Saturday, 31 March 2018

प्रोजेक्ट :- अभ्यासिका

प्रोजेक्ट :- अभ्यासिका
अभ्यासिका आणि वर्गखोल्यांचे नूतनीकरण

चैतन्य मित्रमंडळातर्फे आम्ही जमेल तशी मदत आदिवासी पाड्यांमध्ये करत असतो. अशाच एका आदिवासी पाड्यातील शाळेला भेट देण्याचा योग २०१७ मध्ये आला. श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय, रावतेपाडा या शाळेत सर्व शिक्षक विनावेतन गेले १२ वर्ष आजूबाजूच्या गरीब मुलांना शिकवत आहेत. शाळेत मुलं ४-५ किलोमीटर लांबून पायी प्रवास करत येतात. या शाळेत भेट दिल्यावर आम्हाला अनेक गोष्टी निदर्शनास आल्या. आम्ही सर्व ज्या शाळेत शिकलो (कोणी मराठी माध्यमात तर कोणी इंग्रजी, वैयक्तिक मी मराठी माध्यमात शिकलो) तर शाळा म्हणजे वेगवेगळ्या वर्गखोल्या, बसायला बेंचेस, लाईट-पंखा याची सोय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष इ. सोयी सुविधा असलेली, अभ्यासाला पोषक वातावरण असलेली शाळा आम्हाला अपेक्षित होती. पण या शाळेत आम्ही भेट दिल्यावर अनेक सोयीसुविधांचा अभाव आम्हाला जाणवला. वर्गांमध्ये बसायला बेंचेस कमी होते, पंखा-लाईट नव्हती, फ्लोरिंग खराब झाली होती असे अनेक प्रॉब्लेम होते.

म्हणून चैतन्य ग्रुपतर्फे शाळेतील वर्गखोल्या आणि अभ्यासिकेच्या नूतनीकरणाचे काम आम्ही हाती घेतले. साधारण एका महिन्याच्या कालावधीत आम्ही शाळेतील एक अभ्यासिका आणि ३ वर्गखोल्यांचे पुनरुज्जीवन केले. अभ्यासिकेत मुलांना वाचण्यासाठी ५० मराठी पुस्तके देण्यात आली. वर्गखोल्यांच्या फ्लोरिंग, कलरिंग सोबतच वर्गांमध्ये पंखे उपलब्ध करून दिले. सोबतच सर्वात महत्वाचं, शाळेत इ-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली. खालील चित्रांमध्ये आपण ते पाहू शकता.शाळा जरी आदिवासी विभागातील असली तरी तिथल्या मुलांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. उनातून, पावसातून वाट काढत ४-५ किमी पायी प्रवास करून शाळेत येऊन शिकण्यासाठी जिद्द लागते, ती जिद्द त्या मुलांमध्ये आहे. आणि म्हणूनच चैतन्य ग्रुपतर्फे ज्या सोयीसुविधा आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला त्यातून नक्कीच मुलांच्या शिक्षणासाठी आणि एकूणच सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. हा उपक्रम सफल व्हावा म्हणून चैतन्य ग्रुपला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे शतशः आभार.

प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८०)
चैतन्य मित्रमंडळ

*आपल्यापैकी कोणालाही आमच्यासोबत पुढील उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर ९८६९३७१५८० या क्रमांकावर संपर्क करावा. Whatsapp मेसेज केला तरी चालेल.
** अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या ( https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=bookmarks )

No comments:

Post a Comment