Saturday, 2 July 2016

आम्ही देव वाटून घेतलेत...?

          ह्या लेखाला सुरवात करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की इथे " देव " म्हणजे पुराणकाळातील देव नव्हेत. देव म्हणजे ते महापुरुष जे आपल्या कार्याने देवपण मिळवून गेले.

          आजचा हा लेख का लिहावा लागला ह्याच कारण म्हणजे नुकतंच आपल्या " जाणत्या राजांनी " छत्रपतींच्या राज्यसभेवरील नेमणुकीवरून केलेल वक्तव्य. बघायला गेलं तर वक्तव्य जातीय भेदाला खतपाणी घालणारं आहे. ब्राम्हण - ब्राह्मणेतर हा वाद काही आपल्याला नवीन नाही. त्यात ब्राम्हण-मराठा वाद निर्माण करण्याची ही सुस्पष्ट खेळी दिसते आहे. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्या नंतर ह्यांच्याच एका शिलेदाराने बाबासाहेब पुरंदरे, ब्राम्हण व ब्राह्मणेतर असा वाद निर्माण केला होता. वादाला कोणीच घाबरत नाही किंबहुना असले वाद आता कोणीच जास्त मनावरही घेत नाहीत पण स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्या नेत्यांकडून जर अशी वक्तव्य येत असतील तर महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. प्रत्येकाला आपल्या जातीचा, धर्माचा तितकाच अभिमान असतो जितका आपल्याला आपल्या भारतीय ह्या राष्ट्रीयत्वाचा असतो. पण एकाबाजूला स्वतःला पुरोगामी म्हणायचं आणि दुसरीकडे जातीय वक्तव्य करायचं हे कितपत योग्य आहे?  मला कुठल्याही जाती बद्दल काहीही आक्षेप नाही, प्रत्येक जात, धर्म हा आपापल्या जागी श्रेष्ठ असतो, पण एखाद्या महापुरुषाला जातीय बेडीत अडकवणे किती योग्य? ह्याचा विचार कोण कधी करणार कोणास ठाऊक.

          आज सर्व महापुरुष, योद्धे जातीय बेडीत अडकलेले आहेत किंबहुना जाणूनबुजून तसे अडकवले गेले आहेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे मराठ्यांचे, पेशवे, लोकमान्य हे ब्राह्मणांचे, बाबासाहेब दलित समाजाचे असे आपण जातीनुसार महापुरुष वाटून घेतले आहेत का? शिवरायांनी स्वराज्य उभारलं होतं ते काय फक्त मराठा समाजासाठी? शिवरायांचं कार्य हे संपूर्ण हिंदुस्थान साठी होतं. त्यात  १८ पगड जाती, धर्म अशा सर्व लोकांसाठी होतं. "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा" ह्यातील मराठा म्हणजे मराठा जातीतील नव्हे तर ह्या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो, ज्याला हिंदवी स्वराज्य हवं आहे असा मराठा, मग त्यात कोणत्याही जातीचा आणि धर्माचा मराठा असला तरी महाराजांना त्यावर आक्षेप नव्हता. शिवाजी महाराजांच्या सैन्यात बाजीप्रभू, मोरोपंत ह्यांच्यासारखे ब्राम्हण सुद्धा होते आणि नूरखान बेग सारखा मुस्लिम सुद्धा होते. ह्यावरूनच महाराज जातीपातीच्या किती पुढे होते हे आपल्याला लक्षात येते. फक्त आपले महाराज नाही तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लोकमान्य ह्यांना स्वराज्य हे ब्राह्मणांसाठी नको होतं, संपूर्ण देशासाठी हवं होतं. बाबासाहेबांनी राज्यघटना ही फक्त एक विशिष्ट वर्गासाठी नाही लिहिली. ह्या व इतर सर्व महापुरुषांनी जे केलं ते राष्ट्रासाठी, ह्यांनी एक समाजाचा, संकुचित विचार केला असता तर आपण आज सुखाने घरात बसलो नसतो.

          होय, हे खर आहे की छत्रपती पूर्वी पेशव्यांची, फडणवीसांची नेमणूक करायचे. पण हे कोणालाच अमान्य नाही आहे. पेशवे हे छत्रपतींचे सेवक होते आणि जरी पेशव्यांनी छत्रपतींच साम्राज्य संपूर्ण हिंदुस्थानभर पोहोचवलं तरी त्यांनी छत्रपतींच्या गादीचा हव्यास पेशव्यांना नव्हता. आणि झाला तो इतिहास आहे. आत्ता छत्रपतींची नेमणूक राष्ट्रपतींनी केली आहे राज्यसभेवर, आणि त्यात कोणाला आक्षेप असण्याचं काहीच कारण नसावं. पण ह्यातही आपण जातीय काहीतरी शोधून काहीतरी वादाला तोंड फोडत आहोत का ह्याचा विचार सर्वांनीच करायला हवा. सरकार फडणवीसांचं असो किंवा ९५ साली आलेलं जोशी-महाजनांच, पण आपण सर्व जातीत इतके अडकलो आहोत का की मुख्यमंत्री हे एका जातीसाठी नसून संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत हेही आपल्याला समजू नये? असं असतं तर शंकरराव चव्हाण असो किंवा दिवंगत देशमूख साहेब असोत, ह्यांना लोकांनी मराठा समाजाचे मुख्यमंत्री म्हणून बघितलं असतं.

          असो, कोणी काय विचार करायचा आणि काय बोलायचं ह्याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा. पण आपल्या स्वार्थासाठी निदान आपल्या देवांचा (महापुरुषांचा) वापर करणं आपण थांबवलं पाहिजे, असं मला वाटतं. बाकी आपण सूज्ञ आहात.

जय महाराष्ट्र.

प्रथमेश श. तेंडूलकर

No comments:

Post a Comment