Monday, 30 March 2015

मराठी शाळा जागवा आणि जगवा

आज मराठी शाळा ह्या विषयावर लिहायचे कारण हेच की गेल्या बर्याच दिवसापासून वृत्तपत्रांमध्ये मराठी शाळा टिकवा, मराठी शाळा जगवा अस बरच काही वाचायला मिळतंय..  कदाचित माझी मतं सर्वांनाच पटतील अस नाही पण ह्या सर्वांचा सारासार विचार व्हायला पाहिजे म्हणून हे माझ मत…

मराठी भाषा म्हणजे फक्त संभाषणाच मध्यम नाही… मराठी भाषा हा आपला अभिमान आहे, मराठी हि एक संस्कृती आहे… पण आपल्या महाराष्ट्रातच मराठी शाळा जगवा आणि वाचवा हीं ओरड ऐकायला मिळणे हे आपल दुर्दैव आहे… पण ह्यासाठी फक्त सरकारी धोरण जबाबदार आहे का? कि मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये घालणारे पालक? वास्तविक पाहता ह्यासाठी फक्त कोणा एकाला जबाबदार धरता नाही येणार…

सरकारी धोरणाबरोबर मराठी शाळा सुद्धा काहीप्रमाणात ह्यासाठी जबाबदार आहेत… आज लोकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल जो "अतिविश्वास" निर्माण झाला आहे त्याला ह्या लोकांपेक्षा मराठी शाळांचा बेजबाबदारपणा  सुद्धा काहीप्रमाणात जबाबदार आहे… एखादे पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात टाकताना त्यांचा विचार हा असतो कि आपल्या पाल्याला उत्तम प्रतीच शिक्षण मिळाव आणि ह्यात त्यांची काही चूक असते अस वाटत नाही… पण आपण तेच दर्जेदार शिक्षण मराठी शाळांमध्ये का नाही देऊ शकत? आज जगातल्या लोकांशी स्पर्धा करायची असेल तर आपल्याला इंग्रजी येणं अत्यंत गरजेच आहे पण त्या तोडीच (काही इंग्रजी माध्यमात शिकवल्या जाणार्या इंग्रजी च्या) इंग्रजी भाषेच शिक्षण आपण मराठी शाळात देत आहोत का? हाताच्या बोटावर मोजता यॆतिल अशा काही शाळांमध्ये दर्जेदार इंग्रजी शिकवलं जात पण अनेक शाळांमध्ये इंग्रजी हा विषय सुद्धा मराठीत शिकवला जातो…

पाल्याच प्राथमिक शिक्षण हे त्याच्या मातृभाषेत झाल तर तो विषय त्या पाल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजतो पण इतर विषयांसोबत जगाशी टक्कर घेताना त्या दर्जाच इंग्रजी भाषेच ज्ञान आपल्या मराठी शाळेत दिल गेल तर मला विश्वास आहे कि पालक स्वताहून मुलांना मराठी माध्यमात शिकायला पाठवतील… फक्त गरज आहे ती सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची… कोणा एका व्यक्तीला, संस्थेला दोष न देता अश्या शाळा निर्माण करू कि  मराठी शाळा टिकवा, मराठी शाळा जगवा अशी ओरड करायची गरजच लागणार नाही…

लेख संपवताना एक उदाहरण द्यावेसे वाटते कि एखाद्या पेपर वर दुसर्यापेक्षा आपली रेख मोठी करण्यासाठी दुसर्याची रेख रबर ने खोडण्यापेक्षा स्वतःची रेख मोठी कशी करता येईल ह्याचा विचार झाला पाहिजे… ह्यापुढे आपण असच काहीस करू आणि स्वतःची क्षमता वाढवू…

जय महाराष्ट्र

प्रथमेश तेंडूलकर

Friday, 27 February 2015

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…

काल २७ फेब… आपण सर्व मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करत होतो… प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठीत बोलून आणि इतर अनेक उपक्रम साजरे करून हा दिवस साजरा केला असेल… पण आतापर्यंत आपण असे दिवस फक्त एका दिवसापुरते साजरे करतो आणि नंतर पुन्हा दुसर्या वर्षी येणाऱ्या दिवसाची वाट बघतो… हे एवढ्यापुरतच मर्यादित राहणार आहे का? ह्यातून मराठी भाषा आणि भाषेचे संवर्धन होईल? माझ्यासाठी मराठी ही एक फक्त भाषा नाही तर ती एक संस्कृती आहे आणि ती जपणे आणि वाढवणे हे आपल काम आहे…

आपल्या मध्ये मराठी रुजते ती जागा म्हणजे आपली शाळा… आज मराठी शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे… बरेचसे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत… असे का होत आहे ह्याचा कोणी विचार केला का? प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचं भविष्य उज्वल व्हाव हि माफक अपेक्षा असते आणि ती सर्वांची असते… पण अचानक असे काय झाले कि मराठी शाळा आपल्या महाराष्ट्रात वाचवायची वेळ आपल्यावर आली ह्याचा सारासार विचार आपण सर्वांनी केला पाहिजे… अस तर अजिबात नाही कि इंग्रजी माध्यमात काही वेगळ शिकवतात… पण मुळात फरक हा दर्जेदार शिक्षणात आहे… रात्रीच्या प्रकाशात चांदण्या चमकतात ह्याच कारण त्या सूर्यापेक्षा तेजस्वी झाल्या असा नाही तर सूर्य अस्ताला जातो म्हणून…

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत झाले कि ते त्या मुलांना लवकर अवगत करता येते हे सर्व मान्य आहे पण बाहेरच्या व्यावहारिक जगात जेव्हा इंग्रजी बोलण्याची वेळ येते तेव्हा आपण मागे पडणार नाही ना हा एक न्यूनगंड तयार होतो… त्यासाठी आपल्या मराठी शाळेतच मुलांसाठी दर्जेदार इंग्रजी का नाही शिकवत आपण? काही शाळांमध्ये शिकवलं जात दर्जेदार मराठी  सोबत इंग्रजी शिकवलं जात पण अनेक शाळांमध्ये अजून तेच होत नाही… इंग्रजी माध्यमाच्या तोडीच्या शाळा जर मराठी माध्यमात असतील तर मराठी शाळा वाचवा असे सांगायची गरजच लागणार नाही…

जोपर्यंत आपल्या मातृभाषेला आपण आपली व्यवहाराची भाषा बनवत नाही तोपर्यंत अमुक एक भाषा टिकवा हे सांगावे लागेल… आणि म्हणूनच आज एक संकल्प करू, आजपासून जास्तीत जास्त मराठीत बोलू… समोरचा नाही बोलला तरी चालेल पण जमेल तितक आपण संवाद मराठीतून करू आणि वर्षभर मराठीचा सन्मान करू…

जय महाराष्ट्र…

Friday, 20 February 2015

चार्ली हेब्दो ते कॉ. पानसरे…

आज पहाटे कॉ. पानसरे ह्यांच्या निधनाची बातमी आली आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर अजून एक डाग लागला… आज ह्या विषयावर लिहिण्याच कारण एकच , काही दिवसापूर्वी चार्ली हेब्दो वरील हल्ल्याबद्दल आपल्याला सर्व माहित आहे… अमुक एका समुदायाच्या भावना दुखावल्यामुळे त्या व्यंगचित्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली… हे सर्व करणारा गट हा अतिरेकी होता हे सुद्धा स्पष्ट आहे… पण काही दिवसांपूर्वी कॉ. पानसरे ह्यांच्यावर हल्ला झाला आणि पुन्हा एकदा अश्या घटनेची आठवण झाली… मी चार्ली हेब्दो घटना आणि कॉ. पानसरे ह्यांच्यावरील हल्ला ह्याची बरोबरी करत नाही आहे… चार्ली हेब्दो वरील हल्ला आणि कॉ. पानसरे ह्यांच्यावरील हल्ला ह्यात साम्य एकच, ते म्हणजे दोन्ही वेळा माणूसकीला काळीमा फासणारी घटना होती…

