Saturday, 27 September 2014

महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे - 1

महाराष्ट्राचा विकास आराखडा राज ठाकरे ह्यांनी मांडला त्यातील काही भाग आपल्यासाठी मी ह्या ब्लॉग च्या माध्यमातून मांडणार आहे……

विकास आराखडा कशासाठी

राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवानं आपण तशा व्यापक अर्थानं त्याच्याकडे पाहत नाही.
"आपला देश किंवा राज्य कसं चाललं पाहिजे? कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे? त्याचे आग्रह काय असले पाहिजेत? राज्य कशासाठी चालवलं पाहिजे? याचा विचार मांडणं, त्या विचाराचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवणं" म्हणजे राजकारण.

म्हणूनच राजकारण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं, त्या विचाराला मूल्यांचा आधार असणं आवश्यक आहे, हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा, काही आग्रह असणं आवश्यक आहे. तो विचार आपण सर्वांनी मिळून ठरवावा, कुठे जायचं ते निश्चित करावं, आपली दिशा पक्की असावी आणि आपण सर्वांनी मिळून एका मोठ्या मराठी समाजाचं आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पहावं म्हणून हा "महाराष्ट्राचा विकास आराखडा" आम्ही तयार केला आहे.

स्वत:चं राज्य कशासाठी आहे, ते काय करणार आहे याचा आराखडा देणं ही गोष्ट इतिहासाला नवीन नाही. जगात कित्येक राजांनी, राष्ट्राध्यक्षांनी, पक्षांनी आपला दृष्टीकोन, आपला विचार त्यांच्या त्यांच्या लोकांसमोर ठेवला आहे. आपल्या समाजाला पुढे नेण्याचा आराखडा दिला आहे. आमचाही तोच प्रयत्न आहे.
यातलं सर्वात मोठं उदाहरण आपल्या सम्राट अशोकचं. इसवी सन पूर्व २६४ ते २२७ म्हणजे सुमारे २२५० वर्षांपूर्वी हा राजा होऊन गेला १ . केरळ आणि तमिळनाडूचा काही भाग सोडला तर आजच्या भारताच्या जवळजवळ सर्व भागावर आणि आजच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंत सम्राट अशोकचं साम्राज्य होतं. जवळजवळ चाळीस वर्षं हा राजा सत्तेवर होता आणि त्यानं समाजोपयोगी अनेक कामं केली. असं म्हणतात की माणसाच्या इतिहासातला सम्राट अशोक हा पहिला राजा की ज्यानं लोकांचं भलं करणं, आर्थिक विकास करणं आणि समाजात शांतता पसरावी म्हणून प्रयत्न करणं ही कामं केली. एच.जी. वेल्स नावाचे एक फार मोठे इतिहासकार होऊन गेले. त्यांचं एक पुस्तक आहे, The Outline Of History या नावाचं. त्या पुस्तकात ते सम्राट अशोकचा उल्लेख फारच आदरानं करतात. ते म्हणतात - "इतिहासाच्या पानांपानांतील हजारो राजा-सम्राटांमध्ये सम्राट अशोकचं नाव सर्वोच्च स्थानातील एकुलता एक तारा असावा असं आहे २ ."
आणखी एक गंमत म्हणजे याच सम्राट अशोकने आपल्या साम्राज्यात ठिकठिकाणी शिलालेख लिहून आपले विचार, आपली तत्वं किंवा एका अर्थानं "आपली ब्लू-प्रिंट" लोकांसमोर ठेवली. यातीलच एक शिलालेख आपल्या महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यातील सोपारा या गावाजवळ सापडला आहे ३ .

