Friday 27 February 2015

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…

काल २७ फेब… आपण सर्व मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करत होतो… प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठीत बोलून आणि इतर अनेक उपक्रम साजरे करून हा दिवस साजरा केला असेल… पण आतापर्यंत आपण असे दिवस फक्त एका दिवसापुरते साजरे करतो आणि नंतर पुन्हा दुसर्या वर्षी येणाऱ्या दिवसाची वाट बघतो… हे एवढ्यापुरतच मर्यादित राहणार आहे का? ह्यातून मराठी भाषा आणि भाषेचे संवर्धन होईल? माझ्यासाठी मराठी ही एक फक्त भाषा नाही तर ती एक संस्कृती आहे आणि ती जपणे आणि वाढवणे हे आपल काम आहे…

आपल्या मध्ये मराठी रुजते ती जागा म्हणजे आपली शाळा… आज मराठी शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे… बरेचसे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत… असे का होत आहे ह्याचा कोणी विचार केला का? प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचं भविष्य उज्वल व्हाव हि माफक अपेक्षा असते आणि ती सर्वांची असते… पण अचानक असे काय झाले कि मराठी शाळा आपल्या महाराष्ट्रात वाचवायची वेळ आपल्यावर आली ह्याचा सारासार विचार आपण सर्वांनी केला पाहिजे… अस तर अजिबात नाही कि इंग्रजी माध्यमात काही वेगळ शिकवतात… पण मुळात फरक हा दर्जेदार शिक्षणात आहे… रात्रीच्या प्रकाशात चांदण्या चमकतात ह्याच कारण त्या सूर्यापेक्षा तेजस्वी झाल्या असा नाही तर सूर्य अस्ताला जातो म्हणून…

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत झाले कि ते त्या मुलांना लवकर अवगत करता येते हे सर्व मान्य आहे पण बाहेरच्या व्यावहारिक जगात जेव्हा इंग्रजी बोलण्याची वेळ येते तेव्हा आपण मागे पडणार नाही ना हा एक न्यूनगंड तयार होतो… त्यासाठी आपल्या मराठी शाळेतच मुलांसाठी दर्जेदार इंग्रजी का नाही शिकवत आपण? काही शाळांमध्ये शिकवलं जात दर्जेदार मराठी  सोबत इंग्रजी शिकवलं जात पण अनेक शाळांमध्ये अजून तेच होत नाही… इंग्रजी माध्यमाच्या तोडीच्या शाळा जर मराठी माध्यमात असतील तर मराठी शाळा वाचवा असे सांगायची गरजच लागणार नाही…

जोपर्यंत आपल्या मातृभाषेला आपण आपली व्यवहाराची भाषा बनवत नाही तोपर्यंत अमुक एक भाषा टिकवा हे सांगावे लागेल… आणि म्हणूनच आज एक संकल्प करू, आजपासून जास्तीत जास्त मराठीत बोलू… समोरचा नाही बोलला तरी चालेल पण जमेल तितक आपण संवाद मराठीतून करू आणि वर्षभर मराठीचा सन्मान करू…

जय महाराष्ट्र…

Friday 20 February 2015

चार्ली हेब्दो ते कॉ. पानसरे…

आज पहाटे कॉ. पानसरे ह्यांच्या निधनाची बातमी आली आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर अजून एक डाग लागला… आज ह्या विषयावर लिहिण्याच कारण एकच , काही दिवसापूर्वी चार्ली हेब्दो वरील हल्ल्याबद्दल आपल्याला सर्व माहित आहे… अमुक एका समुदायाच्या भावना दुखावल्यामुळे त्या व्यंगचित्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली… हे सर्व करणारा गट हा अतिरेकी होता हे सुद्धा स्पष्ट आहे… पण काही दिवसांपूर्वी कॉ. पानसरे ह्यांच्यावर हल्ला झाला आणि पुन्हा एकदा अश्या घटनेची आठवण झाली… मी चार्ली हेब्दो घटना आणि कॉ. पानसरे ह्यांच्यावरील हल्ला ह्याची बरोबरी करत नाही आहे… चार्ली हेब्दो वरील हल्ला आणि कॉ. पानसरे ह्यांच्यावरील हल्ला ह्यात साम्य एकच, ते म्हणजे दोन्ही वेळा माणूसकीला काळीमा फासणारी घटना होती…

तूर्तास हिंसा, अहिंसा जर बाजूला ठेवली तर आपल्याला एक कळेल कि हा हल्ला समोरच्या व्यक्तीचे विचार दाबण्यासाठी केलेला एक केविलवाणा पण क्रूर प्रयत्न होता… पण संतांसोबत ज्येष्ठ विचारवंतांची परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात हे व्हाव म्हणजे हे तर महाराष्ट्राची संस्कृती लोप पावत असल्याच लक्षण आहे… टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर अशा अनेक विचारवंतांची परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आणि आज विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐवजी आज ती वेगळ्या मार्गाने लढली जातेय… प्रत्येकाचे मत सर्वांना पटेलच अस नाही हे खरं आहे पण त्यासाठी समोरच्याला शारीरिक इजा करण्याचे प्रकार होत आहेत… कॉ. पानसरे हे त्या वृत्तीला बळी पडलेले अजून एक… काही महिन्यांपूर्वी नरेंद्र दाभोलकर ह्यांचासोबत असंच झालं होतं… पण ह्याने नरेंद्र दाभोलकर नावाची व्यक्ती आज जगात नाही पण त्यांच्या विचारांनी ती अंनिस च्या प्रत्येक कार्यकर्त्यात जिवंत आहेत… माणसाचा देह संपवता येतो त्याचे विचार नाही…

दु:ख ह्याच गोष्टीच आहे कि महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांनी हातात शस्त्र घेतली पण ती घेतलेली शस्त्र हे शौर्याचं लक्षण होतं पण आत्ता ह्या काहींनी घेतलेली शस्त्रे हे शौर्याच नाही तर क्रौर्याच लक्षण आहे… अश्या वृत्तींना आळा घालणे आपल्याच हातात आहे… बाकी आपला समाज सुज्ञ सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे… शेवटी कॉ. पानसरे ह्यांना विनम्र आदरांजली…

जय महाराष्ट्र…

प्रथमेश तेंडूलकर