीमधील सदस्यांना कल्पना देऊन या उपक्रमाची तयारी सुरु केली केली. सर्वात महत्वाचे होते की नक्की मदत कुठे करायची? सांगली कोल्हापूर सारखाच एक पूर कोकण विभागात आला होता. दुसरा प्रश्न हा होता की स्थानिक पातळीवर योग्य मार्गदर्शन कोण करेल? हे पहिले दोन महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात आधी मी माझ्या संपर्कांत असलेल्यांपैकी काही विश्वासू व्यक्तींना (सांगली, कोल्हापूर आणि कोकण विभागातील) संपर्क केला. त्यांच्याशी बोलल्यानंतर अजून एक समजलं की सांगली कोल्हापूर विभागातील पुराचे प्रमाण आणि त्यातून झालेले नुकसान सर्वात जास्त होते. आणि त्यातच डॉ. महेशकुमार ढाणे सरांची ओळख झाली. त्यांनी सांगली विभागातील लोकांना नक्की कोणत्या गोष्टीची गरज आहे, काय करावं लागेल याची सर्व माहिती दिली. "तुम्ही इथलं माझ्यावर सोडा, आपण नक्की काहीतरी चांगलं करू" असं म्हणणारे डॉक्टर ढाणे सांगलीच्या भिलवडी आणि भुवनेश्वरवाडीच्या लोकांसाठी देवदूतापेक्षा कमी नव्हते. अशी सर्व तयारी झाल्यावर 9 ऑगस्ट 2019 पासून या उपक्रमाची सुरवात झाली.

सुरवातीला आम्ही सॅनिटरी नॅपकिन आणि ORS पावडर जमा करण्याकडे भर दिला. लोकांनी सुद्धा भरभरून सपोर्ट केला. लोकांचा चैतन्यवरील विश्वास पाहून हा उपक्रम नक्की पूर्ण होईल हा आत्मविश्वास आला. एका मित्राची बोलकी प्रतिक्रिया होती. त्याने त्याचं नावं गोपनीय ठेवावं म्हणून सांगितलं म्हणून ते इथे लिहीत नाही पण तो म्हणाला की, "मला मदत करायची होती पण कशी करू आणि कुठे करू हेच समजत नव्हतं. तुझी पोस्ट वाचली आणि मार्ग सापडला. तुम्ही योग्य ठिकाणीच मदतीचं वाटप कराल ही खात्री आहे." लोकांचा आपल्यावर किती विश्वास आहे याचं हे उदाहरण होतं. सॅनिटरी नॅपकिन आणि ORS पावडर यांची गरज पूर्ण होते न होते तोच डॉ. ढाणे यांनी एका गावाची माहिती दिली. भुवनेश्वरी देवीच्या मंदिराला लागूनच वसलेलं गाव, भुवनेश्वर वाडी. साधारण 70 कुटुंबांचं हे गाव. या सर्वांना शक्य तेवढी मदत पोहोचवायचं आम्ही ठरवलं आणि डॉक्टरांकडून मिळालेल्या माहिती नुसार सामान आणि सामानासाठी लागणारे पैसे जमा करण्यासाठी सुरवात झाली. या मदतीत प्रत्येक कुटुंबाला एक फॅमिली पॅक द्यायचा ठरला ज्यात काही दिवस पुरेल इतकं अन्नधान्य, ब्लॅंकेट, चटई, लहान मुलांचे डायपर्स, ORS पावडर, रोजच्या वापरातल्या वस्तू, महिलांना साड्या, सॅनिटरी नॅपकिन अश्या वस्तू देण्यात आल्या. सोबतच प्रत्येक कुटुंबातील लहान मुलांना शाळेसाठी दप्तरासकट शालेय साहित्य देण्यात आले. एका कुटुंबाला मदत करताना घरातील मुलांचं शिक्षण मागे पडू नये म्हणून केलेला हा एक प्रयत्न होता.

