Saturday 1 February 2020

महापराक्रमी म्हाळोजीबाबा घोरपडे..

महापराक्रमी म्हाळोजीबाबा घोरपडे..

मूकर्रब खानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला उभी होती. शंभूराजे संगमेश्वरी होते आणि या शिवपुत्राच्या घास घ्यायला पिसाळलेले मुघल संगमेश्वरी येउन पोहोचले. पण शंभूराजांच्या आधीच मूकर्रब खानाचा सामना झाला तो सरलष्कर म्हाळोजीबाबांशी. "ये बुढा, हमारा क्या बिगाडेगा" या गैरसमजात असलेला मूकर्रब खान आणि त्याची फौज मराठ्यांवर तुटून पडली. एकच जयघोष झाला, दीन दीन शब्दाला "हर हर, महादेव"गर्जना भिडली. खणखणल्या भाले, तलवार. आणि एक मराठा हजारोंच्या गनिमांवर भारी पडत होता. रक्ताचा चिखल झालेला, मांसाचे तुकडे पडलेले, प्रेतांचा खच पडला पण म्हाळोजीबाबा लढतच होते, गनीम कापत होते.

इतकं शौर्य मूकर्रब खानाने बघून तो बोलला, "पहिले इस बुढे को लगाम डालो". असं म्हणताच गनिमाने म्हालोजींना घेरलं, चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूप्रमाणे म्हाळोजीबाबा लढत होते. मूकर्रब खानाने एक नेमबाज बोलावला. एक बाण म्हाळोजीबाबांच्या दंडात घुसला आणि तलवार खाली पडली आणि पुढचा बाण कंठात घुसून म्हाळोजीबाबा गुढग्यावर बसले. वाघ जखमी झाला हे बघून गनीम म्हालोजींवर तुटून पडला आणि 1 फेब्रुवारी 1689साली म्हाळोजीबाबा पडले.

स्वराज्यासाठी, शंभूराजांसाठी जीव ओवाळून टाकणारे मावळे हीच स्वराज्याची दौलत होती. पैशासाठी, वतनासाठी फितूर होणारे अनेक होते पण लाखांचा पोशिंदा जगावा म्हणून लढणारे म्हाळोजीबाबा स्वराज्याची खरी दौलत होती. 331व्या पुण्यतिथीनिमित्ताने म्हाळोजीबाबांना विनम्र श्रद्धांजली.

जय शिवराय.

प्रथमेश श. तेंडुलकर