Saturday 29 May 2021

स्वातंत्र्यवीर...

स्वातंत्र्यवीर...

काल २८ मे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती. त्याच्या १ दिवसांनंतर ही पोस्ट फेसबूकवर लिहिण्याचं कारण असं विशेष नाही पण काही विरोधी आणि अनेक सावरकर समर्थनार्थ पोस्ट वाचल्या आणि वाटलं उत्तर द्यावं.

छत्रपति म्हणताच जसे शिवराय आठवतात, लोकमान्य म्हणताच टिळक दिसतात तसेच स्वातंत्र्यवीर, हे नाव घेताच डोळ्यासमोर उभे राहतात ते सावरकर. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी जी स्वातंत्र्याची मशाल पेटवली त्या मशालीने ब्रिटिशांना होरपळून काढायचं काम सावरकरांनी केले. अखंड हिंदुस्तानचा पुरस्कार करणारे सावरकर हे त्यावेळी देशातील एकमेव नेते होते. हिंदुत्व हा जरी श्वास असला तरी सावरकर विज्ञाननिष्ठ होते आणि हाच फरक आजही अनेक आमच्या लोकांना कळला नाही याचं दुःख आहे. कर्मकांडापेक्षा देशसेवा हा धर्म त्यांनी मानला. "निश्चल देहाकडून देवाकडे जातानाच्या वाटेवर मधे माझा देश येतो, माझी मातृभूमी येते आणि तीची सेवा हाच माझा धर्म" या एका वाक्यातून सावरकर समजतात.

सावरकर वाचताना अनेक पैलू समोर येतात. मुळातच जहाल मतवादी असलेले सावरकर उत्तम लेखक आणि कवी होते. जहाल वाणी असलेला माणूस कविता पण करू शकतो हे विलक्षण. स्वातंत्र्यदेवतेचे गीत असो वा ने मजसी ने सारखी कविता, प्रत्येक शब्दातून देशभक्ती ओसंडून वाहते. स्वातंत्र्यदेवतेचे गीत ऐकताना अजूनही अंगावर शहरा येतो यातच सर्व येतं. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांना हेही माहीत होतं की देशाची फाळणी झाली तर स्वातंत्र्य मिळणे अवघड होईल. आपल्या लोकांनी कसं एकत्र राहिलं पाहिजे आणि एकजुटीने कसा लढा द्यावा हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांमधे स्पष्ट होतं. हिंदुत्व म्हणजे धर्मांध नव्हे, हिंदुत्व म्हणजे इतर धर्मांचा तिरस्कार नव्हे हे विचार मांडणारे सावरकर आजच्या लोकांना कळालेच नाहीत. विज्ञानाची कास धरल्या शिवाय पुढे आपली प्रगती होणार नाही हा सिधांत मांडणाऱ्या सावरकरांचे नाव आजचे नेते फक्त राजकारणासाठी घेतात.

सावरकर म्हटले की आठवते ती जगप्रसिद्ध उडी. पण सावरकर विरोधकांना दिसतात ते माफीनामे. सावरकरांनी तुरुंगातून लिहिलेले माफीनामे. पण आम्हाला वरवर बघायची सवयच आहे म्हणा, त्या मागचं राजकारण आम्ही बघत नाही. पण माफीनामे देऊन सुद्धा सावरकरांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला याचाच अर्थ माफीनामे ही एक खेळी होती. शिवरायांनी सुद्धा मस्तवाल अफजलखानाला अनेक पत्रं लिहिली होती ज्यातून शिवाजी महाराज खानाला घाबरले असा संदेश त्यांना द्यायचा होता पण खरंच ते घाबरले होते का? तर नाही. खानाला आपल्या टप्प्यात खेचण्यासाठी खेळलेली ती एक खेळी होती. इतका सारासार विचार करण्याची बौद्धिक क्षमता विरोधकांकडे असेल असे वाटत नाही.

ऐन तारुण्यात काळ्या पाण्याच्या शिक्षेला सामोरे जाणाऱ्या सावरकरांवर जेव्हा अर्धवट माहितीच्या आधाराने आजचे काही तरूण टीका करतात तेव्हा त्यांना सावरकरांची महती एकाच वाक्यात सांगवी वाटते. गर्लफ्रेंडसाठी कविता करण्याच्या आणि पत्रं लिहिण्याच्या वयात सावरकर देशभक्तीपर कविता लिहीत होते. जेवढं आपलं वय नाही तेवढी वर्ष सावरकरांनी देशासाठी तुरुंगात शिक्षा भोगली आहे. आणि स्वतःला सावरकरवादी म्हणवणार्या माझ्या मित्रांनी एकदा सावरकर वाचून समजून घ्यावे. कारण "स्वातंत्र्यवीर" हे डोक्यावर घेण्याचा विषय नसून डोक्यात घेण्याचा विषय आहे.

धन्यवाद
प्रथमेश श. तेंडुलकर

#सावरकर #स्वातंत्र्यवीर