खरंतर चैतन्यतर्फे अश्या अस्मानी संकटात सापडलेल्यांना मदत करायची ही पहिलीच वेळ. त्यामुळे मदत कशी जमवायची हा एक खूप मोठा प्रश्न होता. पण चांगल्या कामासाठी अनेक हात आपोआप जोडत जातात तसेच हात आमच्या सोबत जोडले गेले. आणि 70 कुटुंबांना करायची मदत हळू हळू जमा झाली आणि वाटायची तारीख ठरली 25 ऑगस्ट 2019. पण खरं आव्हान तर पुढे होतं. सर्व सामान तर जमा झालेलं पण त्याचं व्यवस्थित पॅकिंग करणं बाकी होतं, फॅमिली पॅक करायचे होते आणि असं बरंच काम होतं आणि तेही लवकरात लवकर करायचं होतं. अशावेळी चैतन्यच्या तीन मुली स्वतःहून पुढे आल्या आणि त्यांनी हे सर्व काम हाती घेतलं. स्नेहाली आणि पूजाच्या घरी सर्व सामान जमा केलं. स्नेहालीने 70 शालेय साहित्याचे पॅकिंग केलं. पूजा, स्नेहाली आणि दिपालीने मिळून सर्व फॅमिली पॅक तयार केले. 14 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत स्वतःचा जॉब सांभाळून, घरची कामं सांभाळून रात्री 12-1 वाजेपर्यंत जागून आम्ही चौघांनी हे सर्व पॅक तयार केले. पॅक तयार होईपर्यंत कोणालाच भूक, झोप आठवत नव्हती. स्वतःसाठी प्रत्येकजण करतो पण हे दुसऱ्यासाठी करत होते हे विशेष. यांच्यासोबत विशेष कौतुक करावं ते यांच्या सर्व कुटुंबातील सदस्यांचं. स्नेहाली आणि पूजाच्या घरी बरंच सामान उतरवलं तरी त्यांच्या सदस्यांनी यासाठी मदत केली, कुठलीही तक्रार न करता. उलट स्नेहालीच्या घरी पॅकिंग करताना खायला काय हवं नको ते सुद्धा तीची आई बघत होती. चांगलं काम करताना माणूस एकटा नसतो हेच खरं. इतकी मेहनत घेतल्यावर काम पूर्ण झालंच पाहिजे होतं आणि ते आम्ही केलंच. 9 तारखेपासून 24 तारखेपर्यंतचे हे दिवस आमच्यासाठी मंतरलेले होते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच विषय डोक्यात, "बाकी वस्तू कश्या जमवायच्या इ.". सुरवातीला आम्ही हे सामान टेम्पो मधून पाठवणार होतो पण प्रत्यक्ष हा अनुभव घ्यायचा होता म्हणून आम्ही ठरल्या प्रमाणे 24-25 तारखेच्या रात्री 12 वाजता हा प्रवास सुरु केला, तो प्रवास आणि सांगलीतील अनुभव पुढील लेखात मांडणार आहे. नक्की वाचा.

प्रथमेश श. तेंडुलकर
Mob. N0. - 9869371580

*सामानाचे पॅकिंग करतानाचे आणि इतर फोटो सोबत जोडत आहे


पूजाच्या घरी उतरवलेलं सर्व अन्नधान्य, चटई, ब्लॅंकेट आणि इतर सामान


स्नेहालीच्या घरी जमा केलेलं "शैक्षणिक साहित्य"


फॅमिलीपॅक तयार करताना दीपाली आणि स्नेहाली.


दीपाली, स्नेहाली, पूजा यांच्या मेहनतीने तयार  झालेले फॅमिली पॅक 

Wednesday 29 May 2019

हा ABP, माझा नाही..

हा ABP, माझा नाही..

