Saturday, 13 January 2018

पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १

पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १पानिपत म्हण़जे मराठी मनाची ओली जखम. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ज्याचा उर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपत म्हटलं की ज्याच्या हृदयाला वेदना होत नाहीत तो मराठी नाहीच. पानिपत ही कादंबरी वाचताना आणि पानिपतावरील इतर महत्वाच्या गोष्टी वाचताना काही व्यक्तींचं आकर्षण वाटतं. सदाशिवरावभाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, शमशेर बहाद्दर, इब्राहीमखान गारदी इ. मरहट्टी मंडळी असो किंवा अहमदशाह अब्दाली आणि नजीबखान सारखे शत्रू असोत, सर्व तितकेच पराक्रमी होते. या सर्वांबद्दल वाचावं, लिहावं असं न वाटलं तरच नवल. १४ जानेवारी १७६१ मधील पानिपत युद्धातील त्या योध्यांचा घेतलेला हा एक आढावा.

दत्ताजी शिंदे

१० जानेवारी १७६०, यमुनाकाठी मराठयांची छावणी लागली होती. मराठी सैन्य दैनंदिन काम करत असतानाच गिलच्यांनी मराठयांवर हल्ला चढवला. तोफा, बंदुका यांचा प्रचंड मारा होत होता. त्या मानाने मराठी सैन्याकडे शस्त्रे आधुनिक नव्हती. मराठी सैन्याच प्रमुख शस्त्र म्हणजे तलवारी, भाले आणि बंदुका पण त्या खूप कमी सैनिकांकडे होत्या. अचानक आलेल्या शत्रूला मराठे कडवा प्रतिकार करत होते. बुर्हाडी घाटावर जानराव वाबळे यांची तुकडी होती पण शत्रूच्या प्रचंड माऱ्यामुळे जवळपास १००-१५० सैनिक धारातीर्थी पडले. मराठी सैन्याची पीछेहाट होत होती आणि तेव्हाच दत्ताजी आपली फौज घेऊन आले, त्वेषाने लढू लागले. दत्ताजी शिंदेंचा कडवट प्रतिकार आणि अमर्याद शौर्य बघून कुतुबशाह आणि नजीबखान यांनी दत्ताजीला लक्ष केले.

दत्ताजी जरी त्वेषाने लढत असले तरी कितीवेळ लढणार बरं? शत्रूच्या गोळ्या लागून दत्ताजी घायाळ होऊन खाली पडले आणि शत्रूसैन्याने त्यांना चहूबाजूने घेरले. कुतुबशाह आणि नजीब हसत हसत त्याच्या समोर आले कारण एक शूर मराठा योद्धा पकडला गेला होता. कुतुबशाहने घायाळ दत्ताजीला हसत हसत विचारले, "क्यू पटेल... और लढोगे?" यावर दत्ताजी गरजले, "क्यू नाही... बचेंगे तो और भी लढेंगे..." त्यांच्या याउत्तरावर नजीबाने चिडून खाली उतरून दत्ताजींचं शीर धडावेगळं केलं. दत्ताजी धारातीर्थी पडले. त्या दिवशी अनेक मराठी सैनिकांची कत्तल झालेली. शत्रू समोर असतानासुद्धा, मृत्यू जवळ उभा असताना सुद्धा मराठी मुलखाचा स्वाभिमान, अभिमान, शौर्य दत्ताजीने दाखवले. "बचेंगे तो और भी लढेंगे" हे नाजिबाला आणि कुतुबशाहला दिलेलं नुसतं उत्तर नव्हतं तर मराठे शत्रूपुढे मायभूमीच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला मागेपुढे बघणार नाहीत हा संदेश होता. अशा या शूर योध्याला शतशः प्रणाम.

भाऊसाहेब पेशवे

सध्या पेशवे, पेशवाई हे शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय पद्धतीने घेतले जातायत. राजकारण सोडलं तर पानिपतच्या युद्धात भाऊसाहेब पेशवे म्हणजेच सदाशिवरावभाऊ पेशवे यांनी प्रचंड मोठं शौर्य गाजवलं आहे. सदाशिवरावभाऊ पेशवे म्हणजे पानिपतवरील मराठी सैन्याचे प्रमुख नेतृत्व. पानिपतचे युद्ध म्हणजे विशेषतः तरुणांचं युद्ध होतं. भाऊसाहेब पेशवे साधारण तिशीच्या घरात होते, इतकच काय तर मराठयांचा शत्रू अहमदशाह अब्दाली सुद्धा तीस-पस्तिशीचा होता. विश्वासराव तर अगदीच तरुण, कोवळ्या वयाचे. भाऊसाहेब हे अत्यंत हुशार आणि युद्धशास्त्रात निपुण होते आणि म्हणूनच त्यांच्यावर पानिपतच्या युद्धाची जबाबदारी देण्यात आली होती. भाऊसाहेबांचा अजून एक वाखाणण्यायोग्य गूण म्हणजे दूरदृष्टी. पानिपतच्या युद्धातील पराभवाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे सैन्यासोबत असलेले व्यापारी, बाजारबुणगे इत्यादी लोकं आणि हेच कारण ओळखून मोहिमेच्या सुरुवातीलाच भाऊसाहेबांनी सैन्यसोडून इतर कोणालाही सोबत घेण्यास विरोध केलेला होता. पण भाऊसाहेबांचं न ऐकणं पुढे याच मराठी फौजेला महागात पडलं.

