Tuesday 6 November 2018

चैतन्यमय दिवाळी

चैतन्यमय दिवाळी



दिवाळीची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. आणि त्याप्रमाणे ती दिवाळी साजरी करायची पद्धत बदलते. शाळेत असताना दिवाळीला 21 दिवसांची मोठी सुट्टी असायची. सहामाही परीक्षा संपवून एकदम मोकळ्या वातावरणात दिवाळी साजरी व्हायची. लहान असताना फटाक्यांची विशेष आवड होती. पण जसे जसे मोठे होत गेलो तसे काही आवडी निवडी बदलल्या. फटाक्यांची आवड हळूहळू कमी झाली. पण एक आवड मात्र तशीच आहे आणि पुढेही तशीच राहील, ती म्हणजे फराळ चोपून खायची. लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी यांची आवड वयासोबत वाढत गेली. पण जसं जसं इतर लोकांमध्ये मिसळत गेलो तेव्हा हेही कळलं की सगळ्यांची दिवाळी आपल्यासारखी नसते. आपण फराळ करतो, फराळ खातो पण आपल्यासारखी अनेक मुलं-मुली आहेत ज्यांना फराळ माहीतही नसतो. अनेकांच्या घरी फराळ बनतही नाही. म्हणून चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आम्ही या मुलांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद निर्माण करायचा एक छोटा प्रयत्न केला. हा प्रयत्न करताना त्या मुलांना दिवाळीचा फराळ काय असतो आणि त्याचा एक वेगळा आनंद असतो याची एक जाणीव करून देण्याचा उद्देश आमच्यासमोर होता.

म्हणून आम्ही काही शाळांची निवड केली. वाडा तालुक्यातील एक आणि विक्रमगड मधील चार, अश्या एकूण पाच शाळांमध्ये आम्ही फराळ वाटायचे ठरवले. मग तयारी सुरु झाली. फराळ कुठे ठेवायचा इथपासून ते कोणत्या शाळेत किती वाजता जायचं इथपर्यंत सर्व प्लँनिंग सुरु झालं. फराळाची ऑर्डरसुद्धा आम्ही अश्या एका कुटुंबाला दिली की ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण दिवाळी सोबतच थंडीसुद्धा येते आणि या थंडीत त्या मुलांच्या अंगावर नीट चादर असली पाहिजे म्हणून आम्ही फराळासोबत ब्लँकेट द्यायचे ठरवलं. यासाठी वाडा येथील मालबीडी हे गाव आम्ही निवडलं आणि सोबतच विक्रमगड मधून 4 शाळांची निवड केली. हे सर्व आम्ही गावांत जाऊन सुद्धा वाटू शकत होतो पण आम्ही शाळांचीच निवड का केली याचं कारण म्हणजे या विभागात लोकांमध्ये शिक्षणाबद्दल असलेली उदासीनता. त्यामुळे मुलं शाळेत जात नाहीत. पण शाळेत कोणी खाऊ वाटणार आहेत किंवा काही वस्तू देणार या अपेक्षेने मुलं येतात. गेल्या काही उपक्रमांमधून आम्ही आणि शिक्षकांनी शाळेची पटसंख्या कमी न झाल्याचे अनुभवले आहे. शालेय साहित्य, फूटवेअर, वह्या इत्यादी वाटप केल्यामुळे मुलांचा शाळेकडे ओढा वाढला. काहीतरी खाऊ मिळतो या आशेने का होईना मुलं शाळेत यायला लागली. यासाठीच आम्ही शाळांची निवड केली. दिवाळीचा फराळ वाटायच्या आधी आम्ही काही जण राहुलच्या घरी जमलो, फराळ नीट पिशव्यांमध्ये भरला आणि मग दुसऱ्या दिवशी बसने प्रत्येक शाळेत जाऊन त्यांना फराळ आणि ब्लँकेट दिले. 
ZP School Vikramgad
या 5 शाळांमध्ये एक अनुभव समान होता. तो म्हणजे या विभागातील खूप कमी मुलांना फराळ काय असतो हे माहीत होतं. या विभागात गेल्या काही भेटींच्या अनुभवातून असे लक्षात आले होते की या मुलांना प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. तसेच आपण जसे सण साजरे करतो तसे हे करत नाहीत. म्हणूनच चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनतर्फे यावर्षी या सर्व मुलांना फराळ वाटून ही दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. पण या फराळासोबत आम्ही प्रत्येकाला एक ब्लॅंकेट दिलं. मुळात नेहमी घालायलाही नीट कपडे या मुलांकडे नव्हते, त्यामुळे दिवाळी सोबत येणाऱ्या थंडीपासून यांचं संरक्षण व्हावं म्हणून हे ब्लॅंकेट वाटण्यात आले. आम्ही शाळेत फराळ वाटतोय हे बघून आजूबाजूच्या घरातील अनेक मुलं तिथे फराळ घ्यायला आली. काहीतरी नवीन खाऊ आपल्याला मिळणार याची एक अशा त्यांच्या डोळ्यात होती. खाऊच्या आशेने काय होईना कदाचित हीच मुलं उद्या शाळेत शिकायला पण येतील. पण या सर्वात एक विचार मनाला चटका लावून जातो तो म्हणजे मुंबई, ठाण्यासारख्या "developed" शहरांपासून 2-3 तासाच्या अंतरावर असणाऱ्या गावांत ही अवस्था असेल तर इतर आदिवासी भागांचा विचार करणे कठीण आहे.

या लेखाला मी "चैतन्यमय दिवाळी" असं नाव देण्याचं एकच कारण आहे. लहान असताना कंदील बनवणे आणि इतर मजा घेत आपण दिवाळी साजरी करायचो पण ती दिवाळी फक्त आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदापुरती मर्यादित होती. आज चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या सर्व परिवाराने एकत्र येऊन स्वतःच्या आनंदात या आदिवासी विभागातील मुलांना सामील करून घेतले याचा आनंद खूप आहे. आज हा उपक्रम पूर्ण करून घरी जाताना आमच्यापैकी प्रत्येकजण एक वेगळी दिवाळी साजरी केल्याचा अनुभव घरी घेऊन जाईल. चैतन्यचे सर्व सभासद आणि आमचे दाते यांच्या मदतीने त्या मुलांच्या आयुष्यातील ही दिवाळी चैतन्यमय करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. म्हणूनच ही दिवाळी आमच्यासाठी विशेष आहे.

धन्यवाद
प्रथमेश श. तेंडुलकर (9869371580)
चैतन्य सोशल वेल्फेअर फॉउंडेशन

2 comments:

  1. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  2. तुमच्या कार्याला सलाम,पुढच्या उपक्रमात फुल ना फुलाची पाकळी म्हणून सहभाग घेणे आवडेल.

    ReplyDelete