Thursday 12 January 2017

पानिपत - ध्वज विजयाचा उंच धरा रे...

१४ जानेवारी १७६१, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षरात लिहावा असा दिवस, असा क्षण. छत्रपतींचा इतिहास वाचताना किंवा ऐकताना ज्याचे उर अभिमानाने भरून येत नाहीँ आणि पानिपत वाचताना ज्याचे मन हळव होत नाहीँ, तो मराठी नाहीच.
पानिपत मी 2 वेळा वाचलय, पण दोन्ही वेळेला मला दोन वेगवेगळ्या गोष्टी लक्षात आल्या.

पानिपतची लढाई, ह्यात जरी मराठ्यांचा जबरदस्त पराभव झाला तरी त्या पराभवात अनेक असे क्षण आहेत जे आयुष्यभर जपून ठेवावे, अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यात मराठे हरून सुद्धा जिंकले आहेत. पानिपत वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे पानिपतची लढाई ही तरुणांची होती. सदाशिवरावभाऊ पेशवे असोत किंवा मराठयांचा सर्वात मोठा शत्रू अहमदशाह अब्दाली हे तीशीच्या घरातले होते. विश्वासराव पेशवे तर अगदीच तरुण म्हणजे १७-१८ वर्षांचे होते. मल्हारराव होळकर, विंचुरकर असे काही मराठा सरदार फक्त साठीच्या घरात होते. भाऊसाहेब पेशवे, विश्वासराव पेशवे, समशेर, इब्राहिमखान गारदी, जनकोजी शिंदे, म्हल्लारराव होळकर, विँचुरकर ई. इतकी मोठी आणि ताकदीची फौज असूनसुद्धा मराठे का हरले? हा प्रश्न पानिपत वाचताना नक्कीच पडतो.

पानिपतच्या युद्धात आपण का हरलो ह्याचा विचार करायचा झाला तर अनेक लोक म्हणतात की भाऊसाहेब पेशवे ह्यांनी गनिमी कावा न वापरता मैदानी लढाई स्वीकारली पण खरं बघायच झाल तर मैदानी लढाईला पर्याय नव्हता. गनिमी कावा करून लढणे ह्यासाठी एखादा आडोसा लागतो. शिवरायांनि गनिमी कावा सह्याद्रीच्या पर्वतरांगात केला पण उत्तरेकडे जिथे ही लढाई झाली तिथे इतके मोठे डोंगर आणि पर्वतरांगा नाहीँ. त्यामुळे मैदानी लढाईला पर्याय नव्हताच. ह्या मैदानी लढाईसाठी मराठ्यांनी पूर्ण तयारी केलेली. लाम्ब पल्ल्याच्या तोफा ज्या इंग्रज आणि पोर्तुगीज ह्यांच्याकडे होत्या त्या तोफा मराठ्यांनी घेतल्या. इब्राहिमखान सारखा योद्धा तोफखान्याचा प्रमूख नेमणे ह्यातच भाऊसाहेब पेशव्यांची दूरद्रुष्टी दिसते. मराठ्यांनी लढाईचे नवीन तंत्र अवगत केले होते. पण मग चुकलं कुठे? चुकलं ते पेशव्यांनी केलेल्या हलगर्जीपणात. भाऊसाहेब उत्तरेकडे फौजेसह काळाच्या मगरमिठीत अडकले असताना पुण्याहून कुठलीच मदत तिथे पोहोचली नाही. ना आर्थिक मदत आली ना अतिरिक्त फौज आली. प्रत्यक्ष लढाईच्या वेळी मराठी फौज जवळपास १४-१५ दिवस उपाशी होती. कंदमुळे आणि चिकणमाती खाऊन ती लढली होती. कडाक्याच्या थंडीत इतके दिवस उपाशी राहणे हे कोणत्याच फौजेला शक्य नव्हत.

इतक असूनसुद्दा मराठे प्राणपणाने लढले. मोठा पराक्रम त्यांनी गाजवला. दुपारपर्यंत मराठ्यांनी इतका मोठा पराक्रम गाजवला की अब्दाली परतीच्या प्रवासाची तयारी करत होता. अब्दालीची सुरुवातीची फौज पूर्णपणे कापून निघाली होती. अब्दालीने त्याच्या बखरीत लिहून ठेवलं आहे की "मराठे ज्या त्वेशाने लढत होते तो आवेग पाहून आज रुस्तुम असता तर त्यानेही तोंडात बोटे घातली असती". असा असामान्य पराक्रम मराठे गाजवत होते पण १४-१५ दिवसांची उपाशी फौज कितीकाळ तग धरणार होती? मराठयांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा अब्दालीच्या सुदैवाने, मराठी फौजेची ताकद कमी होत होती. आणि त्याचाच फायदा अब्दालीच्या ताज्या दमाच्या फौजेने घेतला आणि सर्व मराठी फौज कापून निघाली. त्यातच होळकर आणि विंचुरकर ह्यांनी मोक्याच्या क्षणी घेतलेली माघार ही सुद्धा मराठ्यांवर उलटली आणि मराठी फौजेचा सम्पूर्ण पराभव झाला.

असामान्य शौर्य, निर्भीडपणा, देशाच्या संरक्षणासाठी धावून जाणे असे अनेक सद्गुण आपल्याला ह्या युद्धात दिसतात पण आपले सैन्य शत्रूच्या कोन्डित सापडली असताना प्रचंड बेफीकीरी, भाऊबन्दकी असे अनेक दुर्गुण सुद्धा प्रकर्षाने जाणवतात. दत्ताजी शिंदे ह्यांनी केलेली "बचेँगे तो और भी लढेन्गे" ही घोषणा सदैव प्रेरणादायीं आहे. म्हणूनच पानिपतच युद्ध कधीच विसरता येणार नाहीँ.

धन्यवाद
जय महाराष्ट्र
प्रथमेश तेंडुलकर