Saturday, 7 June 2014

आम्ही सारे षंढ ???

कोणाही संवेदनशील माणसाचे मन सुन्न होईल. आपली लाज वाटेल अशी ही घटना आहे. आपण शिवाजी महाराजांचे नाव घेणे थांबवावे, अशी ही घटना आहे. कल्याणमध्ये एका एसटी बसमधील महिला कंडक्टरला, एक प्रवासी मारहाण करतो आणि सारे प्रवासी आपले काही घेणेदेणे नाही किंवा काही घडतच नाही इतक्या शांतपणे, मुर्दाडपणे बघत बसतात.

त्या कंडक्टर महिलेची प्रतिक्रिया आपल्या सदसदविवेकबदुध्दीला टोचणी लावणारी आहे. ती म्हणते की, मला त्या गुंडाची भीती वाटत नाही तर ही घटना घडत असताना, डोळयावर पट्टी बांधून बसणाऱ्यांची वाटते.या घटनेची बातमी वाचून मला शरम तर वाटलीच, परंतु अनेक प्रश्नही मनात उभे राहिले.

आज हा प्रसंग त्या परक्या बाईवर आला म्हणून लोक मध्ये पडले नाहीत… जर हाच प्रसंग तुमच्या घरातल्या एखाद्या बाईवर आला असता तर असेच शांत बसला असतात का हा प्रश्न त्या लोकांना विचारावा लागेल… कुठे गेले नेते आणि कुठे गेल्या महिला संगठना?? एरवी उठसूठ कोणाच्या तरी तोंडाला काळे फासणारे, ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा देणारे मावळे नंतरही तिच्या बाजूने उभे ठाकले नाहीत आणि त्यांची हायकमांड किंवा सरसेनापतीदेखील मूग गिळून बसले आहे. त्यांचे युवराजदेखील आत्ममग्न आहेत. सनसेनपतीना चिंता पडली आहे ती मुख्यमंत्रीपदाची. त्यावर काही लोक म्हणतील कि कठोर कायदे नाहीत ह्यासाठी… अरे पण नुसते कायदे करून काय होणार?? आपण जर अन्यायाविरोधात आवाज उठवला नाही तर कायदे काहीच कामाचे नाहीत…

मुंबईकर इतके शांत कधीपासून झाले?? पावसाळ्यात पाणी भरल्यावर एकमेकांना मदतीचा हात देणारे मुंबईकर, २६ जुलै च्या पावसात एकमेकांना निस्वार्थी भावनेने मदत करणारे  मुंबईकर कुठे गेले?? अशा घटना घडल्या कि फक्त निषेध नोंदवायचा… ते पण फेसबुक किंवा ट्विटर वरून… अशाने ह्या घटना थांबणार नाहीत… ह्या घटना थांबवायची गरज आहे आणि त्या मी एकटा किंवा तुम्ही एकटे नाही करू शकत, आपण सर्वांनी एकत्र मिळून केला पाहिजे हे काम…

म्हणून ह्यापुढे अशी कुठलाही अन्याय होताना आपण गप्पा बसू नये… अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे… आणि जर हे आपण करू शकत नसू तर छत्रपतींच नाव घेण्याचा नैतिक अधिका.रही आपल्याला नसेल…

1 comment: