Wednesday 22 July 2015

टिळक… तुम्हाला विनम्र अभिवादन…

टिळक… तुम्हाला विनम्र अभिवादन… आज तुमची १६० वी जयंती… वाटतेय का हो कि आज आपल्या एका राष्ट्रीय नेत्याची जयंती आहे? ज्या नेत्याने भारताला स्वातंत्र्य मिळाव म्हणून कित्येक वर्ष तुरुंगात खर्च केली, ज्या नेत्याने स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे हे लोकांच्या मनात बिंबवल त्या नेत्याबद्दल आज कोणालाच फारशी माहिती नाही… टिळक, आज तुम्ही फक्त इतिहासाच्या एका पुस्तकात, नव्हे नव्हे तर त्या पुस्तकाच्या १-२ पानापुरते मर्यादित झाले आहात… ह्याचीच खंत आहे…

लहान असताना मला आठवतंय की मी तुमच्या जीवनावर असलेल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होतो… तेव्हा त्या स्पर्धेत बक्षिस मिळण ह्यापेक्षा आज मला जास्त आनंद ह्याचा होतो कि त्यासाठी मी तुमच्याबद्दल तेव्हापासून वाचत होतो… आजही कोणी मला झोपेतून उठवलं आणि टिळकांच भाषण म्हण म्हटल तर मी म्हणून दाखवेन, एवढ लक्षात आहे… म्हणजे माझे आई वडील आणि शिक्षक ह्यांचा वाटा जास्त आहे त्यात… त्यांनी मला वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध करून दिली, आणि मी ती वाचली… मुळातच जहाल मताचे असणारे तुम्ही आणि तुमचे जहाल विचार मला तेव्हापासून पटतायत… इतिहासाचं पुस्तक वाचताना तुमच्यावर जास्त लिहिलेलं असाव अशी माझी मनोमन इच्छा असायची, पण काय करणार, आमच्याकडे तुमच्या नंतर आलेल्या लोकांचं कौतुक जरा जास्तच आहे… असो, त्या वादात पडायचं नाही…

पण मला सर्वात जास्त राग तेव्हा येतो जेव्हा आजकाल काही लोक तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अनेक राष्ट्रपुरुषांना जातीच्या बेड्या घालतात… टिळक ब्राम्हणांचे असे म्हणून ब्राम्हण ब्राम्हणेतर हा वाद उगाच पण स्वतःच्या फायद्यासाठी आज लोक करतात… तो वाद करताना ह्यांना हेही माहित नसत की महाराजांचे चौथे वंशज ह्यांच्या विरोधात संस्थान खालसा करण्याच कट हे इंग्रज सरकार करत होत तेव्हा त्याला केसरी मधून वाचा फेडणारे तुम्हीच होतात, त्यासाठी तुरुंगवास भोगणारे हि तुम्हीच (तुम्ही आणि आगरकर) होतात आणि तुमची जामिनावर सुटका करणारे महात्मा फुले होते… असो हे माहित असण्यासाठी तुमच्याबद्दल फार वाचावं लागेल पण टिळक तुम्ही ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मंडालेला तुरुंगवास भोगलात ते स्वातंत्र्य काय फक्त ब्राम्हणांना मिळव ह्यासाठी नव्हत… असो…

पण टिळक, तुम्ही सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज खूपच लोकप्रिय झाला आहे… पण ह्या लोकप्रियते सोबत अनेक वादही आहेत… आज अनेक गणेश मंडळ स्थापन झालेली आहेत आणि नुकताच गणेशोत्सवाच्या मंडपावरून जो वाद झाला तो सर्वश्रुतच आहे… डीजे, डॉल्बी हे तर आजकाल गणेशोत्सवात नित्याचेच झाले आहे… नुसतं ध्वनिप्रदूषण आणि मंडप एवढाच हा वाद नाहीये, आज गणपतीची "उंची" हे लोक फुटावर मोजतायत आणि त्या प्रत्येक प्लास्टर च्या मूर्तीसोबत जलप्रदूषण सुद्धा होतंच आहे… सामाजिक प्रबोधन तर दूरच पण आज ह्यांचच प्रबोधन करायची वेळ आलीय कि काय असं वाटतंय… सर्वच मंडळ नाहीत तशी, काही खरच चांगल काम करत आहेत पण ती हाताच्या बोटावर मोजू एवढीच आहेत… पण, जर आज तुम्ही असतात तर कदाचित तुम्ही एक गाव एक गणपती योजना राबवली असतीत…