भारताच्या स्वतंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाची किंमत स्वातंत्र्योत्तर भारतात किती आहे? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे ABP माझावरील २८ मे रोजी झालेली चर्चा. २८ मे म्हणजे स्वतंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. कदाचित २ ऑक्टोबर इतकी फेमस नसल्याने कुठल्याही वृत्तपत्रात त्याची बातमी नसेलच हे अपेक्षितच होतं. कारण सावरकर म्हटलं की या कणा नसलेल्या लोकांच्या लेखण्या खुंटतात आणि तोंडं सुटतात आणि हाच प्रकार केला ABP माझाने. सावरकर - नायक की खलनायक? यावर एक चर्चा आणि प्रसन्न जोशी सारखे पत्रकार असले की समजून जायचं की चर्चा एकांगी होणार. प्रसन्न सोबत नम्रता वागळे पण होत्या पण "नमस्कार मी नम्रता वागळे. एबीपी माझाच्या माझा विशेष मध्ये आपलं स्वागत आहे... etc एवढंच बोलण्यापुरतं त्यांचा सहभाग होता. असो तो मुद्दा नव्हे. मुद्दा हा की एबीपी माझाला या चर्चेसाठी जो मुहूर्त मिळाला त्याचं टायमिंग आणि कार्यक्रमाचे मुद्दे.

आज एबीपी माझा म्हणतंय की "कार्यक्रमातून सावरकरांचा अपमान करायचा हेतू नव्हता, सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेणं हा उद्देश नव्हता इ." मूळातच कार्यक्रमाच्या शीर्षकातूनच (सावरकर - नायक की खलनायक) सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर संशय घेतला गेला. जर एबीपी माझाने सावरकरांचे कार्य दाखवणारे कार्यक्रम दाखवले होते आणि त्यांच्या मनात सावरकरांच्या राष्ट्रभक्तीबद्दल शंका नव्हती तर "नायक की खलनायक" हे शीर्षक का? आणि यातून शंका उत्पन्न करायची नव्हती? आणि जर एबीपी माझाच्या (प्रसन्नच्या किंवा त्यांच्या इतर पत्रकारांच्या) मनात शन्का होती तर त्यांनी ती शंका सावरकर वाचून दूर करायला हवी होती, त्याचा जहीर कार्यक्रम घेण्याची काय गरज? कोणत्या प्रेक्षकाने एबीपी माझाकडे मागणी केली की "भौ आमची माहिती अपूर्ण आहे तर कार्यक्रम घेऊन पूर्ण करा.''? जर अशी कोणती मागणी नाही, तुम्हाला शंका घ्यायची नव्हती (जाहीर केलेल्या पत्रकाप्रमाणे), तर असा जाहीर कार्यक्रम घेण्याची गरजच नव्हती.

दुसरा मुद्दा. कार्यक्रम सावरकरांवर होता ना? मग सावरकर नायक की खलनायक हा प्रश्न विचारत प्रसन्न जोशी शेवटी हिंदूराष्ट्रवाद या त्याच्या आवडत्या विषयाकडे वळला आणि भाजपच्या प्रवक्त्याला "तुम्ही हे मान्य करा की त्यांचा हिंदुत्ववाद, हिंदूराष्ट्रवाद तुम्हाला मान्य नाही की मान्य आहे.." मुळात कार्यक्रम सावरकरांच्या विषयाचा असताना भाजपाच्या प्रवक्त्याला हा प्रश्न का विचारला गेला? याचं उत्तर एबीपी माझा ने द्यावं. आणि जेव्हा स्वतः गांधीवादी प्रवक्ते सावरकरांच्या हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना जे बरोबर बोलले ते ऐकून सुद्धा त्याविरुद्ध प्रश्न हिंदुत्ववादी प्रवक्त्याला प्रसन्न जोशी एकांगीपणे विचारत असताना एबीपी माझाला सावरकरांच्या कोणत्या कार्याचा आदर करायचा होता?

आज पत्रक काढून त्यावर आपली बाजू मांडणाऱ्या एबीपी माझाने असाच कार्यक्रम २ ऑक्टोबरला घेण्याची हिंमत करावी. कारण जसे काही लोक सावरकर आणि त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत तसेच काही जण गांधीवाद न मानणारे सुद्धा आहेत, म्हणून त्याचीही "चिकित्सा" एबीपी माझाने जाहीर कार्यक्रम घेऊन करावी. आणि प्रसन्न जोशीने एकाच प्रश्नाच उत्तर द्यावं की जर तू फक्त अहिंसाच परमोधर्म मानतो तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःचे बलिदान देणाऱ्या भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांचे योगदान तुम्ही अमान्य करणार का? कारण भारताला स्वातंत्र्य फक्त उपोषण करून मिळालं नाही हेही तितकंच सत्य आहे.