सदाशिवरावभाऊंना माणसांची अचूक पारख होती. इब्राहिमखान गारदी हा त्यापैकीच एक. इब्राहीमखान हा फ्रेंचांच्या वखारीत काम करायचा आणि जुन्या एका लढाईत भाऊंना इब्राहीमखानाच्या तोफांनी जेरीस आणले होते. आणि म्हणूनच भाऊसाहेबांनी इब्राहीमखानाला त्याच्या तोफखान्यासकट आपल्यासोबत घेतले होते. याचा अर्थ हाच होता कि मैदानी लढाई करावी लागली तर त्याची पूर्वतयारी भाऊसाहेबांनी आधीच केलेली. पानिपतावर मैदानी लढाईला पर्याय नव्हता, कारण गनिमी कावा पद्धतीने लढण्यासाठी दऱ्या-डोंगर यांचा आडोसा घ्यावा लागतो आणि असे दरी-डोंगर पानिपतावर नाहीत. पानिपतच्या लढाईत भाऊंनी गोल पद्धतीच्या लढाईची व्यूहरचना केली होती आणि अब्दालीने तिरकस फळी , साधारण अर्ध-चंद्रकोरीच्या पद्धतीची व्यूहरचना केली होती. भाऊसाहेब पेशवे हे प्रत्यक्ष लढाईत सहभागी होते. लीड फ्रॉम द फ्रंट अशाप्रकारचं नेतृत्व भाऊसाहेबांचं होतं आणि अब्दाली मात्र रणांगणापासून ५-६ किलोमीटर लांबून दुर्बिणीने युद्ध पाहात होता. प्रत्यक्ष लढाईमध्ये जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा मोठे मोठे, मातब्बर सरदार माघारी फिरले आणि त्यांनी भाऊसाहेबांना रणांगण सोडायचा सल्लादेखील दिला. पण आपली प्रजा, आपले सैनिक, आपले लोक मृत्यूच्या दाढेत सोडून जाणं जरी सहज शक्य असलं तरी भाऊसाहेबांना ते पटलं नाही. पानिपतच्या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात भाऊसाहेब स्वतः घोड्यावर स्वार होऊन शत्रूवर तुटून पडले होते. अगदी मोजकीच ५०-६० माणसांना घेऊन भाऊसाहेब लढत होते आणि त्यादरम्यान इब्राहीमखान गारदी जखमी होऊन पडला होता. ऐन युद्धात लढताना शत्रूच्या तोफेचा एक गोळा भाऊसाहेबांच्या मांडीवर लागला आणि भाऊसाहेब कोसळले. पण लगेचच भाल्याचा आधार घेऊन ते पुन्हा उठून लढू लागले. तेव्हा त्यांना शत्रुसैन्यातील ५ लोकांनी घेरले होते. जखमी अवस्थेतील भाऊसाहेबांनी त्या अवस्थेतसुद्धा ४ सैनिकांना कंठस्नान घातले आणि त्यावेळी भाऊसाहेब धारातीर्थी पडले.

नेतृत्व कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब पेशवे. पानिपतच्या लढाईत महाराष्ट्राने अनेक वीर गमावले पण भाऊंसारखा कुशल सेनानी गमावण ही मराठी फौजेची कधीच न भरून येणारी हानी होती. भाऊसाहेब पेशवे दिलेल्या शब्दाला किती जागणारे होते याचं एक उत्कृष्ट उदाहरण पानिपत पुस्तकात आहे. युद्ध संपल्यानंतर अब्दालीच्या सैन्याने इब्राहीमखान गारदीला अटक करून दरबारात पेश केले. अब्दाली तसाही इब्राहीमखानाच्या पराक्रमावर बेहद खुश होताच पण त्याने त्याला म्हटले की आपण एकाच धर्माचे आहोत. तू आमच्यासोबत अफगाणिस्तानला चल. तिथल्या सैन्याचा सेनापती हो. त्यावर इब्राहीमखानाने जे उत्तर दिले त्यातून त्याची भाऊंप्रती असलेली निष्ठा आणि भाऊंचा शब्दाला पक्के असण्याचा स्वभाव दिसतो. इब्राहीमखान म्हणाला, " आलमपनाह, भाऊसाहेबांनी मला युद्धाला निघताना वचन दिलेलं. काहीही झालं तरी पाय मातीत रोवून ते युद्धात उभे राहतील आणि आमची साथ सोडणार नाहीत. माझ्या धान्याने त्याचा शब्द पाळला, इतकंच नाही तर त्यासाठी आपला जीव सुद्धा पणाला लावला. आणि त्या पश्चात मी त्यांच्याशी गद्दारी करू? नाही जमणार." इब्राहीमखानाच्या या उत्तरावरून त्याची भाऊंप्रती असलेली निष्ठा आणि भाऊंची दिलेल्या वाचनाला जगण्याची वृत्ती दिसून येते. अशा या पराक्रमी, वीर सुपुत्राला मानाचा मुजरा.

No comments:

Post a Comment