Thursday, 23 April 2015

एका शेतकऱ्याचे मनोगत

सकाळी गुरु ठाकूर ह्यांची एक कविता वाचली आणि त्यावरून आज हि एक कविता सुचली…

काल अजून एका शेतकऱ्याचेआत्महत्या केली… रोज कुठेतरी शेतकरी आत्महत्या करतोय आणि दुर्दैवाने आपण अजूनही देशाला कृषिप्रधान म्हणतोय… अशाच एका शेतकऱ्याची कविता…एका शेतकऱ्याचे मनोगत

गोड लागला ऊस म्हणून मुळासकट खाऊ नको…
शिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…

निरभ्र आहे आकाश, लावलीय त्याच्याकडे नजर
रक्ताचं झाल पाणी आणि सरकार दाखवतंय packagesच गाजर
चुकत असेल काही तर चपलेन हाण पण त्यांच्यात गणू नको
शिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…

दमत नसतो कधी राबून असा आमचा वेगळेपणा
१८ विश्व दारिद्र्य इथे तरी ताठ ठेवलाय कणा
साचून राहिलंय मनामध्ये ते बाहेर आणू कि नको
शिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…

मीही दिसेन तुला असाच एखाद्या फांदीवर लटकलेला
कामाने नाही पण संकटाने जीव आहे गुदमरलेला
मरताना मुलाला मात्र एकच सांगेन, बाबा तू तरी माझ्यासारखं बनू नको
काम कर दुसर एखाद पण शेतकरी मात्र बनू नको…

प्रथमेश तेंडूलकर** कविता गुरु ठाकूर ह्यांच्या कवितेवरून सुचली म्हणून श्रेय गुरु ठाकूर ह्यांना आणि अशी कविता शेतकऱ्यावर सुचली म्हणून सरकारचे श्रेय अधिक…

Friday, 17 April 2015

मैत्री… तुझी माझी …

अचानक हे असे काय झाले,
तुझे मन आणि माझे शब्द अनोळखीच झाले…

अनोळखी होतो जरी शब्द होते सोबतीला
साथ होती तुझ्या मनाची भावना समजायला…

आज ना साथ उरली ना साद उरली कोणाला द्यायला
शब्दच झाले पोरके मनाला भावना समजायला….

मन तरी बिचारे काय करेल, बावरले असेल बिचारे ते सुद्धा
निखळ मैर्त्रीच्या मध्ये कुठून आला इगोचा मुद्दा?

एकमेकांच्या चुका काढण्याची सवय मैत्री वर बेतली
शब्द माघार घेत नाही पाहून बिचार्या मनाने तरी माघार घेतली…

मैत्री दोघांनाही हवीय पण पहिली माघार कोण घेणार?
शब्दांवर मोठा झालेला इगो सोडून पुढे कोण जाणार?

मैत्री मध्ये नसावे हेवेदावे नसावेत शब्दांचे बाण
देवाकडे एकाच प्रार्थना, आमच्या जुन्या मैत्रीला परत आण ….

प्रथमेश तेंडूलकर

Thursday, 9 April 2015

एक पत्र देवाला

प्रथमेश तेंडूलकर
                 मुंबई 
प्रति,
देवबाप्पा.

                                                  विषय:-  तुझ्या काही गोष्टी न आवडल्या बद्दल

          देवा, आज तुला पत्र लिहायची हि माझी पहिलीच वेळ… कदाचित बोलण्याच्या ओघात काहीतरी जास्त बोलून जाईन तर राग मानू  नकोस, थोड्या आमच्या भावना समजून घे…

          आज नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला आलो आणि येतानाच एक दुखद बातमी समजली… आम्ही ज्या चैतन्य ग्रूप तर्फे सामाजिक उपक्रम करतो त्या समूहातील एक मृदुला तांबे ह्याचं हृदयविकाराच्या झटक्याने दादर येथील त्यांच्या घरी निधन झाले… माझ्यासाठी हा एक अतिशय दुखद धक्का होता कारण काही दिवसांपूर्वीच त्याचं आणि माझ फोन वर संभाषण झाल होत, आम्ही आमच्या ग्रूप ला घेऊन जव्हार येथे जाणार होतो पण त्या आधीच हे अस झाल…

          देवा, तुला पत्र लिहायचं कारण एवढच की आज जगात खूप कमी चांगले लोक उरले आहेत, लोकांसाठी निस्वार्थीपणे काम करणारे लोक खूप कमी उरले आहेत… त्यातही तू एक एक करून सर्वांना अस आपल्यासोबत नेलस तर देवा एकदिवशी असे चांगले लोक पूर्णपणे जगातून संपतील… मला ह्याच गोष्टीची तक्रार आहे तुझ्याकडे… मी इतर काही लोकांसारखा नास्तिक नाही, म्हणून ह्या माझ्या छोट्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्या तुझ्या इच्छेने घडतात ह्यावर माझा ठाम विश्वास आहे… 