असल्या टुकार चर्चा बघितल्या की आपल्या क्रांतिकारकांच्या बलिदानाकडे बघून कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितेतल्या काही ओळी आठवतात,

नाचविता ध्वज तुझा, गुंतले शृंखलेत हात..
तुझ्या यशाचे पवाड गाता, गळ्यात ये तात..
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार,
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर..
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार,
आई वेड्यांना आधार..
गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार..!

या ओळींनीसह सर्व क्रांतिकारकांना वंदन करून या लेखाचा शेवट करतो. जय हिंद.

प्रथमेश श. तेंडुलकर

Monday 18 March 2019

कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती...

कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती...

राजकारणाबद्दल जेव्हापासून वाचायला लागलो, काही नेत्यांबद्दल आदरयुक्त कुतूहल वाटू लागलं. अशी काही व्यक्तिमत्व नेहमीच आदरणीय आहेत. अटलजी, प्रमोद महाजन आणि मनोहर पर्रिकर ही यातील अशी नावं आहेत की वैचारिक मतभेद असो अथवा नसो पण यांच्याबद्दल चुकूनही वाईट विचार येत नाहीत. अजातशत्रू या शब्दाचा खरा अर्थ इथेच समजतो. पण भारतीय राजकारणाचं, भारतीयांचं दुर्दैव हेच की वरील तीनही जण आज हयात नाहीत. काल मनोहर पर्रिकर गेले ही बातमी वाचली आणि मन सुन्न झालं. एक चांगला नेता हरपला ही सर्वांचीच भावना होती. पण मला जाणवलेले पर्रिकर पाहता एक चांगला माणूस हरपला हेच राहून राहून मनाला वाटत होतं.

दीड दोन वर्षांपूर्वी पर्रिकरांना live ऐकायचं भाग्य मिळालं. मास्टर्सचं शिक्षण घेत असताना डिफेन्स संदर्भातील एका जागतिक परिषदेत भाग घेण्याचं भाग्य मिळालं आणि मी ती परिषद फक्त पर्रिकरांना live ऐकण्यासाठी attend केली. पर्रिकर तेव्हा देशाचे संरक्षणमंत्री होते. IIT मधून passout झालेले संरक्षणमंत्री अशी एक प्रतिमा त्यांच्याबद्दल माझ्या मनात होती. मनोहर पर्रिकर आणि रघुनाथ माशेलकर यांना live ऐकण्याची इच्छा फार होती आणि त्यातली एक इच्छा त्यादिवशी पूर्ण होत होती. सकाळी 10 वाजता वाशीच्या International Conference Hallमध्ये पर्रिकरांचं भाषण होतं. मिळेल तशी जरा स्टेजच्या जवळची सीटवर बसलो होतो. इतर नेत्यांप्रमाणे पर्रिकर उशिरा येतील अशी सगळ्यांची अटकळ होती आणि तिथेच पर्रिकरांनी सिक्सर मारला. वेळेच्या 10मिनिटं आधीच पर्रिकर आले. बरोब्बर 10 वाजता उदघाटन झालं आणि 10:20ला पर्रिकर सर्वांशी बोलायला उभे राहिले. अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम असल्याने समोर सर्व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि कंपन्यांचे एम्प्लॉयी बसले होते.  पर्रिकरांनी भाषणाची सुरवातच अभियंता आणि त्यांचं देशातील त्यांच्या योगदानाने सुरु झालं. ज्ञान कसे घ्यावे इथून सुरु झालेलं भाषण मधेच एखादा विनोद करत पर्रिकरांना त्यांच्या कॉलेज जीवनात घेऊन गेलं. IITमधली शिक्षणाची पद्धत, तिथे त्यांनी शिकलेल्या गोष्टींसोबतच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यावे या विषयावर बोलताना पर्रिकरांनी दिलेलं त्यांच्या वडिलांचे उदाहरण आजही लक्षात आहे. सकाळी 10:20ला सुरु झालेलं पर्रिकरांचं भाषण 10:55ला संपलं. तो 30-35 मिनिटांचा संवाद आजही मनात घर करून आहे. त्यानंतर पर्रिकर कॉन्फरेन्स हॉल मधून Exhibition Hallमध्ये आले. सर्व उपकरणांची आणि इतर प्रोजेक्ट्सची पर्रिकर नीट आणि कुतूहलपूर्वक माहिती घेत होते.

