Monday 13 July 2020

पावनखिंडीतील रणसंग्राम...!!!

पावनखिंड...! ! ! 

लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात हे एक चित्र पाहीलं होतं आणि पावनखिंडीतील पराक्रम वाचला होता. "लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे" या वाक्याचा अर्थ हळू हळू समजत गेला. १३ जुलै १६६०, मराठ्यांच्या जाज्वल्य पराक्रमाचा दिवस, बलिदान दिवस. अफाट शत्रू विरुद्ध मूठभर मराठे. कसे लढले असतील? कुठे झालेली ही लढाई? का झाली? यासाठी थोडी आधीची माहिती घेऊया.

महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान मारला आणि अखंड हिंदुस्थानात परकीय आक्रमकांना धक्का बसला. अफजलखान मारणं ही अशक्य गोष्ट जी शिवरायांनी शक्य केली. आदिलशाही सलतनतीला हा जबरदस्त धक्का होता. महम्मद आदिलशहाच्या मृत्यू नंतर त्याचा वारीस अली आदिलशहा गादीवर बसला आणि आदिलशाही राजकारणाची सूत्रे बडी बेगम (आदिलशहाची बेगम) हीच्याकडे गेली. आणि अफजल मारल्यानंतर शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी तीने कर्नूलचा किल्लेदार सिद्दी जौहरची नेमणूक केली, सोबत बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी उतावळा झालेला फाजल खान (अफजल खानाचा मुलगा) दिला. प्रचंड सैन्य (साधारण चाळीस हजार), तोफा, संपत्ती घेऊन सिद्दी स्वराज्याकडे निघाला. त्यातच औरंगजेबाने त्याचा मामा शास्ताखानाला स्वराज्यात धाडले. स्वराज्यावर दुहेरी संकट होते. त्यामुळे सिद्दीच्या फौजा स्वराज्यात घुसू नयेत म्हणून स्वराज्याचा कारभार आऊसाहेबांकडे (जिजाऊमातांकडे) सोपवून राजे पन्हाळ्यावर गेले. सिद्दीला वाटले की महाराज घाबरून पळत आहेत पण स्वराज्याचे कमीतकमी नुकसान व्हावे म्हणून सिद्दीला पन्हाळ्यावर खेचण्यासाठी शिवाजी महाराजांनी केलेली ही खेळी होती.

भर उन्हात सिद्दीने पन्हाळ्याला वेढा दिला. एका बाजूला सिद्दी जौहरचा पन्हाळ्याच्या पायथ्याला पडलेला कडक वेढा, विशाळगडाला सूर्व्यांचा वेढा आणि दुसरीकडे स्वराज्यावर चाल करून आलेला शास्ताखान. दुहेरी संकटात सापडलेलं स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. वेढा फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले, खासे सरसेनापती नेतोजी (नेताजी नाही) पालकर पराभूत झाले. पुढे जोरदार पाऊस सुरु झाला. सर्वांना वाटलं की पावसात वेढा कमकुवत होईल, दारू-गोळा भिजेल आणि मग हल्ला करून निसटता येईल. पण सिद्दी तयारीचा योद्धा होता. भर पावसातही सिद्दीचा वेढा जरासुद्धा हलला नाही. आता जास्त काळ महाराज गडावर थांबू शकत नव्हते कारण शास्ताखानाचाही बंदोबस्त करायचा होता. तेव्हा महाराजांनी शत्रूला गाफील ठेऊन वेढ्यातून निसटण्याचे ठरवले. तहाची बोलणी चालू झाली. आणि 12 जुलैच्या रात्री (गुरुपौर्णिमेच्या रात्री)आषाढ पौर्णिमेच्या रात्री राजे निवडक मावळ्यांना घेऊन वेढ्यातून निसटले. एका बाजूला शिवा काशीद महाराजांचे रूप घेऊन मसाईच्या पठाराकडे निघाले. सीद्दीला फसवण्याची एक खेळी होती. इतक्यात घात झाला, सिद्दीच्या नजरबाजांनी पालखी पाहिली आणि ते थेट सिद्दीकडे आले. शिवा काशीदला पकडून ठार करण्यात आले. स्वराज्यसाठी शिवा काशीद यांनी बलिदान दिले. पण सिद्दी चिडला आणि सिद्दी मसूद, फाजल खान आणि सोबत काही हजार हाशम शिवरायांच्या पाठीवर निघाले. इथून खरी झुंज सुरू झाली.

