Sunday, 5 March 2017

आपण हे का करतोय?

आपण हे का करतोय?

गेले 2 वर्ष सतत चैतन्य मित्रमंडळातर्फे अनेक सामाजिक उपक्रम आम्ही करत असतो. आमच्यापैकी प्रत्येक जण काही ना काही कामात म्हणा, नोकरी, व्यवसाय, शिक्षण ह्यात व्यस्त आहे तरी ह्या कामासाठी महिन्यातले एक-दोन दिवस प्रत्येक जण देतात. काही जण तर आपापल्या घरचा विरोध पत्करून ह्या उपक्रमात सहभागी होतात. का? कशासाठी? हा प्रश्न विचारायचं कारण इतकंच की आपल्या इथले काही लोक ह्या कामाची टिंगल टवाळी करतात. त्याला मदत तर सोडाच पण विरोधच जास्त करतात. त्या सर्वांना माझ हे उत्तर,

आज आमच्या ग्रूप मधे अनेक जण आहेत. काही जण अगदी सुरुवातीपासून आहेत. काही नव्याने आले आहेत. पण प्रत्येक जण प्रत्येक उपक्रमात पहिला उपक्रम असल्या सारख काम करतात. तीच ऊर्जा, तेच dedication. वात्सल्य च्या सर्व मुलांना घेऊन आम्ही जेव्हा पिकनिकला गेलो होतो तेव्हा स्नेहा, सुवर्णा, आशीष असे सर्व मिळून आम्ही ती पिकनिक घेऊन गेलो होतो. तेव्हा अगदी सुरुवातीपासून ते मुलांना वात्सल्य मधे नेइपर्यंत सर्व जण मुलांवर लक्ष ठेऊन होते. इतकंच कशाला, आम्ही आदिवासी विभागात एक आरोग्य शिबिर घेतले. हे शिबिर यशस्वी व्हावे ह्यासाठी गणेश ह्या माझ्या मित्राने बरीच मेहनत घेतली. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता तो सतत हे काम करत होता. आमच्या सोबत आलेले डॉक्टर्स, कोणतीही वायफळ अपेक्षा न करता त्यांनी ह्या उपक्रमात सहभाग घेतला. काही जण तर विरार वरून आले होते नेरळला. विरार टू नेरळ म्हणजे जवळपास ट्रेनचा चार तासांचा प्रवास. त्यात आलेला थकवा आणि ट्रेन मधली गर्दी. हे ऐकूनच अनेकांना दमल्याचा फील आला असेल पण इतक होऊन सुद्धा येताना दादरला उतरल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास अथवा दमल्याचा लवलेशही नव्हता हे विशेष. वाशिंद येथील आदिवासी पाड्यात जेव्हा जागरूकता शिबिर घेण्यात आले तेव्हा सुद्धा प्रचंड गरम होत असतानाही ह्या उपक्रमात सर्वजण उत्साहाने काम करत होते.

का करतात हे सर्व? कोण लागतात ते लोक ह्यांचे? बर हे करून काय आर्थिक लाभ होतो अस कोणाला वाटत असेल तर तेही नाही, उलट तिथे जाण्यासाठी लागणारे पैसे प्रत्येक जण मिळून उभे करतात. तरी आम्ही हे करतोय ह्याच कारण एकच आहे. रोज बातम्या वाचून एसी रूम मधे बसून चहा-कॉफीचे घोट घेत त्यावर social मीडियातून चर्चा करण्यापेक्षा social कामातून मदत करणं आम्हाला जास्त पटत. आपल्या सोबतच्या प्राण्यांना लागले तर दूसरे प्राणी सुद्धा रडतात. जर ही जाणीव प्राण्यांना आहे तर आपण माणूस आहोत.

प्रबोधनकार ठाकरे ह्यांचं एक अप्रतिम वाक्य आहे. माणसाच्या मनातील संवेदना आणि आत्मसन्मान मेला की उरतात फक्त सापळे. आम्हाला सापळे बनून जगायचं नाही म्हणून आम्ही हे करतोय. आणि हो, हे सर्वांना शक्य आहे. ठरवले तर काहीच अशक्य नाही.

धन्यवाद
प्रथमेश श. तेंडुलकर

No comments:

Post a Comment