अर्ध्या तासाच्या भाषणादरम्यान आणि Exhibition Hallमध्ये पर्रिकरांना न्याहाळताना त्यांच्यातला माणूस दिसला. जगातल्या सर्वात मोठ्या लोकतंत्र असलेल्या देशाचे संरक्षणमंत्री आणि इतकी साधी राहणी, जाणवतच नव्हतं. निळा हाफस्लीव्हचा शर्ट, काळी ट्राउसर असा पोशाख परीधान केलेल्या पर्रिकरांमधल्या साध्या माणसाचं दर्शन तेव्हा झालं, हल्लीच्या काळात नगरसेवकसुद्धा सुटा-बुटात फिरतात हो. पर्रिकरांचा साधेपणाच सर्वांना भावणारा होता. पर्रिकरांसाठी त्यांच काम आणि देशावरील प्रेम हे सर्वश्रेष्ठ होतं. कर्करोगाने त्रस्त असतानाही ते गोव्याच्या विधिमंडळात उपस्थित होते. माझ्या लेखाचं शीर्षक, "कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती..." याचा अर्थच मुळात हा आहे की स्वतःला सतत देशसेवेच्या कर्तव्यात मग्न ठेवणाऱ्या पर्रिकरांना मृत्यूने विश्रांती दिली. पर्रिकरांना नेताना मृत्यूचेही मन कदाचित हेलावले असेल. पण काय करणार, नियतीपुढे कोणाचे चालते. पण एक मात्र नक्की, पर्रिकर सर, तुमची एक्सिट मन हेलावणारी ठरली.

प्रथमेश श. तेंडुलकर

Tuesday 29 January 2019

Travelog - One Day Trek to Sinhagad 2019

Travelog - One Day Trek to Sinhagad 2019


माझा पहिला ट्रॅव्हलॉग माहुली गड ट्रेक आमच्या बऱ्याच मित्र-मैत्रिणींना आवडला म्हणून सिंहगड ट्रेकचा ट्रॅव्हलॉग लिहावा असे वाटले. माहुली ते सिंहगड दरम्यान अनेक ट्रेक केले पण प्रत्येकाचा ट्रॅव्हलॉग लिहावा वाटला नाही किंबहुना माहुली इतकाच सिंहगड सुद्धा मध्यम कठीण प्रकारात येतो म्हणून या ट्रेकचा अनुभव लिहून ठेवणे महत्वाचे वाटले.


सिंहगडाबद्दल थोडी माहिती..

सिंहगड (पूर्वीचे नाव कोंढाणा) स्वराज्यातील एक महत्वाचा गड. सिंहगडाला तसा खूप महत्वाचा इतिहास आहे. सिंहगड आधी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे कोंढाण्याचे किल्लेदार होते. दादोजींच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा स्वराज्यात सामील करून घेतला. पण महाराजा शहाजीराजे भोसले यांना दगा करून कैदेत ठेवल्यानंतर त्यांना सोडण्याच्या बदल्यात शिवाजी महाराजांनी कोंढाणा आदिलशाहीला परत दिला. त्यानंतर पुन्हा कोंढाणा स्वराज्यात आला पण त्यानंतर मिर्झाराजा जयसिंगच्या स्वारीत पुरंदरच्या तहात कोंढाणा मोगलांकडे दिला. तेव्हा कोंढाण्याचा सुभेदार होता उदयभान राठोड. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असू नये म्हणून शिवाजी महाराजांनी मोहिमेवर जायचे ठरवले पण त्यांचा बालमित्र आणि स्वराज्याचे सुभेदार तानाजी स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून तानाजी, सूर्याजी, शेलारमामा आणि काही निवडक मावळे सोबत घेऊन "आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं" म्हणत  कोंढाणा मोहिमेवर गेले. मोठं युद्ध झालं, गड स्वराज्यात आला पण राजांना त्यासाठी त्यांचा मित्र, स्वराज्याचा सुभेदार गमवावा लागला. तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले.

