Friday, 11 March 2016

एक मराठी माणूस

**सदर blog ABP माझा च्या फेसबूक पेज वरील " एका मराठी माणसाने " राज ठाकरे ह्यांना लिहिलेल्या पत्राला उत्तर म्हणून आहे.

माननीय " एक मराठी माणूस ",

ABP माझाने आपलं blog रूपी पत्र फेसबूक वर दाखवल आणि ते माझ्या वाचनात आलं. सुरुवातीपासूनच आपल्या पत्राला काय म्हणावं हेच कळत नाही पण आपण एका इंग्रजी माध्यमातून शिकला आहात हे नमूद केले आहे म्हणून कदाचित पत्र कसं लिहावं ह्याच ज्ञान नसेल म्हणून आपल्या पत्राला माझ हे उत्तर. पण हे उत्तर फक्त आपल्याला नाही बरं का? हे पत्र ABP माझाला सुद्धा आहे, हे पत्र त्या प्रत्येकाला आहे जे लोक आज राज ठाकरेंवर टीका करत आहेत. पत्राच्या सुरुवातीलाच एक गोष्ट नमूद करतो की मी मनसे ह्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, "आपल्यासारखाच एक मराठी माणूस आहे", फक्त उलट बाजूने न बघता एखादी गोष्ट सरळ बघण्याकडे माझा दृष्टीकोन असतो. हे सांगायचे कारण इतकच की कदाचित हे पत्र वाचल्यावर तुम्ही मला मनसेचा कार्यकर्ता समजाल, तर आपल्या चुकीच्या विचारात अजून एका चुकीच्या मताची भर नको म्हणून हे स्पष्टीकरण.

मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे ह्यांनी त्यांच्या भाषणात सांगितल ते आपण सर्वांनी पाहिलं, तेच पुन्हा मी बोलत नाही. पण आज ते बोलायची वेळ का आली? आपण आपल्या पत्रात सलग एक उल्लेख केला आहे की आपण होळीला रिक्षा जाळू आणि होळी साजरी करू, आपला हा उल्लेख जरी एक टोमणा किंवा तत्सम असल तरी ह्या गोष्टीचा सारासार विचार केला का तुम्ही? ज्या रिक्षाचे परवाने वाटले गेले त्यात ७०% लोक हे परप्रांतीय आहेत ह्या मनसेच्या दाव्याला तुम्ही खोडलं असं कुठेच दिसलं नाही मला. नाही तुम्ही आणि नाही माझा ने. जरा पत्र लिहायच्या आधी नुसत ABP माझा बघू नका, इतर बातम्या बघायचा सल्ला मी आपल्याला देत आहे. कारण काल डॉक्टर उदय निरगुडकर ह्यांच्या कार्यक्रमात मनसे च्या नेत्यांनी अनेक कागदपत्र दाखवली जसे की खोट डोमेसाइल , शाळा सोडल्याचा दाखला ज्यात फक्त ३ वर्षात तो माणूस ८वी पास झाला. अशी अजब शाळा कुठली हे अजून मला कळलेलं नाही. तुमच्या शाळेल तरी अस होईल का? आता मला सांगा की इतके खोटे कागदपत्र जर मनसे दाखवत असेल तरी तुम्ही त्यांना एकाच गोष्टीवर झोडा की रिक्षा जाळायचा आदेश का दिला? तुम्हाला  (ABP माझा सारख्या ) फक्त ह्याच गोष्टी वर खेळ नाचवून TRP वाढवायचा आहे, असं ह्यातून शंका येत आहे.

आपल्या पत्रात अजून एका गोष्टीचा उल्लेख आहे, तो म्हणजे "ब्ल्यू प्रिंट". ह्या पत्राच्या माध्यमातून मला हे तुम्हाला विचारायचे आहे कि तुम्ही तरी हि ब्ल्यू प्रिंट नीट वाचली आहे का? जर ती वाचली असती तर आज त्यावर प्रश्न विचारले नसतेत. वृत्त वाहिन्यांना माझा एकच प्रश्न आहे की  " ब्ल्यू प्रिंट दाखवून १ आमदार आला " वैगरे तुम्ही बोलता आहात पण जेव्हा ब्ल्यू प्रिंट च सादरीकरण होत होतं तेव्हा तुम्ही ते दाखवलं का? तेव्हा तुम्ही युती आणि आघाडीच्या घटस्फोटावर डोळा ठेऊन होतात. मग आत्ता हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे एकदा तपासून पहा. मला ह्या पत्र लिहिणाऱ्या " मराठी माणसाला " अजून एक विचारायचे आहे की बाबा एक सांग आझाद मैदानावर जेव्हा एक हिंसक मोर्चा निघाला आणि आपल्याच मराठी पोलिसांवर अन्याय झाला तेव्हा त्यांच्या बाजूने बोलणारा आणि आवाज उठवणारा नेता फक्त राज ठाकरे होते. तेव्हा साध आभारच पत्र तरी लिहिलं का रे तू? बर ते जाऊदे टोल विषयी महाराष्ट्रात जेव्हा राज ठाकरे ह्यांनी आवाज उठवला तेव्हा जे अनेक टोल बंद झाले त्याबद्दल कृतज्ञता तर जाऊदे पण ते आंदोलन अर्धवट का सोडलं म्हणून तू विचारतो आहेस. अरे पण आज जे सरकार आहे त्यातले मंत्री महाराष्ट्र टोलमुक्त करू हि घोषणा करत सत्तेवर आले, त्यांनी केला का रे महाराष्ट्र टोलमुक्त? हा प्रश्न "मराठी माणसाला" एकट्याला नाही तर हे जे वृत्तवाहिन्या आहेत त्यांना सुद्धा आहेत.

राहिला प्रश्न रिक्षा परवानाच्या आंदोलनाचा तर एकच सांगायचे आहे की कुठल्याही हिंसेच समर्थन मी करत नाही पण मराठी माणसाच्या पोटावर जर पाय मारत असेल कोणी आणि त्यासाठी कोणी विरोध केला तर कुठे चुकलं? असे किती मुजोर रिक्षा आणि टेक्सी वाले दाखवू तुला कि जे मुजोरी करतात? AC च्या गार हवेत बसून ब्लॉग रूपी पत्र लिहिणं जितकं सोपं आहे ना तितक आज मुंबई मध्ये कुठे जायचं असेल तर रिक्षा मिळवण कठीण आहे. हाच बिचारा गरीब रिक्षावाला असतो (परप्रांतीय). मुंबईत ह्याच बिचार्या गरीब रिक्षा आणि कॅब वाल्याला तो ज्या विभागात वाहन चालवतो आहे त्या विभागाची माहिती नसते. तेव्हा ह्या सगळ्यात त्रास सहन करणारा सुद्धा मराठीच असतो, पण तुला त्याच काही नसेलच. बोलायला गेलं तर बरंच आहे पण सध्यापुरत इतका खूप झालं.

माझ पत्र तुला मिळालंच तर वाच आणि विषय समजून घ्यायचं प्रयत्न कर. बाकी मराठी माणूस सुद्न्य आहे.

सस्नेह जय महाराष्ट्र,

एक मराठी माणूस..

No comments:

Post a Comment