          देवा, तू सर्वांची परीक्षा घेतोस हे मला नीट माहित आहे… पण देवा परीक्षा घेताना इतका कठोर होऊ नकोस रे… परीक्षा द्यायला कोणीच नाही म्हणत नाही आहे, पण चांगल काम करणाऱ्यांची जास्त परीक्षा घेऊ नकोस, नाहीतर एकदिवशी देव ह्या संकल्पनेवरून लोकांचा विश्वास उडेल… तुझी आम्हाला गरज आहे, द्रौपदीच वस्त्रहरण होताना जसा तू श्रीकृष्ण रूपाने तिच्या मदतीला धाऊन आलास तसच चांगली माणसं संकटात असताना त्यांना मदत कर रे… दुर्दैव हेच आहे कि फार पूर्वीपासून हे असेच सुरु आहेत, म्हणजे बाजीरावाला चाळीस वर्षांच आयुष्य आणि औरंगजेबला नव्वद वर्षाचं आयुष्य हा जो प्रकार आहे ना तो बंद कर…

          तुझ्याशी असलेल्या नात्याने निदान हक्काने मी हे तुला सांगतो आहे… जर काही चुकल असेल तर माफ कर…


तुझा एक भक्त,

प्रथमेश तेंडूलकर

Wednesday, 8 April 2015

मराठी चित्रपट, multiplex आणि वाद…

 मराठी चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये प्राईम टाईम मध्ये दाखवावा म्हणून राज्यसरकार ने विधीमंडळात काल एक मत दिले आणि त्याची अंमल बजावणी करण्याचे आदेश दिले… आदेश  येतो न येतो तोच काही हिंदी "celebrities" ची टिव टिव twitter वरून ऐकू आली… अनेकांनी स्वागत केले आणि अनेकांनी जाहीर विरोध केला… ह्या विरोधकांसाठी माझा एक ब्लॉग…

महाराष्ट्रात मराठी भाषा आणि त्या भाषेशी निगडीत सर्वच गोष्टींना प्राधान्य मिळायला हवे हे माझ स्पष्ट मत आहे… मराठी नाटक, मराठी सिनेमे, मराठी साहित्य हे सर्व मराठी भाषेशी निगडीत विषय आहेत… मराठी चित्रपटाच्या फायद्यासाठी जर राज्य सरकार काही करू पाहत असेल तर ह्या काही लोकांच्या पोटात दुखण्याचे कारण ते काय? एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय कि " आम्हाला आता choice उरलेली नाही…" choice ? काय पूर्ण दिवसभर मराठी चित्रपट दाखवणार अस हे बोलण आहे आणि तुम्हाला तुमच्या choice ची पडलेली आहे पण मराठी माणसाकडे एवढा दिवस कुठला choice नव्हता तेव्हा कुठे गेलेलात? म्हणजे तुमच्या choice  प्रमाणे आम्ही चित्रपट बघायचे ? कि मराठीत दर्जेदार सिनेमे नसतात?

हे तथाकथित celebrity ज्या माध्यमातून पैसा कमवत आहेत ते चित्रपट सृष्टी एका मराठी माणसाने निर्माण केली आहे… अगदी सुवर्ण कमळ वीजेता श्यामची आई पासून ते ऑस्कर ला जाणार्या श्वास पर्यंत मराठी चित्रपट आहेत…  एवढच कशाला, विहीर, देऊळ, नटरंग सारखे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे चित्रपट मराठीच आहेत… अहो एवढच कशाला… २६ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथात जे गाणं वाजल आणि ज्याला पहिल्या क्रमांकच बक्षीस मिळाल ते मराठी चित्रपटातील आहे आणि संगीतकार सुद्धा मराठीच आहेत… तरी तुम्ही मराठीचा दुस्वास करणार, कारण मराठी चित्रपट, मराठी माणूस म्हटला कि तुमची नाक आपोआप मुरडतात… मग हाच शहाणपणा तुम्ही दक्षिणेकडे शिकवता का?  तिथे आजही प्राइम टाईम मध्ये त्यांचे सिनेमे दाखवले जातात मग तुमचा विरोध मराठीलाच का? कि जाणूनबुजून केलेला हा विरोध आहे?

मुद्दा एवढाच आहे कि महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच अग्रस्थानी असेल आणि जर हे ऐकून कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी पोटदुखीच औषध घ्याव किंवा आमचे मराठी सिनेमे बघायला शिकावेत… नसेल जमत तर प्राइम टाईम सोडून इतर वेळी असलेले हिंदी किंवा इतर भाषिक (तुमच्या आवडीचे) सिनेमे बघा… कोणी अडवलय…

जय महाराष्ट्र

प्रथमेश तेंडूलकर