सिंहगड ट्रेक अनुभव

सिंहगड ट्रेकसाठी २७ जानेवारी २०१९ला आम्ही आमच्या खाजगी बसने सकाळी ४:१५ला मुंबईहून निघालो. मुंबईत थंडी इतकी जाणवत नव्हती पण माझा फेवरेट स्पॉट, लोणावळा आला आणि थंडी जाणवायला लागली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने खंडाळा-लोणावळा परिसरातून जाताना काँक्रीटच्या कुशीतून निसर्गाच्या मांडीवर डोकं ठेवल्याचा फील येतो. मजल दरमजल करीत खडकवासला धरणाच्या बाजूने आम्ही सिंहगडाच्या पायथ्याला पोहोचलो. गाडी जाण्याचा मार्ग बंद होता म्हणून गाडी पार्किंगला लावून मुख्य ट्रेकला सुरवात केली. डोणजे गावापासून सिंहगड पायथा पर्यंतचा प्रवास आणि नंतर सिंहगड सर करतानाचा पहिला टप्पा सहज पार झाला. सिंहगड आम्ही तीन टप्प्यात सर केला. पार्किंग ते सिहंगड पायथा, सिंहगड पायथा ते सिंहगड मध्य आणि मध्य ते सिंहगड माथा, या तीन टप्प्यांपैकी पहिला टप्पा सहज पार झाला. दुसरा टप्पा पार करताना थोडी दमछाक झाली. सिंहगड सर करताना आमचे २ ग्रूप झाले आणि चढतं ऊन आणि सरळ चढ यामुळे आमच्यातला एक मावळा अर्ध्यावरच थांबला. एका टपरीजवळ त्यांना बसवून आम्ही पुढे निघालो. सिंहगड चढताना एक गोष्ट नक्की की तुम्हाला प्रत्येक थोड्या अंतरावर ताक, लिंबूपाणी, दही, रानमेवा मिळतो. एनर्जी ड्रिंक पिऊन गड सर करण्यापेक्षा लिंबूपाणी आणि ताक हे आमचं खरं एनर्जी ड्रिंक अधे मध्ये घेत गडाच्या माथ्याच्या दिशेने आम्ही प्रवास करत होतो. शेवटच्या टप्प्यात चढ कठीण होता आणि सूर्यदेव डोक्यावर होते. अशातच माझ्यासोबतच्या अजून एका मावळ्याने थांबण्याचा निर्णय घेतला. पायात क्रॅम्प आल्याने पुढे गड चढणं तीला शक्य नव्हतं आणि मला गड चढायची कितीही इच्छा असली तरी तीला एकटीला अर्ध्यावर सोडून पुढे जाणं पटतही नव्हतं. म्हणून एकाक्षणी मीसुद्धा तिथेच थांबायचा निर्णय घेतला कारण गडमाथा अजून २५-३० मिनिटं वर होता. पण आमचा एक ग्रूप पुढे निघून गेलेला आणि त्यांना हे कळवणार कसं की आम्ही थांबतोय? कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती. आणि आमचं तर ठरलेलं की जेवण एकत्र करायचं. मग आम्ही थांबतोय हे त्यांना कळणार कसं? फक्त या एकाच कारणामुळे आमचा बसलेला मावळा पुन्हा उभा राहीला गड सर करण्यासाठी. मला एक गोष्ट आठवली, तानाजी धारातीर्थी पडल्यानंतर सर्व मावळे धीर खचून पळत होते तेव्हा सूर्याजीने परतीचे दोर कापून टाकले. एकतर पडून मारा किंवा लढून मारा हाच एक पर्याय होता. तसंच या मोबाईलच्या रेन्जने आमचे परतीचे मार्ग बंद करून टाकले (पण मनातून मला आनंद झालेला :-D ). आणि इथून तिसरा टप्पा सुरु झाला.








