Friday 13 October 2017

दिवाळी आणि फटाके

जसं दिवाळी आणि दिवे, दिवाळी आणि रांगोळी, दिवाळी आणि फराळ ह्याच अतूट नातं आहे तसंच दिवाळी आणि फटाक्यांच सुद्धा एक अतूट नातं आहे. लहानपणी अजिबातच फटाके वाजवले नाहीत असे फारच कमी लोक सापडतील. लहान मुलांना फटाक्यांच एक विशिष्ट आकर्षण असतं, मला सुद्धा होतं. माझ्या लहानपणी बाबा मस्जिद बंदरवरुन होलसेल रेट मधे फटाके घेऊन यायचे आणि मग घरी आम्हा दोन भावांमध्ये समसमान वाटणी व्हायची. फुलबाज्या, अनार, भुईचक्र आणि लवंगी एवढेच काय ते फटाके आम्ही वाजवले. खूप मजा यायची. दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर, पहाटे उठा, अभ्यंगस्नान करा, देवाची पूजा करा, देवासमोर फराळ ठेऊन मग त्यावर यथेच्छ ताव मारा. एवढ सगळं झालं की मग फटाके घेऊन फोडायला आम्ही मोकळे. एक वेगळाच आनंद मिळायचा त्यात. बरं तुम्ही म्हणाल आज ह्यावर का बोलतोय ? कारण इतकंच आहे की फटाकेबंदीचा निर्णय आला आणि एक विचार सहज डोक्यात आला की आमच्या लहानपणी अशी बंदी असती तर? ह्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आम्ही घेतला असता का? उत्तर "नाही" असंच आहे.

दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दिल्लीमधे दिवाळीचे ५ दिवस आणि नंतर काही दिवस (१०-१५ दिवस) फटाके वाजवणे आणि निवासी भागात फटाके विकणे ह्यावर बंदी केली. आणि ह्याच बंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा असा कायदा करायचा सरकारचा विचार असल्याचे आपले मंत्री म्हणाले. मुळातच सरसकट बंदीला माझा विरोध आहे. कुठलीही बंदी सरसकट असू नये. हो त्यावर काही निर्बंध असावेत जेणेकरून काही चुकीच्या गोष्टींना आवर घालता येईल. पण आजकाल आपण बघतोय सणांच्या वेळी, विशेषतः हिंदू सणांमध्ये काही चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी उत्सव साजरे करण्यावर बंदी येतेय आणि हेच चुकीचे आहे. विषय दिवाळीचा आहे तर तेवढ्यापुरतच बोलतो. आज ही बंदी येण्याच किंवा होईल भविष्यात, त्याच कारण काय, तर प्रदूषण (हवेच, आवाजाच), वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास. खरं आहे, दिवाळीच्या ५ दिवसात खूप फटाके फोडले जातात, खूप आवाज होतो, पण ह्यावर बंदी हा एकमेव पर्याय नाही ना. चायनीज फटाके आज बाजारात खूप स्वस्त आणि खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात. एका सर्वे नुसार चायनीज फटाके हे आपल्या देशी फटाक्यांपेक्षा अधिक म्हणजे जवळपास दुप्पट प्रदूषण करतात. असे फटाके आज सर्रास विकले जातात. मुळातच चायनीज फटाके भारतात विकायला परवाना नाही तरी कायदा मोडून ते विकले जातात. ह्यावर कंट्रोल कोण करणार?

बरं प्रदूषण प्रदूषण आपण म्हणतोय तर त्यावर जरा बोलू. दिल्लीमधे प्रदूषण मंडळाने एक वर्ष सर्वे केला. त्यातून असे निष्पन्न झाले की सोमवार ते शुक्रवार ह्या दिवशी दिल्ली मधे सरासरी ८०% हवेचे प्रदूषण झाले. शनिवार-रविवार मिळून सरासरी ६०-६५% हवेचे प्रदूषण झाले. आणि दिवाळीच्या ५ दिवसात सरासरी ८४% हवेचे प्रदूषण झाले. ह्याचाच आधार घ्यायचा झाला तर दिवाळीतील हवेचे प्रदूषण हे सरासरी ४% ने वाढले. मग उरलेल्या ८०%च काय ? ते कमी करण्यासाठी आम्ही काय केलं ? आज डिजेल, पेट्रोलच्या गाड्या प्रदूषण करत नाहीत का? आज मुम्बई मधे अनेक सधन एका कुटुम्बामागे 2 चारचाकी व 1 दुचाकी वाहनाची नोंद होते. ह्याला आवर कोण घालणार? आज दुचाकी-चारचाकी वाहनांच्या वापरावर आपण निर्बंध घालू शकत नसताना फटाके बंदीची मागणी करणं म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा आहे. वाहनातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आज इलेक्ट्रिक कार किंवा बाईकचा पर्याय आहे, लहान अंतर सायकलने किंवा चालत जाऊ शकतो, असे अनेक उपाय करता येतील. प्रत्येक कुटुम्बावर गाडी खरेदी करताना निर्बंध घातले जाऊ शकतात, असे अनेक उपाय करु शकतो पण सरकारची ती इच्छाशक्ति आहे का? की ह्या गाड्या प्रदूषण करतात म्हणून त्यांच उत्पादन बंद करणार?

राहिला फटाक्यांचा प्रश्न, तर त्यावर तोडगा नाही निघू शकत ? जसं चायनीज फटाके जे जास्त प्रदूषण करतात, मोठ्या आवाजाचे फटाके जे ध्वनीप्रदूषण करतात, ह्यावर बंदी लादून इतर फटाके लोकवस्ती सोडून एखादं मैदान घ्यावं जिथे हे फटाके फोडावेत. हे आपण रेग्युलेट करु शकत नाही का? बाहेरच्या देशात (न्यूझीलँड इ.) फटाके वाजवायला एक मोकळं मैदान असतं, जिथे परवानगी असलेलेच फटाके फोडता येतात. मग हे आपल्या देशात आपण का करु शकत नाही? तत्सम गोष्टींना सरसकट बंदिचे नियम लावण्यापेक्षा काही मध्यममार्ग काढले तर पर्यावरण आणि लोकभावना दोन्हीचा समतोल राखता येईल, असं मला वाटत. कारण एका बाजूला विकास पाहिजे म्हणून मेट्रो साठी हजारो झाडे तोडायला निघालेले लोकांना पर्यावरण रक्षणाची शपथ देत फटाके बंदीची मागणी करतात तेव्हा हसावं की रडावं हाच प्रश्न उरतो. बाकी आपण सूज्ञ आहातच.

1 comment: