Monday 24 January 2022

"तीचं" येणं हा खरंच "Problem" असतो का...???


"तीचं" येणं हा खरंच "Problem" असतो का...???

माझ्या या मथळ्याचा अर्थ कदाचित तुम्हाला पहिल्यांदा वाचल्यावर समजला नसेल. पण हा लेख वाचल्यानंतर मला नक्की काय म्हणायचं होतं हे तुमच्याही लक्षात येईल. आपण एखाद्या गोष्टीला आपल्या आपल्या नजरेतून बघतो आणि त्यानुसार त्याला काय म्हणायचं हे ठरवतो. अनेकदा आपल्या घरातील मोठे, किंवा आजूबाजूचे मोठे त्या गोष्टीला जे म्हणतात तेच आपणही म्हणू लागतो. म्हणजेच काय तर ज्या वयात समज नसते त्या वयात आपल्याला एखाद्या गोष्टीला "अमुक अमुक" म्हणतात हे कळलं की आपण त्याचं अनुकरण करतो आणि पुढे त्या गोष्टीला ते नाव रूढ होतं. आणि हे रूढ झालेलं नाव काही केल्या आपल्या मनातून, विचारातून जात नाही, ते तसंच राहतं, कायमचं.

ही सगळी झाली प्रस्तावना, आता मूळ मुद्द्यालाच हात घालू. आपल्या शरीराची एक रचना असते आणि काही नैसर्गिक प्रक्रिया असतात. काही नैसर्गिक प्रक्रिया आपल्याला फार "चांगल्या" वाटतात पण काही मात्र आपल्याला "चांगल्या" वाटत नाहीत. त्याबद्दलच्या गैरसमजामुळे असेल म्हणा किंवा लहानपणापासून आपण आपल्या जवळच्या मोठ्या व्यक्तींकडून हे ऐकल्यामुळे म्हणा, पण आपल्यालाही काही प्रक्रिया "चुकीच्या" किंवा कधीकधी "घृणास्पद" वाटू लागतात. वेगवेगळ्या दुर्गम भागात मी 2016-17 पासून काम करतो आहे. या भागातील मुली "मासिक पाळी" या विषयाकडे एखाद्या "विटाळ" नजरेने पाहतात. पाळीबद्दल अनेक गैरसमज यांच्या मनात लहानपणापासून रूढ झालेले असतात. बऱ्याचदा ते त्यांच्या घरातील मोठ्यांकडून ऐकलेले असतात किंवा आजूबाजूला पाहून, कोणाचं तरी ऐकून निष्कर्ष काढलेले असतात.

प्रोजेक्ट MAHA च्या माध्यमातून "मासिक पाळी" विषयावर मार्गदर्शन समुपदेशन कार्यशाळा घेताना मासिक पाळीबद्दल माहिती सांगायच्या आधी आम्हाला सामना करावा लागतो तो यांच्या मनातील गैरसमजाशी, विविध अंधश्रद्धेशी आणि मनात घट्ट बसलेल्या "विटाळ" भावनेशी. त्यासाठी आधी त्यांचा विश्वास जिंकणं महत्वाचं असतं आणि मग आपण त्यांची मैत्रीण आहोत हा विश्वास निर्माण करावा लागतो. ज्या विषयावर मुली एक-दोघातही बोलायला कचरतात तो विषय आता सर्वांसमोर बोलला जाणार. बापरे..! किती टेन्शन. मुलींचे शंकान्नी ग्रासलेले चेहरे, हावभाव त्यांच्या मनाची घालमेल स्पष्ट करतात. पण याच मुली नंतर हळूहळू कार्यशाळा enjoy करत बोलू लागतात, शंका विचारतात. एका कळीचं फुललेलं फूल होण्याची प्रक्रिया जशी असते तश्या या मुली हळू हळू खुलतात. हा वर्कशॉप सुरु असताना मी दिपालीला मदत करण्यासाठी तीथेच मागे असतो. आणि यादरम्यान बऱ्याचदा एक शब्द माझ्या कानाला खटकत होता. "Problem". शाळेतल्या मुली त्यांना "Problem" येतो, कधी येतो सांगत होत्या. मासिक पाळी हा Problem नाही हे माझ्या मनात घट्ट होतं म्हणूनच की काय माझ्या कानांना "Problem" शब्द खटाकायला लागला. पण पाळी येणं याला "Problem" का बरं म्हणतात? हा प्रश्न होताच. नंतर जाणवलं की बऱ्याचदा शिक्षिकाही मासिक पाळीला "Problem" म्हणत होत्या. आत्ता माझ्या लक्षात आलं की आपली ताई, आई, मॅडमच जर याला Problem म्हणत असतील तर या मुलीही त्याला Problemच म्हणणार. कारण मोठ्यांचं ऐकावं, ते बरोबरच असतात, नाही का? पण इथे ते बरोबर नाहीत हे मुलींना सांगणं गरजेचं होतं. कारण मासिक पाळीला Problem म्हटलं की "ती" म्हणजे काहीतरी चुकीचं हे त्यांच्या मनावर घट्ट बसतं.

म्हणून या Workshop च्या शेवटी मी या मुलींशी संवाद साधला. सुरवातीला लाजणाऱ्या मुली नंतर दादा किंवा सर म्हणून उत्तरं देत होत्या. दिपालीने तीचं काम उत्तम केलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ता जर यापुढे त्यांना पाळी आली तर त्याला आम्ही Problem म्हणणार नाही, हेही त्यांनी सांगितलं. बदल एका दिवसात घडत नाही. तो हळू हळू आपल्या वागण्यातून, बोलण्यातून घडत असतो. म्हणून जेव्हा आपण "तीचं" येणं हे problem समजायचं बंद करू आणि आपल्या मुलींना हा Problem नाही हे सांगू तेव्हाच मासिक पाळीकडे सर्वांचा बघायचा दृष्टिकोन बदलेल. हा बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत, आपणही आमच्यासोबत या.

धन्यवाद,
प्रथमेश शशिकांत तेंडुलकर
Founder - Chaitanya Social Welfare Foundation

©prathameshtendulkar2022

तळटीप - सदर पोस्ट आवडली तर आपण शेअर करू शकता. Copy-Paste करत असाल तर कृपया पूर्ण पोस्ट Copy-Paste करून शेअर करावी.