सम्राट अशोक प्रमाणेच काही राजांनी, राष्ट्राध्यक्षांनी, राजकीय विचारवंतांनी आपापल्या परीनं त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या दृष्टीनं समाज कसा असला पाहिजे याची मांडणी केली आहे. आपल्याकडे चाणक्यानं इसवी सन पूर्व तीनशेच्या आसपास लिहून ठेवलं, १८४८ मध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एन्जल्सनी कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा लिहिला किंवा १८४९ मध्ये हेन्री डेव्हीड थोरो, ज्यांच्यापासून गांधीजींनी प्रेरणा घेतली आणि जॉन रस्कीन यांनी १८६० मध्ये समाज कसा असावा आणि राज्य कसं चालवावं हे लिहून ठेवलं. लेनिनने रशियात १९०५ मध्ये Two Tactics of Social Democracy in the Democratic Revolution हे पुस्तक लिहिलं किंवा गांधीजींनी १९०९ मध्ये त्यांची आदर्श भारताची संकल्पना "हिंद स्वराज्य" मध्ये मांडली. हिटलरनं लिहिलेलं "Mein Kamph" किंवा "माझा लढा" हे सुद्धा त्याच पठडीतलं लेखन जगानं पाहिलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची २२ तत्वं, माओनी सांस्कृतिक क्रांतीविषयी केलेलं लिखाण, किंवा धरमपाल यांनी १९८३ मध्ये The Beautiful Tree मध्ये लिहिलेल्या एका आदर्श समाजाची कल्पना यातून समाज कसा असावा, कसा चालावा या बाबतीत अनेक विचारवंतांनी, थोर लोकांनी लिहून ठेवलंच आहे. इथे त्यांच्याशी तुलना वगैरे करण्याचा मुळीच हेतू नाही. ही सर्व माणसं मोठीच आहेत, फक्त समाजाला पुढे जायचं असेल तर त्यासाठी विचार असावा, दृष्टी असावी आणि राजकारण हे समाजाला पुढे नेणारं असावं; असं जर असेल तर राजकारणाला पक्क्या विचाराची बैठक असावीच लागते हे मात्र अगदी निश्चित !