टिळक तुमच्याबद्दल जेव्हा मी वाचतो तेव्हा मला एक नवीन उर्जा मिळते, कुठलही संकट आलं तरी त्यावर मात करायची शक्ती मिळते… आणि आजपासून मी तुमची माहिती माझासोबत  इतरांना कळावी म्हणून प्रयत्न नक्की करेन… तुम्हाला पुन्हा विनम्र अभिवादन…

प्रथमेश तेंडुलकर

Tuesday 14 July 2015

दुर्गभ्रमंती :- पहिला गड - माहुली गड

          adventure किंवा ट्रेक ह्या सर्वाशी माझा कधी फारसा संबंध आलेला नव्हता तरी एकदा trek ला जाऊन लोकं ट्रेक ला अजून काय मजा करतात ती अनुभवायचं होत… रोजचं तेच तेच काम करून कंटाळा आलेला होता, शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोट ह्याबद्दल नितांत आदर आणि कुतूहल होत… आणि त्यातूनच ठरवल कि ट्रेक ला जायचं… पण कुठे ? मग शोध सुरु झाला आणि गड ठरला, माहुली गड…. मुंबई जवळच आसनगाव ह्या स्टेशन पासून हा गड जवळ आहे… मग माझ्यासारखेच जे रोजच्या कामाला कंटाळलेले आम्ही ३ मित्र निघालो आणि प्रवास सुरु झाला…


प्रवासाला आम्ही तशी तासभर उशिरानेच सुरुवात केली होती… दादर वरून सकाळी ७:३० ची ट्रेन पकडून आम्ही ९ ला आसनगाव स्टेशनला पोहोचलो… स्टेशन च्या बाहेरच रिक्षा असतात ती रिक्षा पकडून माहुली ह्या गावी पोहोचलो… रिक्षातून जातानाच आजूबाजूची हिरवळ बघूनच हे कळत होत कि आपण कॉंक्रिट च्या जंगलातून बाहेर आलो आहोत आणि निसर्गाकडे वाटचाल करीत आहोत… वाटेत जाताना आम्हाला काही लोक दिसले जे वृक्षारोपण करत होते… त्यांना विचारल्यावर असे समजले कि ते नाना धर्माधिकारी ह्यांच्या बैठकीतील लोक होते जे निसर्गाशी आपली बांधिलकी जपत होते… साधारण ४० मिनिटांनी आम्ही माहुली गावी पोहोचलो… तिथेच एका टपरीजवळ चहा घेतला, मस्त आलं घातलेला… आणि तिथूनच सुरुवात केली ट्रेक ला…


ट्रेक ला सुरुवात केली आणि प्रथम गणपती मंदिर लागले… कदाचित पुढे काही विघ्न येऊ नये हीच भावना असावी, बाप्पाला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो… आजूबाजूला घनदाट जंगल, पक्षांचे आवाज आणि शांतता… इतक शांत कि स्वतःच्या पावलांचा आवाज  ऐकू येत होता… पुढे गेल्यावर माहुली किल्ल्याचे पर्यटन केंद्र कार्यालय / टोलनाका दिसले, "टोल" म्हणजेच entry fees भरून आम्ही पुढे निघालो… साधारण १५ मिनिटे चालल्यानंतर एक छोटासा धबधबा दिसला पण आमच लक्ष गड गाठणे असल्याने धबधबा येताना बघू असे ठरवले आणि स्वारी पुढे निघाली… जसे जसे आत जात होतो तस जंगल अधिकच घनदाट होत होत… साधारण २ वर्षांपूर्वी तिथे एका चित्त्याचे वास्तव्य होते आणि १०-१२ लोकांना त्याने आपले भक्ष्य केलेले… पण हि माहिती मी माझ्याजवळच ठेवली :-D …




