Monday 19 March 2018

मदतीचा हात..

प्रोजेक्ट :- आरोग्यम धनसंपदा

पौष्टीक खाऊ उपक्रम

चैतन्य ग्रूपतर्फे आम्ही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये मदत करतो. त्यातीलच एक पाडा म्हणजे रावतेपाडा. २०१७ मध्ये चैतन्य ग्रूप तर्फे पालघर जिल्ह्यातील या पाड्यामध्ये एक मोफत आरोग्य शिबीर घेतले होते. आरोग्यसेवेबद्दल या लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करणे हा या शिबिरामागचा हेतू होता.
पण या शिबिरात अजून काही समस्या आम्हाला समजल्या. जसं की अनेक मुलं-मुली ४-५ किलोमीटर लांबचा प्रवास करून शाळेत येतात. गरिबी असल्यामुळे योग्य सकस आहार त्यांना मिळत नसल्याने कुपोषण संबंधी आजार आम्हाला त्या शिबिरात दिसून आले. यातून अशक्तपणा, अशक्तपणामुळे चक्कर येणे असे प्रकार होत होते. आणि या काही कारणांमुळे शाळेत यायचे प्रमाण कमी झाले होते. आणि म्हणूनच चैतन्य ग्रूपतर्फे आम्ही या विषयावर काम करायचे ठरवले.

आमच्या ग्रूपमधील डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही शाळेतील सर्व १९५ विद्यार्थ्यांसाठी पौष्टीक सत्व असलेला खाऊ देण्याचा आठवडी तक्ता बनवला. सोमवार ते शनिवार प्रत्येक मुलाला-मुलीला एकएक खाऊ देण्याचे आम्ही ठरवले. समाजातील अनेक व्यक्तींनी या कल्पनेला साथ दिली. आणि १४ नोव्हेंबर २०१७ रोजी बालदिनाचे औचित्य साधून या उपक्रमाला सुरवात झाली. प्रत्येक दिवशी मुलांना काही ना काही खाऊ देण्यात आला. गूळ-चणे, गूळ-शेंगदाणे, केळी, खजूर, उकडलेली अंडी यासोबतच पारले-जी चे बिस्कीट इ. खाऊ देण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे सहकार्य आम्हाला लाभले. स्वतःच काम सांभाळून त्यांनी आम्हाला या उपक्रमात मदत केली.
 
त्यानंतर १ जानेवारी २०८ पासून आम्ही शाळेच्या सहकार्याने या सर्व विद्यार्थ्यांना खाऊसोबतच आठवड्यातून एक दिवस खिचडी देण्याचा उपक्रम सुरु केला. नोव्हेंबर २०१७ पासून सुरु झालेला हा उपक्रम ४ महिन्याच्या अविरत कार्यानंतर आता एक टप्पा पूर्ण करून या उपक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमातून नक्की काय साध्य झाले? नक्की कोणता फरक पडला? या सर्वाची चिकीत्सा करणारा हा लेख लिहून आम्ही आमचे कार्य तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.


उपक्रम सुरु करताना आम्ही १९५ विद्यार्थ्यांचे वजन आणि उंची मोजली होती. सोबतच त्यांची आरोग्य तपासणी केली होती.

४ महिन्याच्या या उपक्रमानंतर आम्ही पुन्हा वजन मोजले असता आणि आरोग्य तपासणी केली असता आम्हाला जे आढळले ते पुढील प्रमाणे :-

१) विद्यार्थ्यांचे सरासरी वजन २.५ किलो ने वाढले.
२) अशक्तपणाशी निगडित आजार, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे इ. कमी झाले होते.

डॉक्टरांशी बोलल्यानंतर हे वरील निष्कर्ष आमच्या समोर आले. त्याव्यतिरिक्त अनेक शिक्षकांशी बोलल्या नंतर अजून काही गोष्टी आम्हाला समजल्या.

१) ४-५ किलोमीटर उपाशीपोटी पायी प्रवास केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चक्कर यायची. खाऊ आणि खिचडी यामुळे ते प्रमाण बंद झाले.
२) अशक्तपणामुळे अभ्यासात लक्ष न लागणे इ. प्रकार कमी झाले.
३) अनेक विद्यार्थी जे शाळेला दांडी मारायचे, असे विद्यार्थी शाळेत नियमित येऊ लागले. त्यामुळे शाळेतील पटसंख्या कमी होती ती वाढायला मदत झाली.

वरील सर्व निष्कर्ष पाहिल्यावर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की एक गोष्ट पूर्ण केली असता किती फरक दैनंदिन आयुष्यात पडतो. प्रोजेक्ट आरोग्यम धनसंपदा पूर्ण करणे हा चैतन्य ग्रूपसाठी एक आव्हान होते. तुलनेने मोठा प्रोजेक्ट यशस्वीरीत्या हाताळताना मला अनेक लोकांची मदत झाली स्नेहा, वृषाली, गणेश इ. आमचे चैतन्यचे टीममेम्बर्स आणि त्यासोबतच शशिधर भट, मंगेश तेंडुलकर, अमुल्या तेंडुलकर इ. समाजातील अनेक व्यक्तींची झालेली मदत, तसेच श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय आणि सर्व शिक्षक यांचे सहकार्य, यामुळेच हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाला.

ज्यांची ज्यांची या उपक्रमाला मदत झाली त्या सर्वांचे आभार. चैतन्यतर्फे असेच उपक्रम भविष्यात होत राहोत हीच ईश्वराचरणी प्रार्थना. त्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची, सहकार्याची आणि आशीर्वादाची गरज आहे. आपल्यापैकी कोणाला आमच्या ग्रूपसोबत या व इतर कामात सहभागी व्हायचं असेल तर ९८६९३७१५८० या क्रमांकावर संपर्क (WhatApp केलं तरी चालेल) करा. तसेच आमच्या फेसबूक पेज ला भेट देऊ शकता.

धन्यवाद. 

प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१)
चैतन्य मित्रमंडळ

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/

No comments:

Post a Comment