Saturday, 29 August 2015

बंधन प्रेमाचे

रक्षाबंधनच्या निमित्ताने एक छोटासा लेख.

सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दीक शुभेच्छा. रक्षाबंधन म्हणजे आपल्या बहिणीला मी तुझा रक्षणासाठी सदैव आहे हे सांगणे. मुळातच रक्षाबंधन हे एका स्त्री-पुरुषातील पवित्र नात्याचे प्रतिक आहे. राखी ही फक्त बहिणीने भावाला बांधावी का? जर एखाद्या पत्नीने तीच्या पतीला, एखाद्या मैत्रिणीने तिच्या मित्राला  राखी बांधली तर वावग असण्याचं काय कारण? मला तर अनेकदा माझी आई राखी बांधते, मला त्यात वावग अस काहीच वाटत नाही.

पण काळानुसार रक्षाबंधन हा सण बदलत चालला आहे. पूर्वी भाऊ जर आपल्या बहिणीपासून खूप लांब राहत असेल तर पोस्टाने राखी पाठवली जायची, अजूनही पाठवली जाते. त्याने काही प्रेम संपत नाही उलट लांब असून सुद्धा दुरावा कमी होत असे. पण बदलत्या काळात पोस्टाने राखी पाठवायची ही गोष्ट बदलली नाही, आजही अनेक बहिण भावातला दुरावा दूर होतो. पण बदल असा झाला की जवळ राहणाऱ्या बहिणींनाही राखी पोस्टाने पाठवावी लागते. म्हणजे कामाच्या रगाड्यात आपल्याला एक नाही तर अर्धा दिवसही भावासाठी किंबहुना ह्या सणासाठी मिळू नये? बरं हा प्रश्न फक्त बहिणीसाठी नव्हे तर भावालाही लागू होतो.  मूळातच आपण सण ह्यासाठी साजरे करतो की वर्षातून एकदा ह्या सणाच्या निमित्ताने आपली भेट होते, सर्व एकत्र जमतात, वातावरण आनंदी होतं. बरं माझं म्हणणं असही नाही की रक्षाबंधन च्या दिवशी कामं सोडून बहिणीने भावाकडे किंवा भावाने बहिणीकडे जावे, पण त्यानंतर येणाऱ्या रविवारी तरी एकत्र भेटून हा सण साजरा करावा.

काळाच्या ओघात सगळंच बदलत आणि ते बदललं पाहिजे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, पण पद्धती बदलल्या तरी माणसांनी बदलू नये, प्रेम कमी होऊ नये. रक्षा बंधानासोबत प्रेमाचे बंध सुद्धा दृढ व्हावेत हीच इच्छा.

प्रथमेश

No comments:

Post a Comment