Monday, 25 June 2018

Trek to Lohagad -- लोहगड - माझ्या नजरेतून

महाराष्ट्राच्या कुशीत वसलेल्या गर्द हिरव्या वनराईत २ किल्ले मराठ्यांची शौर्यगाथा सांगत उभे आहेत. एक म्हणजे किल्ले विसापूर आणि किल्ले लोहगड. हे दोन किल्ले म्हणजे २ मित्रच. या दोन किल्ल्यांच्या मधून एक अरुंद खिंड जाते, ती म्हणजे शेलार खिंड. त्यातल्याच एका किल्ल्याला भेट द्यायचा योग आला. तो म्हणजे किल्ले लोहगड.

मुंबई पासून साधारण १२० किलोमीटर वर लोणावळ्याच्या निसर्ग सौंदर्यात वसलेला हा किल्ला. इथे येण्यासाठी जर तुम्ही ट्रेन ने येत असाल तर माळवली स्टेशन पासून येता येते. आम्ही आमच्या गाडीने येथे आलो. किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ आहे. त्याला लोहगड वाडी असे नाव आहे. सहसा किल्ल्याची पेठ ही किल्ल्याच्या मध्यावर किंवा माथ्यावर असते, पण लोहगडवाडी पायथ्याशी आहे. पावसाळा आणि त्यात रविवार म्हणजे असंख्य पर्यटक लोहगडाला भेट द्यायला आले होते.

पायथ्यापासून आम्ही किल्ला चढायला सुरवात केली. जोराचा वारा आणि बारीक पाऊस असं एकंदरीत वातावरण होतं. किल्ल्यावर चढताना काही गोष्टी कायम लक्षात राहतात. सर्वप्रथम मला जाणवल्या त्या किल्ल्याच्या पायऱ्या.
किल्ल्याच्या पायऱ्या रुंद होत्या पण तितक्याच उंच होत्या. प्रत्येक पायरी चढताना जरा जास्तीची मेहनत घ्यावी लागत होती. अश्या पायऱ्या (चढायला कठीण) असण्याचं काय कारण असावं याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शत्रूसैन्याला गडावर हल्ला करताना गड चढणे कठीण जावे हाच यामागचा हेतू असावा. पायऱ्या असून सुद्धा त्या उंच पायऱ्या आणि उभी चढण आपल्याला दमवते. हजारो वर्षांचा इतिहास असलेला हा किल्ला नक्की कोणी बांधला याबद्दल अजून ठाम सांगता येत नाही. येथे राष्ट्रकूट, सातवाहन, चालुक्य, यादव अश्या राजवटी होत्या. तिथून पुढे जाताना अजून एक वैशिष्ट्य लक्षात येते ते म्हणजे किल्ल्याचे दरवाजे. किल्ल्याची मजबुती ही त्याच्या दरवाज्यांवरून लक्षात येते. ५-६ फूट रुंद आणि १४-१५ फूट उंच असे अवाढव्य दरवाजे बघताना किल्ल्याचा भव्यपणा जाणवतो. सर्वात पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे "गणेश दरवाजा". दरवाजाच्या इथे गणपती बाप्पाची एक सुंदर छोटी मूर्ती आहे. म्हणूनच त्या दरवाज्याला गणेश दरवाजा असे नाव पडले असावे. गणेश दरवाज्यातून वर आल्यावर एक प्राचीन शिलालेख आढळतो. यात किल्लेदाराचे नाव कोरलेले आहे. त्यांचं नाव हे धोंडोपंत नित्सुरे, हे नाना फडणवीसांचे कारभारी होते. १४४९ मध्ये यादवांनंतर मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली आणि तेव्हा लोहगडावर यावनी सत्ता आली. अहमद नगरचा दुसरा बुऱ्हाणशहा इथे कैदेत होता. १६४८ मध्ये लोहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि मराठ्यांचा भगवा गडावर फडकला. नंतर पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांना देण्यात आला. १६७० मध्ये महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात घेतला. या किल्ल्याचं आणखी एक ऐतिहासिक महत्व म्हणजे शिवरायांनी औरंगजेबाचं नाक ठेचून सुरत लुटून जी संपत्ती होती ती लोहगडावर ठेवली होती. लोह म्हणजे लोखंड, आणि लोखंडासारखा मजबूत असा हा लोहगड.

गणेश दरवाजातून पुढे मजल दरमजल करत आम्ही आलो. महादरवाजा, नारायण दरवाजा असे पार करत करत शेवटचा दरवाजा म्हणजे "हनुमान दरवाजा". दरवाज्याच्या डाव्या बाजूला द्रोणागिरी पेललेल्या हनुमानाची मूर्ती आहे. हनुमान दरवाजा हा सर्वात जुना दरवाजा. बाकी दरवाजे हे पेशव्यांच्या काळात नाना फडणवीसांनी बांधल्याचे कळते. दरावाज्यातून पुढे येताना एक शिवमंदिर दिसते. गडावर ४५ पाण्याच्या टाक्या आहेत. सर्व बघता आल्या नाहीत पण एक सर्वात मोठी टाकी दिसली. ती टाकी पेशव्यांच्या काळात फडणवीसांनी बांधली असल्याचा शिलालेख त्यावर आहे. गडाच्या माथ्यावर आल्यावर म्हणजे साधारण २५००-३००० फुटांवर ढग अगदी जवळ होते. "ढगांवर स्वार होणे " या म्हणीचा प्रत्यय अशावेळी येतो.

आम्हाला विंचूकाटा बघायचा होता पण ढगांची गर्दी, सोसाट्याचा वारा आणि पडणारा पाऊस हे दृश्य विलोभनीय होतं. विसापूर किल्ल्याच्या माथ्यावर ढगांची गर्दी बघता किल्ल्याला ढगांचा शिरपेच घातला असं वाटत होतं. पेशव्यांकडून जेव्हा लोहगड ब्रिटिशांनी जिंकला तेव्हा सर्वात आधी त्यांनी विसापूर जिंकला आणि विसापूर वरून लोहगडावर तोफा डागल्या. त्यामुळे लोहगड ब्रिटिशांना जिंकता आला.

असा हा दणकट किल्ला, ज्याने वर येताना सर्वाना खूप दमवलं पण वर आल्यावर निसर्गाचं देखणं रूप कदाचित मस्तानीच्या देखणेपणापेक्षा सुंदर असावं असं होतं. हा प्रवास माझ्या आणि आमच्या ग्रूपमधील सहकार्याच्या नेहमी लक्षात राहील.

प्रथमेश तेंडुलकर
९८६९३७१५८०फोटो :- लोहगडावरून नजर ठेवण्याची जागा. खालून येणाऱ्या शत्रूला थोपवता यावं म्हणून वापरण्यात येत असे. 


फोटो :- लोहगडावरील दिशादर्शक फलक
 फोटो :- लोहगडावरून टिपलेले छायाचित्र


 फोटो :- लोहगडावरून टिपलेले छायाचित्र

फोटो :- चैतन्य ग्रूप

1 comment:

  1. Lohgadh chdhtana manat v4 yet hote.. Vishlgadakde chatrapatinna gheun nighalele bajuprabhu ani 300 marathe.. Kashe palale astil...!!!

    ReplyDelete