तूर्तास हिंसा, अहिंसा जर बाजूला ठेवली तर आपल्याला एक कळेल कि हा हल्ला समोरच्या व्यक्तीचे विचार दाबण्यासाठी केलेला एक केविलवाणा पण क्रूर प्रयत्न होता… पण संतांसोबत ज्येष्ठ विचारवंतांची परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात हे व्हाव म्हणजे हे तर महाराष्ट्राची संस्कृती लोप पावत असल्याच लक्षण आहे… टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर अशा अनेक विचारवंतांची परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आणि आज विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐवजी आज ती वेगळ्या मार्गाने लढली जातेय… प्रत्येकाचे मत सर्वांना पटेलच अस नाही हे खरं आहे पण त्यासाठी समोरच्याला शारीरिक इजा करण्याचे प्रकार होत आहेत… कॉ. पानसरे हे त्या वृत्तीला बळी पडलेले अजून एक… काही महिन्यांपूर्वी नरेंद्र दाभोलकर ह्यांचासोबत असंच झालं होतं… पण ह्याने नरेंद्र दाभोलकर नावाची व्यक्ती आज जगात नाही पण त्यांच्या विचारांनी ती अंनिस च्या प्रत्येक कार्यकर्त्यात जिवंत आहेत… माणसाचा देह संपवता येतो त्याचे विचार नाही…

दु:ख ह्याच गोष्टीच आहे कि महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांनी हातात शस्त्र घेतली पण ती घेतलेली शस्त्र हे शौर्याचं लक्षण होतं पण आत्ता ह्या काहींनी घेतलेली शस्त्रे हे शौर्याच नाही तर क्रौर्याच लक्षण आहे… अश्या वृत्तींना आळा घालणे आपल्याच हातात आहे… बाकी आपला समाज सुज्ञ सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे… शेवटी कॉ. पानसरे ह्यांना विनम्र आदरांजली…

जय महाराष्ट्र…

प्रथमेश तेंडूलकर

Monday, 15 December 2014

वात्सल्य, चैतन्य आणि मी…

आज एका वेगळ्या विषयावर Blog  लिहिण्याची संधी मळते आहे… सामाजिक कार्य (social work ) हा काही जणांचा चेष्टेचा विषय असतो आणि काहींच्या तो खूप जवळचा विषय असतो… काहींना वाटत कि एका विशिष्ट वयात हे काम करायचं असत पण माझा मते काहीतरी सामाजिक कार्य करण्यासाठी वयाची नाही तर इच्छेची गरज असते… अनेकांचा असाही गैरसमज असतो कि सामाजिक काम म्हणजे काही पैसे donate करणे म्हणजे सामाजिक कार्य…  माझामते हे पूर्णपणे चूकहि नाही आणि पूर्ण बरोबर हि नाही… सामाजिक काम २  प्रकारे करता येऊ शकत, १ वेळ देऊन आणि २ वेळ नसल्यास आर्थिक मदत करून…


हल्लीच आम्ही ( मी आणि माझ्या चैतन्य group मधल्या सर्वांनी) मुंबईत एका अनाथालयाला भेट दिली… वात्सल्य trust अस नाव त्या संस्थेच… माझ्या  आयुष्यातील एखाद्या अनाथालयाला भेट हि पहिलीच… तिथे जाउन काय करायचं, कोणाला भेटायचं कस वागायचं असे अनके प्रश्न घेऊन (सोबत group सुद्धा घेऊन) आम्ही तिथे पोहोचलो… सकाळी १०:३० वाजता तिथे पोहोचलो, आधी contact केल्या असल्यामुळे  तिथल्या काही लोकांना आम्ही येणार हि कल्पना होतीच… तेव्हा तेथील एका madamनी आम्हाला त्यांचासोबत घेऊन गेले आणि तेथील सर्व काम दाखवल… प्रत्येक वयोगटातील मुलांची खोली (रूम्स ) वेगळ्या होत्या…अगदी नुकत्याच जन्माला आलेल्या लहान  मुलांपासून ते अगदी ८-९ वर्षाच्या मुलांपर्यंतची सोय तिथे होती… नुसती राहण्याची आणि जेवणाचीच नाही तर अगदी त्यांच्या आरोग्याचीही योग्य काळजी तिथे घेत होते… पण वात्सल्य च काम तिथेच सीमित नाही तर त्यांनी मुलींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सबलीकरणाकडे वाटचाल सुरु केली आहे… नर्सिंग पासून ते अगदी ग्लास पेंटिंग पर्यंत वर्ग तिथे भरवले जातात आणि मुलींना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्याच हे एक महत्वाच पाउल आहे… असे बरेच उपक्रम तिथे राबवले जातात…

त्याची माहिती घेत घेत आमचे २ ते ३ तास कसे गेले हे मलाही कळल नाही… मग आम्हाला तिथे वात्सल्यचे trustee सराफ काकांना भेटण्याची संधी मिळाली… आमच्या उपक्रमाच कौतुक तर त्यांनी केलच पण "हे सगळ तुमचच आहे" अस सांगून त्यांनी आपण सर्व एका कुटुंबातील आहोत ह्याची जाणीव करून दिली…

३-४ तासांचा हा एक नवीन अनुभव घेऊन आम्ही तिथून बाहेर आलो ते पुढे काय करायचं ह्या विचारानेच… वात्सल्य visit हि कुठल्याही पिकनिक किंवा ट्रेक पेक्षा एक वेगळा आणि छान अनुभव होता… आजकाल कोणी आपल्या माणसांसाठी कोणी इतक करत नाही तिथे वात्सल्य सारखी संस्था हे चांगल काम करते आहे… माझ वैयक्तिक मत विचारलं तर अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम ह्यांची गरजच पडू नये…  मी ज्या लहान मुलांना पाहिलं ती तर इतकी गोंडस होती कि त्यांना सोडायची इच्छा त्या आई - वडिलांना तरी कशी होते हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही… आपल्या चुकांची शिक्षा त्या लहान मुलांना का द्यावी? असे अनेक प्रश्न नव्याने माझ्यासमोर आले पण वात्सल्य सारख्या संस्था आहेत तो पर्यंत ह्या मुलाचं भविष्य अंधकारमय नाही हे सुद्धा खर आहे…



"वात्सल्य म्हणजे एका आईच आपल्या मुलासाठीच असलेल निस्वार्थी प्रेम…" ह्या मुलांना देखील आईच्या प्रेमाची उब वात्सल्य मध्ये मिळते आहे आणि त्यात आमची मदत होते आहे हे आमच भाग्य आहे… देवाच्या कृपेने हि मदत अशीच सुरु राहील आणि आपली साथ सुद्धा माझ्या ह्या कामात मिळत राहील हि अपेक्षा…

आपला,

प्रथमेश तेंडूलकर

Thursday, 11 December 2014

खानाच्या फौजेतील मराठी सरदार…?

आज ह्या विषयावर लिहिण्याचं कारण एकच… काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी          ( आणि विकासासाठी ) २ "मित्र" पक्ष एकत्र आले… विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांवर तुफान हल्ला चढवणारे आज मात्र एकत्र आहेत… तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वावरताना आणि अनेक कट्टर समर्थक असलेल्यांच्या भावना पाहताना अनेक गोष्टी लक्षात आल्या त्या आपल्या समोर मांडण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न…

अनेक दिग्गजांनी एकत्र येउन केलेली आणि हिंदुत्व हा समान धागा पकडून असलेली अनेक वर्षांची युती विधानसभेच्या निवडणुकी आधी काही दिवस संपली… युती तुटू नये हि अनेकांची भावना होती कारण पक्षांचे कार्यकर्ते युतीत मानाने एकत्र आले होते… एक भावनिक नात निर्माण झालं होतं… युती का तुटली, कोणामुळे तुटली ह्या वादात मला पडायचं नाही कारण त्याची कारणं अनेक आहेत… युती तुटली आणि मग दोन्ही मित्र (जुने मित्र ) एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभे ठाकले… मग आरोप प्रत्यारोपांचे "बाण" सुटले… जुन्या मित्रांची तुलना अफजल खानशी झाली… कालपर्यंत एकमेकांसोबत प्रचार करणारे कार्यकर्ते आज मात्र एकमेकांना दोष देत होते… "पाठीत खंजीर खुपसला", "आता मनं तुटली आहेत ती जोडली जातील असा वाटत नाही " अशी अनेक वक्तव्य ऐकायला मिळाली… अश्या वातावरणात निवडणूक पार पडली… आणि निवडणुकीचे निकालही लागले…

निवडणुकीचे निकाल लागले आणि चित्र बदलल… निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाल नव्हत त्यामुळे खानाच्या फौजेला सत्तेसाठी कोणाची तरी गरज लागणार होती… मग भेटी सुरु झाल्या, गुप्त बैठका झाल्या… आज पाठींबा देणार, उद्या नाही अशा अफवा उठायला लागल्या … "आम्ही देऊ ते घ्या " अशा गोष्टी समोर आल्या… त्यात दोन गट पडले, एक होते सत्तेत जाऊ म्हणणारे आणि दुसरे होते ते सत्तेत न जाता आत्मसन्मान न गमावता विरोधात बसू म्हणणारे… पण बराच काळ विचार झाल्यानंतर निर्णय सत्तेत जाण्याचा झाला आणि बरेचसे जुने आणि निष्ठावंत सैनिक नाराज झाले… "गद्दारांना क्षमा नाही… " अस म्हणणाऱ्या मोठ्या साहेबांची आठवण आणि कमतरता  त्या निमित्ताने सर्वांना जाणवली…

ह्या घटनेने समर्थकांच्या आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ज्यांनी मतदान केल त्यांना हा निर्णय फारसा पटला नाही… but Boss is Always Right ह्याप्रमाणे कदाचित नाईलाजास्तव हा निर्णय सर्वांनी हे मान्य केलेला आहे… पण ह्यात सरशी कोणाची झाली आणि कोण हरल ह्यापेक्षा मतदारंच्या भावना राजकारणी लोकांसाठी किती लवचिक असतात ह्याच दर्शन सर्वांना झाल… ह्यात  गोंधळाला तो मात्र मराठी माणूस आणि कट्टर सैनिक…

ह्या नंतर सुद्धा अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात पण अद्यानांत शहाणपण असते अस म्हणून आपल समाधान करून घ्यायचं एवढाच काय ते आपल्या हाती…

एक मराठी माणूस
जय महाराष्ट्र…

(** वरील लेखातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मात्र त्याबद्दल क्षमस्व...)

Tuesday, 7 October 2014

पर्यटन :- महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे

स्थानिक संस्कृती जोपासताना, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन आणि आर्थिक पातळी उंचावण्यासाठी पर्यटन


ज्यांनी आपल्या देशातील फक्त पर्यटनस्थळं विकसित केल्यामुळे त्या देशातील आर्थिक प्रगतीची चाकं फिरू लागली असे आज आपण अनेक देश पाहतो. सिंगापूर हे त्यातलंच एक उदाहरण. जिथे पर्यटन­विकास होऊ शकतो अशी महाराष्ट्रात अनेक स्थळं आहेत. या ऐतिहासिक, निसर्ग­ सौंदर्यानं नटलेल्या क्षेत्रांचा विकास आपण करायला हवा. इथल्या पर्यटनातून स्थानिक उद्योजक घडले पाहिजेत, स्थानिकांना आर्थिक उत्पन्नाचं एक साधन मिळालं पाहिजे. असं करत गेलो तर आपली संस्कृती टिकेल, जोपासली जाईल.

प्रश्नाचं स्वरूप


महाराष्ट्राला अनेक प्रकारचं वैभव लाभलं आहे. राज्याचा ७५० कि.मी. चा समुद्र किनारा घ्या, विविध प्रकारची जंगलं आणि प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास, समुद्रातले, डोंगरावरचे आणि बेटावरचे गड-किल्ले घ्या. थंड हवेची ठिकाणं, मंदिरे घ्या, बौद्ध आणि जैन धर्मियांच्या गुहा घ्या. हापूस आंबा घ्या, नागपूरची संत्रंबर्फी घ्या, राज्याच्या विविध प्रदेशातला खास असा महाराष्ट्रीय स्वयंपाक घ्या. पुणेरी काठाची साडी घ्या, पैठणची वैशिष्ट्यपूर्ण पैठणी घ्या, सोलापूरच्या सुती चादरी घ्या. गणपती उत्सव घ्या. अनेक लोकांनी उस्फूर्तपणे केलेले विविध वस्तूंचे, ग्रंथांचे संग्रह घ्या. आपल्याकडचे गोट्या आणि गंजिफ्यासारखे बैठे आणि दांडपट्ट्यासारखे लढाऊ खेळ घ्या. लेझीम, लावणी, ढोल-ताशा किंवा पेणचे गणपती घ्या.
कितीतरी वैशिष्ट्यं. आज देशातले आणि परदेशातले पर्यटक इथे येतात. आपल्याला, आपल्या समाजाला, मोठा इतिहास लाभला आहे आणि ही परदेशी पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात येणार्या भारतीय पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. पण तरीही आपली पर्यटन क्षमता आपण पाहिजे तेवढी वापरत नाही असं आम्हाला वाटतं. देशात कुठेही नाहीत असे गड-किल्ले महाराष्ट्रात आहेत. या प्रत्येक गडाला मोठा रोमांचकारक इतिहास आहे. आपल्याला मात्र महाराष्ट्रात नेमके किती गड–किल्ले आहेत हे सांगणारी निश्चित नोंद कुठेही सापडत नाही.
महाराष्ट्रात जगानं मान्य केलेली ११ भौगोलिक वैशिष्ट्ये (geographical indicators) आहेत – महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे, सोलापूरची चादर, सोलापूरचा टेरी­टॉवेल, पैठणची पैठणी, नाशिकच्या खोर्यानतली वाईन, पुण्याची पगडी, नागपूरची संत्री, कोल्हापूरची चप्पल, वारली चित्र आणि कोल्हापूरचा गूळ. रत्नागिरीचा आणि देवगडचा हापूस तसंच बीडची सिताफळे यांसाठीचे अर्ज सध्या प्रलंबित आहेत . अजंठा, वेरूळ, भाजे, भेडसा, कार्ला, पांडवलेणी, पितळखोरं येथील गुहा पहायला तर आजही असंख्य पर्यटक येतात. पण त्याहूनही अधिक संख्येनं पर्यटक येऊ शकतात का? तिथे त्यांना आवश्यक असलेल्या सोयी मिळतात का? त्या पर्यटन स्थळाची शोभा वाढवण्यासाठी, त्यांचं वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासाठी काय करता येईल?
या प्रश्नांची उत्तरं शोधताना आजपर्यंत आपल्या पर्यटनस्थळांचा म्हणावा तसा विचार आपण केलेला नाही असंच म्हणावं लागतं.
पर्यटनामुळे हाताला काम मिळतं, उत्पन्नात ही भर पडतेच; या निमित्तानं आपली संस्कृती जपली जायला मदत होते, इतिहासाला उजाळा देता येतो. पुढच्या पिढीसाठी आपला इतिहास जिवंत राहतो. पण पर्यटनाकडे निव्वळ मनोरंजन म्हणून पाहता कामा नये; आराम, बदल, नवीन पाहण्याची, अनुभवण्याची संधी अशी अनेक उद्दिष्टं त्यात आहेत, मात्र पर्यटकांना ती साध्य करता यायला हवीत.
महाराष्ट्रात पर्यटनाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. गावातील आणि छोट्या शहरातील युवकांचं पुणं, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रात आज पर्यटनाला चालना मिळावी आणि अशा अनेक तरुणांना रोजगार मिळावा असं पोषक वातावरण आपण देऊ शकणार नाही का?

असं का होतं?


जुलै २०१२ मध्ये पश्चिम घाटातील एकूण ३९ ठिकाणांना एकत्रितपणे वारसा­स्थळांचा (heritage site) दर्जा मिळाला. या पैकी ४ ठिकाणं म्हणजे कास पठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना आणि राधानगरी येथील अभयारण्यं महाराष्ट्रात आहेत. या संधीचा खरंतर पर्यटनासाठी किती फायदा करून घेता येईल. पण दोन वर्षात आपण जेवढं करू शकत होतो तेवढं केलं का?
लोहगड किल्ल्याभोवतालचं ३०% जंगल गेल्या ५ वर्षात नष्ट झालं आहे आणि सुमारे ४० नैसर्गिक नाल्यांनी / पाण्याच्या प्रवाहांनी आपले मार्ग तरी बदलले किंवा ते बंद तरी झाले आहेत. ही बातमी जानेवारी २०१४ मध्ये काही अभ्यासकांनी दिली. ते ऐकून काय केलं आपण?
पुण्यात स. गो. बर्वे चौकात बांधण्यात येणार्या ग्रेड सेपरेटरमुळे राष्ट्रीय महत्व असलेल्या पाताळेश्वर गुहांना इजा पोचू शकते असं आपला पुरातत्वविभाग सांगतो आहे, त्याची नोंद तरी आपण घेतली का?
प्रवास­सुविधा, पर्यटन, स्वच्छता आणि आतिथ्य अशा वर्गवारीत महाराष्ट्र राज्य सतत मागे पडत आहे. राज्यात पर्यटनाला अतिशय वाव असूनही सरकारी यंत्रणेची अनास्था आणि उदासीनता आपण पर्यटन क्षेत्रात मागे पडण्यास सर्वस्वी कारणीभूत आहे. सक्षम रस्ते, रेल्वे गाड्या, पाणी, वीज, सार्वजनिक सुविधा, खाण्या-पिण्याची सोय, वैद्यकीय व्यवस्था, संपर्क साधनं या सोयी-सुविधा महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यायपर्यंत पोचलेल्या नाहीत हे ही त्यामागचं मोठं कारण आहे. पर्यटनाचा विकास करत असताना, स्थानिकांना विचारात घेणं अपरिहार्य आहे; मात्र तसं न करता त्यांचं गाव पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केल्यास अथवा काही योजना आखल्यास स्थानिकांचा पाठिंबा मिळत नाही. वास्तविक पाहता पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. आपलाही फायदा होतो आहे हे लक्षात आल्यावर स्थानिकांना पर्यटन स्थळाविषयीची आस्था वाटते आणि ते स्थळ सांभाळले जाते.
याच्या जोडीलाच पर्यटनाचा आनंद घेण्याविषयीच्या आपल्या कल्पनाही बदलायला हव्यात. एखाद्या ठिकाणी जाऊन केवळ आपले त्या ठिकाणी फोटो काढून घेणं या पलीकडे जाऊन त्या स्थळाचा आनंद कशा कशा प्रकारे लुटता येईल, तिथला अनुभव कसा घेता येईल हे आपण शिकायला हवं आहे. आपल्या वागण्यामुळे त्या पर्यटनस्थळाचं काही नुकसान होत नाही ना, तिथे आलेल्या इतर पर्यटकांना आपल्यामुळे काही त्रास होत नाही ना, इ. बाबत आपण जागरूक राहायला हवं.

काय करायला हवं?


सर्वात प्रथम म्हणजे पर्यटनाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलायला हवी. पर्यटन हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्वाचा पैलू आहे, स्थानिकांना बसल्याजागी उत्पन्नाचं एक नवीन साधन निर्माण होईल आणि आपली संस्कृती टिकवायलाही मदत होईल. हा तिहेरी हेतू साध्य करण्यासाठी पर्यटनाचा विकास आपण करायला हवा.
पर्यटनवाढीत स्थानिक लोकांचा सहभाग जितका जास्त असेल तितका त्या गावाचा / नगराचा विकास लवकर होऊ शकतो. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सुविधा पर्यटनाच्या विकासाच्या विचाराने लवकरात लवकर पुरवता येऊ शकतील. स्थलांतर रोखल्यामुळे शहरावर अतिरिक्त ताण येणार नाही आणि युवकवर्ग आपापल्या ठिकाणीच राहिल्याने तिथला विकास होण्यासही मदत होईल.
हे सर्व पर्यटन विकासामुळेच घडू शकतं.
हे करत असताना काही मार्गदर्शक तत्वं मात्र आपण पाळायला हवीत –
  • पर्यावरणाचा समतोल राखला जाईल अशाच पद्धतीनं पर्यटनविकास केला जावा -
  • प्रत्येक पर्यटनस्थळाच्या मर्यादा ओळखून, सांभाळून मगच तिथलं पर्यटन विकसित करायला हवं. पर्यटकांच्या गर्दीमुळे अथवा नैसर्गिक कारणांमुळे ज्या स्थळांचं नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे त्या स्थळांना भेट देणार्याम पर्यटकांच्या संख्येवर हळूहळू मर्यादा घालायला हवी. अशा स्थळांवरचा पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी नवीन पर्यटनस्थळं विकसित करता येतील. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण. २००१ मध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयानं ते पर्यावरण-दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (eco-sensitive zone) म्हणून घोषित केलं आहे. महाबळेश्वरचं सौंदर्य आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यासाठी कदाचित, तिथे येणार्या पर्यटकांची वाढलेली संख्या पाहता तिथलं स्थानिक प्रशासन त्यावर मर्यादा आणण्याचा विचार करू शकेल. पश्चिम घाटातलाच आणखी एक पर्याय म्हणून आंबोलीचा विचार होऊ शकेल.
  • पर्यटनामुळे स्थानिक रोजगार निर्मिती व्हायलाच हवी -
  • वर्षानुवर्षे एकाच गावी राहणार्या् स्थानिक लोकांना आपल्या गावाबद्दल खडानखडा माहिती असते. ह्या माहितीचा उपयोग पर्यटन विकासासाठी उत्तमरीत्या करून घेता येऊ शकतो. इतिहासकार, पुरातत्वविभागातील संशोधक, त्या त्या विषयातील तज्ञ मंडळी इ. च्या मदतीनं प्रत्येक स्थळाविषयीची समग्र माहितीसुद्धा स्थानिकांनी एकत्र केल्यास पर्यटनस्थळाचं आकर्षण वाढू शकतं. तरुण, सुशिक्षित युवक-युवती पर्यटनदौर्यासचं सर्व व्यवस्थापन पाहण्याचं (tour operator) आणि वाटाड्या (guide) म्हणूनही प्रशिक्षण घेऊ शकतील. प्रेक्षणीय स्थळांचा इतिहास, सांस्कृतिक माहिती, त्या स्थळामुळे असलेलं त्या गावाचं भौगोलिक महत्व, इ. सारख्या गोष्टींचा अंतर्भाव या प्रशिक्षणात असावा. हा युवकवर्ग पर्यटकांसाठी आपल्या गावाचं प्रतीनिधित्व करू शकतो. तिथली स्थानिक आकर्षणं, खाद्यसंस्कृती, कला-कौशल्य, जैव-वैविध्य याची माहिती पर्यटकांना सांगू शकतो. ज्या मुला-मुलींमध्ये भाषाकौशल्य असेल ते एखादी परकीय भाषा शिकू शकतात, जेणेकरून त्यांना दुभाषे म्हणून काम करता येईल. या सर्वामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • स्थानिक व्यावसायिकतेला चालना आणि उद्योजकतेला वाव मिळायला हवा –
  • पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्यासाठी स्थानिकांनी चालवलेली अल्पोपहार केंद्रं असावीत, घरोघरी केलेली निवासाची सोय (homestay) असावी, त्यांना स्थानिक पेहेराव, कला, क्रीडाप्रकार, नृत्य – संगीत इ. कलाप्रकारांचा आनंद लुटता यावा म्हणून नियोजित केलेले कार्यक्रम, इ. अनेक प्रकाराने स्थानिक जनता पर्यटनाशी निगडीत कुठल्यातरी व्यवसायात गुंतू शकते.
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन पर्यटकांना देण्यात घरातील महिलेचा पुढाकार असू शकतो. त्यामुळे होणारा आर्थिक फायदा त्या महिलेला मिळेल आणि घरोघरी व्यावसायिक तयार होऊ शकतील. उदाहरणार्थ, कोकणात कोकण-मेवा (आंबा-पोळी, फणस-पोळी, कोकम सरबत, काजूची उसळ, इ.), खानदेशात बाकरवडी, पातोड्या तर देशावर ज्वारीपासून बनणारे विविध पदार्थ पर्यटकांचं आकर्षण बनू शकतील. शिवाय त्या त्या परिसरातली परिपूर्ण अशी जेवणाची मराठी थाळी आहेच.
याच धर्तीवर घरगुती निवासाची (homestay) कल्पना सुद्धा राबवता येऊ शकते. बर्याशच लोकांना, विशेष करून परदेशी पर्यटकांना स्थानिकांच्या जीवनशैलीबद्दल कुतूहल असतं. या पाहुण्यांना आपल्या सहलीतले एखाद-दोन दिवस स्थानिक लोकांसारखे राहण्याची सोय असू शकते. ही सोय गावातल्या लोकांच्या घरीच करता येईल. परदेशी पाहुण्यांना स्थानिकांसारखं खाणं-राहणं-पेहराव या साध्या सोप्या गोष्टीतून व्यवसायनिर्मिती होऊ शकते.
प्रत्येक गावाला / जिल्ह्याला आपली हस्तकला, शिल्पकला, नृत्य, संगीतसंस्कृती असते. ह्या कलेचं प्रदर्शन पर्यटकांसमोर करता येईल. पर्यटकांसाठी स्थानिक नृत्य, संगीत आणि लोककलेचे नमुने सादर करता येतील. स्थानिक लोकांनी केलेल्या हस्तकला, शिल्पकला, टिकाऊ खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू इ. चे विक्रीकेंद्र उभारता येऊ शकतं. त्या निमित्तानं स्थानिक कलाकारांना वाव मिळेल आणि स्थानिक कला जिवंत राहील.
ज्या पर्यटनस्थळी शेती असेल, तिथले शेतकरी शेतीपर्यटन (agro-tourism) आयोजित करू शकतील. शेतावर राहण्याची सोय, शेतातील कामाची झलक यासारख्या गोष्टी या माध्यमातून जगभर पर्यटकांना आकर्षित करत आहेत, हे लक्षात घेऊन संक्रांत, हुल्गा, नागपंचमी, त्रिपुरी पोर्णिमा, इ. सारख्या सणांमध्ये पर्यटकांना सहभागी करून घेता येऊ शकेल.
पर्यावरणाचा समतोल राखून, स्थानिक रोजगार निर्मिती, उद्योजकतेला वाव तसंच संस्कृती संवर्धन होईल, अशा पद्धतीनंच पर्यटनविकास व्हावा म्हणून ही ३ तत्वं आम्ही सुचवत आहोत.
ही ३ तत्वं लक्षात ठेऊन, महाराष्ट्रात पर्यटनाची क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी खालील गोष्टी करायला हव्यात –
  • पर्यटनस्थळांचा शोध – अनेक लोकप्रिय ठिकाणं आहेत; त्याबरोबरच माहीत नसलेलीही अनेक ठिकाणे आहेत. ज्या गावांना / नगरांना पर्यटनविकास करण्यात रस आहे त्यांना आपलं ठिकाण नोंदणीकृत करण्याची संधी देऊन राज्यातली शक्य तितकी पर्यटन स्थळं जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर टाकायला हवीत.
  • या प्रत्येक स्थळाचं वर्गीकरण – तिथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा आणि पर्यटनप्रकार, असं दुहेरी वर्गीकरण करून त्या स्थळाची विकास योजना बनवायला हवी.
  • योजनेनुसार आणि स्थानिकांच्या मदतीनं प्रत्येक पर्यटनस्थळाचा विकास करायला हवा.
  • प्रत्येक स्थळाची उत्तमरीत्या जाहिरात करायला हवी, ते पर्यटकांपर्यंत पोचवायला हवं.
  • पर्यटनासाठी आवश्यक असं मनुष्यबळ राज्यात विकसित व्हावं म्हणून प्रशिक्षण संस्था सुरू करायला हव्यात.
  • महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांना भेटी देणार्याय, राज्यातील व देशातील पर्यटकांचं प्रबोधन करायला हवं.