रानावनातून वाट काढत सकाळी सर्वजण गजापूरच्या खिंडीजवळ पोहोचले. आणि मागून येणारा शत्रू नजरेच्या टप्प्यात आला. प्रत्येकजण शिर तळहातावर घेऊन धावत होते पण इथे कडवी झुंज द्यावी लागणार होती कारण गनीम हजारोंच्या संख्येने आणि ताज्या दमाचा होता आणि इथे आपले मावळे रात्रभर धावून दमलेले आणि कमी संख्येने होते. अशावेळी राजे सुखरूप विशाळगडावर पोहोचावेत यासाठी सगळे सज्ज झाले. लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून सर्वांनी शिवरायांना अर्धे मावळे घेऊन विशाळगड गाठण्यास सांगितले, तोपर्यंत एकही गनिम घोडखिंड पार करणार नाही या वचनाशी सर्व कटिबद्ध झाले. राजांना मुजरा केला, अर्धे मावळे घेऊन राजे विशाळगडाकडे गेले आणि बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, कित्येक बांदल आणि मावळे गनिम अंगावर घायला सज्ज झाले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही होती की पन्हाळगड ते घोडखिंड हे अंतर भर पावसात, चिखलात धावत पार करून हे सर्व लढायला सज्ज होते. त्या सैन्याचे नेतृत्व स्वतः बाजीप्रभू करत होते. बाजी छातीचा कोट करून शत्रूसमोर उभे राहीले. टप्प्याटप्प्यावर एक एक छोटं पथक ठेवलं. दांडपट्टा, तलवार, भाले, दगड जे मिळेल ते घेऊन शत्रूवर तुटून पडायचं. सकाळी सुरु झालेली झुंज दुपारपर्यंत सुरु होती. प्रत्येक मावळ्यांच्या अंगावर वार व्हायलाच जागा नव्हती. रक्ताळलेलं शरीर पण ऊर्जा मात्र छत्रपती होते म्हणून कसलंच भान मावळ्यांना नव्हतं. सर्वांनी मिळून शत्रूला अशी काही झुंज दिली की एक गनिम घोडखिंडीतून पुढे सरकू शकला नाही.

इकडे राजांनी सुर्वेन्चा वेढा फोडला, राजे गडावर जायला निघाले, पोहोचले आणि लगेचच राजांनी वर पोहोचताच तोफांचे ३ बार उडवण्याचा आदेश दिला. तीन बार झाले, तीन तोफा धडाडल्या आणि राजे सुखरूप गडावर पोचले हे बाजींना समजलं. चोख कामगिरी बजावणारे बाजी धारातीर्थी पडले. या युद्धात बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, शिवा काशीद आणि कित्येक बांदल, मावळे धारातीर्थी पडले.

आता पावनखिंडीजवळ मोठे स्मारक उभं केलंय. मुख्य रस्त्यावरून खाली पन्नास एक पायऱ्या उतरून गेलं की एका छोटय़ाशा ओढय़ावर असलेला पूल ओलांडावा लागतो. पायऱ्या उतरताना खाली नजरेसमोर पसरलेली दाट झाडी. कल्पनासुद्धा मनाला शिवत नाही की खाली काही असेल. पण तो छोटासा पूल ओलांडला की अचानक उजवीकडे ढाल-तलवार अन् भगवा झेंडा असं स्मारक सामोरं येतं. इथून पुढे सुरू होते पावनखिंड. 

