Friday 30 April 2021

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...

महाराष्ट्र, 1 मे हा महाराष्ट्र दिन, ज्यादिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी भाषिकांना मिळाला. यासाठी प्रचंड मोठा लढा झाला आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला.

महाराष्ट्राला फार जुना इतिहास आहे. एखाद्या राज्याच्या नावातच "राष्ट्र" असं उल्लेख असलेला महाराष्ट्र हे भारतातलं एकमेव राज्य आहे. महाराष्ट्र या शब्दाचाच मुळात अर्थ हा की महान राष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे असं राज्य की ज्या राज्यात राष्ट्रीयत्व समावण्याची क्षमता आहे. राष्ट्रावर, म्हणजेच हिंदुस्थानावर जेव्हा जेव्हा संकटं आली, परकीय आक्रमकांनी हल्ला केला तेव्हाही महाराष्ट्र सर्वात आधी राष्ट्राच्या संरक्षणार्थ मदतीसाठी गेला. महाराष्ट्राला जसा गौरवशाली इतिहास आहे तशीच साधू संतांची, मराठी साहित्याची मोठी परंपरा आहे. पण महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कधी रूढ झालं असावं? याचा विचार केला तर इतिहासात फार पूर्वीपासून "महाराष्ट्र" हा शब्द रूढ झाला होता आणि वापरला गेला आहे.

इसवीसन ५५० ते ७५३ पर्यंत महाराष्ट्रावर चालुक्यांनी राज्य केले. चालूक्योदय काळात “महाराष्ट्र” ही संकल्पना रूढ होत होती. पुढे महाराष्ट्र हाच शब्द रूळला गेला, ते चालुक्यांच्याच नंतरच्या काळातील शिलालेखावरून कळते. इ. स. १००८ मधिल सीताबर्डी येथिल स्तंभात चालूक्य राजा सहावा विक्रमादित्य याचा मांडलिक असेलेला नागपुर प्रांताचा  महासामंत स्वतःला “महाराष्ट्रकूट” म्हणवून घेतो. 

इ. स. ६३४, ऐहोळे येथिल लिहिलेल्या/कोरलेल्या शिलालेखात एक श्लोक आहे ज्यात महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख येतो.

“अगदमदधिपतित्वं यो महाराष्ट्रकाणाम्।
नवनवतिसहस्त्रग्रामभाजां त्रयाणाम्।।" 

अर्थ: चालुक्यांचा राजा दुसरा सत्याश्रय पुलकेशी  हा तीनही महाराष्ट्रांचा सार्वभौम राजा झाला.

या श्लोकावरून दोन गोष्टी कळतात, एक तर महाराष्ट्र हा शब्द तेव्हा प्रचलित होता आणि त्यात तीन खंडमंडळे होती. आता ही तीन खंडमंडळे कोणती तर,
अपरांत - दंडकारण्य - म्हणजेच आजचे विदर्भ
कोकण - देश - वऱ्हाड होय.

याचाच अर्थ हा की मराठी बोलणाऱ्या मराठी भाषिकांच्या राज्याचे "महाराष्ट्र" हे नाव साधारण ३००० वर्षांपासून नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहे. १ मे १९६० रोजी आपल्या राज्यास भारतीय संघराज्य शासनातर्फे अधिकृत मान्यता मिळाली आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आम्हाला मिळाला.

जय महाराष्ट्र.

प्रथमेश श. तेंडुलकर

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

संदर्भ - मराठी आमुची मायबोली.

#महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #मराठी

©prathameshtendulkar2021

No comments:

Post a Comment