महत्वाच्या कल्पना


  • स्थानिकांनी ठरवल्यास आणि त्यांच्या पुढाकारानं पर्यटनक्षेत्रविकास
  • महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाचं रुपांतर पर्यटन­नियामक आयोगात
  • मुंबईचे बॉलिवूड – पर्यटनाचे आकर्षण

कार्यक्रम


महाराष्ट्रातलं पर्यटन क्षमता असलेलं प्रत्येक ठिकाण शोधून, तपासून त्याच्या विकासाची योजना आखायला हवी. हे शक्यतो स्थानिकांच्या पुढाकारानंच व्हावं; काही पहिल्या दर्जाच्या पर्यटन स्थळांचा विकास शासनाच्या पुढाकारानं, पण स्थानिकांच्या आणि नागरिकांच्या सहभागानं केला जाऊ शकेल.
प्रत्येक पर्यटन स्थळाचे पर्यटन­क्षेत्र­प्रकारात वर्गीकरण केलं जावं. आम्ही पर्यटन स्थळाच्या प्रकारानुसार एकूण ७ नमुने किंवा प्रारूपे (Destination Prototype) विकसित केली आहेत. प्रत्येक पर्यटन स्थळाला 'पर्यटन स्थळ विकास नमुना / प्रारूप' (Destination Development Prototype) याप्रमाणे विकसित करण्यात यावं असं आम्ही सुचवत आहोत (पहा परिशिष्ट १). महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटन स्थळ यापैकी एका पर्यटक­क्षेत्र­प्रकारातलं (destination prototype) असावं असं आम्हाला वाटतं.
ते ७ प्रकार असे -
  • सांस्कृतिक पर्यटन (Heritage / Cultural Tourism) - गड, किल्ले, वाडे, World Heritage Sites इ.
  • यात्रा-पर्यटन (Pilgrimage Destination) - देऊळ, तीर्थक्षेत्र, समाधिस्थळ, इ.
  • साहस-पर्यटन (Adventure Tourism) - trekking, rappelling, para-gliding, डोंगर चढणं, इ.
  • शेती-पर्यटन (Agro-Tourism) - शेती आणि शेतीशी संबधित असलेल्या पर्यटनाच्या संधी.
  • निसर्ग­पर्यटन (Eco-Tourism) - जंगलं, अभयारण्यं, इ.
  • वैद्यकीय पर्यटन (Medical Tourism) - इस्पितळं, वैद्यकीय केंद्र, योगोपचार केंद्र, आयुर्वेदिक चिकित्सालय इत्यादी.
  • समुद्राकाठचं पर्यटन (Beach Destination) - महाराष्ट्राचा ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा.

पर्यटन स्थळाच्या विकासाची योजना

पर्यटनवृद्धीतून आर्थिक समृद्धी आणायला काही गोष्टी अग्रक्रमानं करायला हव्यात. जिथे पहिल्यापसून पर्यटनाचा ओघ आहे ती स्थळं सक्षम करून मग नवीन स्थळांना वर आणायचं काम करण्यात यावं.
प्रत्येक पर्यटनस्थळ तिथे असलेल्या सोयीसुविधांनुसार विकसित करण्यात यावं. जिथे पायाभूत सुविधा पुरेश्या आहेत ते विकसित करायला प्राधान्य दिलं जावं. जिथे पर्यटन क्षेत्र आहे, पण पायुभूत सुविधांची सोय कमी आहे, त्या स्थळांचा प्राधान्यक्रम दुसरा असावा आणि ज्या स्थळांना पर्यटन संभाव्य आहे पण पायाभूत सुविधा अजिबात नाहीत, ती तिसर्या प्राधान्यक्रमानं विकसित केली जावीत. खालील आकृतीत पर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम स्पष्ट केला आहे (पहा आकृती क्र. १)

पर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम


पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्राधान्यक्रम आणि त्याचं प्रारूप ठरवावं

