Monday, 8 January 2018

चैतन्य - चला देऊ मदतीचा हात..... करू कुपोषणावर मात....

पौष्टीक खाऊ उपक्रम

२०१७च्या बालदिनानिमित्ताने १२ नोव्हेंबर २०१७ पासून चैतन्य ग्रूपतर्फे श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय या पालघर जिल्ह्यातील आदिवासी विभागातील शाळेत पौष्टीक खाऊ देण्याचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला आता २ हिने पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने घेतलेला आढावा.

पौष्टीक खाऊ उपक्रम का व कोणासाठी ?

सप्टेंबर २०१७ मध्ये आम्ही चैतन्य ग्रूपतर्फे श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि परिसरातील इतर मुला-मुलींसाठी मोफत आरोग्य शिबीर घेतले होते. या शिबिराचा मूळ उद्देश आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या लोकांची तपासणी करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि आरोग्यसेवेबद्दल विश्वास निर्माण करून जनजागृती करणे हा होता.


या उपक्रमातून आम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळाली, त्यातीलच एक म्हणजे शाळेतील असलेल्या मुला-मुलींमध्ये ८०% पेक्षा जास्त मुलांची वजन हे कमी होते (BMI calculation नंतर). अनेक मुला-मुलींमध्ये चक्कर येण्याचे प्रमाण जास्त होते. याची दोन प्रमुख कारणं होती, १) सकस-पोषणयुक्त आहाराचा अभाव आणि २) भुकेल्यापोटी काही किलोमीटर शाळेसाठी केलेला प्रवास. शाळेला सरकारी अनुदान नसल्याने शाळेत पोषण आहार योजना नव्हती आणि म्हणूनच चैतन्य ग्रूपतर्फे पोषण आहार नाही पण मधल्या सुट्टीत त्यांना पौष्टीक खाऊ देण्याचा विचार आम्ही केला. शाळेतील शिक्षकांनीसुद्धा यासर्वांसाठी आम्हाला सहयोग दिला आणि बालदिनाचे औचित्य साधून १२ नोव्हेंबर २०१७ पासून या उपक्रमाला सुरवात झाली.

पौष्टीक खाऊ उपक्रमाचे स्वरूप

पौष्टीक खाऊ उपक्रम करताना आम्ही चैतन्य ग्रूपमधील सर्व डॉक्टर्स आणि काही माझे आहारतज्ञ मित्र यांच्या सल्ल्यानुसार त्या मुला-मुलींना खाऊ म्हणून काय देता येईल याचा एक तक्ता तयार करण्यात आला. यामध्ये गूळ-चणे (कडधान्य), गूळ-शेंगदाणे, खजूर, केळी, ग्लुकोज बिस्किट्स इ. अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आणि आठवड्याच्या प्रत्येक दिवशी मुलांना त्याचे वाटप करण्यात आले.
उपक्रमाचे फलीत - उपक्रमाचे यश

कोणतीही चांगली गोष्ट घडायची असेल तर त्याला थोडा वेळ जावा लागतो. या उपक्रमाची सुरवात आम्ही १२ नोव्हेंबर २०१७ रोजी केली. त्यानंतर २४ डिसेंबर २०१७ रोजी पुन्हा सर्व मुलांचे वजन आणि इतर प्राथमिक तपासणी करण्यात आली. या तपासणीतून काही निष्कर्ष जे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून नोंदवण्यात आले ते पुढील प्रमाणे :-
१) शाळेतील विद्यार्थ्याचे वजन सरासरी २ किलोने वाढले. 
२) शाळेतील विद्यार्थ्यामध्ये दररोज कोणाला तरी चक्कर येणे, भोवळ येणे असे प्रकार व्हायचे कारण त्या मुलांनी उपाशीपोटी केलेला प्रवास. पौष्टीक खाऊ उपक्रम सुरु केल्यानंतर चक्कर येणे, भोवळ येणे असे प्रकार बंद झाले.
३) दिवसभर उपाशी असल्याने विद्यार्थ्याचं अभ्यासात लक्ष न लागणे असे अनेक प्रकार शिक्षकांच्या लक्षात आले होते पण या उपक्रमामुळे ते कमी झाले.
४) सर्वात महत्वाचं, शाळेत विद्यार्थ्याच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ झाली. आजकाल मराठी शाळा त्यात खेड्यातील शाळा बंद होत असताना या शाळेत मात्र मुलांची उपस्थिती वाढताना दिसली.

आभार :-

उपक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला अनेकांची मदत झाली.

१) सर्वात आधी आभार मानावे तर प्रगट विघ्नेश शाळेतील शिक्षकांचे. शाळेतील शिक्षक हे स्वेच्छेने, एकही रुपया मानधन, पगार न घेता तिथे काम करत आहेत. त्यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले. अनेक चांगले उपक्रम अयोग्य नियोजन आणि अयोग्य अंमल बजावणी यामुळे पूर्ण होत नाहीत पण शाळेतील शिक्षकांनी योग्य नियोजन करून हा उपक्रम पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
२) त्यानंतर अनेक लोकांनी या उपक्रमासाठी आम्हाला आर्थिक मदत केली. संयुक्त कोंकणी सभा पुणे या ग्रूपमधून अनेकांनी मदतीचा हात देऊ केला. प्रत्येकाची नावं इथे मी देऊ शकत नाही पण त्या सर्वांचे मनापासून आभार.
३) त्यासोबतच श्री. शशिधर भट, श्री. संतोष कुमार शानभाग, श्री. गुजर सर इ. अनेकांनी काही मुलांचा खर्च स्वतः उचलला आणि मदतीचा हात दिला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 
४) आणि चैतन्य ग्रूपच्या टीमच नाव घेतल्याशिवाय हि यादी पूर्ण होणारच नाही. टीम चैतन्य म्हणून काम करताना सर्वानी एकत्रित प्रयत्न करून हा उपक्रम पूर्ण केला त्याबद्दल चैतन्य ग्रूपला शुभेच्छा.

पुढील वाटचाल :-

पौष्टीक खाऊ  उपक्रमासोबतच विद्यार्थी, पालक आणि श्री प्रगट विघ्नेश विद्यालय यांच्या सहमतीने आणि सहकार्याने जानेवारी महिन्यापासून प्रत्येक आठवड्यातून एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना खिचडी सुद्धा देणार आहोत. या उपक्रमात आम्हाला सौ. अमुल्या मंगेश तेंडुलकर, श्री. राजाध्यक्ष सर आणि श्री. गवाणकर सर यांची मोलाची मदत झाली आहे. खिचडी हा उपक्रम आम्ही जानेवारी आणि फेब्रूवारी हे दोन महिने राबवणार आहोत. तसेच शाळेतील परीक्षा कालावधी लक्षात घेता पौष्टीक खाऊ उपक्रम सुद्धा १५ मार्च २०१८ नंतर थांबवण्यात येईल.

जून २०१८ पासून हे दोन्ही उपक्रम (पौष्टिक खाऊ आणि खिचडी उपक्रम) पुन्हा राबवण्यात येतील.

हे दोन्ही उपक्रम जून २०१८ पासून, शाळा  सुरु झाल्यानंतर पुन्हा नियमितपणे सुरु होतील. आपणही या उपक्रमात  सहभागी होऊ शकता त्यासाठी मेसेजच्या शेवटी दिलेल्या क्र. वर संपर्क करू शकता. 

धन्यवाद.
 प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८०)
चैतन्य मित्रमंडळ

Visit our Fb page for more details....👇

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=bookmarks

No comments:

Post a Comment