त्यामुळे राजकारणाला विचार असावा लागतो, काय योग्य किंवा काय अयोग्य हे ठरवायला लागतं आणि कशा मार्गानं पुढे जायला हवं हे ही सांगावं लागतं. राजकारणाचं काम समाजाला दिशा देण्याचं आहे. जो समाजाला दिशा दाखवतो, पुढे नेतो तो नेता.
आम्ही महाराष्ट्राचा विचार कसा करतो आहोत, या महाराष्ट्रानं आता कुठल्या मार्गानं जायला पाहिजे असं आम्हाला वाटतं या विषयी आमची भूमिका मांडणं हे या "महाराष्ट्राच्या विकासाच्या आराखड्यात" करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
एक प्रश्न तुमच्या मनात नक्की येत असणार की: एवढा गाजावाजा करून, अनेक वर्षं ती बनवण्यासाठी घेऊन ही ब्लू-प्रिंट किंवा हा "महाराराष्ट्राचा विकास आराखडा" लिहिण्याची खरंच काय गरज होती?
एकेकाळचा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेला महाराष्ट्र आज अधोगतीच्या मार्गावर आहे. देशात जे राज्य पुढारलेले व विकसित म्हणून ओळखले जायचे ते राज्य आज केवळ आपल्या गतवैभवाची टिमकी मिरवण्यात गर्क आहे किंवा खरं पाहिलं तर धड त्यातही गर्क नाही. इथे सध्या काही नवीन घडताना दिसत नाही. नवीन निर्मिती होत नाही. कुठल्याच क्षेत्रात नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांतील चांगल्या प्रयोगांना बळ मिळण्याऐवजी ते आज त्यांच्या अस्तित्वासाठीच धडपडताना दिसत आहेत.
जे राज्य सुधारकांचे राज्य म्हणून ओळखले जायचे ते आज नीतीमत्तेच्या अत्यंत खालच्या पातळीला जाऊन पोचले आहे. समाज सुधारकांचे हे राज्य आज स्त्री-भृण हत्येच्या दुष्कृत्यानं गाजत आहे. किंबहुना या अधोगतीची चिन्हे आज सर्वच क्षेत्रांत दिसत आहेत. राज्याच्या राजकीय नेतृत्वाच्या बाबतीत विचार केला तर आजच्या इतके भ्रष्ट व स्वार्थी राजकीय नेते व प्रशासन राज्याच्या इतिहासात कधीही सापडणार नाही. उद्योग क्षेत्रातूनही विशेष ऊर्जा मिळताना दिसत नाही.
राज्य आज कर्जात बुडाले आहे. राज्याच्या तिजोरीत जमा होणारा पैसा सार्वजनिक कामांसाठी वापरला जाण्याऐवजी भ्रष्ट नेते आणि अधिकारी स्वतःच्याच खिशात भरत आहेत. राज्यातील बहुतांश सरकारी - निमसरकारी संस्था (पालिका, ग्रामपंचायती, महामंडळे, सहकारी बॅंका, इ.) आर्थिक दृष्ट्या डबघाईला आल्या आहेत (२०११-१२ मध्ये अकोला महानगरपालिका बुडाल्यामुळे बरखास्त करावी लागली होती). आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलेली आहे. सर्वत्र एक अंधाराचं, निराशेचं वातावरण आहे.
या बद्दल फार काही सांगण्याची गरज नाही. रोज, वर्तमानपत्रातील अग्रलेखांतून, वाहिन्यांच्या चर्चा सत्रांतून आणि प्रत्यक्ष अनुभवातून आपण हे सर्व ऐकतो आहोत, पाहतो आहोत. अनुभवतो आहोत.
हे सर्व आपल्याला इतक्या खोल दरीत घेऊन गेलंय की आपली स्वप्नं पहायची क्षमताच आपण हरवून बसलो आहोत.
जागतिक पातळीवर मात्र प्रगती, विकास या संकल्पनांचा विचार नव्याने आणि फार झपाट्याने होत आहे. एकीकडे जी-८ या बलाढ्य देशांची आर्थिक परिस्थिती कोसळत आहे. दुसरीकडे हवामान बदलाचे वारे अनिश्चितपणे सगळीकडे वाहत आहेत. आजपर्यंत कधी न जाणवलेला नैसर्गिक साधन संपत्तीचा र्हा्स होत असताना आपण उघड्या डोळ्यानं पाहतो आहोत. या सगळ्याची नोंद घेत आज जगात नव्या जीवन पद्धतीचा नवीन विचार मांडला जात आहे. हा विचार तपासून पाहण्यासाठी नवीन नवीन अभ्यास होत आहेत, नवीन सिद्धांत, नवीन कल्पना मांडल्या जात आहेत. अनेक ठिकाणी तर तसे प्रयोगही केले जात आहेत. माणसाला नेहमीच प्रश्न पडले आणि त्यातून त्यानं उत्तरं शोधली. किंबहुना प्रश्न पडले म्हणूनच माणसानं प्रगती केली. आव्हानं आली म्हणूनच त्यानं धडपड केली आणि समाज पुढे नेला. आज सर्वत्र याचा शोध फार गंभीरपणे चालू आहे. आपणच यात काही करत नाही. आपणच डोळ्यांवर झापडं लावून आपल्याच नादात मश्गूल आहोत.
आपल्याला जागं व्हायला पाहिजे. आज आपल्याला देखील एक स्वप्न पडायला पाहिजे.
जे स्वप्न आपल्याला दिशा देईल, सर्वांना एकत्र ठेवेल. एक उर्जा देईल. चारी बाजूनं दाटत असलेल्या गर्द काळोखात एक दिवा पेटवेल.

या दरीतून महाराष्ट्राला बाहेर खेचण्यासाठी काही मूलभूत विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटली आणि विचार करताना तो विचार लांबपल्ल्याचा असावा हे ही प्रकर्षानं जाणवलं. राज्याची बांधणी करताना आपण पुढच्या शतकाचा तरी विचार करायला हवा. आपण जी काही पायाभरणी करु त्यामुळे महाराष्ट्र पुढची १०० वर्ष विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर चालत राहिला हवा. ज्या गोष्टी आपण येत्या दहा वर्षांत उभ्या करू त्यानं मराठी समाज पुढची अनेक दशकं नव्हे तर अनेक शतकं वैभवशाली वाटेनं चालत राहिला हवा.
केवळ या आणि एवढ्याच भावनेनं तुमच्यासमोर हा महाराष्ट्राच्या विकासाचा समग्र आराखडा मांडतो आहोत.
या विकास आराखड्यामुळे काय होईल? त्याचा महाराष्ट्राला काय उपयोग होईल?
खूप गोष्टी होऊ शकतील...

1) सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना, सर्व मराठी समाजाला एक स्वप्न पाहता येईल.

