Sunday, 14 January 2018

पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग २

पानिपत म्हण़जे मराठी मनाची ओली जखम. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ज्याचा उर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपत म्हटलं की ज्याच्या हृदयाला वेदना होत नाहीत तो मराठी नाहीच. पानिपत ही कादंबरी वाचताना आणि पानिपतावरील इतर महत्वाच्या गोष्टी वाचताना काही व्यक्तींचं आकर्षण वाटतं. सदाशिवरावभाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे,  इब्राहीमखान गारदी इ. मरहट्टी मंडळी असो किंवा अहमदशाह अब्दाली आणि नजीबखान सारखे शत्रू असोत, सर्व तितकेच पराक्रमी होते. या सर्वांबद्दल वाचावं, लिहावं असं न वाटलं तरच नवल. १४ जानेवारी १७६१ मधील पानिपत युद्धातील त्या योध्यांचा घेतलेला हा एक आढावा.

विश्वासराव पेशवे, महादजी शिंदे


विश्वासराव आणि महादजी हे दोघेही पानिपतावर होते. अब्दालीच्या प्रचंड सैन्यासमोर मराठे उभे होते. त्यात भाऊसाहेब, इब्राहीमखान गारदी यांच्या सोबत अजून रणधुरंधर होते, विश्वासराव पेशवे आणि महादजी शिंदे. विश्वासराव हे अत्यंत तरुण होते म्हणजे अगदी १७-१८ वर्षाचे होते. विश्ववासराव हे दिसायला अत्यंत देखणे होते. त्यांच्या देखणेपणाबद्दल आजही बोललं जातं की "स्त्रियांमध्ये देखणी मस्तानी आणि पुरुषात देखणे विश्वासराव." यावरुन आपण अंदाज बांधू शकतो कि विश्वासराव दिसायला किती सुंदर असतील. पानिपतच्या युद्धात विश्वासरावांनी शौर्य गाजवलं पण त्यात ते धारातीर्थी पडले. विश्वासरावांचा देह जेव्हा अफगाणी सैनिकांनी पाहिला तेव्हा ते इतका तरुण, सुंदर देह मृत्यू पावलेला पाहून हळहळले. त्यांनी अब्दालीला सांगितलं, "आपण हा देह घेऊन अफगाणिस्तानला जाऊया. आणि या शरीरात पेंढा भरून त्याच जतन करूया." विश्वासरावांचा, त्यांच्या सौंदर्याचा मोह अफगाणांनासुद्धा आवरला नाही. महादजी शिंदे हे सुद्धा पानिपतच्या लढाईत होते पण ते जिवंत परत आले. त्यांच्या पायाला तलवार लागल्याने थोडी इजा झाली होती पण महादजी शिंद्यांच नाव एवढ्यासाठीच इथे घ्यावं की पानिपताच्या युद्धानंतर जवळपास १५-२० वर्ष महादाजीबाबांनी दिल्लीच्या गादीवर कोण बसेल हे ठरवलं. महाराष्ट्र पानिपत युद्धानंतर खऱ्या अर्थाने किंग मेकर ठरला.


इब्राहीमखान गारदी


पानिपतच्या युद्धाला काही लोक धार्मिक रंग देतात जसे पानिपतचे युद्ध हे हिंदू विरुद्ध मुस्लिम असे होते पण मुळात ते युद्ध परकीय आक्रमक विरुद्ध भारतीय असे होते. हिंदू विरुद्ध मुस्लिम युद्ध असतं तर इब्राहीमखान भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढला असता का? पानिपत युद्धाच्या पराक्रमी वीरांची सुरवात जर भाऊसाहेब पेशव्यांपासून सुरु होत असेल तर इब्राहीमखानाचे नाव घेतले नाही तर यादी अपूर्णच राहील. इब्राहीमखान हा मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. तो आधी फ्रेंचांच्या वखारीत काम करायचा. कुकडी नदीच्या युद्धात नानासाहेब पेशवे आणि भाऊसाहेब यांनी इब्राहीमखानाचा पराक्रम स्वतः बघितला म्हणून त्याला या युद्धात आपल्यासोबत घेतले होते. इब्राहीमखानाचा तोफांचा मारा इतका जबरदस्त होता की पानिपतचे युद्ध सुरु झाले आणि पुढल्या तास-दोन तासातच अब्दालीच्या सैन्याला खिंडारं पडली. विजयश्रीची माळ मराठयांच्या गळ्यात पडणार असं वाटत होतं पण मराठे त्यावेळी मान थोडी उंचावायला कमी पडले आणि माळ तुटली.