पर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम

प्रत्येक पर्यटन स्थळाचं पर्यटन प्रकारात वर्गीकरण केलं जावं. या अंतर्गत प्रत्येक स्थळी खालील प्रमाणे किमान सोयी-सुविधा असाव्यात -
पर्यटन स्थळ विकास नमुना / प्रारूप किमान सोयी-सुविधा
  • पर्यटकांसाठी माहिती केंद्र - तिथल्या राहण्याच्या-खाण्याच्या सोयींबद्दल माहिती देणारं, त्या स्थळाचं ऐतिहासिक, भौगोलिक महत्व दर्शवणारं माहितीपत्रक, चित्रफिती पर्यटकांना उपलब्ध असाव्यात.
  • सर्व आर्थिक श्रेणीतल्या पर्यटकांना परवडतील अशी राहण्याच्या सोय असावी.
  • प्रशिक्षित स्थानिक वाटाडे (guides) उपलब्ध असावेत.
  • स्थानिक हस्तकला आणि खाद्य विक्रीचं अधिकृत केंद्र असावं.
  • केंद्रसरकारने सुचवलेल्या निकषांना(service level benchmarks) अनुसरून भरपूर आणि स्वच्छ सार्वजनिक सुविधा असाव्यात.
  • ठिकठिकाणी पर्यटन स्थळाविषयी माहिती देणारे फलक, उदा. वेळापत्रक, सार्वजनिक सुविधा, दिशांचे माहिती फलक, इ. असावेत.
  • योग्य आरोग्यविषयक आणि मलनिस्सारण व्यवस्था (sewerage and sanitation system) असावी.
  • पर्यटनस्थळाचा विकास पर्यावरणसंवर्धनाच्या चौकटीतून व्हावा (carrying capacity and development control regulation)

पर्यटनाचे विपणन (मार्केटिंग)

पर्यटनाचे विपणन (मार्केटिंग) दोन निकषांवर केलं जावं - पर्यटनस्थळाचा विकास प्राधान्यक्रम आणि तिथे येणारा पर्यटकवर्ग.
पर्यटक स्थळाचा विकास प्राधान्यक्रम तिथे असलेल्या मुलभूत सोयी-सुविधा, रस्ते, वाहतूक सुविधा इ. वर अवलंबून असल्यामुळे त्या त्या स्थळाचं मार्केटिंगचं तंत्र बदलेल. तसंच विविध पर्यटकांपर्यंत पोचण्यासाठी मार्केटिंगच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करायला हवा. आपल्याकडे येणारा पर्यटक राज्यातला, परराज्यातला किंवा परदेशी असू शकतो, त्याची खर्च करायची क्षमता वेगवेगळी असू शकते. तसंच त्याचं पर्यटनाचं प्रयोजनही वेगवेगळं असू शकतं, उदा. यात्रा, मौज-मजा, कामकाज, शैक्षणिक पर्यटन इत्यादी. ही विविधता लक्षात घेऊन जास्तीतजास्त पर्यटकांपर्यंत त्या स्थळाची माहिती पोचावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. सध्या संकेतस्थळावरूनच प्रवासाचे बेत आखता येऊ शकतात, तिकीटविक्री, रेल्वे गाड्यांचे बुकिंग इ. होऊ शकतं. याचा फायदा घेऊन पर्यटनाचं संकेतस्थळ विकसित करता येऊ शकेल.
पर्यटन प्रदर्शनातून महाराष्ट्राचं मार्केटिंग करता येऊ शकेल. म्हणून विविध ठिकाणी – राज्यांमध्ये तसंच परदेशी ­ अशा पद्धतीची प्रदर्शनं आयोजित केली जाऊ शकतात.
प्रत्येक रेल्वेस्टेशनावर, विमानतळावर आणि बसस्थानकांवर पर्यटक­माहिती­केंद्र असू शकेल. नियतकालिकं, वर्तमानपत्रं यातून महाराष्ट्रातल्या विविध पर्यटनस्थळांची माहिती प्रसिद्ध करता येऊ शकते. महाराष्ट्र­पर्यटन­मार्गदर्शिका दर वर्षी प्रसिद्ध करता येईल. खासगी प्रवास / सहल आयोजकांबरोबर संलग्नपणे काम करता येईल.
शिवाय याचबरोबर भौगोलिक वैशिष्ट्य म्हणून घोषित झालेल्या त्या त्या भागांतील सर्वोत्तम उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत विशेष स्थान मिळवून देता येईल. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षं आणि वाईन, नागपूरची संत्री, कोल्हापूरचा गूळ, रत्नागिरीचा आंबा, पुणेरी पगडी, पैठणी साडी, सोलापूरची चादर, वारली चित्रकला यासारख्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी एक स्वतंत्र कार्यालय उभारलं जाऊ शकेल, ज्याअंतर्गत या विशेष उत्पादनांचं प्रदर्शन व विक्री होईल. अशा प्रदर्शनांची व विक्री केंद्रांची शाखा प्रत्येक जिल्ह्यात उघडता येईल.

प्रशिक्षित मनुष्यबळ विकास

महाराष्ट्राला अव्वल दर्जाचं पर्यटनक्षेत्र म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्यासाठी लागणारं प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्यालाच तयार करावं लागेल. पर्यटनासाठी लागणारं विशेष कौशल्य (माहिती सांगायचं कसब, सांस्कृतिक शिक्षण, परकीय भाषाशिक्षण इ.) पुरवू शकतील अशा प्रशिक्षणसंस्था उभ्या राहायला हव्यात. पर्यटन-क्षेत्र-प्रारुपाप्रमाणे योग्य असं मनुष्यबळ विकसित करायला हवं. सांस्कृतिक पर्यटन-क्षेत्राची ऐतिहासिक, भौगोलिक आणि स्थानिक हस्तकला, शिल्पकला इत्यादींविषयीची आवश्यक अशी माहिती या शिक्षणातून मिळवता येईल. साहसी पर्यटन-क्षेत्रातील गाईड्सना परिचिकित्सक प्रशिक्षण (paramedical skills) असणं आवश्यक असेल.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं रुपांतर पर्यटन नियामक आयोगात

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं (MTDC) समन्वयकाची भूमिका घ्यावी असं आम्हाला वाटतं. खासगी कंपन्यांबरोबरच्या स्पर्धेत उतरण्यापेक्षा विश्रामगृहांना, हॉटेलस्, resorts वगैरे विकसित करणार्याक कंपन्यांना मार्गदर्शक तत्वं, मानदंड आखून देऊन नियामक आयोगाची जबाबदारी महामंडळानं बजावावी. महामंडळाच्या अखत्यारीत येणारी विश्रामगृहं, हॉटेल इ. खासगी कंपन्यांना चालवायला द्यावीत.

पर्यटकांचं प्रबोधन

सर्व पर्यटनस्थळांवर माहितीफलकांद्वारे पर्यटकांचं प्रबोधन केलं जावं. मौजमजेबरोबरच पर्यटनस्थळी पाळायची शिस्त सुद्धा अधोरेखित केली जावी. स्वच्छता ठेवण्यासारखे नियम तर सगळ्याच ठिकाणी असावेत पण काही नियम त्या त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यांना अनुसरून केले जावेत. जसं वन-पर्यटनाच्या वेळी बोलताना आवाज हळू ठेवावा, गाणी लावू नयेत इ. समुद्रपर्यटनक्षेत्रात भरतीच्या वेळी समुद्रावर जाऊ नये यासारखे नियम पर्यटकांकडून कसोशीनं पाळले जावेत म्हणून आग्रह धरायला हवा.
परिशिष्ट १ - पर्यटनक्षेत्रप्रकार आणि त्यानुरूप स्थळाचा विकास

१.सांस्कृतिक पर्यटन

(Heritage / Cultural Tourism): गड, किल्ले, वाडे, World Heritage Sites, इ.
१.१ केंद्रसरकारनं आखलेल्या "Model Heritage Regulations" ला अनुसरून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तूंचं संवर्धन केलं जावं; या वास्तूंजवळ अतिथिगृहं आणि विश्रामगृहं बांधावीत.
१.२ या वास्तूंच्या जतनासाठी पर्यटकांच्या आणि तिथं काम करणार्यांeच्या संख्येवर मर्यादा असावी.
१.३ सांस्कृतिक वास्तूच्या भोवताली पायवाटा विकसित करण्यात याव्यात.
१.४ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याविषयी माहितगार असे गाईड उपलब्ध असावेत.
१.५ वास्तू ज्या काळातली आहे त्या काळातले कपडे, रोजच्या वापरातील वस्तू, खाद्य पदार्थ, जीवनशैली दर्शविणार्याक गोष्टींचं संग्रहालय असावं.
१.६ शाळा-महाविद्यालयातील अभ्यास-गट त्यांच्या इतिहास- प्रकल्पांसाठी इथे येऊ शकतील असं वातावरण असावं.
१.७ ऐतिहासिक महत्व सांगणार्याआ चित्रफिती, फिल्म, परिसंवाद आयोजित केले जावेत.
१.८ ऐतिहासिक काळात असायची तशी तलवारबाजी, घोडेस्वारी, पारंपारिक खेळाची प्रात्याक्षिकं असावीत. पर्यटकांना त्यात सहभागी करून घेतलं जावं.