वर दिलेल्या फोटो मध्ये माहुली गडाकडे जाणारा रस्ता दिसत आहे आणि दुसर्या फोटो मध्ये गडाकडे जाण्याचे दिशादर्शक आहेत…

दिशादर्शकाच्या मदतीने आम्ही चालत राहिलो आणि साधारण १ तासाने आम्ही काही वेळासाठी थांबलो, साधारण १५ मिनिटांसाठी… ह्या फोटो मध्ये असलेल्या जागेवर आम्ही आराम करत होतो… पाय बरेच दुखत होते आणि पुढची वाट ह्यापेक्षाही अवघड होती…एक क्षण असा विचार आला कि आता बस, ह्यापुढे नाही जमणार पुढे जायला… पण तो शिवरायांच्या मावळ्यांचा, मराठ्यांचा अपमान ठरला असता… मनाचा निश्चय केला आणि पुन्हा गड चढायला सुरवात केली… तेवढ्यात मागून येणाऱ्या काही ग्रूपची मुलं आम्हाला join झाली आणि "हर हर महादेव" ची गर्जना करत सर्व गड चढू लागले… आयुष्यात पहिल्यांदा शिरायांचा मावळा झाल्याचा feel आला…

तिथून पुढच्या दीड तासात आम्ही गडावर होतो, म्हणजे एकूण अडीच तास लागले गडावर पोहोचायला… गडावर पोहोचल्यावर आम्ही गडावरून खाली दिसणारे निसर्गसौंदर्य बघत बसलो… आराम केला आणि महत्वाचं, खूप भूक लागलेली म्हणून जेवण जेवलो…

आराम करता करता तासभर कसा निघून गेला कळलच नाही आणि मग सुरु झाला परतीचा प्रवास… परतीचा प्रवास फार दमवणार नाही हा माझा अंदाज होता कारण येताना लागलेली चढण हि जाताना उतरण असणार होती पण  माझा अंदाज सपशेल चुकला… चढण चढण्यापेक्षा उतरण जास्त कठीण होत… अरुंद वाटा, एकाबाजूला मोठे खडक आणि दुसऱ्याबाजूला दरी, खोल दरी… भरीस भर म्हणून पडणारा पाऊस त्या वाटा निसरड्या करत होता… जर जरी तोल गेला तर गडाच्या माथ्यावरून थेट पायथ्याला जाण्याचा shortcut होता तो… तरी एकमेकांना मदत करत  पुढच्या २ तासात आम्ही गडावरून खाली आलो…


तरी गडावरून खाली येताना पुन्हा मागे वळून गडाकडे पहिले, आपलं घर सोडून बाहेर जाताना जसं वाटतं तसं वाटत होतं… महाराजांना स्मरून आम्ही गडाला निरोप दिला… आणि हो येताना धबधब्यात हात पाय धुतले आणि परतीच्या प्रवासाला निघालो…

अशाप्रकारे माझा पहिला ट्रेक झाला… ह्या ट्रेक ने मला खूप काही गोष्टी शिकवल्या… समोर असलेल्या संकटांवर मात करत आणि कितीही विश्वास डगमगला तरी ठरलेला निश्चय पूर्ण करण्यासाठी आम्ही केलेली यशस्वी मेहनत हेच शिकवते कि आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात पण न डगमगता विश्वासाने त्याला सामोरे जायचे असते आणि संकटांवर मात करायची… असा हा माझ्या आयुष्यातील पहिला मोठा ट्रेक मला खूप काही शिकवून गेला…

जय महाराष्ट्र

प्रथमेश तेंडुलकर

https://www.facebook.com/prathamesh.tendulkar.7/posts/934035196635117?ref=notif&notif_t=like

Monday 6 July 2015

स्मारकांच्या देशा...

