Tuesday, 5 June 2018

वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

आज ५ जून, जागतिक पर्यावरणदिन. सहसा असे दिवस फक्त एका दिवसापुरतेच साजरे केले जातात. पर्यावरणदिनाच्या दिवशी अनेक जण फोटो काढण्यापुरते वृक्षारोपण कार्यक्रम करतात पण त्याच्यापुढे काय? लावलेल्या झाडांची योग्य काळजी घेतली जाते का? लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगतात हा कदाचित संशोधनाचा मुद्दा असेल. आज यावर लेख लिहिण्याचं कारण इतकंच की चैतन्य मित्रमंडळाच्या माध्यमातून गेले २ वर्ष आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने जे काम करतोय ते ठळकपणे आज दिसू लागलंय आणि तेच सर्वांसमोर यावं हाच या लेखामागचा उद्देश.

चैतन्य ग्रूपतर्फे सामाजिक उपक्रम राबवताना पर्यावरणपूरक कोणते उपक्रम राबवता येतील यावर एक विचार झाला. वात्सल्य सोबत काम करताना सराफ काकांनी एक कल्पना सुचवली. बदलापूर येथे एक प्रस्तावित वृद्धाश्रमाची जागा होती. त्या जागेवर त्यांना वृक्ष लागवड करून त्यामध्ये वृद्धाश्रम बांधून त्या आजी-आजोबांचे शेवटचे काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात जावे ही कल्पना होती. मग त्या जागेवर वर्ष २०१६ मध्ये साधारण ६० झाडांचे रोपण तिथे करण्यात आले. चैतन्य सोबत अजून २ ग्रूप आमच्या सोबत होते. पण ६० झाडांचे रोपण करताना त्यांची योग्य काळजी घेणं आणि त्यांना वाढवणं ही आमची जबाबदारी होती. चैतन्य ग्रूपने ही जबाबदारी गेली २ वर्ष निस्वार्थीपणे सांभाळली आहे. मध्यंतरीच्या काळात पाण्याच्या अभावाने २-३ रोपे मरण पावली पण इतर सर्व झाडे अत्यंत जोमाने वाढली. झाडांच्या वाढीसाठी लागणारे खत व इतर गोष्टी वेळेवर पुरवल्या गेल्या आणि २०१८ मध्ये वाढलेली झाडे बघता केलेल्या कामाचे, कष्टाचे चीज झाले. काही झाडांना तर छोटी छोटी फळं सुद्धा लागली होती. मध्यंतरी सराफ काकांनी तिथे एक आरोग्यसुविधा सुरु केली होती आणि त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला बोलावले होते. तेव्हा सर्वांना आवर्जून ते त्या झाडांबद्दल सांगत होते. आम्ही ती झाडे कशी लावली, कोणत्या अडचणी आल्या, झाडांची काळजी कशी घेतली याच्याबद्दल बोलताना चैतन्यचं आणि माझं कौतुक करणाऱ्या सराफकाकांना ऐकलं की आमच्या कामाला अजून कोणाच्या पावतीची गरज वाटत नाही.

२०१७ मध्ये चैतन्य ग्रूपच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात काही झाडांचे रोपण करण्यात आले. त्यावेळी तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे, झाडांचे महत्व समजावून सांगण्यात आले, झाडांची काळजी कशी घ्यायची याची माहिती देण्यात आली. ठराविक विद्यार्थयांमागे एक झाड या प्रमाणात झाडांचे रोपं करून त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्या मुलांवर सोपवण्यात आली. यातून २ गोष्टी आम्ही साध्य केल्या. एक म्हणजे वृक्षारोपण केले आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या पिढीला वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. आमच्यासोबतच आमचे हे बालमित्र पुढील काळात पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक राहतील याची काळजी आम्ही घेतली.

५ जूनला एक दिवस पर्यावरण दिवस एका दिवसापुरता साजरा न करता वर्षातले ३६५ दिवस पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे.

प्रथमेश श. तेंडुलकर
चैतन्य मित्रमंडळ
(९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१)

** वृक्षारोपण करताना आणि २ वर्षांनंतर झालेली झाडांची वाढ याचे फोटो देत आहे.No comments:

Post a Comment