सिंहगड - अखेरचा टप्पा

तिसरा टप्पा हा पूर्ण सिहंगड ट्रेक मधील सर्वात कठीण टप्पा म्हणता येईल. उभी चढण आणि प्रत्येक ठिकाणी निसरडी वाट. दगडांना धरून उभी चढण चढणे म्हणजे एक टास्क होता. पुढे जाऊन मागच्यांना हात देऊन वर घेणे असं करत करत वर जायचं होतं. साधारण हा कठीण टप्पा पार करायला अर्धातास लागला. आता मात्र सिंहगड माथा नजरेत आला. डौलाने फडकणारा भगवा बघून झालेला त्रास विसरलो आणि पुढे पुढे सरकत राहिलो. 

जसा जसा गड जवळ येत होता तश्या शिवगर्जना ऐकू येत होत्या. खालून वर येताना तर URI मधलं "How's the Josh" करत सर्व वर येत होते. गडाच्या माथ्यावर उभं राहिल्यावर गेले काही तास आम्ही जी मेहनत केली ती सफल झाल्याचं समाधान वाटलं. वरून खाली बघताना "आपण एवढं वर चढून आलो?' असा प्रश्नही मनात आला. पण हो, आम्ही गडावर होतो, माथ्यावर.


सिंहगड दर्शन आणि जेवण

सिंहगड म्हणजे अगदी नावासारखा, जिंकण्यास अभेद्य. पहिला येतो तो पुणे दरवाजा. त्यापुढे पुणे दरवाजा दोन. आणि मग गडावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. घोड्याची पागा आहे आणि दारूखाना सुद्धा आहे. पूर्वी या ठिकाणी युद्धसाहित्यातील दारुगोळा ठेवला जात असे. सिंहगडावर तुम्हाला हिरकणी बुरुज सुद्दा दिसेल. आणि सर्वात महत्वाचा तानाजी कडा. जिथून तानाजी आणि त्यांचे साथीदार गडावर चढून आलेले. या व्यतिरिक्त राजाराम महाराजांची समाधी अश्या अनेक गोष्टी पाहणासारख्या आहेत.





इतकं चढून आल्यावर भूक तर लागणारच. गडावर अनेक छोटी हॉटेल आहेत जिथे जेवण्याची सोय होते. आम्ही सर्व एका चटईवर मस्त झाडाच्या सावलीत जेवायला बसलो. गडावरची स्पेशल चुलीवरचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी,वांग्याचं भरीत, सोबत कांदाभजी आणि मटक्यात लावलेले दही.



मटक्याच्या दह्याची चव वेगळीच. गड चढत असताना आम्हाला एक दही विकणारे काका भेटले. त्यांच्याकडे दही घेऊन खाता खाता मी या दह्याबद्दल अधिक माहिती घेतली. मुळात आपण घरी जे विरजण लावतो त्या दह्याची चव आणि या चवीत खूप फरक होता कारण हे दही करण्यासाठी लागणारं दूध हे एका मडक्यात उकळवलं जातं आणि मग प्रत्येक छोट्या छोट्या मटक्यात त्याचं दही लावलं जातं. या मटक्यात उकळवलेलं दूध आणि मटक्यातच लावलेलं विरजण यामुळे दह्याची चव एक नंबर लागते.

पुणेकरांना तसंही स्वतःचे (पुण्यातले) पदार्थ जगात भारी असतात हे वाटतच असतं (गैरसमज) पण मटक्यातलं दही हे चवीच्या दृष्टीनेतरी जगात भारी होतं.माझं नशीब जोरात, ज्या ज्या गोष्टी जेवायला आवडतात त्या त्या अगदी भारी चवीच्या तिथे मिळाल्या.

पैशांचा विचार केला तर हो जेवण बऱ्यापैकी महाग आहे पण हिशोबाचा विचार केलात तर गडाच्या माथ्यावर, चटईवर, झाडाच्या सावलीत बसून असे ऑथेंटिक पदार्थ खायला मिळणार तर थोडे पैसे जास्त गेले तरी प्रॉब्लेम नाही. तशीही आमची मुंबई आर्थिक राजधानी आहेच, मग चालतंय की राव.