२. यात्रा-पर्यटन

(Pilgrimage Destination) देऊळ, तीर्थक्षेत्र, समाधी स्थळ, इ.
२.१ तीर्थक्षेत्रं आणि त्याभोवतीचं संवर्धन development control regulation प्रमाणे व्हावे.
२.२ धर्मशाळा आणि राहण्याच्या व्यवस्था मुबलक असाव्यात.
२.३ भरपूर आणि स्वच्छ सार्वजनिक सोयी-सुविधा असाव्यात.
२.४ खाण्या-पिण्याच्या सोयी उत्तम पण स्वस्त दरात असाव्यात.
२.५ स्थानिक खाद्य विक्रीची आणि पूजा साहित्याची अधिकृत केंद्र असावीत.
२.६ उरूस, सण, जयंती, पुण्यतिथीनिमित्तानं होणार्याअ गर्दीच्या नियमनाची चोख व्यवस्था केली जावी. या ठिकाणी पोलीस यंत्रणा सक्षम असावी.
२.७. परिपक्व मलनिस्सारण व्यवस्था असावी.
२.८ बस आणि रेल्वे स्थानकावरून पर्यटकांना ने-आण करण्यासाठी बस-व्यवस्था (shuttle service) असावी.
२.९ पादत्राणं सुखरूप काढून ठेवायची व्यवस्था असावी.
२.१० प्रदक्षिणा घालायला, देवदर्शनाच्या रांगेत उभं राहतान ऊन-पावसापासून संरक्षण देणारं छत असावं. 

३. साहस-पर्यटन

(adventure tourism) trekking, rappelling, para-gliding, डोंगर चढणे, इ.
३.१ हिमालयन mountaineering institute च्या धर्तीवर सह्याद्री mountaineering institute ची स्थापना करण्यात यावी. येथं mountaineering चं प्रशिक्षण देता यावं.
३.२ अद्ययावत सुरक्षानियमावली कार्यरत असावी.
३.३ गाईडसना परिचिकित्सकाचं प्रशिक्षण देण्यात यावं (paramedical skills)
३.४ सह्याद्रीतलं जैव-वैविध्य जोपासून पायवाटांची आखणी करण्यात यावी.
३.५ स्वच्छ सार्वजनिक सोयी-सुविधा असाव्या.
३.६ तंबूत आणि गावातल्या घरांमध्ये राहण्याची सोय असावी.
३.७ Trekking and Camping चं साहित्य विकण्यासाठी अधिकृत केंद्र असावं.

४. शेती-पर्यटन

(agro-tourism) शेती आणि त्याच्याशी संबधित असलेल्या पर्यटनाच्या संधी
४.१ शेतावर राहण्याची उत्तम सोय असावी.
४.२ मराठी खाद्य संस्कृतीची ओळख इथे होऊ शकेल असं वातावरण असावे.
४.३ सार्वजनिक स्वच्छतेची उत्तम सोय असावी.
४.४ गाय, बैल, कोंबड्या, बकर्याीपालनाचं प्रात्यक्षिक व मार्गदर्शन व्हावं.
४.५ भाजीपाला, फळबागा, धान्यलागवडीची प्रात्याक्षिकं केली जावीत.
४.६ बैलगाडी आणि tractor मधून फेरी मारायची सोय असावी.
४.७ पर्यटकांना पारंपारिक खेळ खेळण्याची संधी मिळावी आणि प्रात्यक्षिकं दिली जावीत. उदा. विटी-दांडू, सूरपारंब्या इत्यादी.

५. निसर्ग-पर्यटन

(Eco-tourism) जंगलं, अभयारण्य
५.१ जैव-वैविध्यात प्रशिक्षण घेतलेले गाईड असावेत.
५.२ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी core zones, buffer zones and tourism zones आखण्यात यावेत.
५.३ वन्यजीवन माहिती कक्ष उभारण्यात यावा.
५.४ परिसरातील शेवटच्या १ किलोमीटरमध्ये फक्त पायी किंवा सायकलवरून जाता येईल आणि पर्यावरणाशी समतोल राखणार्या गाड्याच जाऊ शकतील अशी सोय असावी.
५.५ या परिसरातील हॉटेल, resorts ना green-star rating असल्यावरच परवानगी देण्यात यावी.
५.६ पर्यटनव्यवसायाकरिता लागणार्या सर्व वस्तू देशी, स्थानिक बनावटीच्या आणि पर्यावरणाला हानी न पोचवता बनवलेल्या असाव्यात.
५.७ पक्षी-निरीक्षण, वनस्पतींचा अभ्यास, वन्यजीव निरीक्षण, वन्यजीवन फोटोग्राफी यासारखे उपक्रम राबवले जावेत. 

६. वैद्यकीय-पर्यटन

(medical tourism) इस्पितळे, वैद्यकीय केंद्र, योगोपचार केंद्र, आयुर्वेदिक चिकित्सालय, इत्यादी
६.१. आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रप्राप्त (international certification) सोयी-सुविधा देण्यात याव्यात.
६.२ वैद्यकीय आचार-नीती कसोशीने पाळली जावी.
६.३ हॉस्पिटल आणि रोग्यांमध्ये दुवा साधणा-या प्रशिक्षित व्यक्ती कार्यान्वित असाव्यात.
६.४ रोग्यांच्या आप्तेष्टांना राहण्याची आणि जेवणाची आरामदायक व्यवस्था असावी.

७. समुद्राकाठचे पर्यटन

(beach destination) महाराष्ट्राचा ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा
७.१ प्रशिक्षित जीवन-रक्षक किनार्या लगत असावेत.
७.२ कोकण खाद्य-पर्यटनक्षेत्र विकसित व्हावे.
७.३ प्रत्येक आर्थिक स्तरातील लोकांसाठी त्यांना परवडेल अशी राहण्याची व्यवस्था केली जावी.
७.४ काही विशेष किनारे विकसित केले जावेत, उदा. आंबा किनारा -जिथे आंब्याची झाडे असतील, कासव किनारा - जिथे कासवे अंडी घालतात, जैव-वैविध्य असलेला किनारा इ. 

तळटीप


  • http://ipindia.nic.in/girindia/
  • http://ipindiaservices.gov.in/GirPublic/DetailsGIR.aspx

from... http://mnsblueprint.org/index.html

Monday, 6 October 2014

गड-किल्ले संवर्धन :- महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे

गड-किल्ले संवर्धन

गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन

महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं. त्यासाठीचा हा प्रयत्न.

प्रश्नाचं स्वरूप


एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपर्‍या-कोपर्‍यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे. अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला. या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले, कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते.
ज्या काळी, ज्या भौगोलिक अवस्थेत हे गड-किल्ले बांधले आणि तेव्हा असलेली तंत्रज्ञानाची उपलब्धता लक्षात घेता, हे गड-किल्ले चमत्कारापेक्षा काही वेगळे नाहीत. अशा वास्तूंचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे कारण आपल्या मराठी ऐतिहासिक संस्कृतीचे प्रतिक म्हणून या वास्तूंना अनन्यसाधारण महत्व आहे. पण नैसर्गिक आपत्तींमुळे आणि आपल्याच अनास्थेमुळे आज बर्‍याच गडांची दुरावस्था झाली आहे, त्यांची योग्य ती दखल घेतली गेलेली नाही. या ठिकाणी बहुतांश पर्यटक फक्त मौज-मजेसाठी येतात. इथे येण्याचा आनंद प्रत्येकाने घ्यावाच, पण त्याचबरोबर या पुरातन वास्तूंचे ऐतिहासिक महत्वही जाणून घ्यावे. आज तसे फारसे होत नाही, गडावर येणार्‍या पर्यटकांना, गिर्यारोहकांना ते सांगण्याची कुठलीच सोय आज उपलब्ध नाही. दुर्गम भागातल्या किल्ल्यांच्या दुरावस्थेबद्दल तर बोलायलाच नको.