आपल्या देशात स्मारक हे एक चर्चेचं आणि वादाचा विषय असतो… देशात अनेक स्मारक आहेत, आणि अजून काही होणार आहेत… पण बऱ्याच स्माराकांवरून ह्या आधीही वाद झाले आहेत आणि आजही होत आहेत… मुळातच एखाद्या व्यक्तीच स्मारक हा जितका लोकांच्या भावनांशी निगडीत विषय आहे तेवढाच राजकारणाचाही आहे…

आज ह्या मुद्द्यावर लिहायचं कारण एवढाच की काही दिवसांपूर्वी एक बातमी पाहिली कि प्रतापगड ढासळतोय… प्रतापगड म्हणजे शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचा साक्षिदार… स्वराज्यावरील मोठे, महाकाय संकट म्हणजे अफजल खान आणि त्याची स्वारी… त्याच अफजलखानाचा जिथे शिवरायांनी कोथळा बाहेर काढला आणि खान संपवला तो प्रतापगड… काही दिवसांपूर्वी हि बातमी वृत्तवाहिन्यांवर दाखवली होती… महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची दुरावस्था काही लपून राहिलेली नाही… बहुतांश गडावर हीच परिस्थिती आहे, एकतर गड ढासळतो किंवा मग गडावर जाणारे प्रेमवीर आपल्या प्रेमाची निशाणी त्या गडावर सोडून येतात ( बदाम आणि बाण )… अशी एकीकडे गडांची दुरावस्था असताना आपण मात्र स्मारकात अडकलोय… कितीतरी हजार कोटींच स्मारक उभारतायत म्हणे शिवाजी महाराजांचं, आनंदच आहे… भव्य स्मारक व्हाव हि माझीही इच्छा आहे,  आपला राजा कोण होता, किती महान कार्य आहे हे प्रत्येकाला कळाल पाहिजे पण शिवरायांच खरी स्मारके म्हणजे त्यांचे गडकोट आहेत… हेच काही हजार कोटी मधले काही पैसे गडकिल्ले संवर्धनासाठी वळवले तर तो इतिहास जिवंत राहील… स्मारक काय आज नाही तर उद्या होईलच पण हे दुर्ग कोसळले तर असे दुर्ग पुन्हा होणे नाही… ज्या काळी, ज्या भौगोलिक अवस्थेत हे गड-किल्ले बांधले आणि तेव्हा असलेली तंत्रज्ञानाची उपलब्धता लक्षात घेता, हे गड-किल्ले चमत्कारापेक्षा काही वेगळे नाहीत. अशा वास्तूंचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.

गड किल्ल्याच संवर्धन कस करायचं ह्याबद्दल मी मागे एकदा राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंट मध्ये वाचल होत… अतिशय अभ्यासपूर्ण अस लिहिलेल होत… त्याची link मी शेवटी दिली आहे, त्यावर जाऊन आपण वाचू शकता…  खर बघायला गेल तर गडांची काळजी घेण हे आपल्या सर्वांच काम आहे… ट्रेक ला जाताना गडावर कचरा होणार नाही हे पहाव आणि हे बदामवाल्यांनी गड हि आपली property समजून त्यावर आपली नाव कोरण टाळाव… ह्या सर्व गोष्टीला सरकारची साथ मिळायला हवी… आणि असे झाले तर ती खरी शिवरायांना दिलेली आदरांजली ठरेल…

जय महाराष्ट्र

प्रथमेश तेंडुलकर 

लिंक:- http://mnsblueprint.org/m_06_09_marathiPride_conservationOfForts.html