इब्राहीमखानाला अब्दालीने युद्धाच्या आधीच तू आमच्या पक्षात ये (पक्षांतर कर) असा सल्ला दिला होता पण त्याने तो साफ धुडकावून लावला. इतकंच नाही तर इब्राहीमखानाला कैद करून अब्दालीसमोर पेश करण्यात आले. अब्दाली तसाही इब्राहीमखानाच्या पराक्रमावर बेहद खुश होताच पण त्याने त्याला म्हटले की आपण एकाच धर्माचे आहोत. तू आमच्यासोबत अफगाणिस्तानला चल. तिथल्या सैन्याचा सेनापती हो. पण त्यावर फार सुंदर उत्तर इब्राहीखानाने अब्दालीला दिले. तो म्हणाला "आलंपना, भाऊसाहेब, आमचे धनी, यांनी पानिपतावर निघण्यापूर्वी मला वचन दिलेले की मी तुझासोबत मातीत पाय रोवून युद्धात उभा राहीन. माझे धनी वचनाला जागले, इतकंच नाही तर त्यासाठी धारातीर्थी पडले. आणि त्यांच्या पश्चात मी त्यांच्याशी प्रतारणा करू? नाही जमणार." इब्राहीमखानाचे हे बाणेदार उत्तर ऐकून अब्दालीने त्याला सोडून दिले. इब्राहीमखान परत जात असतानाच अब्दालीने त्याला थांबवले आणि विचारले, "इब्राहीम, तुम्हारे सारे सैनिक, सरदार मारे गाये. अब वापस जाकर क्या करोगे?" इब्राहीमखान म्हणाला, "कुछ नही हुजूर, परत जाईन, पुन्हा सैन्य गोळा करेन आणि अल्लातालाने मदत केलीच तर माझ्या धन्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अफगाणिस्तानावर हल्ला करेन, तुमच्यावर हल्ला करेन. आणि बदला घेईन." इब्राहीमखानाचे हे उत्तर ऐकून अब्दाली प्रचंड चिडला आणि त्याने इब्राहीमखानाला कैद करून त्याची खांडोळी करण्याचा हुकूम दिला. त्यानंतर इब्राहीमखानाच्या शरीराचे बारीकबारीक तुकडे करून गिधाडांना घालण्यात आले.


पानिपतमध्ये मराठे जरी हरले तरी २२-२३ वर्षाच्या दत्ताजीचे बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर जितके बाणेदार आहे, ज्यात शौर्य अमाप भरलेलं आहे तसंच इब्राहीमखानाच्या या उत्तरात त्याची भाऊंप्रती, मराठा साम्राज्याप्रती असलेली निष्ठा दिसून येते. अशी निष्ठा, शेवटपर्यंत साथ देणारी माणसं लाभणं ही मराठा साम्राज्याची, भाऊंची पुण्याई होती. यांची चरित्रे आपल्याला सदैव प्रेरणा देतील हे निश्चित.

1 comment:

  1. दुर्दैवाने काही मराठ्यांनी घाबरुन युद्धातुन माघार घेतली.. परंतु तरीही इब्राहिम खानसारख्या निष्ठावंतांनी अगदी मरेपर्यंत साथ दिली.. ती फुट पडली नसती.. तर कदाचित आजचंही चित्र वेगळं असतं...!

    ReplyDelete