परतीचा प्रवास

सगळ्यात मोठा टास्क आत्ता होता. जेवढी उभी चढण आम्ही चढून आलो तेवढीच उभी उतरण होती. त्यामुळे एक मावळा जो अर्ध्यावर होता त्याला घेण्यासाठी एक ग्रूप आलेल्या वाटेने गडउतार झाला आणि आम्ही एक ग्रूप जिथून गाड्या येतात त्या रस्त्याने निघालो. साधारण १०-११ किलोमीटरचं अंतर होतं पण फक्त उतार होता आणि तोही चांगल्या रस्त्याचा. कोणीतरी मागून ढकलावे आणि घरंगळत हळू हळू पायथ्याशी पोहोचावे असं आम्ही चालू लागलो. सुनसान रस्ता आणि त्या रस्त्यावरून चालणारे आम्ही. फक्त पक्षांचा आवाज आणि आमच्या बोलण्याचा आवाज इतकी शांतता होती त्या रस्त्याला. पण हळू हळू आम्ही ते अंतर पार केलं. साधारण दीड तास आम्हाला लागलॆ. डोणजे गावात येऊन मस्त कटिंग चहा आणि बिस्कीट सोबत परतीचा प्रवास सुरु झाला.

ट्रेकमधून आम्ही परत काय घेऊन गेलो? असं जर कोणी विचारलं तर मी या ट्रेक मधून माझ्या सोबत ऊर्जा घेतली आणि काहीही झालं तरी गड सर करायचाच ही प्रचंड इच्छाशक्ती घेऊन परतलो. ट्रेक करून खाली उतरताना अजून एक अनुभव मला समजला. आमचा एक ग्रूप ट्रेक मार्गाने खाली उतरताना एका आजींच हाड निखळलं होतं हे आमच्या ग्रूपमधील गणेशला समजलं. त्यावेळी त्यांना प्रथमोपचार देण्यासाठी तो पुन्हा वर गेला आणि इतकंच नाही तर आपल्यासोबत इतर 4-5 जण जमवून त्याने त्या आजींना खाली आणलं. गणेशने आणि त्या इतर 4-5 जणांनी जे काम केलं त्याला तोड नाही. आजकाल लोक आपल्या लोकांसाठी काही करत नाहीत पण ना ओळख ना पाळख असलेल्या आजींना मदतीसाठी हे सर्व धावून गेले. गणेशला त्याच कारणामुळे पायथा गाठायला उशीर झाला आणि नक्की का उशीर झाला हे माहित नसल्याने त्याची काळजी तर होतीच पण त्याच्याशी कुठलाच संपर्क नसल्याने मी त्याच्यावर चिडलो सुद्धा पण हे कारण कळलं तेव्हा पट्ठ्याचा अभिमान वाटला. आणि एवढं करून पण मनाचा मोठेपणा दाखवून त्याने "हे मी चैतन्य मधून शिकलो, क्रेडिट चैतन्यच.." असं सांगितलं पण हे क्रेडीट चैतन्यच नाही ते फक्त छत्रपतींच. कारण छत्रपतींच्या गडावर असताना आपल्या डोक्यात शिवविचारच असणार आणि त्याच शिवविचाराने त्याने त्या आजींना मदत केली.

 आपण ट्रेक करतो त्यात एक मजा असते पण त्यासोबत आपल्याला आपल्या मर्यादा कळतात. आपल्या limits आपण किती स्ट्रेच करू शकतो हे कळतं आणि सिंहगडाच्या माथ्यावर पोहचून जेव्हा खाली बघतो तेव्हा २ तास केलेल्या मेहनतीचं जे फळ मिळतं आणि जे समाधान मिळतं त्याची तोड कशालाच नाही.

जय शिवराय.
प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८0)


काही टीप्स:-
मटक्यातील दही घ्यायचे असल्यास ते मटक्यातच लावलेले होते का याची खात्री करून घ्यावी. दही मटक्यातच लावलेले असेल तरच त्याला ती चव असेल.