हे सारे वाचताना तो इतिहास अंगावर काटा उभा करतो. त्या भयाण रात्री, कोसळत्या पावसात, इतकं अंतर धावून पार केलेलं आणि अशा परिस्थितीत  ती मंडळी कुठल्या निष्ठेने लढली असतील असे वाटू लागते. निष्ठा एकच, ऊर्जा एकच, छत्रपती. त्यांच्या निष्ठेपुढे नतमस्तक व्हायला होते. मृत्यू पाठीवर असताना केवळ आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी अग्निकुंडात देहार्पण करण्यास आसुसलेले ते बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, शिवा काशीद आणि कित्येक बांदल, त्यांची स्वराज्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा अलौकिकच म्हणावी लागेल. कुठे सत्तेसाठी भावांचे रक्त आणि वडिलांचे प्राण याचाही विचार न करणारा औरंगजेब आणि आपले राजे सुखरूप गडावर पोहोचावेत म्हणून स्वतः वीरमरण पत्करणारे हे वीर. आजही तो प्रसंग वाचनात आला तरी अंगावर काटा उभा राहतो. आम्ही हॉलिवूड मुव्ही '300' मोठ्या आवडीने पाहतो पण घोडखिंडीत 300 मावळ्यांनी लढलेली लढाई आपण जाणून घ्यायचं प्रयत्न पण करत नाही म्हणून हा छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी.

नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू,शिवा काशिद, बांदलसेना व ज्ञात अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन 🙏

जय भवानी, जय शिवराय...
ऊर्जा छत्रपती...

प्रथमेश श. तेंडुलकर

Saturday 1 February 2020

महापराक्रमी म्हाळोजीबाबा घोरपडे..

महापराक्रमी म्हाळोजीबाबा घोरपडे..

मूकर्रब खानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला उभी होती. शंभूराजे संगमेश्वरी होते आणि या शिवपुत्राच्या घास घ्यायला पिसाळलेले मुघल संगमेश्वरी येउन पोहोचले. पण शंभूराजांच्या आधीच मूकर्रब खानाचा सामना झाला तो सरलष्कर म्हाळोजीबाबांशी. "ये बुढा, हमारा क्या बिगाडेगा" या गैरसमजात असलेला मूकर्रब खान आणि त्याची फौज मराठ्यांवर तुटून पडली. एकच जयघोष झाला, दीन दीन शब्दाला "हर हर, महादेव"गर्जना भिडली. खणखणल्या भाले, तलवार. आणि एक मराठा हजारोंच्या गनिमांवर भारी पडत होता. रक्ताचा चिखल झालेला, मांसाचे तुकडे पडलेले, प्रेतांचा खच पडला पण म्हाळोजीबाबा लढतच होते, गनीम कापत होते.

इतकं शौर्य मूकर्रब खानाने बघून तो बोलला, "पहिले इस बुढे को लगाम डालो". असं म्हणताच गनिमाने म्हालोजींना घेरलं, चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूप्रमाणे म्हाळोजीबाबा लढत होते. मूकर्रब खानाने एक नेमबाज बोलावला. एक बाण म्हाळोजीबाबांच्या दंडात घुसला आणि तलवार खाली पडली आणि पुढचा बाण कंठात घुसून म्हाळोजीबाबा गुढग्यावर बसले. वाघ जखमी झाला हे बघून गनीम म्हालोजींवर तुटून पडला आणि 1 फेब्रुवारी 1689साली म्हाळोजीबाबा पडले.

स्वराज्यासाठी, शंभूराजांसाठी जीव ओवाळून टाकणारे मावळे हीच स्वराज्याची दौलत होती. पैशासाठी, वतनासाठी फितूर होणारे अनेक होते पण लाखांचा पोशिंदा जगावा म्हणून लढणारे म्हाळोजीबाबा स्वराज्याची खरी दौलत होती. 331व्या पुण्यतिथीनिमित्ताने म्हाळोजीबाबांना विनम्र श्रद्धांजली.

जय शिवराय.

प्रथमेश श. तेंडुलकर