Saturday 12 June 2021

World Child Labor Dayच्या निमित्ताने...

World Child Labor Dayच्या निमित्ताने

१२ जून हा जागतिक बालकामगार विरोध दिन. हा दिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं 19 वर्षापूर्वी पुढाकार घेतला. 14 वर्षाच्या आतील बालमजूरी संपवणे आणि त्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बालकांना त्यांचे बालपण मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संघटना कार्यरत आहेत. आजही जगभरात, विशेषकरुन भारतासारख्या विकसनशील देश आणि इतर मागासलेल्या देशात बालमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या देशांत बालकामगार विरोधी कायदे झाले असले तरी बालमजुरांच्या संख्येत म्हणावी तितकी घट झाली नाही. त्यावर जगभरात जागरुकता निर्माण करण्यासाठी 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा करण्यात येत आहे.

मूळात बालकामगार निर्माण का होतात? इथपासून या विषयाचा विचार करण्याची गरज आहे. ज्या वयात चांगलं शिक्षण मिळण्याची गरज असते त्या वयात अनेकदा मेहनतीची कामं या मुलांना करावी लागतात. अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी माझ्या समोर आली. दोन विद्यार्थी, एक सहावीला आणि एक आठवीला. काही वर्षांपूर्वी आपले वडील गमावले आणि आई मूक-बधिर असल्याने लहानसहान कामं करायची. त्यातच कोरोनामध्ये त्यांच्या आईचं कामही बंद झालं. लहान असले तरी घरातली परिस्थिती त्यांच्या समोर होती. तीन महिन्याचं घराचं भाडं थकलेलं, घरात पुरेसं रेशन नाही, म्हणून या दोघांनी कामं करायला सुरवात केली. एक हॉटेल मधून चहा वेगवेगळ्या दुकानात नेऊन द्यायचा आणि दुसरा बिल्डींग मध्ये साफसफाई करायचा. त्यातून मिळणाऱ्या पैशातून यांच्या घराला थोडाफार हातभार लागायचा. ही घटना मला त्यांच्या एका शिक्षिकेकडून समजली. सर्वात आधी सर्व शिक्षकांनी मिळून त्यांचं घरभाडे दिले. मग चैतन्यतर्फे त्यांच्या घरी आम्ही किराणा साहित्य घेऊन गेलो होतो, मुलांना भेटलो, त्यांची प्रगती पुस्तकं बघितली. त्यानंतर त्या मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. इयत्ता दहावी पर्यंत दोघांनाही आम्ही चैतन्यच्या माध्यमातून मदत करणारच आहोत पण पुढील शिक्षणासाठीही साहाय्य करणार आहोत.

ही दोन मुलं म्हणजे एक उदाहरण आहे. मुळात गरिबीचं चक्र तुटायला मदत शिक्षण करतं. वेगवेगळ्या खेड्यात, आदिवासी भागात काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मुलांचे आई-वडील शिकलेले नसतात, त्यामुळे उत्पन्नाची साधनं मर्यादित आणि त्यामुळेच शिक्षणाबाबतची अनास्था. या सर्वाचा एकत्रित परिणाम होऊन हे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायच्या ऐवजी कामावर घेऊन जातात. तिथे पैसेही मिळतात आणि थोडफार खायलाही मिळतं. पण मुळातच हे चक्र काही संपत नाही. हे चक्र संपवण्यासाठी या मुलांना योग्य शिक्षण मिळणं गरजेचं आहे.

चैतन्यतर्फे काम करताना आम्ही याच गोष्टींवर विशेष लक्ष देत आहोत. योग्य वयात योग्य शिक्षण मुलांना कसं मिळेल, त्यांना सकस आहार कसा मिळेल, शैक्षणिक सोई सुविधा कशा मिळतील याकडे आम्ही लक्ष देतो. जेणेकरून ही मुलं व्यवस्थित शिकतील आणि त्यांना शिक्षणाचं महत्व पटेल आणि त्यामुळेच त्यांच्या येणाऱ्या पिढीला कामावर घेऊन जायच्याऐवजी ते त्यांना शिकवू शकतील. एकदा हे चक्र तुटलं की बालकामगार कमी होण्यासाठी मदतच होईल.

प्रथमेश श. तेंडुलकर
संस्थापक - चैतन्य सोशल वेलफेअर फाउंडेशन

No comments:

Post a Comment