Saturday, 15 July 2017

दुर्दैव....

दुर्दैव....

चैतन्यचं काम करताना अनेक आदिवासी पाड्यांना भेट आम्ही देत असतो. त्या निमित्ताने आम्ही वासिंद जवळील रावतेपाडा येथे भेट देण्याचा योग्य आला. तिथल्या प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय येथे ई - लर्निंग सुविधा आम्हाला सुरु करायची होती. तेव्हा तिथल्या सरांकडून इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीबद्दल मला समजलं. त्या मुलीला काहीतरी आजार झाला इतकंच मला समजलं होतं. मी माझ्या ओळखीतल्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन यायला सांगितले. खरा प्रॉब्लेम तर इथून सुरु झाला होता. आदिवासी पाडा आणि तिथले लोक हे औषधं, डॉक्टर ह्यापासून चार हात नव्हे तर किंबहुना कोसो दूर असल्याचं आम्हाला दिसलं. कारण जेव्हा त्या मुलीच्या पालकांना त्या शिक्षकांनी डॉक्टरांकडे घेऊन जायची तयारी दर्शवली तेव्हा त्यांनी त्याला साफ नकार दिला. त्या विभागात फिरताना आम्हाला जवळपास एखादं हॉस्पिटल तर सोडाच पण साधा दवाखानासुद्धा दिसला नाही. सरकारी आस्थेच हे एक अपयशच म्हणावं लागेल. पण मुंबईसारख्या मेट्रोसिटी पासून काही किलोमीटर अंतरावर असूनसुद्धा मूलभूत सुविधांचा अभाव हे सर्वांसाठीच लज्जास्पद आहे आणि सरकारसाठी जास्त.

आमच्या काही प्रयत्नांमुळे त्या मुलीचे पालक तिला के.ई.एम. हॉस्पिटलला घेऊन यायला तयार झाले. ९ जुलैला त्या मुलीचे पालक तिला घेऊन आले. तिची परिस्थिती बघवत नव्हती. तिचा एक पाय पूर्ण काळा पडला होता आणि ती वेदनेने कळवळत होती. ओळखीचे डॉक्टर तिथे होतेच. शाळेचे एक सर, आणि आमच्या ग्रुपचे मेम्बर्स तिथे प्रत्यक्ष हजर होते. डॉक्टरांनी ताबडतोब तिचं चेकअप केलं आणि त्यात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्या मी पुढे सांगेनच. पण तिला गँगरीन झाला होता आणि तो पसरला होता. तिचा पाय कापावा लागणार होता आणि पर्याय नव्हता. तिच्या पालकांनी ऑपेरेशन करायला साफ नकार दिला. डॉक्टरांनी त्यांना खूप समजावले आणि हे सुद्धा सांगितलं की जर हिच्यावर आता उपचार झाले नाहीत तर पुढील १५-२० दिवसात हिला जीव गमवावा लागेल. पण इतक ऐकून सुद्धा ते तयार झाले नाहीत. कारण त्यांचा डॉक्टर, हॉस्पिटल ह्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. शेवटी ते तिला घेऊन गेले घरी. आणि आज १५ जुलैला त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला.

ह्या गोष्टीला जबाबदार कोण? त्या मुलीचे आई वडील? मूलभूत आरोग्य, शिक्षण न पुरवणारं सरकार? की त्यामुलीचं नशीब? कारण जेव्हा डॉक्टरांनी त्या मुलीचं चेकअप केलं तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी माझ्या समोर आल्या. त्या मुलीला गँगरीन झाला होता. आणि ह्या गोष्टीला १ महिन्यापेक्षा जास्त होऊन गेलेला. आणि म्हणूनच ते विष त्या मुलीच्या शरीरात पसरत गेलं. मग एक महिना हे लोक करत काय होते? ह्या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न मी केला तेव्हा काही शक्यता समोर आल्या. त्या म्हणजे सगळ्यात आधी एखाद्या रोगाबद्दल तिथल्या लोकांचं असलेलं अज्ञान. दुसर म्हणजे गरिबी आणि शिक्षणाचा अभाव. तिसरं म्हणजे मूलभूत सोयी सुविधा जस आरोग्य सुविधांचा अभाव आणि जरी त्या उपलब्ध झाल्या तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या दळणवळणाच्या गोष्टींचा अभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धा. लोक ताप खोकला ह्यासाठी सुद्धा बुवा-बाबाकडे जातात. स्वतःला पुरोगामी म्हणवणर्या आपल्या सर्वांसाठी ही एक चपराक आहे.

Whatsapp, फेसबुक ह्यासारख्या virtual जगात राहणाऱ्या आपल्या नेटकरी लोकांपर्यंत ह्या बातम्या क्वचितच पोहोचत असतील. अश्या कितीतरी मुली आपला जीव ह्यामुळे गमावत असतील. आता ह्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपतर्फे जे जे जमेल ते ते करणार आहोत. कारण निदान रावतेपाडा विभागात तरी पुन्हा कोणाची अशी अवस्था होऊ नये अशी अपेक्षा आहे. ह्याला आपण एक लढा म्हणू शकतो. हा लढा कुठल्या व्यक्ती विरुद्ध किंवा सरकार विरुद्ध नाही. हा लढा आहे विचारांचा. आपले विचार त्यांना पटवून देण्याचा. हे काम करताना, हा विचारांचा लढा लढताना, ह्या कामात आम्हाला आपल्या मदतीची सुद्धा गरज लागेल. निदान आत्तातरी ह्या व्हर्च्युअल जगातून बाहेर येऊया आणि सर्वांनी मिळून एक विचाराने ह्यासाठी काम करूया.

आमच्या चैतन्य ग्रुपची लिंक मी शेवटी देत आहे. ज्यांना आमच्या ग्रुप सोबत काम करायचे आहे किंवा आपले काही सजेशन असतील तर आम्हाला संपर्क करू शकता. वाट बघतो आहे.

प्रथमेश श. तेंडुलकर
९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel

No comments:

Post a Comment