असं का होतं?


महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती आपल्या भूगोलाची आणि पुरातन वास्तू या इतिहासाच्या ठेवी आहेत. या वास्तूंचे जतन हे आपण नाही केले तर दुसरं कोण करणार? अनेक व्यक्ती, गट यासाठी आज झटत आहेत पणे त्यांचे प्रयत्न आज एकाकी पडताना दिसतात. महाराष्ट्र म्हणून आपण या गोष्टीला पुरेसे महत्व दिलेले नाही. या प्रयत्नांना लागेल ती मदत करणं हे आपलं कर्तव्य आपण मानायला हवं.
असे अनेक हौशी गट आहेत ज्यांना गड संवर्धनाबद्दल आस्था आहे. ते नियमितपणे गड चढतात. त्या गडाचा इतिहास जाणून घेतात. त्यांच्यासारख्या इतर दुर्ग-प्रेमींना तिथल्या गड-किल्ल्यांबद्दल माहिती सांगतात. काही संस्था आहेत ज्या शाळा-महाविद्यालयाच्या मुलांना इतिहास अभ्यासासाठी गडावर नेतात. त्या काळातल्या गोष्टी सांगून, तसे वातावरण निर्माण करून इतिहास जिवंत करून सांगतात. पण हे प्रयत्न त्यांच्यापुरतेच मर्यादित राहतात. या दुर्ग-प्रेमींसाठी बर्‍याच गडांवर पुरेशी व्यवस्थाच नसते. सरकारकडून त्यांना पुरेसं सहकार्य किंवा आर्थिक सहाय्य मिळत नाही. अशा गटांची दखल सुद्धा घेतली जात नाही.
आपल्या गड आणि किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपल्या वारशाचे जतन हे आपणच करायला हवे असा विचार आता लोकांच्या मनामध्ये रुजतो आहे, तो बळावला पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास समजून पुढे जाण्यासाठी आता ही जागरूकता लोकांमध्ये हळूहळू वाढत चालली आहे, ती अधिक वेगाने पसरली पाहिजे.
या वास्तूंची अशी दुरावस्था होण्याचे आणखी एक कारण आहे. जेव्हा जेव्हा या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तेव्हा तो काही अपवाद वगळता तडीस जात नाही असा आज पर्यंतचा अनुभव आहे. बरेच गड हे पुरात्तव विभागाच्या (Archeological Survey of India - ASI) अखत्यारीत येत असल्याकारणाने ASI च्या गतीने आणि नियमांच्या चौकटीनुसार हे काम सुरु राहतं. जसा निधी मिळेल तसं जतन करायचं काम पूर्ण केलं जातं. शिवाय, ASI च्या कामामध्ये महाराष्ट्र राज्य काहीच हस्तक्षेप करू शकत नाही.

काय करायला हवं?


  • गड-किल्ल्यांना 'सांस्कृतिक पर्यट्न क्षेत्र प्रकार' घोषित करायला हवे.
  • 'महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ' स्थापन करायला हवे.

महत्वाच्या कल्पना


  • गड-किल्ल्यांना 'सांस्कृतिक पर्यटन क्षेत्र प्रकार' (Heritage Tourism Destination) असा दर्जा देणे
  • 'महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ' स्थापना

कार्यक्रम


महाराष्ट्रात इतके गड आणि किल्ले आहेत की त्यांची एक अधिकृत सूची तयार करायला हवी. अनेकांनी हा प्रयत्न केला आहे, ते सर्व प्रयत्न संकलित करून, इतिहासकारांकडून तपासून, त्यात अनेक प्रकारच्या माहितीची भर घालून एक कोषच बनवायला हवा. अशा प्रकारे एकत्र केलेली सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देता येईल. त्यात वेगवेगळ्या युगातील आणि कालखंडातील गडांची वर्गवारी असू शकेल. भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती तर असेलच पण सध्या तिथे पर्यटकांना जाण्यासाठी काय सुविधा आहेत, वाहतूक व्यवस्था कशी आहे हे सुद्धा कळू शकेल.
हे सर्व प्रयत्न पर्यटन विभागाच्या माध्यमातून आणि या विभागाच्या समन्वयानेच होतील.
गड-किल्ल्यांना 'सांस्कृतिक पर्यटक क्षेत्र प्रकार' (Heritage Tourism Destination) असा दर्जा सांस्कृतिक पर्यटन क्षेत्र विकसित करून गड-किल्ल्यांना या अखत्यारीत घेऊन मग त्यांचा विकास केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची देखभाल आणि संवर्धन हे एक विशेष कौशल्य असणारे काम आहे. त्यासाठी कुशल कारागीर व प्रशिक्षित कामगारांची मदत घ्यावी लागेल. गडांचे आणि किल्ल्यांचे संवर्धन करून ते सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राच्या अमलाखाली येतील
प्रत्यके सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राला काही विशिष्ट मानदंड असायला हवेत. केंद्र सरकारच्या "Model Heritage Regulations" या मार्गदर्शक सूचीमध्ये सुचवल्याप्रमाणे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करायचे आहे. या वस्तूंजवळ अतिथिगृह आणि विश्रामगृह बांधाव्यात असे त्यांनी सांगितले आहेच. इतरही काही मानक असावेत असं आम्ही सुचवत आहोत (पहा चौकट क्र. १.)
चौकट क्र. १ - सांस्कृतिक पर्यटन मानक (Heritage/Cultural Tourism norms):
  • या वास्तूंच्या जतनासाठी पर्यटकांच्या, तिथे काम करणार्‍या लोकांच्या संख्येवर मर्यादा असाव्यात.
  • सांस्कृतिक वास्तूच्या भवताली पायवाटा विकसित केलेल्या असाव्यात.
  • इतिहासात आणि संस्कृतीत पारंगत असे गाईड असावेत.
  • ती वास्तू ज्या काळातली आहे त्या काळातले कपडे, रोजच्या वापरातल्या वस्तू, खाद्य पदार्थ, जीवनशैली दर्शविणार्‍या गोष्टींचे संग्रहालय तिथे असावे.
  • शाळा-महाविद्यालयातले अभ्यास-गट इतिहास प्रकल्पांसाठी यावेत म्हणून प्रयत्न केले जावेत.
  • ऐतिहासिक महत्व सांगणार्‍या चित्रफिती, फिल्म, परिसंवाद त्या परिसरात आयोजित करण्यात यावेत.
  • ऐतिहासिक काळात असायची तशी तलवारबाजी, घोडेस्वारी, पारंपारिक खेळाची प्रात्यक्षिके आयोजित केली जावीत आणि पर्यटकांनी यात सहभागी होता यावे असे नियोजन असावे.

महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळाची स्थापना

महाराष्ट्रात आज अशा बर्‍याच वास्तू, किल्ले, बागा आहेत ज्यांची अपुर्‍या निधीपोटी, अनास्थेमुळे दुर्दशा झाली आहे. अशा वस्तूंचे संवर्धन करून त्यांना पुन्हा सुशोभित करून जनतेसाठी खुले करण्याचे काम आपण करायला हवे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ या संस्थेची स्थापना करावी असे आपण सुचवत आहोत. या संस्थेचा हेतू गड-किल्ले, ऐतिहासिक वाडे, वास्तू, सांस्कृतिक जागा, बागा, डोंगर यांचे जतन करून त्यांना स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुल्या करून देणे असे असेल. या जागांचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व लक्षात घेऊन संवर्धन, पुनर्बांधणी आणि सुशोभीकरण करण्यात येईल. पर्यावरणाचा समतोल राखून, स्थानिक लोकांचे हित जपून हे संवर्धन केले जाईल.
या उपक्रमासाठी लागणारा निधी हा नागरिकांच्या मदतीनेच गोळा केला जावा असे आम्हाला वाटते. महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूसच या संवर्धनातील गुंतवणूकदार वा भागीदार (stakeholder) असेल. या कामासाठी लागणारे मनुष्यबळ सुद्धा स्वयंस्फूर्तच असेल. इतिहास प्रेमी, निसर्गप्रेमी, विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य माणूस हे या उपक्रमात भाग घेऊ शकतील.
from.... http://mnsblueprint.org/index.html