Sunday 28 September 2014

महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा by राज ठाकरे - 2

विकास" म्हणजे काय?

आपला हा "महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा" आहे, त्यामुळे आपण आधी " विकास " म्हणजे काय हे पहायला हवं. "विकास" हा शब्द कदाचित मराठीतील सर्वांत जास्त वापरून वापरून गुळगुळीत झालेला शब्द असावा. विकास हा शब्द 'कस' या शब्दापासून बनतो. 'कस' म्हणजे हलणे, जाणे. "विकास" म्हणजे पुढे जाणे. आत्ता आहोत त्यापेक्षा पुढे जाणे. आपलं जीवनमान सर्व बाजूनं सुधारणे. आनंद वाढवणे.

जगभर यावर गेली काही वर्षं खूप विचार झाला. आपण नुसताच "विकास" करणं उपयोगी नाही तर तो सतत चालणारा असला पाहिजे. म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे म्हणून ती कापून खायची नसते तसंच विकासाचं आहे. विकास असा करायचा नसतो की तो क्षणभंगुर ठरेल. विकास असा करायचा नसतो की तो आज होईल पण उद्या होणार नाही. म्हणून जगात हे मान्य झालं की " विकास " म्हणजे "टिकाऊ विकास". "टिकणारा, सतत चालू रहाणारा विकास". "चिरंतन विकास"

विकास अणि पर्यावरण याविषयावर काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे युनायटेड नेशन्स वर्ल्ड कमिशन ऑन एनव्हायर्नमेंट अॅन्ड डेव्हलपमेंट (United Nations World Commission on Environment and Development) या नावाची. या संस्थेने १९८७ मध्ये "टिकाऊ विकासाची" एक सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात: "जेंव्हा आजची पिढी त्यांच्या आजच्या गरजा भागवताना उद्याच्या पिढीच्या विकास करण्याच्या क्षमतेत बाधा आणत नाही तेंव्हा तो टिकाऊ विकास म्हणायचा ".

"विकास" म्हणजे "टिकाऊ विकास", "चिरंतन विकास" आणि तो करताना काहीही ओरबाडणार नाही, उद्याच्या पिढ्यांना त्रास होणार नाही तो विकास असं आम्हीही मानतो. त्यासाठी आम्ही १० प्रश्न समोर ठेवले आहेत. ज्यांची उत्तरे दिल्यावर विकास झाला की नाही हे ठरेल. ते प्रश्न असे:

1) लोक सुरक्षित आहेत ना?
2) महाराष्ट्रातल्या माणसा-माणसांमध्ये आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक गोष्टींमध्ये भीषण अशी तफावत तर नाही ना?
3) लोकांना पुरेसं खायला आणि पुरेसं प्यायला शुद्ध पाणी मिळतंय ना?
4) लोकांना परवडणारी घरं - त्यात शांतता, खाजगी जागा, नळानं पाणी, शौचालय अशा सुविधा - मिळताहेत ना?
5) त्यांना पुरेशा, समाधानकारक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ना?
6) ते त्यांच्या मुलांना त्यांना परवडेल अशा पद्धतीनं दर्जेदार आणि नव्या युगाच्या दृष्टीनं योग्य असं शिक्षण देऊ शकताहेत ना?
7) त्यांना त्यांच्या जवळ आणि त्यांना परवडेल अशी आरोग्य सेवा मिळतीय ना?
8) त्यांना शुद्ध हवा, त्यांच्या हक्काची नैसर्गिक साधनसंपत्ती, सोयी-सुविधा आणि मनोरंजनाची साधनं मिळताहेत का?
9) लोकांमध्ये अस्मिता जागृत आहे का?
10) ते भविष्याकडे आशेनी, अपेक्षेनी, महत्वाकांक्षेनी पहाताहेत ना?

अगदी थोडक्यात -

विकास म्हणजे लोकांचा विकास.

विकास म्हणजे लोकांची सुरक्षितता, लोकांचा आनंद.

विकास म्हणजे सर्वांना पुढे जाण्याची संधी.

महाराष्ट्राकडे जे आहे ते वाचवणं, टिकवणं, जोपासणं आणि वाढवणं म्हणजे 'विकास'. मग त्यात निसर्ग आला, संपत्ती आली, नद्या आल्या, माणसं आली, माणसांची क्षमता आली, मराठी संस्कृती आली.

महाराष्ट्राचा विकास म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा विकास.

होय. हे शक्य आहे 

शेवटी थोडक्यात –

आनंदी समाज, आनंदी महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र. मूलभूत गरजा भागलेला, नव्या आकांक्षा मनात ठेवून पुढे जाणारा महाराष्ट्र.

ज्ञानी समाज, ज्ञानी महाराष्ट्र. दर्जेदार शिक्षण, व्यवसाय शिक्षण आणि तंत्रज्ञानानं युक्त असा नव्या युगातला महाराष्ट्र.

खुली अर्थव्यवस्था, मुक्त वातावरण. उद्योगाचं मुक्त वातावरण, शेती खुल्या अर्थव्यवस्थेला जोडलेली असा उद्योजक महाराष्ट्र.

स्वावलंबन – शासनाचे, लोकांचे. नवा आर्थिक विचार, नवी करप्रणाली, बळकट स्थानिक स्वराज्य संस्था.
गुणांवर, मुक्त स्पर्धेला उत्तेजन देणारी व्यवस्था. सर्वत्र दर्जा महत्वाचा, कामात, शिक्षणात, उद्योगात, प्रशासनात, गुणांना वाव देणारी व्यवस्था.

विकेंद्रित रचना – विकासाची, राज्यकारभाराची, प्रशासनाची. स्थानिकांच्या हाती अधिक कारभार आणि जबाबदारी, विकासाचा असमतोल कमी केलेला.

जागतिक नकाशावरचा बलवान महाराष्ट्र प्रागतिक दृष्टी ठेवून, जागतिक स्पर्धेत अव्वल ठरलेला, मराठी महाराष्ट्र.

या घडीला आज आपण हा नवा, उद्याचा, प्रगतीशील महाराष्ट्र उभा करण्याची आकांक्षा मनात ठेवायला हवी. त्यासाठी योगदान देण्याची तयारी हवी.

मला तुमची साथ हवी..

माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्र तुम्हाला साद घालतो आहे, त्या हाकेला ओ देण्यासाठी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी तयार रहा, तसंच त्यासाठी कष्ट करण्याची आणि तुमचं योगदान देण्याचीही तयारी ठेवा. लक्षात ठेवा काहीही फुकट मिळत नाही. कष्ट करून मिळवावं लागतं आणि आपल्याला माहीत आहे जे फुकट मिळतं ते टिकत नाही आणि आपल्याला तर टिकाऊ, अनेक वर्ष चालणारा विकास या महाराष्ट्रात करायचा आहे. तुम्हा सर्वांच्या सहकर्याची मी मनोमन अपेक्षा बाळगतो.

सस्नेह जय महाराष्ट्र!

आपला नम्र

राज ठाकरे

http://mnsblueprint.org/

No comments:

Post a Comment