हा आराखडा हा काही एका व्यक्तीचा, एका पक्षाचा नाही. तो आम्ही बनवला असला तरी तो पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे. माणसाचा इतिहास असं सांगतो की अशाच समाजांचा विकास झाला आहे ज्या समाजांना सर्वांचं मिळून एक आणि एकत्र पाहिलेलं स्वप्नं होतं. लिंकन किंवा रूझवेल्टच्या काळातली अमेरिका घ्या, चर्चिलच्या काळातलं इंग्लंड घ्या, माओच्या वेळचा चीन घ्या, महाराजांच्या काळातला महाराष्ट्र घ्या किंवा स्वातंत्र्याच्या काळातला भारत देश किंवा अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळचा महाराष्ट्र घ्या. या सर्व समाजांना त्या त्या वेळी एका स्वप्नानं पछाडलं होतं. वेडं केलं होतं. सर्व समाज एक होऊन एक महान स्वप्न पाहत होता. आज आपणही महाराष्ट्रात असं स्वप्न पाहण्याची गरज आहे.

2) आपण भविष्यात बघायला शिकू

म्हणतात की ज्याला इतिहासाचं भान आहे त्यालाच भविष्य आहे आणि जो भविष्यात पाहतो त्याचंच भविष्य घडतं सुद्धा. आपण भविष्यात पहायला शिकलं पाहिजे. भविष्यवेध घेतला पाहिजे. भविष्याचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपला मराठी समाज, आपला महाराष्ट्र कसा असला पाहिजे? येत्या काही वर्षांत या समाजापुढे काय आव्हानं असणार आहेत? त्यावर आपण कशी मात केली पाहिजे यावर आपल्यातल्या एक-दोघांनी नव्हे, एखाद्या पक्षानं नव्हे तर सगळ्याच समाजानं विचार करायला पाहिजे. हा आराखडा या सर्वांची उत्तरं देईल असं आम्ही मुळीच म्हणणार नाही पण निदान त्यामुळे आपल्या समाजाचा भविष्यवेध घ्यायची सुरुवात तरी आपल्यामध्ये नक्कीच होईल.

3) "रोजच्या प्रश्नाच्या पलीकडे" जायला लावेल

आपण सगळेच रोजच्या प्रश्नांत गुंतलेले असतो, आहोत. तुमच्या वॉर्डातला कचरा कुंडीचा प्रश्न असेल किंवा तुमच्या मुलीच्या शाळेच्या प्रवेशाचा प्रश्न असेल किंवा तुमच्या गावात, शेतात पाणी नाही असा तुमचा प्रश्न असेल. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा प्रत्येक प्रश्न जरी इथे सुटेलच असा दावा आम्ही करणार नसलो तरी या आराखड्यातून "तुमचा प्रश्न कसा सुटेल?" याची दिशा तरी अगदी नक्कीच तुम्हाला दिसेल. ह्या आराखड्यात आम्ही "मोठे", "व्यापक संदर्भ असलेले" प्रश्न घेतले असले तरी त्याचा संबंध रोजच्या प्रश्नांशी, रोजच्या समस्यांशी आहे. आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. मात्र आपल्याला त्या रोजच्या प्रश्नांच्या जंजाळातून सुटून प्रगतीच्या वाटेनं गतीनं सुसाट निघायचं असेल तर तसं करण्याची संधी या आराखड्यामुळे मिळेल.

4) आपलं मूल्यमापन, आत्मपरीक्षण होईल

आज आपण कुठे आहोत हे यामुळे समजेल. जगात अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपला पुढचा समाज कसा असावा यावर सखोल विचार चालू आहे. काही समाजांनी, देशांनी यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. ज्या क्षेत्रात त्यांना प्रगती करण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रात फार अभिनव पद्धतीनं मार्ग काढत आहेत. त्या संदर्भात, जगाच्या तुलनेनं आप ण कुठे आहोत हे ही आपल्या या आराखड्यामुळे लक्षात येईल. काही प्रश्नांवर जगानं मार्ग काढला पण आपण तसेच मागं राहिलो असं होऊ नये. या विकास आराखड्यामुळे जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत आणि काय करायला हवं याची स्पष्टता येईल.

5) समाज चिरंतन टिकावा, संपन्न रहावा याचा विचार होईल

एक छान म्हण आहे. म्हटलंय: "तुम्हाला आत्ता भूक लागली असेल तर समोरच्या झाडावरचं फळ तोडून खा. तुम्हाला पाच वर्षं, सात वर्षं असा विचार करायचा असेल तर झाड लावा, पुढच्या २०, ३० वर्षांचा विचार करायचा असेल तर माणूस पेरा आणि पुढच्या १००-१५० वर्षांचा विचार करायचा तर समाजात विचार पेरा". आपल्याला चिरंतन विचार करायचा आहे. मराठी समाज प्रगतीच्या वाटेनं कायमच चालत रहावा अशी आमची तळमळ आहे, पण त्यासाठी महाराष्ट्रात विचार पेरला पाहिजे. तो विचार पेरण्याचं काम हा आराखडा करेल असं आमचं म्हणणं नाही, पण निदान त्याची सुरुवात तरी करेल किंवा तसा काही विचार चालू असेल तर त्यात हा आराखडा आपलं योगदान देईल.

6) सर्वांगीण, मूलगामी विचार करता येईल

खूपदा आपण पठडीबद्ध विचार करतो. झापड लावून पहात असतो. या आराखड्यामुळे आपल्याला सर्व बाजूनं विचार करता येईल. पर्यावरण आहे, हवामानातील बदल आहेत या गोष्टींपासून ते अगदी शेती, शिक्षण,वाहतुक अशा समाजातल्या सगळ्या अंगांचा आपला अभ्यास या निमित्तानं होईल. खूपदा प्रगतीच्या वाटेनं चालत असताना काही गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. काही भाग मागे पडण्याची शक्यता असते. आपल्याला महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील समाजाच्या विकासाचा चारी बाजूनं विचार यामुळे करता येईल. आम्ही काही मांडलं असलं आणि आमच्याकडून काही राहिलं असलं तरी तुमच्या सूचना घेऊन आपल्या सर्वांना पुढे जाता येईल.

7) काही जगावेगळा विचार करण्याची संधी मिळेल

असं म्हणतात की जगाचे प्रश्न इतके जटील झालेत, इतके गुंतागुंतीचे झालेत की ते सोडवण्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. ज्याला इंग्रजी मध्ये "out of the box" कल्पना म्हणतात तसा विचार केला तरच मार्ग निघेल. तसं काहीसं करण्याचा प्रयत्न आम्ही इथे केला आहे, पण त्यामुळे मराठी समाजात काही आगळा-वेगळा पण समाजाला अत्यंत लाभदायक विचार ह्यामुळे होऊ शकला तर ते ह्या आराखड्याचं यश म्हणावं लागेल.

8) समाजातील सर्वांचा साकल्यानं, पूर्णपणे विचार करता येईल

आपल्याला समाजातल्या प्रत्येकाचा विचार करायला हवा. अगदी शेवटच्या माणसापर्यंत, त्याच्या झोपडीपर्यंत पोहचायला हवं. छोट्या छोट्या योजनांमध्ये हे शक्य होत नाही. छोटा छोटा विचार केला तर तो आवाका मिळत नाही. इथे मात्र अधिक विस्तारपूर्वक विचार केला असल्यानं समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करता येईल. कुणीही सुटणार नाही, मागे राहणार नाही.

9) महाराष्ट्राला आपला प्राधान्यक्रम ठरवता येईल

आणि, सर्वांत महत्वाचं म्हणजे आधी काय, महत्वाचं काय, काय वाचवलं पाहिजे, काय सोडून देऊन चालेल, कशावर भर द्यायला पाहिजे अशा संवेदनशील, कधीकधी कटू वाटतील अशा गोष्टींना या निमित्तानं हात घालता येईल. आपला महाराष्ट्र इतिहासानं, परंपरेनं खूप श्रीमंत असला, आपल्याकडे चांगली निसर्गसंपत्ती असली आणि थोरा-मोठ्यांचा वारसा आपल्याला असला तरी आपण काही पैशानं, संसाधनानं फार श्रीमंत, संपन्न नाही. त्यामुळे कमी पैशात, मर्यादित साधनांमध्ये आपल्याला प्रगती कशी साधता येईल याचा विचार करायचा तर आपल्याला आपला प्राधान्यक्रम या निमित्तानं ठरवता येईल.

via
http://mnsblueprint.org/

No comments:

Post a Comment